सौभाग्यवती मराठा स्त्री
अर्धेजग - कळीचे प्रश्न
डॉ. संध्या शेलार
  • मराठा स्त्रिया
  • Sat , 05 November 2016
  • संध्या शेलार रंगनाथ पठारे ताम्रपट Sandhya Shelar Rangnatha Pathare Tamrapat मराठा स्त्रिया

​‘सौभाग्यवती मराठा स्त्री’ जशी लक्षित त्यापेक्षा जास्त दुर्लक्षित! विधवा म्हणून भोगाव्या लागणाऱ्या दुःखाच्या खाणाखुणा ती चेहऱ्यावर प्रकट करत राहते आणि तसं करणं कुणालाही डाचत नाही. खरी गोची असते ती सौभाग्यवती मराठा स्त्रीची! जे ती भोगत असते, ते ती उघडपणे बोलू शकत नाही आणि देहबोलीतून व्यक्तही करू शकत नाही. वरवर पाहता सारं आलबेल दिसतं, पण आत उफाळणारा ज्वालामुखी तिला करपवून टाकतो. ही घुसमट कुठेतरी मोकळी होण्याची ती ती वाट पाहते. शेवटी तिच्यासारख्या एखाद्या अबलेच्या उणेपणावर बोट ठेवत, त्याची चर्चा करत ती स्वतःच्या वेदना समोर पाहण्यात एक आसुरी आनंद मिळवत राहते. राजरोजपणे एकमेकींवर अनेक कुरघोड्या करणाऱ्या आजकालच्या मालिकांमधल्या स्त्री-पात्रांची शहर आणि खेड्यातली लोकप्रियता हे याचंच द्योतक असावं.

 ‘ताम्रपट’मध्ये रंगनाथ पठारे यांनी उच्चकुलीन, मध्यम मराठा आणि गरीब मराठा कुटुंबाच्या प्रतिनिधी भासतील अशा मराठा कुटुंबातल्या स्त्रियांचा उल्लेख केला आहे. या स्त्रियांचं समाजातलं, कुटुंबातलं स्थान; त्यांची स्वप्नं, परिस्थितीनुरूप बदलणारं त्यांचं राहणीमान, त्यांच्या जाणीवा आणि उणिवा हे सारं शब्दबद्ध करताना कुठेही एकांगी न होणारं वर्णन वाचकाला या स्त्री-पात्रांच्या अधिक जवळ नेतं. या स्त्री-चित्रणातला उच्चकुलीन नेटकेपणा जितका भावतो, तितकाच त्यातला रांगडेपणाही लोभस वाटतो. तिच्या अस्मितेच्या कसोट्या तिच्या शिक्षितपणाच्या अधीन असल्याचंही प्रकर्षानं जाणवतं.

एकीकडे नात झाल्याने गोधाबाई पाटलीण एकीकडे कासावीस होते, तर दुसरीकडे इंदिराराजे मात्र मुलाच्या दुराव्याने विचलित होतात. स्वतःच्या अस्मितेची जाणीवच नसलेली सावित्री जिथं केविलवाणी दिसते, तिथं जगदाळेची सून मात्र धडाडीने काम करून संसाराचा गाडा हाकते आणि कौतुकास पात्र ठरते . व्यंग असलेलं मूल जन्माला आल्याने खचून गेलेली गोधाबाई पाटलीणीची सून आधीची स्वतःचं मानसिक परावलंबित्व अधोरेखित करते. सासर-माहेरची भक्कम आर्थिक- सामाजिक पार्श्वभूमी आणि शिक्षण असूनही असलेलं तिचं हे परावलंबित्व म्हणूनच तिच्या सासूला आणि वाचकांनाही जास्त स्पष्टपणे जाणवतं! हेच लक्षित असून दुर्लक्षित असणं.

इंदिराराजे बापूसाहेब देशमुख म्हणजे आधीच्या निंबाळकर या बाई शिक्षित तर आहेतच, पण सर्व विषयांमधली त्यांची गती खचितच लक्ष वेधून घेते. बापूसाहेब देशमुख हा गरिबीतून शिक्षण घेत धडाडीने शिकणारा, वकील होणारा पती केवळ गुणाच्या आणि त्याच्या होतकरू स्वभावाच्या जोरावर त्या निवडतातच, पण घरातून असलेल्या रोषाला जराही बळी न पडता त्या स्वतःचा संकल्प तितक्याच ताकदीने पूर्णत्वास नेतात; आणि यामुळे त्यांच्या सरदार घराण्याचा घरंदाजपणा कुठेही लयाला जाताना दिसत नाही. उलटपक्षी, बापूसाहेबांसारख्या यशस्वी वकील आणि आमदार मंत्री असलेल्या पतीला बाईंमधल्या नेटकेपणाचा अंगीकार करावा लागणं, हेच त्यांचं परिस्थितीवरचं वर्चस्व सिद्ध करतं. मुलगा सोडून जात असल्याची जाणीव त्यांना थोडी विचलित करते, पण या भावनेला त्या जराही वरचढ होऊ देत नाहीत. कुठल्याही संकटसमयी संयम सुटू न देता प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्याचा त्यांचा स्वभाव त्यांना आदरास पात्र ठरवतो. एका गरीब, होतकरू मुलापासून यशस्वी राजकारणी होण्यापर्यंतच्या टप्प्यांमधून त्या बापूसाहेबांना सहजगत्या पार करवतात.

‘विवाहानंतरचे त्यांचे सारे आयुष्य एका चौकटीत घडत गेले होते. प्रेमविवाह केला होता आणि प्रेमाच्या बळकट पायावर उभी असलेली चौकट होती. इंदिराराजे यांच्या दूरदर्शी, धोरणी विचारांची चौकट. प्रगतीसाठी नुसती बुद्धिमत्ता पुरेशी नसते. धोरणीपणा हवा. तो बाईंजवळ अधिक. दोघांच्या दोन गुणांचा सुकर मिलाफ होता, म्हणून तर आयुष्याची नेटकी घडण झाली होती.’ ‘तू नेशील तिथं आणि तसं वाहत जाणं हाच माझ्या जगण्याचा धर्म बनून राहिलाय.’ या बापूसाहेब देशमुखांच्या विचारात असलेल्या या इंदिराराजेंच्या वर्णनातून त्यांच्या आयुष्यातलं इंदिराराजेंचं अनन्यसाधारण महत्त्व प्रकट होतं. एक मराठा स्त्री, जिला शिक्षण घेता येतं, जिचं निर्णयस्वातंत्र्य अबाधित राहतं, तिच्या हातून नक्कीच काही मोठं निर्माण होतं. एक साधा शेतकरी मुलगा राज्याचा मंत्री होण्यामागे इंदिराराजेंचा किंग मेकरचा रोल आहे. पठारे यांनी अशीही मराठा स्त्री रेखाटली आहे. वास्तविक, तिच्यातल्या अंतस्थ चेतनेला पूरक वातावरण मिळालं, तर तीही मागे नाही!

दुसरं सौभाग्यवती पात्र, स्वतःच्या वागण्याने, कष्ट करण्याच्या तयारीने आणि संसाराप्रति समर्पित राहण्याने स्वतःच्या नावाप्रमाणे कादंबरीत ठसठशीत होतं - गोधाबाई तुकाराम (दादासाहेब ) भोईटे पाटील; आधीच्या गव्हाणे पाटील. थोडंफार शिक्षण होऊनही लिहिण्यापुरतंदेखील आठवत नसलेल्या. घर आणि शेत, स्वतःचा संसार आणि माहेर याबाहेरचं जग माहीत नसलेल्या गोधाबाई हे पात्र आहे. त्यांची स्वप्नं फार नसतात, पण पै पै जोडून संसार उभा करावा लागत असल्याचं त्यांना पक्क ठाऊक असतं. आणीबाणीच्या काळात सावकारीवर कुऱ्हाड येते तेव्हा त्यांचे हे उद्योग दादासाहेबांना कळतात . गहाणवटीने गच्च भरलेली खोली पाहून दादासाहेब बिथरतात, पण त्यांचं अशा प्रकारे रागावणं गोधाबाईला उमजत नाही. ती गहाणवट परत करताना मात्र तिचा जीव तीळ तीळ तुटतो. मला आठवतं की, माझी आजीही असंच काही करून तिचे वेगळे पैसे साठवी आणि अडचणीला ते कुटुंबाच्या खर्चाला देई. म्हणजे शेतकरी कुटुंबातली स्त्री येनकेन मार्गे - जरी व्यवहार तिच्या हाती नसला तरी – कुटुंबाला हातभार लावणं स्वतःचं कर्तव्य समजे. गोधाबाई गरिबीतून श्रीमंत होताना तिच्या जीवनात होणारे बदल अनुभवते, पण जुन्या वळणाच्या या पाटलीणबाईला मजुरांना काम न करता मोबदला देणं मान्य नसतं. कामाच्या बायका वेळकाढूपणा करायला लागल्या की तिचा पारा चढतो. महत्त्वाचं म्हणजे, मजुरांच्या सोबत घरचं कुणीतरी असावं, हे त्यांचं ठाम मत बरेच दिवस कायम राहतं. दादासाहेब कारखान्याचे चेअरमन झाल्यानंतरही पाटलीणबाई दंडाची लुगडी घालून मजुरांसोबत रानात राबत राहतात. याचं दादासाहेबांना आणि वाचक म्हणून आपल्यालाही कौतुक वाटल्याखेरीज राहत नाही. ‘घरात सारं भरपूर असलं म्हणून असं मातल्यासारखं करायचं का?’ हा गोधाबाईचा साधा प्रश्न असतो, पण दादासाहेब जेव्हा त्यांना हळुवार आवाजात समजावतात, तेव्हा नवऱ्याच्या शब्दाखातर त्या बदलण्यासाठी तयार होतात; पण ते सुखासीन जगणं रात्रंदिवस शारीरिक कष्ट करणाऱ्या गोधाबाईच्या पचनी पडत नाही आणि तिला शारीरिक व्याधी जडतात. आरोग्यासाठी डॉक्टर फिरण्याचा सल्ला देतात, पण गोधाबाईचा पुन्हा साधाच प्रश्न, ‘असं मोकळं कामाशिवाय कसं हिंडायचं?’

गोधाबाई पूर्ण शेतीवाडीची जबाबदारी घेऊन पार पाडतात आणि म्हणून मुलगा आणि नवरा यांना बाहेर राजकारणासाठी वेळ मिळतो. हे वास्तव लेखक अगदी सहजतेने मांडतात. यातून संपूर्ण मराठा समाजाची मानसिकता प्रकट होते . शेतकरी आणि बागायतदार शेतकऱ्याच्या घरातलं हे अनेक वर्षांपासूनचं चित्र आहे. आजही त्यात बदल झालेला नाही. पूर्ण बागायती पट्टा आज सधन आहे आणि त्यामागे त्या घरातल्या स्त्रीचे कष्ट आहेत! हे अगदी आजचं वास्तव आहे. अगदी तीन-चार एकर असलेली महिला दूध उत्पादन आणि इतर शेतीजोड व्यवसाय करून कुटुंब चालवताना दिसते. शहरालगत असलेल्या गावांचं जरी शहरीकरण झालेलं असलं, तरी तिथली स्त्रीही शेतात, गोठ्यात राबताना दिसते आणि तीच या कुटुंबाचा आर्थिक कणा बनते. जरा जास्त जमीन असलेल्या शेतकरी घरातली बाई बंगल्यात राहत असली, चारचाकीतून फिरत असली, तरी शेताची जवळजवळ सगळी कामं ती पेलते; आणि म्हणून घरातली पुरुष मंडळी बाहेर हिंडताना, वेळ घालवताना दिसतात. बरं, हे लोक राजकीय वर्तुळाच्या जास्तच प्रेमात असतात. वास्तविक, शिक्षणाने मान-मरातब मिळवण्याची त्यांची क्षमता नसते. मग एखादं छोटं-मोठं पद पदरी पडून घेण्यासाठी ते धडपडत राहतात. त्यासाठी कुठलीही तडजोड त्यांना मान्य असते! खरं तर तत्त्वहीन राजकारण फोफावण्याचं हेच कारण आहे!

याच गोधाबाई पाटलीण सुनेला दोन वेळा मुली झाल्या म्हणून नाराज होतात. मात्र ही नाराजी केवळ त्यांच्या मनापुरती मर्यादित राहत नाही, तर तिचे परिणाम हृदयविकारात परिवर्तित होतात. ‘हत मेल्या! दुसरी पण फिंद्रीच झाली! ह्या फिन्द्र्या तुम्हाला जन्माला पुरणार हैत का? लगीन लावून त्या निघून गेल्याव काय करशान तुम्ही?’ ही गोधाबाई पाटलीणीची प्रतिक्रियाही प्रातिनिधिक म्हणावी अशी आहे. मुलीच्या जन्मावर आजही हीच प्रतिक्रिया मला प्रसूतिगृह चालवताना अनेकदा ऐकायला मिळते. अशा प्रकारे ही कादंबरी समाजातल्या सर्व बदलांचा आणि प्रश्नांचा आढावा घेणारी आहे. फक्त राजकीय पट न उलगडता सामाजिक बदल आणि राजकीय समीकरणं लेखक अतिशय प्रभावीपणे या कादंबरीतून हाताळतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भोवतीचं वास्तव जसं आहे, तेच आपण वाचत असल्याची जाणीव संपूर्ण कादंबरी वाचताना होत राहते. म्हणूनच प्रदीर्घ असली, तरीही कादंबरी कुठेही रटाळ होत नाही!

तिसरं आणि चौथं लक्षात राहणारं पात्र म्हणजे सावित्री ढोरमले आणि जगदाळेची सून. सावित्री शिकलेली म्हणून वकील ढोरमले तिच्याशी लग्न करतात. या स्त्रीला नवऱ्याबद्दल प्रगाढ विश्वास आहे आणि त्याने कमवून आणल्यात समाधानी राहण्याची तिची वृत्ती आहे. नवरा करत असलेल्या ‘बाहेरच्या’ वाऱ्या दिसून त्याकडे तिने दुर्लक्ष करणं जास्त बोचत राहतं. तिचं शिक्षण तिची अस्मिता जागृत करत नाही; आणि तिथंच ती केविलवाणी होऊन पुढे येते. हा प्रश्न आज तीव्रतेने जाणवत नसला, तरी तो आजची पिढी पोखरणारा आहे. अशा प्रश्नांमध्ये  त्या स्त्रीची अस्मिता जागृत झाली, तरी ‘कुलीन’ या नावाखाली घरातली इतर मंडळी ही गोष्ट दडपण्याचा प्रयत्न करतात आणि ती मुलगी विफल अवस्थेत सारं मान्य करत आतल्या आत कुढत जगते. हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त भयावह असल्याचं वैद्यकीय सेवा देताना मला जाणवतं. कारण शिक्षणाने मिळालेली समज आणि व्यवहारात मिळणारी अवहेलना याचा मेळ घालताना आजची ही तरुणी मानसिक रुग्ण होते आहे. या प्रश्नाचं प्रमाण कमी असलं, तरी हा प्रश्न गहिरा आहे. त्याला तोंड देताना कादंबरीतली गोधाबाईची थोरली मुलगी मात्र अडाणी असूनही रखेलीच्या घरी जाऊन तिला धीटपणे बदडते आणि स्वतःच्या नवर्‍याला स्वतःच्या बाजूने वळवून घेते. वडलांच्या श्रीमंतीमुळे आणि राजकीय वजनामुळे तिच्यात धाडस येतं, पण गोधाबाईची धाकटी मुलगी मात्र शिकूनही नवऱ्याच्या बाहेरख्याली वागण्याने ढासळते आणि काहीही न करता रडत बसते. एकूणच लेखकाने सर्व बाजूंनी हा मुद्दा हाताळला आहे. आजही या परिस्थितीत काहीही बदल झालेला दिसत नाहीत.

जगदाळेची सून मात्र कादंबरीत भाव खाऊन जाते. अडाणी असणारी ही मुलगी सासरी आल्यावर कष्टांना आपलंसं करत संसाराला हातभार लावताना दिसते. गरीब शेतकरी कुटुंबातले कष्ट आणि दारिद्र्य या गोष्टी या स्त्रीला इतर सामाजिक प्रश्नांपासून दूर तर ठेवत नसाव्यात, हा प्रश्न मात्र माझ्या डोक्यात अजून घोंगावतो आहे! 

 

लेखिका मुक्ताई ग्रामीण महिला संघ (नागरगाव, शिरूर, जि. पुणे)च्या अध्यक्ष आहेत.

Shelargeetanjali16@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लग्नासाठी केवळ आर्थिकदृष्ट्या सबळ असणे आणि विशिष्ट वयाचे असणे महत्त्वाचे नसून भावनिकदृष्ट्या स्थिर असणे, सर्वांत जास्त गरजेचे आहे, याचा आपण जोवर विचार करणार नाही, तोवर अतुल सुभाषसारखे बळी जातच राहतील

तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या भावना व नाती हाताळायची पद्धत वेगळी असते का, असा प्रश्न सामान्य व्यक्तीला पडू शकतो. एवढे उच्चशिक्षित, तंत्रज्ञानावर हुकमत असलेली हे लोक जेव्हा भावनांचा भाग येतो, तेव्हा का अपयशी ठरत असावेत? अतुल सुभाष यांचा दुर्दैवी मृत्यू हा पुरुषांच्या मानसिक आरोग्याशी संबधित, भारतीय लग्नसंस्थेविषयी आणि कायदा व्यवस्थेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करतो.......