अजूनकाही
कुठलेही नाते जपणे, टिकवणे ही अतिशय नाजूक बाब असते. परस्परांना समजून घेतले नाही, तर छोट्या-छोट्या कारणावरून गैरसमजुती वाढत जातात आणि निष्कारण एकमेकांबद्दल अढी निर्माण होऊन प्रसंगी नाते तुटते. विशेषतः सध्याच्या बदलत्या काळात तर नात्यावर 'किरकोळ कारणांमुळे'देखील प्रहार होऊ शकतो. त्यामुळे लग्नव्यवस्थेपासून कुटुंबव्यवस्थेपर्यंत सर्वांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' या नवीन मराठी चित्रपटात अशाच काही प्रश्नचिन्हांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. मध्यंतरापर्यंत चित्रपटातील पती-पत्नीचा नेमका 'प्रॉब्लेम' प्रभावीपणे मांडण्यात त्यांना चांगले यश मिळाले आहे. परंतु मध्यंतरानंतर मात्र हा प्रॉब्लेम 'कौटुंबिक' होतो आणि मग त्यातील गुंतागुंत वाढत गेल्याने तो सहजपणे सोडवता येणार नाही, याची दिग्दर्शकाप्रमाणे इतरांनाही जाणीव होते. शेवटी पती-पत्नीमधील 'प्रॉब्लेम' हा त्यांनीच मिटवायचा असतो, एवढेच 'सत्य' उरते.
ही आहे अजय (गश्मीर महाजनी) आणि केतकी (स्पृहा जोशी) या आधुनिक विचाराच्या तरुण जोडप्याची कथा. मुंबईत प्रेम जमलेल्या अजय-केतकीची कुटुंबे मात्र वेगवेगळ्या भागातील असतात. केतकीचे माहेर कोकणातले तर अजय नागपूरचा. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा 'वैदर्भीय थाट'. दोघांनाही लग्न साध्या पद्धतीने करायचे असते, मात्र लग्न ठरवताना दोन्ही कुटुंबांकडून मानपान, त्यांच्या त्यांच्या परंपरा आणि धार्मिक विधी यावरून मतभेद होतात. परिणामी लग्न फिस्कटल्यागत जमा होते. म्हणून अजय-केतकी त्यांच्या सागर (विनोद लव्हेकर) या मित्राच्या मदतीने 'कोर्ट-मॅरेज' करतात. त्यामुळे दोघांचीही कुटुंबे दुरावतात.
मुंबईत आलिशान फ्लॅट घेऊन राहणाऱ्या अजय-केतकीचा संसार तसा सुखाचा आहे, कारण त्यांना आता एक छोटा मुलगाही झालेला असतो. केतकीला मात्र लग्नानंतर सात वर्षांनी अजयशी असलेले नाते दुरावत चालले असल्याची जाणीव होते. केतकी तशी 'आक्रमक' आहे, तर अजय शांत, समंजस आणि केवळ तिच्या 'हो' ला 'हो' नव्हे तर इतरांच्याही 'हो'ला 'हो' म्हणणारा आहे. केतकी त्यालाच हरकत घेते. तिचे म्हणणे असते - अजयने कोणत्याही परिस्थितीत ठाम निर्णय घेणे अपेक्षित आहे. मात्र अजयची तशी मन:स्थिती नसते. पती-पत्नीच्या या नात्याला आता तसा काही अर्थ उरला नाही, अशी समजूत करून घेतलेली केतकी अजयपासून वेगळे राहण्याच्या निर्णयाप्रत येते. या प्रकरणात दोघांमध्ये 'मध्यस्थी' करण्याचे मित्र सागरचे प्रयत्नही फोल ठरतात.
तेवढ्यात दोघांचीही कुटुंबे झाले-गेले विसरून जाऊन एकत्र येण्याचा निर्णय घेतात (याचे नेमके कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही) आणि अजय-केतकीला नाईलाजाने केतकीच्या कोकणातील घरी यावे लागते. तिथे अजयच्या आईच्या सांगण्यावरून काही धार्मिक विधी करणे अजयला भाग पडते. आधुनिक विचाराच्या केतकीचा त्या धार्मिक विधीला विरोध असतो आणि अजयनेही त्याला विरोध करावा अशी तिची अपेक्षा असते. मात्र अजय तसे न करता आपल्या 'आई'साठी ते विधी करतो. त्यामुळे अजय-केतकीचे चांगलेच बिनसते आणि केतकी दोन्ही कुटुंबासमोर आपण अजयपासून वेगळे राहण्याच्या निर्णयाप्रत आलो आहोत असे जाहीर करते. शेवटी हा निर्णय अजय-केतकी यांनीच घ्यावयाचा आहे असे 'स्पष्ट' झाल्यानंतर दोघेही मुंबईत येतात. अर्थात त्यांचा निर्णय अपेक्षितच असतो, हेही लगेच कळून चुकते.
चित्रपटाच्या मध्यंतरापर्यंत अजय-केतकी या दोघांचीच कथा, त्यांच्या प्रेमापासून त्यांच्या ताणतणावापर्यंतच्या विविध प्रसंगातून चांगली पकड घेते, मात्र मध्यंतरानंतर पडद्यावर दोन्ही कुटुंबातील बरीच पात्रे दिसू लागतात. त्यांचा आणि अजय-केतकीमध्ये निर्माण झालेल्या ताणतणावाचा तसा अर्थाअर्थी फारसा संबंध येत नसल्यामुळे कथेचे पूर्ण दोन भाग पडल्याचे ठळकपणे दिसून येतात. त्यामुळे मूळ कथेवरची पकड सैल झाल्याची जाणीव होते. नाही म्हणायला, विविध पात्रांनी आपापल्या भूमिका करताना 'विशिष्ट संवादफेक' करून चांगली करमणूक केली आहे. केतकीच्या आत्याचे एक उपकथानक कथेला पूरक आहे. मात्र त्याची व्याप्ती थोडीसी वाढवण्याची गरज होती. चित्रपटातील सर्व 'पार्श्वभूमी'वरची गाणी श्रवणीय आणि कथेला पूरक ठरली आहेत.
स्पृहा जोशी हिने 'समंजस', 'परखड' आणि 'आक्रमक' केतकी छान उभी केली आहे. गश्मीर महाजनी या चित्रपटात वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळतो. त्याने शांत, अबोल अजय अतिशय सयंतपणे रंगवला आहे. केतकीच्या माहेरकडील मंगला केंकरे (आई), सतीश आळेकर (बाबा), सीमा देशमुख (आत्या) तसेच अजयच्या कुटुंबातील निर्मिती सावंत (आई), विजय निकम (बाबा), कमलेश सावंत (मामा) आदींचीही कामे चांगली झाली आहेत.
थोडक्यात 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'मधील 'प्रॉब्लेम' चांगला मांडण्यात आला आहे, मात्र त्यामानाने त्यावरील 'तोडगा' (दृष्टीपथात असला तरी) तेवढ्याच प्रभावीपणे मांडण्याची गरज होती. तरीही एक चांगला समस्याप्रधान कौटुंबिक चित्रपट आहे हे नक्की!
लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment