शंकर चाफाडकर : पुस्तकांच्या घरातला माणूस
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
प्रवीण दशरथ बांदेकर
  • ग्रंथसंग्राहक शंकर चाफाडकर
  • Fri , 11 August 2017
  • ग्रंथनामा Booksnama वाचणारा लिहितो वाचन-संस्कृती Reading Culture वाचक-समाज Reading Class शंकर चाफाडकर Shankar Chaphadkar

बेळगावचे पुस्तकप्रेमी शंकर चाफाडकर गेल्याची बातमी एका स्नेह्याकडून कळली आणि प्रचंड उदासवाणं वाटत राहिलं. दोन-तीन महिन्यांपूर्वी त्यांच्याशी काही पुस्तकांच्या संदर्भात फोनवर बोललो होतो ते शेवटचं. मी भेटलेल्या पुस्तकसंग्राहकांमध्ये व्यक्तिगत मालकीची सर्वाधिक पुस्तके जमवणार्‍यांमध्ये चाफाडकरांचा नंबर बहुधा सर्वांत अव्वल लागू शकत होता. चाफाडकरांकडे असलेल्या हजारो पुस्तकांच्या संग्रहात पुस्तकांविषयी लिहिलेल्या पुस्तकांचीही संख्या प्रचंड होती. अलीकडेच नीतीन रिंढे यांचं या विषयावरचं एक उत्तम पुस्तक लोकवाङ्मयगृह प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे. त्यात उल्लेख असलेली सगळीच्या सगळी पुस्तकं चाफाडकरांच्या संग्रही होती. किंबहुना त्यात उल्लेख नसलेलीही असंख्य पुस्तकं चाफाडकरांकडे होती. अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये मलाही रस आहे, हे कळल्यावर एका भेटीमध्ये त्यांच्याकडे जादाच्या असलेल्या प्रतींमधून याविषयाशी संबंधित काही पुस्तकं त्यांनी मला दिली होती. त्यासोबतच अशा शंभरेक पुस्तकांची यादी असलेली एक स्वहस्ताक्षरात लिहिलेली नोंदही दिलेली. त्यापैकी माझ्याकडे नसलेली पुस्तकं मी खरेदी करावीत, वाचावीत, संग्रही ठेवावी हा अर्थातच त्यामागचा त्यांचा उद्देश होता. लेखकाचं मध्यवर्ती पात्र असलेल्या कादंबर्‍या मराठीत अलीकडे दिसू लागल्यात, तशाच पद्धतीनं वाचकाचं मध्यवर्ती पात्र असलेली कादंबरी मराठीत यावी, असं त्यांनी एकदा बोलून दाखवलं होतं. त्याविषयी मला सुचलेल्या एका आशयसूत्राच्या अनुषंगानेच मी त्यांच्याशी त्या शेवटच्या फोनभेटीत बोललो होतो. इंग्रजीत उपलब्ध असलेल्या तशा प्रकारच्या अनेक पुस्तकांची नावं त्यांनी सुचवली होती. अट्टल वाचक असलेल्या चाफाडकरांच्या आयुष्याचं पुस्तक मात्र अनपेक्षितपणे मिटलं गेलं होतं. त्यामुळे पुढे मागे कधी ही अशी कादंबरी माझ्याकडून लिहून पूर्ण झालीच तर, त्या वेळी ती वाचायला चाफाडकर नसतील ही अस्वस्थ करणारी जाणीव मनाला छळत राहतेय.

आता नेमकेपणानं लेखकाचं नाव आठवत नाही, पण पुस्तकांच्याच घरात राहणार्‍या पुस्तकवेड्याविषयीची एक कादंबरी वाचलेली एकदा. तेव्हा ते सगळं खोटं वाटलेलं. असं कधी असतं का? किंवा असलंच तर ते तिकडच्या युरोप अमेरिकेसारख्या सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप पुढारलेल्या एकाद्या देशात असं असू शकेल वगैरे मनात आलेलं. पण एकदा अशाच एका काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बेळगाव या माझ्या आवडत्या गावी जाणं झालं होतं. तिथं अनपेक्षितपणे अशाच एका पुस्तकांच्या घरात राहणार्‍या पुस्तकवेड्या अवलिया ग्रंथसंग्राहकाला भेटायचा योग आला. त्या वेळी अचानकच मला या कादंबरीची आठवण झाली होती. मनात आलेलं, अरेच्चा! अगदीच काही आपण समजतोय तशी सांस्कृतिक दुष्काळाची परिस्थिती नाहीये. ही अशी पुस्तकांवर जीवापाड प्रेम करणारी माणसं आपल्याकडेही आहेत. अगदी आपल्या आजूबाजूलाही आहेत.

बेळगाव आवडण्यामागे काही खास कारणं आहेत माझ्या मनात. त्यातली बरीचशी अर्थातच मला आवडणार्‍या जी० ए० कुलकर्णी, इंदिरा संत, शंकर रामाणी यांसारखे लेखक, कवी आणि प्रकाश नारायण संतांच्या कथांमधून भेटणार्‍या लंपन आणि सुमीशी निगडित आहेत. तर त्या दिवशीचा कार्यक्रम आटोपून मी खाली आलो, तोवर भेटायला आलेल्या मंडळींमध्ये एक साठी उलटलेले अपरिचित गृहस्थही होते. त्यांच्यासोबत अशोक याळगी वगैरे काही परिचयातली मंडळीही होती. त्यांपैकीच कुणीतरी त्या गृहस्थांचा परिचय करून दिला, हे शंकर चाफाडकर. उत्तम वाचक आहेत. तुम्हाला भेटू इच्छितायत.

साधारणत: हा नेहमीचा अनुभव असतो. कार्यक्रम चांगला झाला, भाषण आवडलं वगैरे सांगायला, ओळख करून घ्यायला किंवा आपली पुस्तकं द्यायला अनेक जण भेटतात. त्यापैकीच कुणीतरी हे असावेत असं पहिल्यांदा मनात आलं. पण तितक्यातच परिचय करून देणारे म्हणाले, ‘यांच्या घरी यांची स्वत:ची लायब्ररी आहे. एकेका विषयावरची शेकडो पुस्तकं आहेत. काही काही तर अन्यत्र कुठेही सहसा बघायलाही मिळायची नाहीत अशीही दुर्मीळ पुस्तकं यांच्या संग्रही आहेत. यांची इच्छा आहे की, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही त्यांच्या ग्रंथ संग्रहाला भेट द्यावी.’

मला अर्थातच त्या दिवशी बेळगावातच मुक्काम करायचा असल्याने भरपूर वेळ होता. त्या दिवशी दुसरा काही कार्यक्रमही ठरला नव्हता. याळगींसोबत जी० ए० कुलकर्णींच्या वस्तू असलेलं संग्रहालय बघायला दुसर्‍या दिवशी जायचं ठरलं होतं. त्यामुळे चाफाडकरांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या घरी जाण्यात काहीच अडचण नव्हती. दुसरं म्हणजे मला अतिशय प्रिय असलेली अशीच ती गोष्ट होती. पुस्तकं जमवण्याचा नाद मलाही होती. अगदी शाळकरी वयापासून मी तो जोपासला होता. तेव्हापासून गेल्या काही वर्षांत मी कुणाच्याही नजरेत भरण्याइतपत पुस्तकं जमवली होती. त्यामुळेच दुसरा एखादा समानधर्मा ग्रंथप्रेमी आणि ग्रंथसंग्राहक भेटला की, मला नेहमीच आनंद होत असे. सतीश काळसेकरांचं पेणचं घर आणि नीतीन रिंढे, शशिकांत सावंत, गोव्यातले डॉ० विठ्ठल ठाकूर व त्यांच्या सुविद्य पत्नी कवयित्री रेखा ठाकूर, नांदेडमधले कविमित्र श्रीकांत देशमुख, सोलापूरचे नीतिन वैद्य अशा माझ्या कितीतरी ग्रंथप्रेमी मित्रमंडळींची पुस्तकांनी भरून वाहणारी घरं हा त्यांच्या इतकाच माझ्यासाठीही अभिमानाचा विषय राहिला आहे. त्यामुळेच चाफाडकरांकडेही असाच पुस्तकांचा संग्रह आहे हे ऐकल्यावर नकार द्यायचा काही प्रश्‍नच उरला नव्हता.

चाफाडकरांच्या घरात जाईपर्यंत मी साधारणत: आजवर मी पाहिलेल्या वा ऐकलेल्या ग्रंथसंग्राहकांच्या घरातल्या ग्रंथाप्रमाणेच यांच्याही घरात पुस्तकं असतील, भिंतीतली कपाटं असतील, पुस्तकांची गच्च भरलेली शेल्फ वगैरे असेल, असंच काही तरी गृहीत धरून चाललो होतो. पण माझे सगळे अंदाज खोटे ठरवत, एखाद्या अदभुत दुनियेत गेल्यावर जसं होईल तसं काहीसं माझं होऊन गेलं. चाफाडकरांच्या घरात पाय ठेवल्यापासून जिथं नजर टाकावी तिथं पुस्तकंच पुस्तकं मी पाहत होतो. पुस्तकांनी व्यापला नाही, असा एकही कोपरा शिल्लक राहिला नव्हता. घराला जणू भिंतीही पुस्तकाच्याच होत्या. खालच्या फरशीपासून छतापर्यंत पुस्तकं नीटपणे मांडलेली. हॉल, बेडरुम्स, किचन सगळं पुस्तकं, नियतकालिकं, कात्रणं, फाइल्स, बुकमार्क्स, नकाशे, चित्रं यांनी भरलेलं. बरं, पुस्तकंही कशी तरी कोंबलेली वा अस्ताव्यस्तपणे घाईघाईत एकावर एक रचलेली वगैरे नाहीत. तर व्यवस्थितपणे कव्हर्स वगैरे घालून विषयांनुसार मांडणी करून ठेवलेली दिसत होती. पुस्तकं दाखवताना इतका वेळ काहीसे अबोल वाटणार्‍या चाफाडकरांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यांना किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. एकेका विषयावरची मिळतील ती पुस्तकं जमवण्याकडे त्यांचा ओढा दिसत होता. उदाहरणार्थ, मेंदूसारखा विषय असो किंवा पुस्तकांविषयी माहिती देणारी पुस्तकं असोत, या विषयांवरची मराठी, इंग्रजी, हिंदी अशा चाफाडकरांना येत असलेल्या भाषामधली शेकडो पुस्तकं त्यांच्या संग्रही दिसत होती. ही सगळी पुस्तकं बारकाईनं वाचून त्यांच्या नोट्सही काढलेल्या दिसत होत्या. कुठच्या पुस्तकात काय आहे हे सगळं त्यांना लख्खपणे आठवत होतं. काही पुस्तकांविषयी लिहून आलेली परीक्षणं वगैरेही व्यवस्थित कात्रण करून त्याच पुस्तकाच्या मागच्या कव्हरच्या आत चिकटवलेली होती. तर काही काही लेखकांच्या स्वतंत्र फाईल्स करून त्यांच्याविषयी लिहून आलेलं, त्यांच्या ग्रंथांची परीक्षणं, त्या लेखकांनी लिहिलेले महत्त्वाचे लेख वगैरे निगुतीनं जतन करून ठेवले होते. मलाही त्यांनी माझ्या नावाची फाईल आणि त्यातली माझ्या ‘चाळेगत’ या कादंबरीचीपरीक्षणं वगैरे दाखवूआश्चर्याचा धक्का दिला होता. माझ्यासारख्या अत्यंत आळशी आणि बेशिस्त लेखकाकडे स्वतच्यिा लेखनाविषयी लिहून आलेलं असं एकत्रित सापडणं कठीण, पण चाफाडकरांनी मात्र एखाद्या प्रशिक्षित ग्रंथपालालाही जमणार नाही अशा पद्धतीनं अतिशय शिस्तीनं सगळं सांभाळलं होतं. चाफाडकरांशी झालेल्या त्या पहिल्या भेटीपासून माझ्यासाठी बेळगाव आवडण्याच्या कारणांमध्ये या आणखी एका गोष्टीची भर पडली होती. बेळगावमध्ये जाऊन चाफाडकरांना भेटलो नाही असं पुढे क्वचितच झालं असेल.

त्यापुढच्या भेटींमध्ये चाफाडकरांविषयी काही गोष्टी समजत गेल्या. सीमा सुरक्षा दलात  काही वर्षं सेवा करून असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांनी १९९४मध्ये निवृत्ती स्वीकारली होती. नोकरीत असताना एका चकमकीत आपल्या पाठीतून गोळी गेल्याचे ते सांगत असताना मी शहारलो होतो. निवृत्तीनंतर आपलं पुस्तकप्रेम जोपासताना त्यांनी लग्न वगैरे काही न करता पुस्तकांशीच संसार थाटला होता. निवृत्तीनंतर मिळालेले पैसे, पेन्शनची रक्कम, वारसाहक्कानं मिळालेली काही प्रॉपर्टी या सगळ्याचा विनियोग त्यांनी फक्त आणि फक्त पुस्तकांची खरेदी आणि जोपासना यांसाठीच केला होता. पुस्तकांच्या जोडीला विविध प्रकारचे नकाशे, बुकमार्क्स, नियतकालिकं यांचाही त्यांनी संग्रह केला होता. अनेक नव्या-जुन्या नियतकालिकांचे गठ्ठेच्या गठ्ठे व्यवस्थितपणे स्वत:ची बांधणी करून त्यांनी जपून ठेवले होते.

वाळवी व तत्सम उपद्रवी किटकांपासून पुस्तकांची काळजी घेण्यासाठी चाफाडकर करत असलेले विविध उपायही थक्क करणारे होते. उदाहरणार्थ, वेखंडाच्या मुळ्या पुस्तकांच्या आजूबाजूला पसरून ठेवल्यावर वाळवी वा कसरीपासून पुस्तकं सुरक्षित राहू शकतात, हे त्यांच्यामुळेच मला माहीत झालं. आमच्याकडच्या दमट हवेपासून पुस्तकाचं संरक्षण करण्यासाठी काय करता येईल, हेही मला त्यांच्याकडून जाणून घेता आलं होतं. पोटच्या पोराप्रमाणे त्यांचं आपल्या प्रत्येक पुस्तकाकडे लक्ष असे, त्यांना नीट प्लास्टिकची वगैरे कव्हर्स घालून ते सांभाळ करत असतं, हे सतत जाणवायचं. स्वत: अत्यंत मेहनतीनं कुठून कुठून विकत घेतलेली, जीवापाड सांभाळलेली पुस्तकं दुसर्‍याला वाचायला द्यायला त्यांची तयारी नसे. एखाद्याला हवं असलं तर त्या पुस्तकाची दुसरी प्रत मागवून त्याला ते देत असत. पण आपल्या संग्रहातली आपली प्रत मात्र बाहेर जाऊ नये असं त्यांना वाटत असे.

आपल्याकडच्या अफाट संग्रहातलं प्रत्येक पुस्तक त्यांनी नुसतंच नजरेखालून घातलेलं नाहीये, तर ते बारकाईनं वाचलेलं आहे याचंही प्रत्यंतर त्यांच्याशी गप्पा मारताना लगेचच येत असे. कुठल्या पुस्तकात काय आहे, याविषयी ते अचूकपणे सांगू शकत असत. बोलता बोलता एखाद्या पुस्तकाचा संदर्भ आला की, लगेच उठून ते संबंधित पुस्तक काढून घेऊन येत नि कोणत्या विशिष्ट पानावर आपण चर्चा करीत असलेला मजकूर आहे हेही दाखवून देत असत. आपल्या आजूबाजूला वावरणार्‍यांनीही वाचावं, क्षीण होत चाललेल्या वाचनसंस्कृतीला आपापल्या कुवतीप्रमाणे जोपासण्याचा प्रयत्न करावा म्हणून ते सतत इतरांना वाचायचा आग्रह करत असत, त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे पुस्तक सुचवत असत. फेसबुक, व्हॉटसअॅपसारखा आधुनिक सोशल मीडियांचा वापरामधूनही ते आपल्या आवडत्या पुस्तकांविषयी सांगण्याचा प्रयत्न सातत्याने करत असलेले दिसून यायचे. मध्यंतरी मी सुरू केलेल्या बुक क्लब या व्हॉटसअॅप ग्रुपवरही ते काही काळ सक्रिय होते. पुस्तकांप्रमाणेच मराठी, इंग्रजी, हिंदी अशा भाषांतील अनेक नियतकालिकांची वर्गणी भरून ते नियतकालिकं मागवत असत. वाचलेल्या एखाद्या मासिकातील आवडलेल्या लेखाची मित्रपरिवारामध्ये शिफारस करत. त्यांना वाचायला सुचवत. इतकंच नव्हे, तर पुढच्या भेटीत वा फोन करून त्यांनी ते वाचलं का, याचीही आस्थेनं चौकशी करत असत. बेळगावात आलेल्या जवळपास प्रत्येक मराठी साहित्यिकाला चाफाडकर आपला ग्रंथसंग्रह दाखवायला घेऊन गेले होते. सतीश काळसेकर, संजय भास्कर जोशी, कवयित्री नीरजा अशा अनेकांनी चाफाडकरांच्या या अविस्मरणीय भेटीनंतर त्यांच्या ग्रंथप्रेमाविषयी स्वतंत्रपणे लिहिलेलंही आहे.

चाफाडकरांची तब्येत अलीकडे बरी नसते, त्यांना दम्याचा त्रास होतो आहे, हे माहीत होतं. त्यांचं वयही ऐंशीच्या पुढे झालं होतं. पण तरीही त्यांच्या उत्साहात, वाचनात आणि ग्रंथप्रेमात तसूभरही फरक पडला नव्हता. पुस्तकांविषयी बोलताना त्यांना आपल्या तब्येतीचा नेहमीच विसर पडायचा. भेटायला आलेल्याला स्वत: बनवलेल्या कॉफीचा कप देऊन तासन् तास पुस्तकांविषयी बोलत बसायची त्यांची तयारी असायची. दहा-पंधरा मिनिटांसाठी धावती भेट द्यायला गेलेल्या माणसालाही त्यांच्या त्या अलिबाबाच्या अद्भुत खजिन्यात हरवून गेल्यावर दोनतीन तास कधी उलटले हे कळत नसे. बेळगावातल्या या पुस्तकप्रेमीचा हा खजिना अनुभवण्यासाठी कोल्हापूर, हुबळी, धारवाड, कोकण, गोवा अशा अनेक ठिकाणाहून वाचनप्रेमी जात असत.

चाफाडकर गेल्याची वार्ता कानी आली नि हे सगळं आठवत राहिलं. मनात येतंय, चाफाडकरांच्या नंतर पोरक्या झालेल्या त्यांच्या या पुस्तकांचं पुढे काय होईल? पुस्तकांविषयी शिस्तीनं सगळं उस्तवार करणार्‍या चाफाडकरांनी आपल्या मृत्युपत्रात त्यांची काही सोय करून ठेवली असावी का? की आता मराठीचा दु:स्वास करणार्‍या या कानडावू मुलखात असा एक पुस्तकवेडा माणूस राहत होता, ही एक दंतकथाच बनून जाईल?

लेखक कवी व कादंबरीकार आहेत.

samwadpravin@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......