अजूनकाही
तीन ऑगस्टला अनेकांच्या व्हॉटसअॅपवर एक पोस्टर झळकलं. २०-२५ फूट लांब व पाच-सहा फूट उंच फ्लेक्स प्रकारातलं हे पोस्टर होतं. देशाची राजधानी नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकाच्या १६ क्रमांकाच्या फलाटावर असलेलं हे पोस्टर कुणा अंत्योदय ग्रूपची संकल्पना व निर्मिती होती.
डार्विनच्या उत्क्रांति सिद्धान्तासाठी पाठ्यपुस्तकात जशी वानरापासून होत गेलेल्या मनुष्यप्राण्याची एक चित्रसाखळी असते, तशीच ती याही पोस्टरवर होती. मूळ आकृतीत आजचा विकसित मनुष्यप्राणीही वस्त्रहीन असतो. त्याची विकसित शरीरयष्टी दिसते. शरीर, मानववंशशास्त्राला योग्य असं ते रेखाटन आपण शाळेपासून पाहत आलोय. या पोस्टरवर मात्र साधारण हत्यारानं शिकार शोधण्याच्या पवित्र्यात आणि दोन पायावर उभ्या राहू शकणाऱ्या मनुष्याकृतीच्या पुढच्या आकृत्या आजच्या आधुनिक युगाला साजेशा शर्ट-पँटमध्ये दाखवल्यात. यातली सगळ्यात शेवटची आकृती सुटाबुटातील आहे. उत्क्रांतिची ही आकृतीमाला, पंतप्रधानांच्या बहुचर्चित ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी वापरली गेलीय. त्यामुळे उत्क्रांत होत जाणारा माणूस कचरा उचलताना दिसतो आणि सर्वांत शेवटी सुटाबुटातला माणूस नव्या कचराकुंडीत तो टाकताना दिसतो. या चित्राखाली एक वाक्य लिहिलेलं आहे. ते वाचल्यावर वरच्या चित्रातील शेवटच्या सुटाबुटातील माणसाचं रेखाचित्र उत्क्रांतिमालेतला मनुष्यप्राणी एवढंच राहत नाही, तर या देशातील अत्यंत जातीयवादी मानसिकता किती बेशरम, हलकट आणि निर्लज्ज निर्ढावलेली आहे, याचा पुरावा मिळून मस्तक भणभणायला लागते.
कारण या चित्राखाली ओळी आहेत - ‘अपने अंदर के बाबा साहेब को आप जागृत करे! गन्दगी के खिलाफ इस महान अभियान में अपना योगदान दे.’ थोडक्यात चित्रमालेतली ती शेवटची सुटाबुटातली आकृती ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आहे. माकडापासून संक्रमित झालेल्या मनुष्यप्राण्याच्या शेवटच्या अवस्थेत बाबासाहेब ‘गन्दगी’ साफ करताना दाखवणारी ही सडकी मनोवृत्ती कुणा अंत्योदय ग्रुपची कन्सेप्ट अँड डिझाईन आहे. तशी श्रेयंही त्यांनी घेतलीत.
‘दलित दस्तक’ नामक ऑनलाईन ग्रूपनं व्हॉटसअॅप-फेसबुक माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया येताच थेट नवी दिल्ली रेल्वे स्टेशन गाठलं. सुरुवातीला रेल्वे प्रशासनानं त्यांना या पोस्टरचा व्हिडिओ काढायला बंदी केली. पण दरम्यान सूत्रं हलली आणि पोस्टरच रेल्वे सुरक्षा रक्षकांनी काढून घेतलं. पण कॅमेऱ्यासमोर याविषयीचं स्पष्टीकरण देण्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी टाळलं. नंतर अशीही सारवासारव केली की, स्वच्छता अभियानातंर्गत कुणा अंत्योदय ग्रूपनं हे पोस्टर लावताना रेल्वेची परवानगी घेतली नव्हती!
आता विना परवानगी एवढं मोठं पोस्टर कम बॅनर म्हणजे काय लोकलच्या डब्यात डकवले जाणारे बंगाली बाबा, गुप्तरोग, धातृवृद्धी टाईपची सिंगल कलर हँडबिलं वाटली, जी कुणी जाता-येता डकवून गेलं कळलं नाही. ज्या उंचीवर ते लावलं होतं, त्या उंचीवर शिडी वगैरे शिवाय लावता येणंच शक्य नाही. याचाच अर्थ कुणाच्या तरी आदेशावरून ते पोस्टर लावण्यात आलं. त्यासाठी रेल्वे स्टेशनचा फलाट निवडण्यामागेही एक सूत्रबद्ध विचार आहे.
कारण रेल्वे फलाटावर इतर फलकांच्या भाऊगर्दीत हे पोस्टर खपून जाऊ शकतं. पुन्हा रेल्वे प्रवास करणारा विविध वर्ग, जाती-जमातीचा प्रवासी. त्याचं लक्ष गेलंच तर बाबासाहेब आणि गन्दगी म्हणजेच दलित समाज व गन्दगी या जणू काही समान गोष्टी आहेत. आणि स्वच्छतेची पहिली गरज दलितांना आहे. त्यामुळे त्यांचा नेताच आदिम अवस्थेतून उत्क्रांत होत सुटाबुटात वावरताना सफाईचं काम करताना दिसतोय, हा संदेश प्रवाशांना मिळाला असता. भेटीला येणाऱ्या दलितांना साबण आणि तौलिया पाठवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी आपली सवर्ण जाणीव दाखवलीच होती. विरोधाभास म्हणजे संविधानाची शपथ घेऊन हे लोक सांविधानिक पदावर बसून वर्णवर्चस्ववादी मानसिकतेनं वावरतात. आणि त्याविरोधातला कायदा असूनही सगळे मोकळेच राहतात.
रेल्वे स्टेशनवर मोठ्या संख्येनं दलित समाज (विशेषत:) युवक जमा होऊन उद्रेक होण्याआधीच अंत्योदयच्या कल्पक निर्मितीचा गर्भपात करण्यात आला. अळीमिळी गुपचिळी झाली.
संसदेचं अधिवेशन चालू असताना ही आगळीक घडते आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, दलित की बेटी मायावती, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दलित महिला म्हणून ज्यांचे ढोल वाजवण्यात आले त्या मीराकुमार यांसह सर्व प्रागतिक पक्षांचे खासदार नेते गप्प कसे? कुणालाही हा अंत्योदय ग्रूप कोण? त्यामागचे सडके मेंदू कोण? त्यांच्या या निर्लज्ज धाडसामागे कुणा चाणक्याची कुटिलनीती आहे हे विचारावंसं नाही वाटत?
एरवी रेल्वेच्या जेवणात झुरळ सापडलं म्हणून कुणी ट्विट\मेल केलं की, प्रतिक्षिप्त क्रियेसारखं उत्तर पाठवणारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या एकुणच घटनाक्रमाचा तपशील जाहीर करतील? स्थानकावरचे सीसीटीव्ही तपासून अंत्योदयवाल्यांना जेरबंद करतील? त्यांच्यावर गुन्हा दाखल करून, अॅट्रॉसिटी कलम लावलं जाईल? का याबाबतीत जास्तीत जास्त त्या दिवशीच्या रात्रपाळीच्या स्टेशनमास्तर, एखाद-दोन सुरक्षारक्षकांची बडतर्फी दाखवून मूळ मेंदू मोकळाच ठेवला जाईल?
स्वत:च दलितत्व मिरवत राष्ट्रपतीभवनात पोहोचलेले रामनाथ कोविंद आणि ‘मी आज जो काही आहे तो केवळ बाबासाहेबांमुळे’ असं टाळीचं वाक्य म्हणणारे आणि टीव्ही कॅमेरा उपस्थित आहे हे भान ठेवून संसदेच्या पायरीवर नतमस्तक होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोस्टर, त्याची संकल्पना आणि त्याचं प्रदर्शन ही गंभीर बाब मानणार की उनाड मुलांची खोडी म्हणून सोडून देणार? माननीय पंतप्रधान ‘ना खाऊंगा और ना खाने दूँगा’ म्हणत भलेही तुम्ही भ्रष्टाचार पैशांपुरता सिमित केला असेल. पण हा जो वैचारिक भ्रष्टाचार आहे त्याची गिनती कशात करणार?
सरळ सरळ जातीयवादी पोस्टर बनवणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणार की नाही? का नेहमीचीच गदगदलेल्या स्वरांची नौटंकी? मुस्लिमांच्या हत्याकांडाबद्दल विचारलं, तर यांचं उत्तर ‘गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू आलं तरी दु:ख होतंच ना!’ रोहिल वेमुलावर न बोलता ‘मैं उस माँ की दर्द को समझ सकता हूँ, जिसने अपना जवान बेटा खोया है.’
प्रधानसेवक त्या आईचा तरुण मुलगा अंगावर वीज पडून किंवा दरड कोसळून गेला नाही. त्याला तुमच्या वर्णवर्चस्ववादी विचारसरणीनं कोंडीत पकडून मारलाय. त्याची हत्या केलीय. गुजरातमध्ये दलितांना गोहत्यारे म्हणून अमानुष मारहाण झाली. पंतप्रधान संतापून गदगदत म्हणाले, ‘त्यांना मारण्याऐववजी मला गोळ्या घाला!’ का? ‘सर्जिकल स्ट्राईक’ करत मिरवणारी ५६ उंच छाती इथं काय टाचणीनं फुगा फुटावा तशी पंक्चर होते?
उन्मादी गोरक्षकांना गोळ्या घालायची हिंमत दाखवा! तुमच्या त्या परेश रावळला बांधायचा का जीपला पुढे? चिथावणीच्या सर्व व्यवस्था करायच्या आणि मग रुदालीसारखे हुकमी डोळे भिजवायचे, ही नाटकं किती दिवस करणार?
अर्थात तुम्हाला अडवणारे, विचारणारे कोण आहे? बाबासाहेबांचं नाव घेत तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारे आज गरीब सवर्णांच्या आरक्षणासाठी पुढे सरसावलेत.
बाबासाहेबांनी गुलामीची जाणीव करून देऊन विद्रोहाचे पाणी पेटवून हिंदू धर्माला लाथ मारून नागपुरातच ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, तो बौद्ध, आंबेडकरी समाज आज सुस्तावलाय. आरक्षणातून अंगावर आलेली सुबत्तेची सूज अंगाखांद्यावर मिरवत एकेकाळचे पँथर दरवेशाच्या अस्वलासारखे फिरताहेत. इतकी संतापदायक घटना घडली, व्हॉटसअॅपवर चार फुलझड्या पेटल्या. बाकी सगळं शांत शांत!!!
का नाही रान पेटलं? गल्ली ते दिल्ली सत्ताधाऱ्यांना का नाही जाब विचारला गेला? कोपर्डीसाठी महिनाभर मोर्चे निघतात. बाबासाहेबांच्या प्रेससाठी माणसं रस्त्यावर उतरतात, मग यावेळीच का ही स्मशानशांतता?
का आम्ही वाट पाहतोय की, बाबासाहेब कचरा उचलतानाची पोस्टर्स लागतील आणि त्याचवेळी पंतप्रधान सूतकताईच्या गांधींच्या पोझमधून उठून संविधानाची प्रत घेऊन एक बोट उंच केलेली पोझ कधी घेताहेत याची?
बाबासाहेबांना बाप म्हणून आपलुकीच्या आदरानं संबोधणारा समाज, बापाची अब्रू वेशीवर टांगली जातेय तरी आपआपसात बोलत बसलाय. मुसलमानांना ‘पाकिस्तानची वाट धरा’ सांगितलं जातंय आणि या अशा पोस्टरमधून काय दलितांनी पुन्हा डोईवरून मानवी मैला वाहायची तयारी ठेवा, हे सुचवलं जातंय?
‘मूकनायक’ होऊन गेला. जीवन खर्चून गेला. स्वाभिमानानं गेला. अस्पृश्य म्हणून जन्मला, पण ‘बुद्धसाधक’ म्हणून महानिर्वाणास गेला…पण मुकी मात्र मुकीच राहिली. आधी गुलामीत आता बापाच्या श्रीमंतीत!
लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment