अजूनकाही
हातात मुराकामीची कादंबरी होती आणि टीव्हीवर 'अनारकली ऑफ आरा' अवतरला. काही वेळातच मी मुराकामी महाशयांना सन्मानपूर्वक बाजूला ठेवलं आणि अनारकलीच्या वेदनेत कधी वाहून गेलो मला कळलंच नाही. सिनेमा संपल्यावर मी म्हणालो 'लई भारी सिनेमा'. नंतर डोक्यात खळबळ सुरू झाली की, हे असं कसं आलं प्रतिक्षिप्त क्रियेसारखं?
म्हणजे असं की बर्गमन, सत्यजित रे, ऋत्विक घटक, अकिरा कुरोसावा अशा दादा लोकांचे चित्रपट बघून आपण ‘लई भारी’ बोलत नाही. त्यांच्याबद्दल बोलताना मनाच्या तळातून, मानवी आदिम भावभावनांपासून सुरुवात करतो. असं म्हणू की, बहुतेक छापील भाषेत व्यक्त होतो. इथं एक एकदम बोलीभाषेतच उतरलो... पण 'लई भारी' काय घडलं?
गोष्ट तशी साधी. नेहमीची परिचयाची. बाई वापरायची वस्तू आहे अशा माणसांची. त्यात आपल्या मराठी माणसांना जवळची वाटणारी. आरा नावाचं बिहारमधलं एक गाव किंवा शहर. तिथं बाबू कुबेरसिंह नावाचं विश्वविद्यालय आहे. त्याच गावात आपल्या तमाशासारखी एक नाचगाण्याची पार्टी आहे. त्याच पार्टीतली एक बाई लग्नात नाचतेय. तिच्यावर पैसे ओवाळून टाकले जात आहेत. एकजण बंदूक घेऊन नाचतोय. बंदुकीच्या नळीत नोट अडकवून तिला घ्यायला लावतोय. तीसुद्धा नाचता नाचता नोट तोंडात पकडते आणि बंदुकीचा बार उडतो. स्टेजवरून मुलगी आपल्या आईचं मरण बघते. हे भयंकर दृश्य संपतं. काही वर्षांनंतर तीच मुलगी नाचायला उभी आहे. नाव अनारकली. म्हणजे स्वरा भास्कर.
वातावरण निर्मितीच्या दृश्यांमध्ये गावातली दृश्यं, अनारकली गावात भटकत आहे, खरेदी करते, त्यांच्या पार्टीची गाण्यांची तालीम अशी दृश्यं आहेत. यात प्रामुख्यानं दिसतो तो त्यांचा केअर टेकर कम मॅनेजर रंगीला. म्हणजे पंकज मिश्रा. आराचा पोलीस ठाण्याच्या आवारात दसऱ्याच्या निमित्तानं कार्यक्रम ठरतो. विश्वविद्यालयाचे कुलगुरू धर्मेंद्रबाबू म्हणजे संजय मिश्रा कार्यक्रमाला येतात. तमाशा चालू होतो. पोलीस नाचतायत. कुलगुरू हळूच दारूचे घोट मारत आहेत. काहीवेळानं त्यांना दारू चढते. स्टेजवर चढून ते अनारकलीचा हात धरतात आणि चक्क तिला सर्वांसमोर झोंबायला लागतात. गोंधळ उडतो. शेवटी अनारकली त्यांच्या जोरात थोबाडीत मारते आणि स्वत:ला सोडवून घेते. इथून अनारकलीच्या जिंदगीची परवड सुरू होते.
पोलीस स्टेशन आणि कुलगुरूची माणसं आराचं जगणं हराम करतात. तिच्यावर वेश्याव्यवसाय केल्याचा आरोप होतो. ती कोठडीत जाते. रंगीला तिला सोडवतो. परत तिला पकडायला गुंड येतात. ती पळते. तिला सोबत असते, ती तरुण पण ढोलकीवाल्या अन्वरची. दोघं दिल्लीला येतात. खायचे वांधे होतात. तिला गायला मिळत नाही म्हणून ती झुरते. भविष्यात अंधार दिसतो. निराशा दाटून येते. त्याच वेळी सीडी कंपनीचा एजंट हिरामण भेटतो. पुन्हा नशीब बदलायला लागतं. तिच्या गाण्यांची सीडी निघते आणि घोटाळा होतो. सीडीच्या पत्त्यावरून पोलीस आराला शोधत दिल्लीत येतात. ताकदवान व्यवस्थेपुढे ती हतबल होऊन खचते. गुलछबू दिसणारा सीडी कंपनीचा मालक तिला मायेनं समजावतो की, आपण फार छोटी माणसं आहोत. जाताना हिरामण गौप्यस्फोट करतो की, आरामधला प्रसंग त्याला पहिल्यापासून माहीत होता. त्याच्या मोबाईलमधलं शूटिंग तो दाखवतो.
अनारकली आरामध्ये दाखल होते. कुलगुरूला शरण जाते. विद्यापीठात तिचा कार्यक्रम ठेवला जातो. आपल्या बायको-मुलीसह कुलगुरू हजर होतात. अनारकली नाचू लागते. नंतर जे घडतं ते थरारक आहे. तिच्यावर दारूड्या कुलगुरूने अतिप्रसंग केल्याचं शूटिंग मागे स्क्रीनवर दिसू लागतं आणि तिचं तांडव सुरू होतं. तमासगीर बाईचं तांडव. शेवट अपेक्षित होतो. बायको- मुलगी निघून जातात. कुलगुरूची पूर्णपणे इज्जत निघते. शेवटी अनारकली रस्त्यातून एकटी चालत जाते. आपलं गाणं गुणगुणत.
ही कहाणी जरा सविस्तर सांगितली असली, तरीही अनेक तपशील आलेले नाहीत. हे सांगण्याचं कारण म्हणजे यात फिल्मी मसाला भरपूर वाढवता येईल हे आपल्याला जाणवतं, पण तसं काही केलेलं नाही. अनेक छोटे-मोठे प्रसंग आणि व्यक्तींनी सिनेमाचा अवकाश भरलाय. संवादातून स्वभावाचे कंगोरे आणि समाजदर्शन उत्तम रीतीन दाखवलंय.
आपल्याला तमासगीर बाईच्या जगण्याचं जळजळीत दर्शन घडतं. तिची आत्मसन्मानासाठी चाललेली धडपड बघून आपण कासावीस होतो. शेवटच्या प्रसंगातील तिची चीड आणि उद्वेगानं आत्मसन्मानासाठी केलेलं नाचणं आपल्याला चिरत जातं. त्या दृश्यात गाणं आहे, पण त्याचे शब्द फक्त माझ्यावर आघात करत होते. पडद्यावर दिसणारा अतिप्रसंग आणि त्यासमोर आपल्या नाचातून साचलेला संताप ओकणारी अनारकली आपला कब्जा घेते आणि स्व जपायला निघालेली ही तमासगीर बाई तमाम पीडित आया-बहिणींच्या वेदनांपर्यंत आपल्याला नेऊन सोडते. जगातल्या कोणत्याही भाषेतल्या प्रेक्षकाला कळेल असं ताकदीचं हे दृश्य आहे. दृश्य संपतं आणि ती संतापाच्या वेगात ताडताड चालत सुटते. तिचं ताडताड वेगात चालणं काही वेळात थांबतं. ती शांत होते. इकडेतिकडे स्वस्थपणे बघते. केस मोकळे करते आणि गाणं गुणगुणत तालावर चालू लागते. सिनेमा एका उंचीवर शब्दांच्या पलीकडे जाऊन संपतो.
या सिनेमामध्ये अनेक मोह टाळून नेमकं मांडणारा सिनेमाचा दिग्दर्शक अविनाश दास, स्वरा भास्करचा थोर अभिनय आणि ज्यांना वाईट अभिनय करताच येत नाही असे कसलेले अभिनेते पंकज त्रिपाठी आणि संजय मिश्रा या सर्वांनी आपल्या प्रयत्नांतून साकारलेली अनारकलीची वेदना आभाळ भरून टाकते. म्हणून 'लई भारी सिनेमा'!
.............................................................................................................................................
लेखक विजय तांबे कथाकार आहेत.
vtambe@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Shivaji Gaikwad
Sat , 12 August 2017
हा सिनेमा पाहिल्यावर लिहील .तू लिहिलेले आवडले .