अजूनकाही
‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ किंवा त्याहीपेक्षा ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ या ‘सामना’ चित्रपटातील गाण्यांचे संगीतकार म्हणून भास्कर चंदावरकर हे नाव बहुतेक सर्वांना परिचयाचं असेल. ‘श्री गणराय नर्तन करी, आम्ही पुण्याचे…’ हे ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचं संगीतही त्यांचंच, हे काही थोड्या लोकांना माहीत असेल. चंदावरकर पं. रविशंकर यांचे शिष्य. आणि चांगले सतारवादक होते, हेही अगदी मोजक्या लोकांनाच माहीत असेल.
मी हे सगळं का सांगतोय तर त्यांच्या ‘वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्त्वे’ या पुस्तकाचा परिचय आज करून देणार आहे.
चंदावरकर जुलै २००९मध्ये गेले. बहुतेक त्यांच्या प्रथम स्मृतिदिनाला हे पुस्तक प्रकाशित झालं असावं. चंदावरकरांच्या सहधर्मचारिणी मीना यांनी मान्यवर स्नेह्यांच्या साहाय्यानं हे पुस्तक आकाराला आणलं. मीनाबाईंना खरोखर धन्यवाद!
त्या प्रास्ताविकात म्हणतात, “वास्तविक आतापर्यंत त्यांनी (भास्करजींनी) सहा-सात पुस्तके तरी लिहायला हवी होती…” हे पुस्तक वाचून पूर्ण झालं की, मीनाबाईंचं हे विधान अधिक हळहळ लावून जातं. आणखी एका गोष्टीची मला खूप हळहळ वाटली. भास्करजींच्या हातून ग्रंथलेखन झालं नाही याचं पहिलं कारण मीनाबाई देतात - “प्रमुख कारणातील महत्त्वाच्या बाबी म्हणजे लोक जमवून गप्पांच्या मैफली रंगवायची (भास्करजींची) हौस!” हळहळ अशी की, अशा मैफलींत मला सहभागी होता आलं नाही.
एक व्यक्तिगत संदर्भ सांगावासा वाटतो. २००२-०३मध्ये ‘युनिक फीचर्स’च्या ‘अनुभव’ मासिकासाठी शिवजी, हरिजी, विश्वमोहन भट, शोभाताई (गुर्टू) अशा १२ कलाकारांच्या मुलाखती मी घेतल्या. त्यानंतर मुलाखतींचा दुसरा दौर सुरू करावा आणि भास्कर चंदावरकरांची मुलाखत घ्यावी असं संपादकांनी सुचवलं. पण माझ्याकडून ते झालं नाही. असो.
भास्करजींनी पाच-सहा पुस्तकं लिहिली नाहीत, याची आणखी काही कारणं मीनाबाईंनी दिली आहेत. “पायांवर पडलेले नक्षत्र…” म्हणजे जगभर भ्रमंती. आणखी एक कारण म्हणजे “अफाट वाचन”. वाचनामुळे लिहायला वेळ मिळाला नाही असं सोपं समीकरण नाही बरं का! “(थोरांनी) एवढं सगळं लिहून ठेवलंय, त्यात मी काय वेगळं लिहिणार?” अशी चंदावरकरांची धारणा होती. ही सगळी कारणं वाचली की, चंदावरकरांनी ग्रंथलेखन केलं नाही, याची हळहळ जास्तच वाटू लागते!
बरं, तर मग हे पुस्तक कसं लिहिलं? काय आहे या पुस्तकात? तर हे Twin book म्हणजे दोन पुस्तकांचा संच आहे- ‘वाद्यवेध’ आणि ‘भारतीय संगीताची मूलतत्त्वे’. पृष्ठे अनुक्रमे १३६ आणि ७३. चंदावरकरांनी ‘भारतीय संगीताची मूलतत्त्वे’ या विषयावर २००४ साली सात आणि २००९ साली पाच व्याख्यानं दिली होती. त्या व्याख्यानांवर संस्करण करून त्याचं पुस्तक (पुस्तकार्ध?) बनलं आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताची चंदावरकरांनी नऊ मूलतत्त्वं सांगितली आहेत. नाद, षडज, स्वर व स्वरस्थाने, श्रुती, अलंकार, रागसंकल्पना, ताल व काल, लय आणि उत्स्फूर्त रचना. या नऊ मूलतत्त्वांवर प्रत्येकी एक प्रकरण वगैरे अशी मात्र पुस्तकाची रचना नाही. सांगण्याच्या ओघात सर्व काही सांगितलं आहे. ही नऊ मूलतत्त्वं चंदावरकरांनी संदर्भाच्या एका अतिशय विस्तीर्ण पटलावर उलगडून दाखवली आहेत. अतिप्राचीन तत्त्वज्ञान आणि दर्शन, प्राचीन संस्कृत ग्रंथ, आठव्या शतकातले ग्रंथ, दहाव्या-बाराव्या शतकातले ग्रंथ, ऐतिहासिक (सोळाव्या शतकापासून पुढे) पुरावे यांचा अत्यंत मार्मिक आणि थोडक्यात संदर्भ चंदावरकर देतात. हे संदर्भ मनाशी ठेवून हे प्राचीन व मध्ययुगीन ग्रंथ जर हाती घेतलं तर ते समजून घेणं सुकर होईल.
चंदावरकरांची निरीक्षणं मार्मिक आहेत! त्यांची विधानं डोळसपणे आणि सप्रमाण केलेली आहेत. याचं एक उदाहरण सांगतो. माणूस बोलण्यापूर्वी गाऊ लागला होता असं विधान सहजपणे केलं जातं; आणि ‘असेल बुवा!’ असं आपण सहज म्हणतो. चंदावरकरांनी या विधानाला प्रमाण दिलंय ते पुरातत्त्वशास्त्राचं. ‘‘पुरातत्त्वशास्त्रातील काही लोकांनी लाखो वार्षांपूर्वीच्या मानवी हाडांचा अभ्यास करून हे सिद्ध केलेलं आहे की, मानवी उत्क्रांतीत मनुष्यप्राणी भाषा बोलण्यापूर्वी संगीताचा आविष्कार करत होता.” यापुढे चंदावरकर लिहितात - “स्नायू आणि हाडं यांमधील लिगॅमेंटचा अभ्यास करून कोणते स्नायू कशासाठी वापरले जात होते याचा अंदाज येतो. ३० लाख वर्षांपूर्वी म्हणजे अगदी सुरुवातीला माणसे आवाज तर करत असत, परंतु हा आवाज काढताना जीभ आणि दात यांचा वापर करत नसत हे सिद्ध करता येतं. जिभेच्या आणि दातांचा वापर केला नाही, तर भाषा बोलता येत नाही हे आपल्याला माहीत आहे!”
ही वाक्यं मी उदधृत एवढ्यासाठी केली की, आपल्या लक्षात यावं की, गप्पांच्या शैलीत, ओघात बोललं तरी ज्याची दृष्टी वैज्ञानिक असते, असा माणूस भोंगळ विधानं करत नाही.
अ-भारतीय संगीत संस्कृतीविषयीचे चंदावरकरांनी दिलेले संदर्भ असेच अत्यंत विश्वासार्ह आणि समृद्ध आहेत. एक उदाहरण देतो. चंदावरकर म्हणतात - ‘इस्लाममध्ये संगीताला जेव्हा मज्जाव करण्यात आला, तेव्हा बऱ्याच अरब लोकांनी संगीताचा अभ्यास गणितशास्त्राचा म्हणून करायला सुरुवात केली होती.’ ‘पायथागोरस’ या अवलियाविषयी चंदावरकरांनी जाता जाता जे सांगितलं आहे, तेही आपल्या संवेदनेला झंकारून टाकणारं आहे! संगीताच्या भौतिक शास्त्राविषयी सांगताना चंदावरकरांनी एक मौलिक माहिती दिली आहे. ती अशी - “अलीकडच्या एका संगीतज्ञाने असे म्हटले आहे की, सगळ्या विश्वाचा एक स्वर आहे आणि तो ५२ ऑक्टेन्ट बिलो मिडल ‘C’(सी) आहे.”
असो. नऊ मूलतत्त्वांवर नऊ स्वतंत्र प्रकरणं लिहिली असती तर क्रमिक पुस्तक वाचल्याचा भास झाला असता. आणि ‘कळलं’ म्हणणं सुकर झालं असतं. चंदावरकरांच्या लेखनानं ते समाधान (?) मिळत नाही, ही त्यांच्या लेखनाची मोठीच जमेची बाजू आहे. चंदावरकरांच्या या लिखित गप्पा आपल्या अँटिन्याला जरासा झटका देऊन त्या टवकारवून देतात.
चंदावरकर हे भारतीय शास्त्रीय संगीत अभ्यासक, कलाकार, गुरू, भाष्यकार, भारतीय संगीतीचे प्रेमी. आपल्या कथनाचा समारोप करताना ते म्हणतात - “एखाद्या विस्तीर्ण वटवृक्षाच्या दाट आणि पवित्र पर्णछायेखाली बसल्यानंतर जसे वाटेल, तशी शांतता, समाधान आणि आनंद देण्याची शक्ती संगीतात असते. ती मी अनुभवली आहे. तशी सर्वांना मिळो, हीच अंती माझी प्रार्थना!” असं असूनही भारतीय संगीताची ‘भलती भलामण’ ते करत नाहीत. भारतीय संगीताची थोरवा गात ‘सुटत’ नाहीत. उगीचच अन्य संगीत संस्कृतीला ‘हिणवत’ नाहीत. कोणतंही अतिरंजित, अतिशयोक्त, बेजबाबदार विधान करत नाही. आपल्या संगीताविषयीचं प्रेम त्यांच्या कथनाच्या तळाशी मात्र मंद गुंजन करत असल्याचं जाणवतं.
आणि आता ‘वाद्यवेध’विषयी. वाद्यांचा वेध घेण्याचा चंदावरकरांचा छंद जुनाच आहे. १९७२मध्ये त्यांनी पुण्याच्या भरत नाट्यमंदिरात दोन दिवसांचा भारतीय वाद्य महोत्सव भरवला होता. २००० साली त्यांनी शेकडो भारतीय वाद्यकारांना स्पेन, जपान आणि रशियाचा सांस्कृतिक देवाण-घेवाण दौरा घडवला होता.
वादक आणि वाद्यकार यांच्या उपेक्षेवर आपल्या बाजूनं काही उतारा म्हणून ‘वाद्यवेध’ शब्दबद्ध झाला असं मीनाबाई नमूद करतात. १९-२० प्रकरणांतून चंदावरकरांनी वाद्यांचा आणि त्या अनुषंगाने संगीताचा मागोवा घेतला आहे. आजची वाद्यं हे वाद्यांचं उत्क्रांत रूप आहे. या रूपापर्यंत ही वाद्यं कसकशी आणि का आली याचा उलगडा चंदावरकरांनी अनेक वाद्यांच्या बाबतीत केला आहे. वाद्यं ही संगीताच्या इतिहासाची साधनं आहेत. आपल्या जडणघडणीत आणि नादवलयांत अनेक दशकांचाच नव्हे, तर शतकांचा इतिहास ही वाद्यं वागवत आहेत, हे चंदावरकरांनी थोडक्यात सुस्पष्टपणे दाखवलं आहे.
वाद्यांच्या नावांची उकल भाषाशास्त्राचे नियम लावून त्यांनी जी करून दाखवली आहे, ती खूपच उदबोधक आहे. वाद्यांच्या बदलत्या रूपाचा अभ्यास म्हणजे विविध संस्कतींच्या समन्वयाचा अभ्यास आहे. ही गोष्ट ‘वाद्यवेध’ लक्षात आणून देते.
संगीतक्षेत्रात (अन्य क्षेत्राप्रमाणेच!) आपल्या वैयक्तिक कल्पनेवर आरूढ होऊन बेछूट लिखाण करण्याची पद्धत आहे. अशा पार्श्वभूमीवर शास्त्रीय पद्धतीने विषयाकडे पाहिल्याचं जाणवलं की, एक दिलासा मिळतो. चंदावरकरांच्या लेखनानं हा दिलासा दिला आहे. चंदावरकरांनी शब्दमाध्यमात ‘वाद्यवेध’ म्हणून जो वाद्यमेळ आपल्यासमोर उभा केला आहे, तो नक्कीच रोमहर्षक आहे, उदबोधक आहे आणि समृद्ध करून सोडणारा आहे!
.............................................................................................................................................
वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्त्वे - भास्कर चंदावरकर
राजहंस प्रकाशन, पुणे, पाने - २३२, मूल्य - २५० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3938
.............................................................................................................................................
लेखक केशव परांजपे अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.
kdparanjape@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment