अजूनकाही
१. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर प्राप्तीकर भरणाऱ्यांच्या प्रमाणात २५ टक्के वाढ झाली आहे. ५ ऑगस्टपर्यंत २ कोटी ८२ लाखांहून अधिक लोकांनी आयकर भरला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ २५ टक्के इतकी आहे. मागील आर्थिक वर्षात आयकर भरणाऱ्यांचे प्रमाण २ कोटी २६ लाख इतके होते. नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात लोक कर यंत्रणेच्या अंतर्गत आले आहेत. नोटाबंदीचा परिणाम आगाऊ करभरणा करणाऱ्यांच्या संख्येवरही दिसून आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आगाऊ करभरणा करणाऱ्यांचे प्रमाण ४१.७९ टक्क्यांनी वाढले आहे.
केवढं मोठं यश हे! देश सव्वाशे कोटींचा. करदाते सव्वादोन कोटी म्हणजे सव्वा दोन टक्केही नाहीत. त्यांच्यात २५ टक्के वाढ केवढी घसघशीत! लोक उगाच नोटाबंदीचा काही फायदा झाला नाही म्हणतात. या सगळ्या आगाऊ लोकांना प्राप्ती असो वा नसो, सरसकट आगाऊ करभरणा करायला लावला पाहिजे.
.............................................................................................................................................
२. काँग्रेस पक्ष सध्या गंभीर संकटाचा सामना करतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे काँग्रेससमोर जी आव्हाने उभी करतात, त्यांचा सामना करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत. आता पक्षासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदी आणि शहांच्या कार्यशैलीचा अभ्यास करून योग्य लवचिकता दाखवायला हवी. अन्यथा आपण काळाच्या खूप मागे पडू, असे जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.
किती ते मात्रांचे वळसे, द्राविडी प्राणायाम! सोप्या शब्दांत, एका वाक्यात ‘गांधी-नेहरू घराण्याकडेच पक्षाचं नेतृत्व असलं पाहिजे’ हा अलिखित संकेत मोडून नव्या दमाच्या, नव्या विचारांच्या, प्रबळ सत्ताधीशाला शिंगावर घेण्यायोग्य कल्पना असलेल्या दमदार नेत्याकडे पक्षाची धुरा दिली पाहिजे. सोनिया आणि राहुल यांना विश्रांती दिली पाहिजे. नाहीतर पक्ष जिवंत राहणार नाही. रमेशभाऊ, बेगडी आणि धादांत खोटी धर्मनिरपेक्षता, सुस्ती, भ्रष्टाचाराला पोषक अशी कारभारपद्धती या सगळ्यांमध्ये बदल करून नव्या युगाला साजेसं रूप तुमचा पक्ष धारण करणारच नसेल, तर तो मेला तरी देशाला काही सोयरसुतक नाही.
.............................................................................................................................................
३. संरक्षण खात्याने देशभरातल्या ३९ सैन्य गोशाळा बंद करण्याचा निर्णय लागू केला आहे. लष्करी गोशाळांमध्ये उच्च प्रजातींच्या गायींचा समावेश आहे, देशभरातल्या इतर गायींच्या तुलनेत या गायी जास्त दूध देतात. देशभरातल्या अशा ३९ गोशाळांमध्ये सुमारे २० हजार गायी आहेत, त्यांचं काय होणार? हा प्रश्न कायम आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही टांगती तलवार आली आहे. सैनिकांसाठी आता डेअरींमधूनच दूध खरेदी केलं जावं असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.
कशाला एवढी चिंता हवी. एवढ्या प्रचंड गोप्रेमी समाजात आणि गोप्रतिपालक सरकारमध्ये २० हजार गोपुत्र सापडणार नाहीत? ते काय आपल्या मातेला (खऱ्या नव्हे, गोमातेला) वाऱ्यावर सोडतील का? (तेही त्या सर्वसामान्य गायींपेक्षा अधिक दूध देत असताना.) एकेक गोपुत्र एकेक गाय घेऊन जाईल घरी प्रतिपाळासाठी. अडचण फक्त एकच आहे... या गायी खूप दूध देतात म्हणजे त्या विदेशी असणार. त्यातून काहीतरी शास्त्रार्थ काढा बुवा!
.............................................................................................................................................
४. हरियाणामधील भाजप नेते दर्शन नागपाल यांनी रुग्णवाहिका अडवून धरल्याने त्यातील रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या कुटुंबियांनी केला आहे. या रुग्णवाहिकेने नागपाल यांच्या गाडीला धडक दिल्याने त्यांनी रुग्णवाहिका अर्धा तास थांबवून ठेवली आणि त्यामुळेच रुग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी नागपाल यांच्याकडे अनेकदा विनंती करूनही त्यांनी रुग्णवाहिकेचा मार्ग रोखून धरला.
साक्षात भाजप आमदाराच्या गाडीला ठोकर देऊन पळू पाहणाऱ्या रुग्णवाहिकेला- आत मरणासन्न रुग्ण आहे इतक्या फुटकळ कारणासाठी- अशीच सोडायला ही काय मोगलाई लागून गेली आहे काय? (कंपोझिटर, ते ‘उपाध्यायी’ करून घ्या बुवा!) एकवेळ आजारी गाय वगैरे असती, तर सोडलं असतं गोपुत्राने. एका सामान्य आणि त्यातही मरणासन्न माणसाच्या जिवासाठी इतका आटापिटा कशाला हवा? आमदारांनी अँब्युलन्समधल्या इतरांचं मरणासन्न रुग्णांमध्ये रूपांतर केलं नाही, हे नशीब समजा.
.............................................................................................................................................
५. सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानकडून सुरू असणाऱ्या प्रयत्नांना भारत काहीच प्रतिसाद देत नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी म्हटले आहे. शेजाऱ्यांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या इच्छेला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. भारत आणि अफगाणिस्तानने चांगल्या शेजाऱ्यांप्रमाणे पुढे येऊन पाकिस्तानच्या शांती प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. जेणेकरून एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांचे सत्र संपुष्टात येईल. भारताकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक व राजकीय अस्थिरता निर्माण करण्यासाठी भारत अफगाणिस्तानच्या कट कारस्थानांना पाठबळ देतो, असा आरोपही त्यांनी केला.
गंमत आहे ना. तिन्ही देश याच आशयाचे दावे थोड्याफार फेरफाराने करत असतील आणि तिन्हीकडची भाबडी मंडळी आपला देश कसा साधुसंतसज्जनांचा देश आहे आणि ‘शत्रू’च फक्त कुरापती काढतो, असं मानून त्यावर प्रतिसाद देत असतील. अर्थात, यात क्रमवारी लावायची झाली, तर पाकिस्तानचा दावा सर्वात हास्यस्फोटक ठरेल, यात शंका नाही. पाकिस्तानने शांततेसाठी प्रयत्न चालवल्याचा दावा हा पाकिस्तानात लोकशाही आहे, या दाव्यापेक्षाही अधिक विनोदी ठरेल.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment