सदाभाऊ, तुम्हीसुद्धा ‘असं’ वागताय म्हणून आमच्या पोटात दुखतंय हो!
पडघम - राज्यकारण
किशोर रक्ताटे
  • कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत
  • Wed , 09 August 2017
  • पडघम राज्यकारण शेतकरी शेती संप शेतमाल बाजारभाव कर्जमाफी सदाभाऊ खोत Sadabhau Khot

सरकारमध्ये गेल्यानंतर, मंत्री झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांची शेतकरी संघटना, शेतकरी आणि शेतीचे प्रश्न यांविषयीची आस्था स्पष्ट होत गेली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी तर खोत सरळ सरळ सरकारच्या बाजूने राहिले. त्याचा परिणाम म्हणून नुकतीच त्यांची शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांचं मंत्रिपद जाणार की राहणार याची चर्चा चालू आहे. मंत्रिपदं ही केव्हाही औटघटकेच्या कवचकुंडलांसारखीच असतात. मुद्दा आहे तो सदाभाऊंच्या बांधीलकीचा. त्याचं काय करायचं? ८ जून २०१७ रोजी ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेल्या लेखाचं हे पुनर्प्रकाशन...

……………………………………………………………………………………………

शेतकर्‍यांचा संताप अजूनही जोरात आहे. माध्यमांना दिसणारं आंदोलन काहीसं कमी झालं असलं तरी सोशल मीडियावर जोरदार टीका-टिपण्णी सुरू आहे. त्यातच खरे शेतकरी अन खोटे शेतकरी असा ट्रेंण्ड आहेच. त्याशिवाय शेतीची अजिबात समज नसणारे भक्त एका बाजूला आहेत, तर दुसर्‍या बाजूला शेतीत राबणारे, राबलेले किंवा ज्यांचं कुणीतरी राबतं आहे, असे एकमेकांच्या विरोधात भांडत आहेत. ज्या सामान्य शेतकर्‍यांनी हे आंदोलन सुरू केलं आणि वाढवलं त्यांना आधार वाटेल असं अजून तरी काही घडताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलन कोणत्या दिशेनं जाणार, ते कधी अन कसं थांबणार, याबाबत काहीही खात्री नाही. कर्जमाफीच्या आश्वासनानं त्यातला रोष कदाचित कमी होईल. पण सत्तेवर बसलेला पक्ष शेतकरीविरोधी आहे या सामाजिक मान्यतेनं मोठी जागा घेतली आहे. सदाभाऊ खोतांसारखे शेतकरी आंदोलनातून आलेले नेते सरकार सोबत असताना आंदोलनात मध्यस्थी किंवा मार्ग निघणं अवघड दिसतंय. एकूणच या आंदोलनाला अनेक कंगोरे आहेत. यात मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल चर्चेत आहेत सदाभाऊ खोत. त्यामुळे त्यांची वेगळ्या पद्धतीने दखल घेणं महत्त्वाचं वाटतं...

या आंदोलनाच्या निमित्ताने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल वैयक्तिक स्तरावर जोरात टीका सुरू आहे! त्यातच त्यांच्या संघटनेच्या बाबतीत असलेले अन संपाच्या काळात ताणल्या गेलेल्या संबंधांबाबत राजू शेट्टींनी राजकीय टीका केली आहेच; पण ती वैयक्तिक गद्दारीच्या संदर्भातील आहे. अजून तरी सरकारच्या शेतीसंदर्भातील धोरणात्मक भूमिकेबाबत राजू शेट्टी सदाभाऊंना फारसा दोष देत नाहीत. सदाभाऊ सरकारमध्ये असले तरी त्यांच्या अस्तित्वाला राजकीय मर्यादा आहेत. पण शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं मुळात सदाभाऊ खोतांसारख्या सामान्यांतून पुढे आलेला माणूस मंत्री झाल्यावर आपल्या माणसांसाठी साधा निषेध व्यक्त करत नाही. सरकारच्या मर्यादांबद्दल बोलत नाही आणि सरकारमध्ये जाऊन काही नवीन केलं आहे असंही सांगत नाही. सदाभाऊंनी सरकारचं समर्थन करणं स्वाभाविक म्हणता येईल; पण ज्या पक्षात शेती अन शेतकरी यांच्याबद्दलची बेसिक समज सदाभाऊपेक्षा उणीपुरी आहे, त्या पक्षात ते जाणार आहेत. ज्या पक्षात त्यांना जायचं आहे किंवा ते ज्या पक्षाच्या जवळ आहेत, तो पक्ष हे आंदोलन करणार्‍यांबद्दल शंका घेत आहे. अशा वेळी सदाभाऊंची दखल घेणं आवश्यक आहे.  

सदाभाऊ, “मला मंत्रीपद मिळाल्याने काही लोकांच्या पोटात दुखतंय” असं तुम्ही म्हणालात. तुम्ही म्हणत आहात ते खरं आहे. खरंच तुम्ही मंत्री झाल्याने काही लोकांच्या पोटात भयानक दुखतंय. मात्र तुम्हाला ज्यांच्या पोटात दुखतंय असं वाटत ते वेगळे अन आम्हाला वाटतंय ते वेगळे. कारण तुम्हाला असं वाटत असेल की, राजू शेट्टींच्या पोटात दुखतंय. ते मर्यादित अर्थानं खरं मानलं तर मग तुम्हाला त्यांनी मंत्री केलंच नसतं. तुम्ही मंत्री झाल्यावर राजू शेट्टींच्या एकूणच काय अपेक्षा होत्या माहीत नाही. पण आमच्या खूप अपेक्षा होत्या.

सदाभाऊ, आम्ही आपल्यासोबत आंदोलन करून पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्या, झेलल्या व जेलचा आनंददेखील घेतला. म्हणून तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही खूप अपेक्षा ठेवल्या होत्या. त्या अपेक्षाभंगामुळे आमच्या पोटात भयानक दुखतंय. कारण ज्यांनी तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने सरकार समोर मांडणारा नेता म्हणून कायम साथ दिली, ज्यांनी तुमच्यावर अपेक्षा ठेवून तुम्हाला आपला नेता बनवलं, त्यांच्याकडे ढुंकून बघायला तुम्हाला वेळ नाही.

सदाभाऊ, कालपर्यंत तुम्ही आम्हाला आमचे वाटत होतात. कारण आशा होती. आता आशा तर आम्ही सोडली आहेच; पण घोर निराशेचं काय करायचं या अस्वस्थेतून जात आहोत. म्हणून बोलावंसं वाटतंय. त्याच अस्वस्थेत आमचं पोट दुखतंय अन आता डोकंही ठिकाणावर नाही. म्हणून तर संपासारखी वाट तुडवतोय.

सदाभाऊ, सध्या परिस्थिती प्रचंड वाईट आहे. हे तुम्हाला मात्र माहीत असायचं कारण नाही. कारण आता तुम्ही सत्तेत आहात. आता कुठे आंदोलनं करायची आहेत तुम्हाला? आता प्रवासाची अडचण पण नसणार तुम्हाला. बाकी बर्‍याच वैयक्तिक अडचणी तुम्ही सोडवल्या असणार! भाऊ, तुम्ही आमचे प्रश्न सोडवले नाहीत हा मुद्दा नाही. तुमच्या मर्यादा आम्ही समजून आहोत. तसंही हे सरकार तुम्हाला फार चांगली वागणूक अन अधिकार देत असेल याबाबत शंका आहेच! पण हे असं सगळं असलं तरी तुम्ही अस्वस्थ नाहीत. तुमचा राग- रोष दिसत नाही. त्याची एक अस्वस्थता आमच्या पोटदुखीत आहेच. आमच्या पोटदुखीचं मूळ कारण आहे तुमची भाषा. तुम्ही सांगण्यासारखं काहीच नसताना शासनाच्या जुन्या योजनांना दिलेल्या नव्या नावांचं कौतुक करता. तुम्हाला शेतीतले प्रश्न माहीत आहेत. तरी तुम्ही फक्त संवादयात्रा काढता. आणि सर्वांत वाईट म्हणजे जुन्या सरकारनं कसं सगळं वाईट करून ठेवलं आहे एवढंच सांगत राहता आहात. मग तुम्ही काय करत आहात?

सदाभाऊ, सगळ्या पिकांबद्दल सोडा, चार-दोन मोजक्या प्रमुख पिकांबद्दल नीटनेटका भाव द्यायला हवा एवढा मार्ग पण तुम्हाला सुचू नये? तुम्ही खुर्चीवर बसल्यावर कोणत्या नव्या योजना आणल्या? शेती अन शेतकरी याचं दु:ख तुम्ही विरोधात असताना बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं. तुमची त्या वेळची भाषणं ऐकून असं वाटायचं, खरंच कुणीतरी आहे आपल्यासाठी लढणारं. त्या वेळी तुम्ही टीका करताना अगदी शहरी लोकांवर बोललात. भाजीपाला आणि शेतमालात बार्गेनिंग करता म्हणून टीका केली. तुम्ही मंत्री झाल्यावर शहरी लोकांचं शेतमाल बार्गेनिंग न करता खरेदी करा असं प्रबोधन का नाही सुरू केलं? किंवा हमीभावासाठी लढणारे तुम्ही हमीभावासाठी आग्रह धरायचा सोडून काय बोलत आहात? शेतीची समज नसलेल्या सरकारचं समर्थन करून कुणाची फसवणूक करत आहात?

सदाभाऊ, तुम्ही पूर्वी जे बोलला ते आता आठवलं तरी उलटीची भावना होते. आपला वाटणारा हा माणूस बदलला कसा? तुमचं घरदार बदललं, त्यानं आम्हाला बरं वाटलं होतं! म्हटलं आमचा माणूस मोठा होतोय. पण इथं फक्त तुम्हीच मोठे होत आता. आमचं काय? आमच्या भल्याचं काही सुचत नसेल तर आमच्या विरोधात गरळ ओकणार्‍यांचा निषेध तरी करा? तुम्ही ज्या भाजपमध्ये जाणार आहात, त्या पक्षाचा अतुल वाघ नावाचा एक प्रवक्ता असं अधिकृतपणे म्हणतोय की, शेतकर्‍यांच्या आंदोलनात नक्षलवादी घुसले आहेत. आम्हाला नक्षलवादी ठरवलं जात असताना तुम्ही मूग गिळून गप्प आहात? आम्ही खरंच नक्षलवादी व्हावं असं तुमच्या सत्ताधारी मित्रपक्षाला वाटत आहे का? अतुल वाघांचा पक्ष वेगळा असता अन तुम्ही सत्तेत नसता तर तुम्ही किमान जीभ हासडण्याची भाषा तरी नक्कीच बोलला असता. हे तुम्ही बोलत नाही ना म्हणून आमच्या पोटात दुखतंय.

सदाभाऊ, आजवर आम्ही तुमच्या सोबत होतो, पण आज तुमची आम्हाला जास्त गरज असताना तुम्ही आमच्या सोबत नाहीत. खरं तर तुम्ही सोबत नाहीत याचं दुःख मर्यादित आहे. पण तुमची सगळीच वक्तव्यं ऐकून खरंच किव येते. कारण तुम्ही असं म्हणालात की, “माणूस कुणामुळे नाही स्वतःच्या जीवावर लहान-मोठा होत असतो.”  आम्हाला उगाच असं वाटायचं की, आम्ही लाठ्या-काठ्या खाल्यामुळं तुम्ही मोठे झालात. ते सगळं तुम्ही इतक्या लवकर विसराल असं वाटलं नव्हतं. तुमचं हे विधान राजू शेट्टींबद्दल असलं तरी ते समजून घ्यायला आमचं मन तयार नाही. त्यांच्याबरोबर तुमचे मतभेद असतील, पण आज अडचणीच्या वेळी ते आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आम्हाला कर्जमाफी मिळाली तर त्यात त्यांचा वाटा असेल, तुमचा नाही. तुम्ही सत्तेत जाऊन तुमची भरभराट होईल. आम्ही मात्र फक्त पश्चातापाचे वाटेकरी व्हायचं?

सदाभाऊ, आमच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. तुम्ही आमचं आंदोलन फोडण्यात पुढाकार घेत आहात. आंदोलन फोडताना तुम्हाला आपली कोणतीच लढाई आठवली नाही? अहो, आम्ही तुमच्यावर दबाव आणण्यासाठी लढत नाही. आम्ही या व्यवस्थेवर दबाव निर्माण करत आहोत. आता अशा या वातावरणात तुम्ही आमच्या सोबत आला असता तर आणखी मोठे झाला असता. पण हेही बरं झालं की, तुम्ही आमच्या सोबत नाहीत. कारण त्यातून तुमची आस्था अन उंची कळली आम्हाला. आमचा प्रश्न आम्ही आमच्या मार्गाने सोडवूच. आज तुम्ही सत्तेत आहात. ती उद्या असेल-नसेल. तुमची सत्ता गेल्यावर तुम्हाला पुन्हा सामान्यांच्या पंगतीत यायचं आहे हे विसरू नका.

सदाभाऊ, शेतकऱ्यांची ही लढाई सरकारच्या, तुमच्या विरोधात नाही. ती या व्यवस्थेच्या संकुचित धोरणांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांचं कर्ज माफ व्हावं यासाठी आम्ही आपल्याकडे भीक मागतो असं अजिबात नाही. तर आमच्या कष्टाची किंमत केली जावी; आमच्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून लढतोय. आमची ही लढाई नवीन नाही, ती आम्ही वर्षानुवर्षं लढतोच आहोत. त्यात कधीकाळी तुम्हीपण होताच की! त्या वेळी तुम्हीच तर आमचे माय-बाप होतात. तुम्हीच तर आम्हाला आमच्या शेतीचं अर्थकारण समजावून सांगितलंय. त्यामुळे तुम्ही दिलेल्या ज्ञानात भर टाकून नव्या उमेदीने आम्ही भांडत आहोत. यात आमचं काय चुकलं भाऊ?

सदाभाऊ, सध्या आपण कृषी राज्यमंत्री आहात. आपण ज्या मातीत वाढलात, त्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचा त्यांना फायदा झाला का, या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. आपल्याच शेतकरी मंत्र्यांनी आपल्या शेतकऱ्यांना फसवलं असं तुम्हाला वाटत नाही का? किमान भाषिक व्यवहारात तरी फसवलं असंच आम्हाला वाटतंय. कारण साधं हमीभावाचं प्रकरणही तुम्हाला मार्गी लावता आलेलं नाही. उद्या कदाचित तुम्ही म्हणाल की, चूक झाली यांच्या नादी लागून. पण तोवर पुलाखालून बरंच पाणी गेलेलं असेल. तेव्हा आम्हाला हसू आवरणार नाही. तुम्ही मात्र नव्या दमाची खोटी भाषा बोलणार! अर्थात, हे सगळं तुमच्या वैयक्तिक आशा-अपेक्षांवर अवलंबून आहे.

सदाभाऊ, संपावर जाणं हा आमच्या हौसेचा विषय नाही अन नव्हता. पूर्वी आपण लढत होतोच. पूर्वी परिस्थिती इतकी हाताबाहेर कधीच गेली नव्हती. पूर्वी नाहीच काही तर सातबाराच्या उतार्‍यावर केवळ चार टक्यानं बॅंक कर्ज द्यायची. ते नाहीच जमलं तर आमचं दुसरं भांडवल म्हणजे जनावरं. ती आम्ही विकायचो किंवा शेतमाल विकायचो. आता काय करावं? तुमच्या सरकारनं तर शेतकर्‍याला सोन्यावर चार टक्याने मिळणारं कर्ज बंद केलं. भाकड जनावरं विक्रीवर बंधनं आणली. तूर खरेदीपासून कांदा, गहू, डाळिंब सगळ्याचे भाव पडले आहेत. त्याकडे तुमचं लक्ष नाही. आमचा असा गळा घोटला जात असताना, आम्ही रस्त्यावर उतरलो तर नक्षलवादी झालो? राष्ट्रवादीवाले झालो? गंमत म्हणजे राष्ट्रवादीचे नेते आमदार करायला ज्या भाजपला चालतात, त्यांना शेतकर्‍यांच्या आंदोलनात राष्ट्रवादीचा सहभाग का खटकतो? पुढची सत्ता त्यांना मिळणार आहे, अशी भीती वाटायला लागली की काय? अन तसं झालं तर ‘आमच्या’ सदाभाऊंचं काय होणार? 

सदाभाऊ, तुम्हाला मत देताना आम्ही भाजपचे असतो अन आंदोलन केलं तर राष्ट्रवादीचे होतो? तुमचे एक आदरणीय मंत्री म्हणत आहेत की, आंदोलनात अर्धे लोक राष्ट्रवादीचे आहेत. दादांनी आंदोलन अभ्यासलं की, पोलिसांनी आंदोलकांचा पक्ष लिहून घेतला की काय? भाऊ, दादांना सांगा, हे अगोदर शेतकरी आहेत. आमचा पक्ष पुढच्या निवडणुकीत दिसेल. गेल्या वेळेस तुमचं पटलं म्हणून भाजपला मतदान केलं. आता यापुढे तुम्हाला आमचं पटेल असं काहीतरी आम्ही करू आशा आशेनं लढतोय.

सदाभाऊ, तुम्ही फार थोर आहात म्हणून हे लिहिलं नाही. आमच्यातील एक सामान्य माणूस व्यवस्थेत गेल्यावर किती बदलला, किती बदलु शकतो, यापायी पोटात दुखतंय आमच्या. म्हणून पोटतिडीकेनं लिहितोय. खरं तर तुम्ही इतके बदलाल असं मुळीच वाटलं नव्हतं. त्यामुळे पोट दुखताना सारखा प्रश्न पडतो की, सदाभाऊ तुम्हीसुद्धा व्यवस्थेच्या मोहात इतके गुरफटलात?  म्हणूनच आता आमची आस्था जागी झालीय. त्या आस्थेनेच असं वाटतंय की, सत्ता ही काय जादू आहे. जी माणसाला कुठूनही तोडू शकते. त्यामुळेच आता तुम्ही प्रतीकात्मक आहात. बाकी आम्हाला तुमचं वैयक्तिक स्तरावर काहीही महत्त्व उरलेलं नाही!

लेखक ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.

kdraktate@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......