टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अमित शहा, पहलाज निहलानी, प्रसून जोशी, वांग यांग, मुक्ता टिळक आणि सैोदी एअरलाइन्स
  • Tue , 15 August 2017
  • विनोदनामा टपल्या अमित शहा Amit Shah पहलाज निहलानी Pahlaj Nihalani प्रसून जोशी Prasoon Joshi वांग यांग Wang Yang मुक्ता टिळक Mukta Tilak सैोदी एअरलाइन्स Saudi Airlines

१. भारतासारख्या मोठ्या देशात आजवर अनेक दुर्घटना घडल्या आहेत, गोरखपूरमधील रुग्णालयात घडलेले मृत्यू ही काही पहिली मोठी दुर्घटना नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे. राजीनामे मागणं काँग्रेसचं काम आहे त्याप्रमाणे ते मागत आहेत असंही शहा यांनी स्पष्ट केलं आहे. जन्माष्टमीचा उत्सव आपल्या जागी आहे. जन्माष्टमी साजरी करावी ही लोकांची धारणा आहे, त्यामागे सरकारचं काहीही धोरण नाही, असंही अमित शहा यांनी म्हटलं आहे. दरम्यान, आदित्यनाथ यांच्याकडून प्रशासनाला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा, असे आदेश देण्यात आले आहेत.

नवं काहीच नाहीये खरं तर. सगळं जुनंच आहे. फक्त भारतीय जनता पक्षाचं देशात बहुमताने आलेलं सरकार पहिल्यांदाच आलेलं आहे. अमित शहा आणि आदित्यनाथ हे त्यांच्या त्यांच्या पदांवर पहिल्यांदाच बसलेले आहेत आणि या पदांवर गेंड्यासारख्या जाड कातडीचे लोकही काही पहिल्यांदा बसलेले नाहीत. राज्यात मोठी दुर्घटना घडलेली असताना ती विसरून सणबाजीमध्ये मग्न होण्याचाही हा पहिला प्रकार नसेलच. अब की बार, घिसीपिटी सोच वाली पुरानी सरकार!!

.............................................................................................................................................

२. ‘चीन आणि पाकिस्तानची मैत्री पोलादापेक्षा जास्त मजबूत आणि मधापेक्षाही अधिक गोड आहे,’ अशा शब्दांमध्ये चीन-पाक मैत्रीचं वर्णन करत चीनचे उपपंतप्रधान वांग यांग यांनी पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चीन आणि पाकिस्तान प्रतिकूल परिस्थितीतही एकमेकांसोबत ठामपणे उभे आहेत, असे वांग स्वातंत्र्यदिनानिमित्त इस्लामाबादेत आयोजित सोहळ्यात म्हणाले.

चीनची मैत्रीची भाषा मधापेक्षा गोड असते, तेव्हा तो आपल्या ‘मित्रा’च्या गळ्याभोवती पोलादापेक्षा मजबूत पकड बसवण्याच्या प्रयत्नात असतो, हा इतिहास किमान भारताच्या अनुभवातून तरी पाकिस्तानने शिकायला हरकत नव्हती. मात्र, तशी शक्यता अजिबातच नाही. या प्रांतातलं सत्तासंतुलन आणि पाकिस्तानचा सगळा अस्तित्वाचा डोलाराच भारतद्वेषावर उभारलेला असल्याने ड्रॅगनने गिळंकृत करेपर्यंत पाकिस्तानला शुद्ध येणार नाही. त्यांना आणखी किती स्वातंत्र्यदिन साजरे करता येतील, याचा भरोसा नाही.

.............................................................................................................................................

३. भाऊसाहेब रंगारी यांनीच पहिल्यांदा गणेशोत्सवाला सुरुवात केली तर लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा प्रसार केला, हे पुण्याच्या महापौर आणि लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील सूनबाई मुक्ता टिळक यांनी मान्य केलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सव यंदा १२६व्या वर्षांत पदार्पण करत असल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे, असं भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने म्हटलं आहे. मुक्ता टिळक यांनी ते मान्य केल्याची ध्वनीफीत ट्रस्टने पत्रकार परिषदेत सादर केली.

लोकमान्य टिळकांच्या वंशजांनी सार्वजनिक पदावरून या क्रमाला मान्यता दिल्यानंतर आणि पुण्यात १२५वा नव्हे, तर १२६वा गणेशोत्सव साजरा होत असताना आता याची अधिकृत इतिहास म्हणून नोंद होणार का? गणेशोत्सवाला आलेलं एकंदर स्वरूप पाहता तसं झालं तर लोकमान्य टिळक हे गणेशोत्सवाचे जनक नाहीत याने त्यांचं प्रतिमाहनन होण्यापेक्षा ती आणखी उजळून निघण्याचीच शक्यता जास्त आहे.

.............................................................................................................................................

४. सौदी एअरलाइन्सने प्रवाशांसाठी नुकताच नवा ड्रेसकोड जाहीर केला असून त्यानुसार आता पुरुष आणि महिला प्रवाशांना संपूर्ण अंग झाकणारे कपडे घालावे लागणार आहेत; अन्यथा त्यांना विमानात चढून दिले जाणार नाही. सौदी एअरलाईन्सच्या संकेतस्थळावर प्रवाशांच्या या ड्रेसकोडची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विमानातील इतर प्रवाशांना आक्षेप असेल असे कपडे कोणत्याही प्रवाशांनी घालू नयेत, असे संकेतस्थळावर म्हटले आहे. याशिवाय, पाय आणि हात दिसतील किंवा पारदर्शी आणि गरजेपेक्षा जास्त घट्ट असलेले कपडे घातलेल्या महिलांना विमानात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच शॉर्टस घालून अंगप्रदर्शन करणाऱ्या पुरूषांनाही विमानात बसू दिले जाणार नाही, असा सूचना सौदी एअरलाईन्सने दिल्या आहेत.

विमानातील इतर प्रवाशांच्या आक्षेपाला इतकं महत्त्व? कोणत्या प्रवाशांच्या आणि किती प्रवाशांच्या आक्षेपावर ठरणार हे? विमानात सगळे अल्पवस्त्रांकित प्रवासी असतील आणि त्यांच्यापैकी कोणी नखशिखांत वेष परिधान केलेल्या प्रवाशाबद्दल आक्षेप नोंदवला, तर त्याला विमानातून उतरवणार की वैमानिक अर्ध्या वाटेत उतरून जाणार? सौदीमधले लोक विमानातून प्रवास करतात ते इकडून तिकडे जायला की इतरांच्या बायकांचे हातपाय पाहायला?

.............................................................................................................................................

५. केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाच्या (सीबीएफसी) अध्यक्षपदावरून संस्कारपटू पहलाज निहलानी यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी प्रसिद्ध गीतकार आणि अॅडमेकर प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या २३ सदस्यांच्या कार्यकारिणीत अभिनेत्री विद्या बालन हिचा समावेश करण्यात आला आहे. १९ जानेवारी २०१५ रोजी निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. ‘उडता पंजाब’, ‘इंदू सरकार’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ आणि सध्या प्रसिद्धीच्या वाटेवर असलेल्या ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या चित्रपटात त्यांनी अनेक कट सुचवले होते. त्याविरुद्ध एकत्र येऊन काही दिग्दर्शकांनी निहलानींना हटवण्याची मागणी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘अॅक्शन हिरो’ संबोधून आपल्या राजकीय निष्ठा स्पष्ट केल्या होत्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे असल्याचा आरोपही अनेकदा झाला होता.

निहलानींच्या जागी प्रसून जोशी आल्याने काही क्रांतिकारक बदल घडतील, अशी अपेक्षा इतक्यात करणं चुकीचं ठरेल. प्रसून जोशी हे संवेदनशील गीतकार आहेत, पण, त्यांनी जाहिरात व्यवसायाचा भाग म्हणून का होईना, भाजपच्या प्रचारमोहिमेचं लेखन केलं आहे, कॉपीरायटिंग केलं आहे, हे विसरता येणार नाही. निहलानींना थेट भिडता येत होतं, जोशींनी त्यांचाच कित्ता चालवायचा ठरवला, तर शब्दप्रभुत्व वापरून ते त्याचं तत्त्वज्ञान उभं करू शकतात. शेवटी सेन्सॉरचे कालबाह्य नियम बदललेले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......