फिल्मी मालमसाल्याच्या 'वाडगा' भरलेला 'भिकारी'
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
श्रीकांत ना. कुलकर्णी
  • 'स्वामी तिन्ही जगाचा.... भिकारी'चं एक पोस्टर
  • Sat , 05 August 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie स्वामी तिन्ही जगाचा.... भिकारी Swami Tinhi Jagacha...Bhikari

'स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी' असा मराठीत एक वाक्प्रचार आहे. याच सुविचाराचा आधार घेऊन आलेल्या नव्या मराठी चित्रपटात आपल्या आईसाठी अक्षरशः भिकारी झालेल्या एका करोडपती मुलाची कथा पडद्यावर साकार करण्यात आली आहे. या मराठी चित्रपटाचं नाव 'स्वामी तिन्ही जगाचा.... भिकारी' असं आहे. त्यातील 'आई' हे नाव गायब आहे. ते अध्याहृत ठेवण्यात आलं आहे. त्यानुसारच चित्रपटात अगदी सुरुवातीला दाखवण्यात आलेली नायकाची 'आई' शेवटीच पडद्यावर पाहावयास मिळते. मधल्या काळात 'आई'च्या महतीचं गुणगान करण्यासाठी वापरलेला तद्दन 'फिल्मी मालमसाला’च पडद्यावर पाहावयास मिळतो.

हा चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटावरून बेतला आहे. कथेची संकल्पना उत्तम आहे. चित्रपटाच्या नावात 'भिकारी' शब्द असला तरी चित्रपट चकचकीत करण्यात कोणतीही 'भिकारता' दाखवलेली नाही. मात्र ही 'उणीव' पटकथेत भरून काढल्याचं दिसून येतं. 'बॉलिवुड'मधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून त्यामुळे साहजिकच पटकथा आखीव-रेखीव करण्यापेक्षा नाचगाण्यांवर अधिक भर दिला असल्याचं जाणवतं.

सम्राट जयकर (स्वप्नील जोशी) हा उच्च विद्याविभूषित तरुण लंडनहून शिक्षण संपवून मायदेशी परत येतो. (तो लंडनला असतो हे फक्त सांगण्यासाठी चित्रपटाची सुरुवातच गाण्यापासून होते.) त्याच्या आईनं (शारदा-कीर्ती आडारकर) खूप मोठ्या कष्टातून शारदादेवी मिलची उभारणी केलेली असते. या मिलचा सर्व कारभार आता सम्राटनं पाहावा अशी तिची इच्छा असते. त्याप्रमाणे ती मिलचा कारभार सम्राटाकडे सोपवत असतानाच मिलमध्ये अचानक एक अपघात होतो आणि डोक्याला जबर लागून शारदादेवी 'कोमा'त जातात. सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार होऊनही त्यांच्या प्रकृतीत फारसा फरक पडत नाही.

शेवटी निराश झालेल्या सम्राटला एका नदीकाठी एक भला माणूस (हा 'तपस्वी' माणूस कोण असतो, कोठून आलेला असतो त्याचाही थांगपत्ता लागत नाही.) 'स्वतःचं अस्तित्व विसरून तू 'आई'साठी ४८ दिवसासाठी 'भिकारी' हो असा उपदेशवजा सल्ला देतो. त्यानुसार सम्राट पुण्याला जाऊन भिकारी बनतो आणि एका देवळातील भिकाऱ्यांच्या टोळीत सामील होतो. तिथं त्याला त्याची मधू (ऋचा इनामदार) ही प्रेयसीही भेटते.

दुसरीकडे सम्राटच्या संपत्तीवर डोळा ठेवून असलेला त्याचा मामा विश्वनाथ (सयाजी शिंदे), सम्राटला खतम करण्यासाठी बसप्पा (मिलिंद शिंदे) नावाच्या गुंडाच्या टोळीची मदत घेतो. 'भिकारी' झालेला सम्राट या गुंडांचा कसा बंदोबस्त करतो आणि त्याच्या 'आई'चं पुढे काय होतं, हे अर्थातच पुढे सांगण्याची काही गरज नाही.

दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी आपल्या या चित्रपटात कथेपेक्षा मनोरंजनावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे 'आई'च्या बाबतीत घडणारे भावनिक प्रसंग कमी आणि नाचगाणी व मारामारी पडद्यावर जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मारामारीचे प्रसंगही 'सिंघम' स्टाईल' आहेत. त्यामुळे थोडीफार करमणूक होतेही, मात्र सम्राट 'आई'साठी भिकाऱ्याच्या वसा घेऊन आला आहे की, गुंडांना धडा शिकवण्यासाठी मारामारी करायला आला आहे, असाही प्रश्न पडतो. शिवाय 'भिकारी' बनलेला सम्राट आपल्या प्रेयसीसाठी 'पिझ्झा'री बनलेला (प्रेयसीच्या हॉटेलमध्ये पिझ्झा करण्यात मदत करणारा) दाखवला आहे.

कथेतील विश्वनाथ 'मामा'सारखं महत्त्वाचं खलनायक पात्र आणखी विकसित करण्याची गरज होती. 'सुपारी' घेणारा आणि त्यासाठी हातात सतत अडकित्ता घेऊन फिरणारा बसाप्पा हा गुंड एका प्रसंगात या विश्वनाथचं बोट अडकित्त्यानं कापतो असं दाखवण्यात आलंय. हा प्रसंग अंगावर येतो. (मात्र नंतरच्या अनेक प्रसंगात या विश्वनाथचं कापलेलं बोट 'जैसे थे' असल्याचं दिसतं), तसेच चित्रपटाच्या शेवटी याच विश्वनाथला मोटारीतून अटक करून घेऊन जाण्याचा प्रसंगही अतिशय हास्यास्पद ठरला आहे.

स्वप्नील जोशी 'सम्राट'च्या भूमिकेत उत्तम शोभून दिसला आहे. मात्र चित्रपटात एका भिकाऱ्याच्याच तोंडी असलेल्या वाक्याप्रमाणे 'तो कोणत्याही अँगलनं 'भिकारी' वाटत  नाही. ही मुख्य उणीव चित्रपट पाहताना सतत जाणवत राहते. मधू या प्रेयसीच्या भूमिकेत ऋचा इनामदार त्याला छान शोभून दिसली आहे. अर्थात तिची भूमिका छान दिसण्यापुरतीच मर्यदित आहे. मामा झालेले सयाजी शिंदे यांनी नेहमीप्रमाणे 'विनोदी' खलनायक उभारला आहे. मिलिंद शिंदे यांनी रंगवलेला 'बसाप्पा' हा गुंडही दखल घेण्याजोगा आहे. बाकी भिकाऱ्यांच्या टोळीतील अनेकांची कामंही चांगली झाली आहेत. चित्रपटाच्या शेवटी 'देवा ओ देवा' हे गणपतीचं भव्य सामूहिक नृत्य गाणं खास गणेश आचार्यासाठी चित्रित करण्यात आलं आहे हे लक्षात येतं.

थोडक्यात चित्रपटाचं नाव 'भिकारी' असलं तरी 'आई'ची महती सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी सर्व प्रकारचा फिल्मी मालमसाला घालून तयार करण्यात करण्यात आलेला हा चित्रपट आहे. या 'भिकाऱ्या’ला 'भीक' घालायची की, नाही हे रसिकांनीच ठरवावं.
 

लेखक ज्येष्ठ सिनेपत्रकार आहेत.
shree_nakul@yahoo.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख