अजूनकाही
१. गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिष्ठेच्या लढाईत काँग्रेसनं भाजपवर मात केली आहे. काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांचा पराभव केला असून त्यांना ४४ मते मिळाली. गुजरातमधील तीन जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस होती. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या चाणक्यांमधील लढाईत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे. काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय महत्त्वाचा ठरणार आहे. या निवडणुकीत धनशक्तीचा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्यांचा पराभव झाला, अशा शब्दात अहमद पटेल यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. ‘सत्यमेव जयते’ असंही पटेल यांनी म्हटलं आहे.
अमित शहा कसे पहिल्या नंबरानं निवडून गेले आणि पटेलांना किल्ला लढवायला लागला, असा स्वसांत्वनायुक्त अभिनंदनाचा केविलवाणा जल्लोष करून काय फायदा? पटेलांना हरवून काँग्रेसला हतोत्साह करण्याचा डाव उधळला, याचा सल फक्त शहाच जाणू शकतात. बाकी ‘धनशक्तीचा आणि सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करणाऱ्यांना धडा,’ ‘सत्यमेव जयते’ आदी शब्दप्रयोग अहमद पटेलांच्या तोंडी शोभून दिसत नाहीत... पण निकाल वेगळा लागला असता तर ते शहांच्याही तोंडी कुठे शोभले असते?
.............................................................................................................................................
२. तामिळनाडूतील शाळा-महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम बंधनकारक करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबईतील शाळांमध्येही ‘वंदे मातरम्’ गाणं बंधनकारक करण्यात यावं, अशी मागणी मुंबईतील भाजप नगरसेवक संदीप पटेल यांनी प्रस्तावाद्वारे मांडली आहे. महापालिकेच्या आणि सर्व अनुदानित शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गाणं अनिवार्य करण्यात यावं, असं त्यांनी या प्रस्तावात म्हटलं आहे. भावी पिढीत देशभक्ती जागृत राहावी, यासाठी आठवड्यातून किमान दोनदा ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायला हवं. महापालिका सभागृहाच्या धर्तीवर स्थायी, सुधार आणि अन्य समित्यांच्या कामकाजालाही ‘वंदे मातरम्’ या गीतानं सुरुवात करायला हवी, असंही त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे.
हे असं टप्प्याटप्प्यानं करण्यापेक्षा जेवढ्या वेळा नमाज होते, तेवढ्या वेळा दिवसातून प्रत्येकानं ‘वंदे मातरम’ गायलंच पाहिजे; बाकी कामकाज, शिक्षण वगैरे मधल्या वेळात करायचं, असाच एक निर्णय देशभरासाठी घेऊन टाकला तर? आजकाल कोर्टंही देशभक्त बनली आहेत, त्यामुळे त्यांचाही अडसर होणार नाही. आपल्यासमोर आदर्श कोणाचा आहे आणि आपल्याला लवकरात लवकर आपल्या समाजाला काय बनवायचंय, देशाला काय बनवायचंय, हे लक्षात घ्या.
.............................................................................................................................................
३. ‘आपल्या देशाचे 'पीएम' नरेंद्र मोदी म्हणजे प्रधानमंत्री नव्हे तर प्युअरली प्रचारमंत्री आहेत. कारण, ते फक्त ‘मन की बात’ करतात, जाहिरात करतात. विशेष म्हणजे पंतप्रधान सरकारी मोबाइल कंपनीचा प्रचार करत नाहीत. तर अंबानी यांच्या खासगी कंपनीचा प्रचार करतात’, अशी टीका जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार यानं केली आहे.
बापरे, भलतेच देशद्रोही आणि फुटीरतावादी विचार! देशाचे तुकडेच करायला निघालाय तो. पदव्युत्तर शिक्षणाशी आमचा काही संबंध नसला आणि त्यातलं काही कळत नसलं तरी तरी किती वर्षं एकेका इयत्तेत घालवावीत याला काही सुमार. अभ्यासाचा वेळ असल्या राष्ट्रद्रोही विचारांमध्ये घालवतो आणि जनतेच्या पैशाची उधळपट्टी होते यांच्या शिक्षणावर. कुठाय तो रणगाडा. धाडा लवकर, काबीज करा ते विद्यापीठ!!
.............................................................................................................................................
४. पुणे महानगरपालिकेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना 'बावळट' असं संबोधणारे खासदार संजय काकडे यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात 'पुणेकर बंधू भगिनींनो, आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाहीये' या आशयाचा मजकूर लिहिण्यात आला आहे. पुणे शहरातील समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाची फेरनिविदा काढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतल्यामुळे संजय काकडे यांनी 'पालिकेतील आमचे पदाधिकारी बावळट आहेत', असं विधान केलं होतं.
पुण्यात कोणी कोणाला बावळट म्हणणं, म्हणजे जन्मजात ओव्हरस्मार्ट असलेल्या पुणेकरांच्या दृष्टीने अपमानाचा परमावधीच. एका पक्षाच्या खासदाराने आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बावळट म्हणणे, हा मात्र खरोखरच बावळटपणा म्हणायला हवा. नेते आयात असले की, कधीकधी असे गोंधळ होतात. बाकी पुणेकरांना टोप्या घालण्यात पटाईत असलेल्या कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकाला बावळट म्हणण्याचा बावळटपणा कोणी पुणेकर कधी करील का?
.............................................................................................................................................
५. भारताचा बॉक्सर विजेंदर सिंगने प्रो-बॉक्सिंगमध्ये चीनचा बॉक्सर मायमायतीचा पराभव केल्यानंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विजेंदरचं कौतुक करतानाच चीनवरही निशाणा साधला आहे. 'जीत गए !! भारत ने चीन को दे मारा !!', असं ट्विट बिग बी यांनी केलं आहे. या ट्विटसह अमिताभ यांनी विजेंदरच्या विजयाच्या सेलिब्रेशनचे फोटो देखील शेअर केले आहेत.
अमिताभ बच्चन महोदय हे हवेची दिशा पाहून तिच्यावर स्वार होण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते उगाच नव्हे! एका क्रीडास्पर्धेतल्या विजयावर युद्धोन्मादी कमेंट टाकून त्यांनी लोकभावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी बनावटीच्या फोनवरूनच त्यांनी हे ट्विट केलं असणार आणि ते त्यांच्या चाहत्यांनीही तशाच फोनवरून रिट्विट केलं असणार. उद्या चीननं त्यांच्या एखाद्या योजनेसाठी, कंपनीसाठी यांना मानधन देऊन प्रचाराला बोलावलं, तर ते ‘कुछ दिन तो गुजारो झेजियांग में’ म्हणून दात विचकणार नाहीत, याची गॅरंटी नाही.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment