टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • गुलजार, अरुण जेटली आणि मुगलसराय स्टेशन
  • Tue , 08 August 2017
  • विनोदनामा टपल्या गुलजार Gulzar अरुण जेटली Arun Jaitley मुगलसराय रेल्वे स्टेशन Mughalsarai railway station रामवीर भट्टी Ramvir Bhatti

१. उत्तर प्रदेशातील ऐतिहासिक मुगलसराय रेल्वे स्टेशनाचं नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय यांचं नाव देण्याच्या सरकारच्या प्रस्तावावरून राज्यसभेत गदारोळ झाला. समाजवादी पार्टी आणि बसपाच्या सदस्यांनी या प्रकरणी सरकारला जाब विचारत आक्रमक रूप धारण केल्यानं गोंधळातच कामकाज स्थगित करण्यात आलं. हे रेल्वे स्टेशन १८६२ मध्ये अस्तित्वात आलं. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीनं हावडा ते दिल्ली हा मार्ग रेल्वेनं जोडला होता. रेल्वेनं या स्टेशनचं नाव दीनदयाळ उपाध्याय करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. अग्रवाल म्हणाले की, सरकार देशाचं चरित्र बदलण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाचे अन्य सदस्य म्हणाले की, ज्यांचं स्वातंत्र्याच्या संघर्षात कोणतंही योगदान नाही, त्यांचं नाव रेल्वे स्टेशनला दिलं जात आहे. त्यास उत्तर देताना मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, एका विचारवंताचं नाव देण्यास विरोध करणं अयोग्य आहे. मुगलांचं नाव बदलण्यास तुम्ही निष्कारण विरोध करत आहात.

या विनोदी मंडळींना मुघलांचा आक्रमक इतिहास पुसून काढायचा आहे आणि त्याच वेळी निव्वळ आक्रमक परकीय राज्यकर्ते ही त्यांची प्रतिमाही प्रस्थापित करायची आहे. या देशाच्या संस्कृतीत मुघलही मिसळून गेले होते, त्यांच्याशी हिंदूंनी, राजपुतांनी सोयरिकी केल्या, त्यांच्या चाकऱ्या केल्या, त्या इमानानं केल्या आणि ते त्यासाठी स्वधर्मीयांशीही लढले, ही सगळी संमिश्र आणि व्यामिश्र इतिहासपरंपरा पुसून रेम्याडोक्यांनाच पटेल आणि झेपेल, अशी कृष्णधवल मांडणी करून त्यांना हिंदूंचा पाकिस्तान निर्माण करायचा आहे. मुघलांचा या देशाच्या खानपानावर, संस्कृतीवर प्रभाव आहे आणि या गंगाजमनी संस्कृतीमुळेच भारताचा ‘पाकिस्तान’ किंवा ‘बांगलादेश’ झालेला नाही, हे केवढं मोठं सुदैव आहे, याची किंमत योग्य वेळी देशाला कळेलच... फार मोठी किंमत मोजल्यानंतर.

.............................................................................................................................................

२. विशिष्ट आकार आणि ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घालून कित्येक वर्षं उलटली तरी त्यांचा वापर पूर्णपणे रोखण्यात महापालिका प्रशासन हतबल ठरले असून आता पर्यावरणरक्षणाचा नारा देत नागरिकांनाच सहकार्याची साद घालण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी कापडी व कागदी पिशव्यांचा वापर करा, बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या वापरू नका, असं जाहीर आवाहन करणारं पालिका प्रशासन प्लास्टिक पिशव्यांचं बेकायदा उत्पादन करणाऱ्यांना लगाम घालू शकलेलं नाही. प्लास्टिकच्या ५९ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या आणि आठ इंच रुंद व १२ इंच उंचीहून कमी आकाराच्या पिशव्यांवर बंदी आणणारा महाराष्ट्र विघटनशील व अतिविघटनशील कचरा नियंत्रण कायदा राज्यात २००६ मध्ये अस्तित्वात आला. या पिशव्यांचं उत्पादन करणारे अड्डे प्रशासन उद्ध्वस्त का करत नाही, असा सवाल आता नागरिकांकडून केला जात आहे.

वर्तमानपत्रांमध्ये हे जे कोणी नागरिक सवाल करत असतात, चर्चा करत असतात, ते बहुतेक वेळा टेबलावर बसून ती बातमी लिहीत असतात आणि मनातल्या मनात बोलत असतात. दर वर्षी नाले तुंबतात म्हणून महापालिकेच्या नावानं खडे फोडणारे लोक प्लास्टिकच्या पिशव्यांचा बेसुमार वापर करून कुठेही त्या फेकण्यात मागे नसतात. समुद्रातून कचरा किनाऱ्यावर येतो, यावर ओरड करणारे लोकलमधून खाडीत निर्माल्य भिरकावत असतात. त्याचप्रमाणे भाजीवाल्याकडून मिरच्यांना एक, कोथिंबीरीला एक आणि कडिपत्त्याला एक अशा पिशव्या मागून घेणारे लोक प्लास्टिकबंदी होत नाही म्हणून प्रशासनाला दोष देत असतात.

.............................................................................................................................................

३. हरयाणामधील भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलानं एका आयएएस ऑफिसरच्या मुलीचा पाठलाग करून तिची छेड काढली. या घटनेनंतर पीडित तरुणीनं फेसबुकवर त्याला वाचा फोडल्यानंतर चंदिगढ पोलिसांनी कारवाई सुरू केली. शनिवारी सकाळी पोलिसांनी पीडित मुलीचा जबाबही नोंदवून घेतला. हरियाणा भाजपचे उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी विकास बरालाचा बचाव करताना, पीडित मुलगी इतक्या उशिरा रात्री का फिरत होती, असा प्रश्न विचारला आहे. तरुणींनी रात्री १२ नंतर बाहेर फिरायला नको. संबंधित तरुणी इतक्या उशिरा का फिरत होती?, असा प्रश्न भट्टी यांनी विचारला. सध्याचं वातावरण चांगलं नाही. स्वत:लाच स्वत:चं संरक्षण करावं लागतं. त्या तरुणीला रात्री उशिरा गाडी चालवायला नको होती, असंही भट्टी म्हणाले.

या भट्टींचे दिवंगत जसपाल भट्टींशी काही नातं आहे काय? विनोदबुद्धी त्यांच्याइतकीच तरल दिसते. अन्यथा या भट्टींचा अन्य मादक देशी द्रवपदार्थांशी संबंधित भट्टीशी तरी नक्कीच नजीकचा संबंध असावा. त्यांच्या संस्कारी पक्ष आणि परिवाराच्या मध्ययुगीन कल्पनांमधल्या संस्कारी तरुणी रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाहीत. कारण, या पक्षाच्या संस्कारी पुरुषांवर स्त्रीच्या सन्मानाचा संस्कार काही झालेला नसतो. ते कुसंस्कारी तरुणीवर झडप घालून तिच्यावर संस्कार करण्याचा प्रयत्न करू शकतात, हे तरुणींनी लक्षात घ्यायला हवं. ‘सध्याचा काळ वाईट आहे,’ या त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाला अनुमोदन.

.............................................................................................................................................

४. केरळमध्ये सध्या जो हिंसाचार सुरू आहे, तोच प्रकार भाजपशासित राज्यांमध्ये घडला असता तर एव्हाना पुरस्कारवापसीचं सत्र सुरू झालं असतं, असा टोला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी डाव्या पक्षांना लगावला आहे. गेल्या आठवड्यात केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी तिरुअनंतपुरममध्ये त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. डाव्या पक्षांच्या आघाडीचं सरकार असताना केरळात नेहमीच राजकीय हिंसाचार अनुभवायला मिळाला आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना शासन होणं, ही सरकारची जबाबदारीच आहे. डाव्या पक्षांचं सरकार आल्यानंतर प्रत्येकवेळी हिंसाचाराच्या घटना घडतात. राजकीय विरोधकांच्या निर्घृण आणि घृणास्पद पद्धतीनं हत्या केल्या जातात, असा आरोप जेटली यांनी केला.

जेटली महोदयांचा सात्त्विक संताप समजण्यासारखा आहे. हिंसाचार घडवण्यासाठी डाव्या पक्षांना सत्तेत का यावं लागतं, सत्तेत नसतानाही हिंसाचार घडवता येतो, हे यांना माहिती नाही का, असा त्यांचा सवाल असावा. भाजपशासित राज्यांमध्ये घडलेल्या हिंसाचाराचं आणि देशातल्या सध्याच्या हिंस्त्र वातावरणाचं खापर जेटली कुणावर फोडतील? की फक्त आपल्या संघटनेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर तोच हिंसाचार असतो. कशाच्याही निषेधार्थ पुरस्कारवापसी करायला मुदलात पुरस्कार असावे लागतात, ती एक अडचणही त्यांच्या लक्षात यायला हवी.

.............................................................................................................................................

५. देशातलं सध्याचं वातावरण चिंता निर्माण करणारं आहे, धर्म माणुसकीपेक्षा मोठा झाला आहे. असं वातावरण या आधी देशात कधी पाहिलं होतं? असं म्हणत ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांनी खंत व्यक्त केली आहे. देशात याआधी कोणीही माणूस बिनधास्त आपलं म्हणणं मांडू शकत होता, आता मात्र तशी स्थिती राहिली नाही. देशासमोर आर्थिक संकट होतं, मात्र धर्मिक संकट कधीही नव्हतं; आता आपल्या देशात नाव विचारण्याआधी माणसाचा धर्म विचारला जातो, ही परिस्थिती दुर्दैवी आहे, असंही मत गुलजार यांनी व्यक्त केलं आहे. भारतात सध्याच्या घडीला राजकीय स्वातंत्र्य आहे मात्र सांस्कृतिक स्वातंत्र्य नाही. आपण मागासलेल्या मानसिकतेतून अजून बाहेरच आलेलो नाहीत.

या गुलजार यांचा धर्म कोणता? नाव तर ऊर्दू दिसतं. मुघलांचे वंशज आहेत का? म्हणजे थेट परकीय आहेत. त्यांना ‘आमच्या’ देशाबद्दल, ‘आमच्या’ परंपरांबद्दल बोलण्याचा अधिकार काय? ‘माझं काही सामान तुझ्याकडे पडलेलं आहे, ते पाठवून दे’ असल्या रुक्ष कल्पनांवर लिहिलेल्या त्यांच्या गाण्यांची फार कौतुकं झाल्यानं ते शेफारलेले दिसतात. तुम्ही ही बाष्कळ बडबड करू शकलात, ते स्वातंत्र्य असल्यामुळेच ना. टिंबक्टूमध्ये बोलू शकलात का असं? ग्वाटेमालात तोंड उघडता आलं असतं का? पेरूमध्ये तर मिरचीचा तोबरा दिला गेला असता. म्हणे स्वातंत्र्य नाही!!!

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......