‘पहिली इनिंग’च्या भरपायीसाठी अन अंतिम निर्णयासाठी ‘सेकंड इनिंग’ अधिक कामाची ठरते
ग्रंथनामा - झलक
सतीश तांबे
  • ‘सेकंड इनिंग’चं मुखपृष्ठ
  • Fri , 11 August 2017
  • ग्रंथनामा Booksnama झलक सेकंड इनिंग Second Inning अविनाश राजाराम Avinash rajaram अविनाश कोल्हे Avinash Kolhe सदामंगल पब्लिकेशन Sadamangal Publication

प्राध्यापक-नाट्यसमीक्षक अविनाश कोल्हे यांनी निवृत्तीच्या सुमारास सर्जनशील लेखनाला सुरुवात केली असून त्यांचा ‘सेकंड इनिंग’ हा दोन दीर्घकथांचा संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. कथालेखक म्हणून  कोल्हे यांनी ‘अविनाश राजाराम’ हे नाव घेतलं आहे. त्यांचा हा कथासंग्रह सदामंगल पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केला असून त्याला कथाकार सतीश तांबे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

‘सेकंड इनिंग’ हा अविनाश राजाराम यांचा दोन दीर्घकथांचा पहिलाच संग्रह खरोखरच नावानुरूप आहे. याअर्थी की त्यांच्या लेखन- कारकिर्दीची ही खरोखरच सेकंड इनिंग आहे. म्हणजे असं की अविनाश राजाराम हे नाव जरी मराठी वाचकांना तितकंसं परिचित नसलं तरी ‘अविनाश कोल्हे’ हे त्यांचं मूळ नाव वृत्तपत्रं-साप्ताहिकं वगैरे ठिकाणी गेली सुमारे ३० वर्षं अनेक मराठी वाचकांच्या समोर येत राहिलं आहे. भारतीय-आंतरराष्ट्रीय राजकारण, साहित्य, कला, देशी-विदेशी चित्रपट, नाटकं, मराठी व इंग्रजी ग्रंथ परिचय अशा नानाविध विषयांवर त्यांनी सातत्यानं लेखन केलं आहे आणि अलीकडेच त्यांनी-सेवानिवृत्तीच्या आधी सुमारे तीन वर्षं कथा-कादंबरी असं ‘फिक्शन’ लिहायला प्रथमच सुरुवात केली आहे. तर याअर्थी ही त्यांच्या लेखन कारकिर्दीची’ सेकंड इनिंग’च आहे. वृत्तपत्रात लिहिण्याचा सराव झालेल्यांचा कल सर्वसाधारणपणे छोटेखानी लिहिण्याकडे असतो, पण अविनाश राजाराम यांनी मात्र आपल्या साहित्य निर्मितीची सुरुवातच दीर्घकथा लिहून केली आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे…

अविनाश राजाराम यांच्या या कथासंग्रहात दोन कथा आहेत. पैकी एकीचं नाव आहे - ‘सेकंड इनिंग’, तर दुसरीचं नाव आहे - ‘बैल थकला त्याची गोष्ट’. दोन्ही कथा या आस्थापनांमध्ये घडणाऱ्या आहेत. पैकी ‘दुसरी इनिंग’ या कथेतील वातावरण बँकेचं आहे, तर ‘बैल थकला त्याची गोष्ट’मधील वातावरण हे कॉलेजचं आहे. म्हणजे दोन्ही कथांमधील वातावरण हे तसं मध्यमवर्गीयच आहे. साहिजकच त्यामध्ये फारशी सनसनाटी नाही. तर एक प्रकारचा कोमटपणा आहे. पण लेखकाला त्यातील कंगोरे, बारकावे याची उत्तम जाण आहे. त्यामुळे रोख नेमका आहे. परिणामी या दोन्ही कथा वाचनीय झाल्या आहेत. गंगाधर गाडगीळांच्या कथांपासून ते समकालीन मराठी कथांपर्ययत जो मध्यमवर्गीय जीवनातील कोतेपणा, किडकेपणा, किरटेपणा दाखवायचा प्रघात आहे, तो या दोन्ही कथांमध्ये जाणवतो.

दोन्ही कथांमधील मध्यवर्ती पात्रंही संबंधित आस्थापनामधील महत्त्व प्राप्त झालेली पात्रं आहेत हे कथांच्या सुरुवातीलाच जाणवतं. त्यांना मानमरातबाची अपेक्षा आहे, सवय झाली आहे. ‘सेकंड इनिंग’मधील निरगुडकर बाई या त्याचं रंगरूप, सधन सांपत्तिक स्थिती, आब राखून स्वत:चं महत्त्व वाढवणारं वागणं आणि मॅनेजर गणपुले यांचं त्यांना मान देणं, यामुळे बँकेत काहीशा तोऱ्यात वागणाऱ्या आहेत. तर ‘बैल थकला त्याची गोष्ट’मधील प्रोफेसर घाटपांडे हे त्यांच्या विद्यार्थ्यांना अन्य प्राध्यापकांच्या तुलनेत दर वर्षी मिळणाऱ्या नेत्रदीपक यशामुळे कॉलेजात काहीसे घमेंडीत वागणारे आहेत. पण या दोघांच्याही मानाच्या स्थानाचा फुसका फुगा आकस्मिक फुटतो आणि नंतर त्यांची काय फे फे होते याचं दोन्ही कथांमध्ये सांगोपांग चित्रण केलं आहे. मध्यमवर्गीयांचा अहंकार, डामडौल कसा पोकळ आणि तकलादू असतो, त्याची या कथांमध्ये रीतसर भांडाफोड केलेली आहे.

‘सेकंड इनिंग’मधील निरगुडकर मॅडम आता शारीरिकदृष्ट्या उताराला लागलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नवऱ्याला त्यांच्याविषयी पूर्वी वाटणारं आकर्षण कमी होत चालल्याच्या संशयानं त्या ग्रासलेल्या आहेत. एकुलता एक मुलगादेखील तरुण होऊन त्याच्या विश्वात रमला आहे. साहजिकच बँकेत मिळणारा मान हेच आता त्यांचं सर्वस्व झालेलं आहे. अशा नाजूक मनोव्यस्थेमध्ये असताना शैलजा आठवले नावाची एक चुणचुणीत दलित तरुणी बदली होऊन त्यांच्या ब्रँचमध्ये येते आणि मॅनेजर गणपुले यांच्यासह सर्वांच्या कौतुकाचा विषय बनते. ज्यामुळे निरगुडकर बाईंचा बँकेतील वरचष्मा कमी होत जातो. परिणामी आधीच उताराला लागलेला त्यांचा आत्मविश्वास अधिकच डळमळीत होत जातो.

निरगुडकर बाई सुरुवातीला आठवलेशी पंगा घ्यायचा प्रयत्न करतात. पण लवकरच त्यांना कळून चुकतं की, आपली सांपित्तक स्थिती, ब्रँचमधील पूर्वपीठिका वगैरे सर्व घटक ध्यानात घेता आपण आठवलेपेक्षा वरचढ असलो तरी तिच्या तारुण्यसुलभ चैतन्यापुढे आणि मोकळ्या-ढाकळ्या वागण्या-बोलण्यामुळे आपला निभाव लागणं शक्य नाही. त्यात त्यांना हे देखील जाणवतं की, ब्रँचमधील आपल्या आजवरच्या तोऱ्यामुळे दुखावलेले परंतु दबून असलेले काही सहकारी हे आता आपला हिशोब चुकता करण्यासाठी आठवलेला मुद्दाम अधिक भाव देणार आणि आगीत तेल ओतत मजा बघणार. त्यापेक्षा शहाणपणा याच्यात आहे की, काळाची पावलं ओळखून आपणच थोडंसं नमतं घ्यावं. त्या दृष्टीनं त्या आठवलेबरोबर थोडं गोडीगुलाबीनं वागायचा प्रयत्न करतात आणि गंमत अशी होते की, मोठ्या मनाची आठवले ब्रँचमधील वातावरण आणि निरगुडकरबाईंना लागलेली उतरती कळा सहृदयतेनं विचारात घेऊन अत्यंत सहजपणे त्यांच्या मैत्रीच्या आवतणाला प्रतिसाद देते. परिणामी त्यांच्यातील चुरसच नाहीशी होते. फार काय त्या जणू ‘आम्ही दोघी मैत्रिणी जोडीच्या’ आवेशात वागू लागतात. निरगुडकर आणि आठवले यांची गट्टी दिसामासानं वाढत जाते. इतकी की, त्या दोघी नाटक-सिनेमालादेखील एकत्र जाऊ लागतात. निरगुडकर बाई एकदा तर आठवलेच्या घरीदेखील तिचा संसार पाहण्यासाठी जातात आणि त्यांच्या लक्षात येतं की, तिच्याकडे साधा गॅसदेखील नाही. तर ती स्टोववरच स्वयंपाक करते आहे. पण तिचे आणि तिच्या पत्रकार नवऱ्याचे संबंध अत्यंत लाडीगोडीचे आहेत. त्यातून निरगुडकर बाईंना खात्रीच पटते की, आठवले आपल्यापेक्षा सांपत्तिक स्थितीतीत कितीही कमकुवत असली तरी तिची बौद्धिक आणि मानसिक कुवत एवढी दांडगी आणि वागणं-बोलणं एवढं चतुरस्र व व्यासंगी आहे की, आपण कदापि तिच्या पासंगाला कदापिही पुरलो नसतो. त्यामुळे वेळीच माघार घेतली, हा आपला शहाणपणाच झाला.

 मात्र हा समंजसपणा येतानाच दुसरीकडे त्यांच्या मनातील तुलना वाढतच जाते आणि त्यांच्या दु:खामध्ये भर पडत जाते. आठवले बाईंचा नवरा हा पत्रकार असतो आणि त्यांच्यात चांगलाच सुसंवाद असतो, त्यामुळे तिला मिळणारं शरीरसुख देखील भरभरून आहे, हे त्यांना आठवलेच्या शरीराच्या केलेल्या निरीक्षणातून तसेच आठवलेनं त्यांच्या शृंगाराच्या केलेल्या विनासंकोच रसरशीत वर्णनातून जाणवतं आणि त्यांच्या ओसरत्या शारीरिक संबंधांच्या तुलनेमध्ये अधिकच डाचूही लागतं. कथेच्या सुरुवातीला सम्राज्ञी म्हणून अवतरलेल्या निरगुडकर बाईकथेच्या शेवटापर्यंत एखाद्या भिकारणीसारख्या भासू लागतात. हे जाणवून वाचकाचा जीव कळवळतो आणि त्याला तोऱ्याने वागण्यातील विफलता कळते.

‘बैल थकला त्याची गोष्ट’मधील प्रोफेसर घाटपांडे हे एक प्राध्यापक म्हणून आपण यशस्वी असल्याच्या समाधानात, काहीसे घमेंडीत आहेत. आपण इतर प्राध्यापकांच्या तुलनेमध्ये उजवे असल्याची त्यांना जाणीव आहे. पण प्राध्यापकांची अध्ययनक्षमता जोखणाऱ्या ‘नेट /सेट’ परीक्षा या सरकारी धोरणानुसार सक्तीच्या केल्यावर आणि त्या विशिष्ट काळात उत्तीर्ण न केल्यास नोकरी जायचीही शक्यता आहे असं कळल्यावर मात्र घाटपांडे यांचं धाबं दणाणतं. त्यांचा आत्मविश्वासच नाहीसा होतो. अपयशाच्या भीतीनं ते पुरते खचून जातात. हे अपयश दोन पातळ्यांवरचं आहे, एक म्हणजे आपण असफल झालो, तर आपले सहकारी आपल्याला हिणवणार आणि नोकरी गमवायची वेळ आली तर आपल्या संसाराला त्याची आर्थिक झळ पोचणार. त्यात घाटपांड्यांचा विषय भूगोल आहे. त्यामुळे पुढच्या वयात नवीन क्षेत्रामध्ये पाय रोवता यायची शक्यता तशी कमीच आहे. साहजिकच त्यांची तहानभूक हरपल्यागत होते, झोप उडते. महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्राचा विचार करता घाटपांडे हे तसे प्रातिनिधिक पात्र आहेत. शिक्षणक्षेत्र हे तसं समाजाच्या जिव्हाळ्याचं क्षेत्र असल्यामुळे ‘नेट सेट’ हा विषय वर्तमानपत्रातून आमजनतेलाही ठाऊक झालेला आहे. त्यात  अविनाश राजाराम हे स्वत: प्राध्यापक असल्यामुळे त्यांना या विषयाची आतल्या गोटातील म्हणता येईल अशी माहिती आहे. नेट सेट या परीक्षांचा निकाल जेमतेम एक आकडी असतो याचं कारण अपयशाची भीती हेच असावं, हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो. कारण नोकरी जाण्याची किंवा कुणाकडून अवहेलना होण्याची किंवा नोकरी मिळेल की नाही याचीही भीती न बाळगता मी या परीक्षेला एक ओळ देखील न वाचता जाऊन बसलो होतो आणि अजिबात अपेक्षा नसतानाही माझ्या केंद्रातून एकटाच उत्तीर्ण झालो होतो. असो. तर सांगायचा मुद्दा असा की घाटपांडे सरांच्या मनातील भीती आणि परिणामी त्यांच्या तकलादू आत्मविश्वासाचे होणारे खच्चीकरण हे या कथेमध्ये अशा काही परिणामकारकपणे आलं आहे की, ती भीती केवळ घाटपांडे याची आणि नेट सेट पुरती सीमित राहात नाही, तर वाचकाला एकूणातच भय या भावनेपर्यंत पोहोचवते. आणि मग ‘बैल थकला त्याची गोष्ट’ ही घाण्याला जुंपून चाकोरीमध्ये चालणाऱ्या सर्वांचीच होऊन जाते.

या दोन्ही कथांमध्ये संस्थांतर्गत राजकारणाचं सांगोपांग दर्शन घडतं. अविनाश राजाराम हे पॉलिटिक्सचे प्राध्यापक असल्याने त्यांना या राजकारणाच्या चलनवलनाचं चांगलंच भान आहे.

‘सेकंड इनिंग’ मध्ये निरगुडकर मॅडम आणि शैलजा आठवले यांनी एकमेकींशी मिळतं जुळतं घेतल्यामुळे बँकेतील राजकारण हळूहळू ओसरत जातं. पण ‘बैल थकला त्याची गोष्ट’मध्ये मात्र त्याचं स्वरूप अधिक व्यापक आणि गुंतागुतीचं असल्यामुळे राजकारणाचं अधिक खोलवर दर्शन घडतं. मराठी साहित्यात भालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या कादंबऱ्यांमधून शिक्षण क्षेत्राची झडझडून झाडाझडती घेतली आहे. विशिष्ट जातींनाच शिक्षणाचा अधिकार दिल्याने प्रदूषित झालेल्या व्यवस्थेवर रोख असल्याने ती त्यांची गरजच होती. त्यानंतर शिक्षणक्षेत्राचे अनेक पैलू मराठी साहित्यात येतच राहिले. रमेश इंगळे उत्रादकर यांच्या ‘निशाणी डावा अंगठा’सारख्या कादंबऱ्यांप्रमाणेच ‘बैल थकला त्याची गोष्ट’ ही दीर्घकथा वर्षानुवर्षं आलम शिक्षण क्षेत्राला खलनायकासारखा भेडसावणाऱ्या ‘नेट-सेट’ या जिव्हाळ्याच्या विषयावर असल्याने शिक्षणक्षेत्राविषयीचं मराठी फिक्शनमध्ये एक महत्त्वाचं योगदान ठरू शकते.

काळाची गरज म्हणून सध्या जरी क्रिकेट ५० ओवर्सवरून थेट २० ओवर्सवर आलं असलं आणि कसोटी सामन्यांची लोकप्रियता जरी ओसरू लागली असली तरी अद्यापही अस्सल क्रिकेट शौकिन कसोटी सामन्यांनाच अभिजात क्रिकेट मानतात आणि या अभिजात कसोटी क्रिकेटमध्ये ‘सेकंड इनिंग’ खूपच महत्त्वाची असते. कारण ‘पहिली इनिंग’ खेळताना जे काही कमी-जास्त झालेलं असतं तर त्याची भरपाईकरून अंतिम निर्णय ठरण्यासाठी ‘सेकंड इनिंग’ ही अधिक कामाची ठरते. अविनाश कोल्हे यांनी ‘अविनाश राजाराम’ या नावानं सुरू केलेली ही ‘सेकंड इनिंग’ निश्चितच आश्वासक आहे.

लेखक प्रसिद्ध कथाकार आहेत.

satishstambe@gmail.com

.............................................................................................................................................

सेकंड इनिंग : दोन दीर्घकथा - अविनाश राजाराम
सदामंगल पब्लिकेशन्, मुंबई, पाने - १२८, मूल्य - १५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठ क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3936

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......