मी जेव्हा प्रथम ‘चले जाव’ घोषणा केली...
पडघम - देशकारण
महात्मा गांधी
  • ‘साधना’च्या ‘चले जाव विशेषांका’चे मुखपृष्ठ आणि ‘चले जाव’ लढ्याचे एक दृश्य
  • Wed , 09 August 2017
  • पडघम देशकारण चले जाव Chale Jao Movement Quit India Movement म. गांधी Gandhi साधना साप्ताहिक Sadhana Weekly

भारतीय स्वातंत्र्यासाठी लढला गेलेला अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला आज, ९ ऑगस्ट रोजी ७५ वर्षे पूर्ण होताहेत. तर येत्या १५ ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. ही निमित्ते साधून ‘साधना’ साप्ताहिकाने १९ ऑगस्टचा अंक ‘चले जाव’ विशेषांक  म्हणून प्रकाशित केला आहे. या लढ्याच्या वेळची म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद यांची भाषणं प्रथमच एकत्रितरीत्या मराठीमध्ये वाचायला मिळतात. त्यातील म. गांधी यांचे हे प्रास्ताविक भाषण...

.............................................................................................................................................

या ठरावावर चर्चा करण्याच्या आधी मला तुम्हाला एक-दोन गोष्टी सांगायच्या आहेत. त्या तुम्ही अतिशय स्पष्टपणाने ध्यानात घ्याव्यात आणि ज्या दृष्टिकोनातून मी त्यांचा तुमच्यापुढे विचार करणार आहे, त्याच दृष्टिकोनातून तुम्ही विचार करावा, अशी माझी इच्छा आहे. माझ्या दृष्टिकोनातून विचार करा असे मी सांगत आहे; याचे कारण की, जर त्या तुमच्या पसंतीस उतरल्या, तर मी जे-जे सांगेन ते-ते तुम्हाला करावे लागेल. ही एक मोठीच जबाबदारी आहे. पुष्कळ लोक मला असे विचारतात की, १९२० मध्ये तुम्ही जसे होता, तसेच आजही आहात का? तुमच्यात काही बदल झालेला आहे का? त्यांचे ते विचारणे बरोबर आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की, १९२० मध्ये मी जसा होतो, तसाच आताही आहे.

फरक एवढाच की, १९२० पेक्षा आता काही गोष्टींत मी अधिक आग्रही बनलो आहे. स्पष्टीकरणार्थ उदाहरण देतो. एखादा माणून थंडीमध्ये भरगच्च कपडे घालून बाहेर जातो, परंतु तोच माणूस उन्हाळ्यात फारसे कपडे अंगावर घालताना दिसत नाही. हा फरक त्या माणसाच्या बाह्यांगात झालेला असतो, त्या माणसात नाही. हेच माझ्या बाबतीत लागू आहे. मी आज एक म्हणतो, उद्या एक म्हणतो; म्हणजे माझ्या बोलण्यात बोल नसतो, असे काही लोक म्हणतात. पण मला हे सांगितलेच पाहिजे की, माझ्यात कसलाही फरक झालेला नाही. अहिंसेच्या तत्त्वावर माझी पूर्वी जितकी दृढ भक्ती होती, तितकीच आताही आहे. तुम्ही जर त्या तत्त्वाला कंटाळले असाल, तर तुम्ही माझ्याबरोबर यायलाच पाहिजे, असे नाही.

या ठरावाला तुम्ही संमती दिलीच पाहिजे, अशी तुमच्यावर सक्ती नाही. तुम्हाला जर स्वराज्य व स्वातंत्र्य हवे असेल आणि मी तुम्हाला जे काही सांगणार आहे, ते चांगले आणि बरोबर आहे, असे तुम्हाला वाटत असेल; तरच तुम्ही त्याला मान्यता द्या. या एकाच मार्गाने तुम्ही आम्हाला सर्वतोपरी पाठिंबा देऊ शकाल. असे जर तुम्ही केले नाहीत, तर तुम्हाला कृतकर्माबद्दल पश्चात्ताप करावा लागेल. एखाद्या माणसाच्या हातून काही चूक घडली आणि त्याबद्दल त्याला पश्चात्ताप झाला, तर त्यात फारसे नुकसान नाही. पण या बाबतीत जर तुमच्यावर पश्चात्ताप करण्याची वेळ आली, तर तुम्ही सबंध देशाला संकटाच्या खाईत लोटाल. माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवण्याला जर तुम्ही राजीखुशीने तयार झाला नाहीत, तर हा ठराव तुम्ही फेटाळून लावावा- अशी मी तुम्हाला विनंती करीन. पण जर हा ठराव स्वीकारूनही त्यासंबंधी मला काय म्हणायचे आहे, हे तुम्ही नीट ध्यानात घेतले नाहीत; तर त्यासंबंधात आपल्यामध्ये कुरबूर होण्याचा संभव आहे- मग त्या कुरबुरीचे स्वरूप कितीही मित्रत्वाचे असो.

आणखी एक गोष्ट मला तुमच्या मनावर विशेष कटाक्षाने ठसवायची आहे, ती म्हणजे- तुम्हाला आपल्या अंगावर घ्यावी लागणारी जबाबदारी. अखिल भारतीय काँग्रेसच्या कार्यकारिणीचे सभासद हे एखाद्या पार्लमेंटच्या सभासदांच्या तोडीचे आहेत. काँग्रेस ही अखिल भारताची प्रतिनिधी आहे. काँग्रेसने आरंभापासूनच केवळ एखाद्या विशिष्ट वर्णाचे, जमातीचे किंवा प्रांताचे प्रतिनिधित्व पत्करलेले नाही; आपण सबंध देशाचे प्रतिनिधी आहोत, असा तिचा आपल्या जन्मापासूनचा दावा आहे. आणि तुमच्या संमतीने मी असे हक्काने सांगू शकतो की- काँग्रेस ही केवळ तिच्या सभासदांचीच प्रतिनिधी नाही, तर अखिल भारताचे प्रतिनिधित्व तिच्याकडेच आहे.

संस्थानिकांविषयी मी असे म्हणू शकतो की, त्यांच्या उत्पत्तीला ब्रिटिश सत्ता जबाबदार आहे. त्यांची संख्या ६००च्या आसपास खासच आहे. ब्रिटिश हिंदुस्थान व हिंदी हिंदुस्थान असा भेदभाव निर्माण करण्यासाठीच राज्यकर्त्या इंग्रजांनी त्यांना निर्माण केले. ब्रिटिश हिंदुस्थान व हिंदी हिंदुस्थान यांच्यामधील एकंदर परिस्थितीत काही थोडा फरक आहे, हे जरी खरे असले; तरी संस्थानी प्रजा असा फरक मानू इच्छित नाही. संस्थानी प्रजा आणि बिगरसंस्थानी प्रजा या दोहोंचेही आपण प्रतिनिधी आहोत, असा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेसने संस्थानांच्या बाबतीत जे धोरण स्वीकारले, ते माझ्या विनंतीनुसार ठरवण्यात आलेले होते.

त्यात काही फेरफार झाले असतीलही, पण त्याचा मूळ पाया जसाच्या तसाच कायम आहे. संस्थानिक काहीही म्हणाले, तरी त्यांची प्रजा मुक्तकंठाने घोषणा करील की- तिला जे हवे होते, त्यालाच आम्ही वाचा फोडली आहे. मला मान्य असलेल्या पद्धतीने जर आपण लढा चालू ठेवला, तर संस्थानिकांना त्यापासून त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त फायदा होण्याचा संभव आहे. मला काही संस्थानिक भेटले आणि आपली स्थिती वर्णन करून सांगताना ते म्हणाले की, आमच्यापेक्षा तुम्ही जास्त स्वतंत्र आहात. कारण सरकारला आमची केव्हाही उचलबांगडी करता येण्याजोगी आहे.

मी तुम्हाला पुन: पुन्हा सांगतो की जर तुम्हाला हा ठराव मनोमन पटला असेल, तरच तुम्ही त्यास मान्यता द्या. कारण असे जर तुम्ही न कराल, तर तुम्ही मला आणि तुम्हालाही संकटाच्या खाईत लोटाल; म्हणून मी हा इशारा तुम्हाला देत आहे. आज माझ्यापुढे जी साधने सज्ज आहेत, ती गतकालात माझ्यापाशी नव्हती. ईश्वराने मला आज संधी दिलेली आहे आणि ती जर मी साधली नाही, तर मी खासच मूर्ख ठरेन. त्यायोगे मी केवळ माझाच घात करीन असे नाही, तर ईश्वराने माझ्या पदरात घातलेले ते अहिंसेचे मौल्यवान रत्नही मी उकिरड्यावर फेकून दिल्यासारखे होईल.

तुम्ही जर हा ठराव मान्य केलात, तर मला पुन्हा एकदा तुम्हाला चार शब्द सांगावे लागणार आहेत, म्हणून मी आताच तुमचा फारसा वेळ घेत नाही आणि नंतरही मी एका तासापेक्षा तुमचा जास्त वेळ घेणार नाही. जो मार्ग तुडवीत आणि ज्या माणसाच्या संगतीत तुम्हाला प्रवास करायचा आहे, तो मार्ग व तो माणूस हे दोन्ही तुम्ही नीट पारखून घ्यावेत, हीच माझी इच्छा आहे. असे म्हणणारे काही लोक आहेत की, ‘मी केवळ विध्वंसक आहे आणि विधायक कार्य म्हणजे काय ते माझ्या गावीही नाही.’ याचे कारण असे की, विधायक कार्य करण्याची संधीच मला मिळत नाही. तशी संधी जर मला मिळाली असती, तर मी ती आनंदाने पत्करली असती; हे मी यापुढे तरी सिद्ध करून दाखवीन, अशी मला आशा आहे. मी विध्वंसक आहे, असा माझ्यावर आरोप आहे. या आरोपाचा अर्थ तुम्ही नीट समजावून घ्या. स्वातंत्र्य मिळाले की, जे आपण जमीनदोस्त केले तेच आपण पुन्हा चांगल्या तऱ्हेने बांधू शकतो- हा आत्मविश्वास तुम्ही पहिल्यापासून आपल्या मनात वागवायला हवा. कमीत कमी सात प्रांतांमध्ये तरी सत्ता गाजविण्याची संधी आम्हाला मिळाली होती. त्या वेळी आम्ही आपले काम इतके चोख बजावले की, इंग्रज सरकारनेसुद्धा त्याची स्तुती केली. नुसते स्वातंत्र्य मिळविल्याने तुमचे काम संपले, असे होत नाही. अहिंसा पाळूनही तुम्ही सैनिकी बाणा कायम ठेवायला हवा. लष्करी लोकांच्या हातांमध्ये सत्ता आली न आली तोच ते हुकूमशहा बनतात. आम्ही ज्या योजना आखलेल्या आहेत, त्यात अशा हुकूमशहांना जागा नाही.

स्वातंत्र्य मिळवणे हेच आमचे ध्येय आहे आणि ते मिळाल्यावर जो सत्तेची सूत्रे घेण्यास लायक ठरेल, त्याने ती खुशाल घ्यावीत. (आणि ही लायकी ठरवण्याचे काम जनतेचेच आहे.) मग ही सूत्रे पारशांच्या हातात द्यावीत, असेही जनता ठरवू शकेल. ही सत्ता पारशांच्या हातात काय म्हणून द्यावी, असा आक्षेप कोणाला घेता येणार नाही. कदाचित असेही होऊ शकेल की- जे काँग्रेसच्या पक्षाचे नाहीत, त्यांच्याही हातात सत्ता जाईल. सारे काही लोकांच्या हातात आहे. स्वातंत्र्यासाठी जे लढले त्यांत बहुसंख्य हिंदूच होते आणि मुसलमान व पारशी यांची संख्या अल्प होती, ही जाणीव तुम्ही लोकांनी बाळगता कामा नये. आपण स्वतंत्र झालो की, सारेच वातावरण काही निराळे होईल.

असे किती तरी लोक आहेत की, ज्यांच्या चित्तामध्ये ब्रिटिशांविषयीचा द्वेषभाव वाढत आहे. ब्रिटिशांचा आम्हाला वीट आलेला आहे, असे अनेकांच्या तोंडून मी ऐकले आहे. ब्रिटिश लोक आणि सार्वभौम सत्ता गाजवणारे ब्रिटिश सरकार यांच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचे मन भेदभाव ठेवत नाही. त्यांच्या मते, या दोनही गोष्टी एकच. कित्येक लोक असे आहेत की, ज्यांना जपान्यांच्या येण्याचे काहीच वाटत नाही. त्यांच्या मते, जपानी लोक आल्याने फार-फार तर धन्याची अदलाबदल होईल, इतकेच काय ते! परंतु खरे पाहता, अशी कल्पना करून घेणे अत्यंत धोक्याचे आहे. तुम्ही ती आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. ही वेळ मोठी आणीबाणीची आहे. या वेळेला जर आपण स्वस्थ बसलो आणि आपले कर्तव्य चोखपणे बजावले नाही, तर आपल्या हातून ती मोठीच चूक होईल. ब्रिटन व अमेरिका यांनी हे युद्ध लढवावे आणि आम्ही फक्त सक्तीने वा खुशीनेही केवळ पैशांची मदत करावी, असे जर होत राहिले, तर ते काही आपल्याला सुखावह वा भूषणावह होणार नाही. चालू युद्ध हा जेव्हा आमच्या जीवन-मरणाचा लढा होईल, तेव्हाच आमच्या अंगचे खरेखुरे शौर्य व बळ उफाळून वर येईल. आमची पोरेबाळेही शौर्य-धैर्याने रसरसूं लागतील. स्वातंत्र्य म्हणजे काही आभाळातून पडणारी वस्तू नव्हे; त्यासाठी लढलेच पाहिजे. माझी अशी खात्री आहे की, आपली त्यागबुद्धी जेव्हा पराकोटीला पोचेल आणि जेव्हा आपण आपले सामर्थ्य सिद्ध करून दाखवू; तेव्हा ब्रिटिशांना आपल्याला स्वातंत्र्य द्यावे लागेलच लागेल.

ब्रिटिशांबद्दल तुमच्या मनात जर तिरस्कार वसत असेल, तर तो तुम्ही काढून टाकला पाहिजे. निदान माझ्या अंत:करणात तरी त्यांच्याबद्दल यत्किंचितही तिरस्कार नाही. खरे बोलायचे तर ब्रिटिशांविषयी माझ्या मनात आज जितका मित्रभाव आहे, तितका तो पूर्वी कधीही नव्हता. याचे कारण असे की, मला त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून द्यायची आहे. ब्रिटिश लोक आज एका खंदकाच्या काठावर उभे असून, खंदकात पडण्याच्या अगदी बेतात आहेत. माझी स्थिती ब्रिटिश लोकांच्या या स्थितीपेक्षा खासच वेगळी आहे; म्हणून जरी त्यांनी माझे हात झिडकारून टाकले, तरी माझ्या मनात वसत असलेल्या मित्रत्वाच्या भावनेला स्मरून मला त्यांना खंदकाबाहेर ओढून काढण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.

माझ्या या म्हणण्याला पुष्कळ लोक हसतील; परंतु त्याच वेळी मी सांगतो की, माझे म्हणणे सत्य आहे. मी ज्या वेळी माझ्या जीवितातील सर्वांत मोठा लढा सुरू करण्याच्या तयारीत होतो, त्या वेळी माझ्या मनात ब्रिटिशांविषयी यत्किंचितही तिरस्कार नव्हता. ब्रिटिश लोक संकटात आहेत, ही संधी साधून त्यांना टोला द्यावा, असे माझ्या मनात चुकूनसुद्धा आले नाही.

रागाच्या भरात केव्हा केव्हा ब्रिटिश लोक तुम्हाला राग येणारी कृत्ये करतही असतील. असे जरी असले, तरी तुम्ही हिंसेला कवटाळून अहिंसेला लाज आणता कामा नये. असा जर काही प्रकार घडला, तर मी जिथे असेन तिथे तुम्हाला जिवंत सापडणार नाही. तुम्ही ब्रिटिश लोकांचे रक्त सांडलेत, तर त्याचे खापर तुमच्याच डोक्यावर फुटेल.

माझ्या म्हणण्याचे मर्म जर तुमच्या ध्यानात येत नसेल, तर तुम्ही हा ठराव फेटाळून लावणेच योग्य होय. तेच तुमच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने जास्त फायदेशीर आहे. जे तुम्हाला कळू शकत नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला कसा दोषी ठरवू शकेन?

तुम्हाला जो लढा लढावयाचा आहे, त्याच्यामागे काही तत्त्व आहे. चालू युद्धात ब्रिटिशांचा पराभव होणार आहे, या म्हणण्यावर ज्याप्रमाणे मी विेशास ठेवला नाही, त्याप्रमाणे तुम्हीही ठेवू नका. ब्रिटन हे भेकडांचे राष्ट्र आहे, असे मला वाटत नाही. मला हे पुरते माहीत आहे की, पराभवाची आपत्ती पत्करण्यापूर्वी प्रत्येक ब्रिटिश माणूस आपले बलिदान करील. त्यांचा पराभव होऊ शकेलही आणि ज्याप्रमाणे त्यांनी ब्रह्मदेश, मलाया इत्यादी ठिकाणच्या लोकांना सोडून दिले, पण ती-ती ठिकाणे वेळ येताच पुढे जिंकून घेण्याची ईर्ष्या मनात कायम ठेवली; त्याप्रमाणे कदाचित ते तुमचीही गत तशीच करतील. पण समजा- ब्रिटिश आपल्याला सोडून गेले, तर आपली वाट काय? असे झाले, तर जपानी लोक इथे येतील. जपानी आक्रमणाचा विजय म्हणजे चीनचा पुरा नाशच आणि कदाचित रशियाचाही! या सर्व बाबतीत पंडित नेहरू हे माझे गुरू आहेत. रशियाच्या किंवा चीनच्या पराभवाला कारणीभूत होण्याची माझी इच्छा नाही. तसे जर झाले, तर मी माझाच तिरस्कार करीन.

मला धडाडीने आणि जलदीने कार्य झालेले आवडते, हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु कदाचित असेही होत असेल की, तुम्हाला मी जितक्या त्वरेने पुढे जायला हवा असेन, तितक्या त्वरेने मी पुढे जातही नसेन. सरदार पटेलांच्या मते, ही मोहीम एका आठवड्यात आटोपण्यासारखी आहे. माझ्या मते, इतकी घाई करण्याची जरूर नाही. जर ही मोहीम एका आठवड्यात आटोपली, तर ब्रिटिश लोकांच्या काळजाचे पाणी करणारा तो एक चमत्कारच ठरेल. कदाचित ब्रिटिशांना शहाणपण सुचेल आणि त्यांना कळून येईल की- जे लोक ब्रिटिशांच्या बाजूने लढावयास तयार आहेत, त्यांना तुरुंगात डांबणे केवळ मूर्खपणाचे आहे. कदाचित बॅ.जीनांचाही हृदयपालट होऊ शकेल. त्यांना असे वाटू लागेल की, ‘काही असले तरी ते आज हिंदी स्वातंत्र्यासाठी लढत आहेत; तेही या भूमीचेच सुपुत्र आहेत. आणि म्हणून अशा वेळी जर आपण हरी-हरी म्हणून स्वस्थ बसलो, तर त्या पाकिस्तानचा तरी आपल्याला काय उपयोग?’ अहिंसा हेच प्रत्येकाच्या उपयोगी पडणारे एकमेव शस्त्र आहे. मी हे जाणून आहे की, अहिंसेच्या मार्गात आपण काही फारसे मिळवले नाही आणि म्हणून जर काही क्रांती घडून आली; तर ते गेल्या वीस वर्षांतील श्रमांचे फळ आहे, असे मी म्हणेन. आणि ते मिळवण्यासाठी ईेशराचे आम्हाला सर्वतोपरी साह्य झालेले आहे.

मी जेव्हा प्रथम ‘चले जाव’ घोषणा केली; तेव्हा खिन्न झालेल्या हिंदी लोकांना वाटले की, मी त्यांच्यापुढे काहीएक अपूर्व वस्तू आणून ठेवलेली आहे. तुम्हाला जर खरेखुरे स्वातंत्र्य हवे असेल, तर तुम्हाला संघटित झाले पाहिजे आणि अशी संघटनाच खरीखुरी लोकशाही निर्माण करेल. अशी खरीखुरी लोकशाही अजून कुणाला पाहावयास मिळालेली नाही आणि ती तशी मिळावी, म्हणून आतापर्यंत कोणी फारसा प्रयत्नही केलेला नाही. फ्रेंच राज्यक्रांतीविषयी मी पुष्कळसे वाचलेले आहे. कार्लाईलचे ग्रंथ मी तुरुंगात वाचले. फ्रेंच लोकांबद्दल मला मोठाच आदर आहे. पंडित जवाहरलालनी रशियन राज्यक्रांतीविषयी मला पुष्कळच सांगितलेले आहे. पण मी त्यांना सांगितले की, रशियन लोकांचा लढा हा लोकांसाठीच होता हे खरे असले; तरी ज्या लोकशाहीचे चिंतन मी चालवले आहे, त्या खऱ्याखुऱ्या लोकशाहीसाठी तो झगडा चाललेला नव्हता. माझ्या लोकशाहीमध्ये जो-तो स्वत:चा धनी आहे. मला इतिहासाचे पुरेसे ज्ञान आहे. परंतु, पूर्वी कधी इतक्या मोठ्या प्रमाणावर अहिंसेच्या मार्गाने लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाल्याचे माझ्या आढळात आले नाही. एकदा या सर्व गोष्टींचे मर्म तुमच्या ध्यानात आले, म्हणजे हिंदू-मुसलमान हा भेदभाव तुम्ही विसरून जाल.

तुमच्यापुढे जो ठराव पसंतीसाठी ठेवलेला आहे, त्याचा अर्थ असा की- आता आपण यापुढे कूपमंडुकवृत्तीने राहण्यास तयार नाही. आम्हाला जागतिक राष्ट्रसंघात सामील व्हायचे आहे. अहिंसेचे अद्वितीय हत्यार तुम्ही हाती घेतलेत, तरच तुम्हाला नि:शस्त्रीकरण आणि पर्यायाने शांतीही साध्य करून घेता येईल. काहींच्या मते, मी मनोराज्यात रमणारा एक माणूस आहे. पण मी तुम्हाला सांगतो की, मी पक्का बनिया आहे आणि स्वराज्य मिळवणे हाच माझा धंदा आहे. तुम्ही ह्या ठरावाला मान्यता दिली नाहीत, तर मला वाईट वाटणार नाही; उलट मी आनंदाने नाचू लागेन. कारण त्यामुळे मी आता माझ्या शिरावर केवढी मोठी जबाबदारी घेणार आहे, याची तुम्हाला चांगलीच जाणीव आहे, असेच सिद्ध होईल. मला असे वाटते की, अहिंसा ही तुम्ही आपले धोरण म्हणून पत्करावी. माझ्याबाबतीत अहिंसा हे अत्यंत श्रद्धेय असे तत्त्व आहे. पण तुम्ही निदान तिचा धोरण म्हणून तरी स्वीकार करावा. शिस्तप्रिय या नात्याने तुम्ही अहिंसेचा सर्वतोपरी स्वीकार करावा आणि लढ्यात सामील झाल्यानंतर तिच्याशी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहावे.

.............................................................................................................................................

‘चले जाव : ८ ऑगस्ट १९४२च्या ठरावावरील भाषणे’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/4213/Chale-Jao

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......