‘स्वदेस’ : गंगा-जमुनी संस्कृतीचा आरव
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • ‘स्वदेस’ मधील एक दृश्य
  • Sat , 05 August 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar स्वदेस Swades

देशभक्तीबद्दल जॉर्ज बर्नोड शॉचं एक चरचरीत वाक्य आहे - Patriotism is your conviction that this country is superior to all other countries because you were born in it. पण 'स्वदेस'मधला मोहन भार्गव सर्व लोकांसमोर बोलतो, “मला नाही वाटतं आपला देश जगातला सगळ्यात महान देश आहे.” खासदार नर्गिस दत्त राज्यसभेत बोलल्या होत्या, “सत्यजित रे सारखे दिग्दर्शक 'पाथेर पांचाली'सारख्या चित्रपटांमधून भारतातल्या दारिद्र्याचे जगभरात प्रदर्शन करून प्रसिद्धी मिळवतात." नर्गिस दत्त यांच्यासारखीच विचारसरणी असणारा एक मोठा वर्ग देशात आजही आहे. 'स्वदेस'मध्ये भारतीय ग्रामीण भाग अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित असणारा, जातीपातींच्या आणि कालबाह्य रूढी परंपरांच्या विळख्यात अडकून पडलेला दाखवलेला आहे. 'स्वदेस'मधला नायक आक्रस्ताळेपणा करत संवाद बोलत नाहीत. 'स्वदेस'मध्ये पाकिस्तान किंवा 'पडोसी मुल्क'चा उल्लेखही नाही. 'स्वदेस'मधला नायक एकाच वेळेस तीस-चाळीस देशाच्या शत्रूंना लोळवत नाही. नायक एनआरआय असला तरी 'स्वदेस' ही अँटी ब्रेन ड्रेन चित्रपटही नाही. मग 'स्वदेस'ला देशभक्तीपर चित्रपट म्हणावा का? मुळात चित्रपटाला अशा कुठल्यातरी कॅटेगरीमध्ये कोंबण्याचा अट्टाहास करावाच का? 'स्वदेस'बद्दल प्रत्येकाचं स्वतःच एक इंटरप्रिटीशन आहे. तसं ते माझंही आहे. 'स्वदेस'नं वर्षानुवर्षं माझ्या मेंदूत घट्ट रुतून बसलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनांना आव्हान दिलं हे नक्की. 'तुमच्या देशानं तुमच्यासाठी काय केलं हे विचारू नका, तुम्ही देशासाठी काय केलं हे स्वतःला विचारा.' या जॉन एफ . केनेडीच्या वाक्याचं पडद्यावरचं प्रारूप म्हणजे 'स्वदेस'. 

'लगान'नं भूतो न भविष्यती यश मिळवल्यावर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आता पुढचा चित्रपट कुठला  करणार, याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. 'लगान'मुळे निर्माण झालेल्या ढिगभर अपेक्षांना आशुतोष कसा पूर्ण करणार हा औत्सुक्याचा विषय होता. आशुतोषच्या डोक्यात मात्र वेगळीच कल्पना घोळत होती. खूप वर्षांपूर्वी त्यानं टीव्ही मालिकेच्या एका भागात काम केलं होतं. एक एनआरआय आपल्या गावात येतो आणि तिथलाच बनून राहतो अशा अर्थाचं कथानक त्याचं होतं. आशुतोषला त्या कथानकात 'सिनेमॅटिक जर्म' दिसत होता. त्यानं त्या कथेचा गाभा कायम ठेवून त्यात मोठ्या प्रमाणावर बदल केले. ग्रामीण भारताचे  प्रश्न, अजून घट्ट असलेली जातिव्यवस्था, शिक्षणाचे प्रश्न, विजेची अनुपलब्धता असे अनेक घटक पटकथेत आले. यासाठी अजून अनेक पटकथा लेखकांचं सहाय्य  आशुतोषनं घेतलं. आशुतोष धरून अजून नऊ जण पटकथा-संवाद लेखनात सहभागी होते. अयान मुखरजी (‘वेक अप सिड’, ‘ये जवानी है दिवानी’चा दिग्दर्शक ) हा या नऊजणांपैकी एक. आता प्रश्न उभा होता मोहन भार्गवच्या मुख्य भूमिकेत कोण असणार? 'लगान'नंतर आशुतोषच्या पुढच्या चित्रपटात आमिर खानचं असेल असं लोकांनी गृहीत धरलं होतं. त्यामुळे मोहन भार्गवच्या भूमिकेत शाहरुख खान असणार आहे, हे कळताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण तोपर्यंत शाहरुखची 'लव्हरबॉय' ही इमेज लोकांच्या मनात घट्ट बसली होती. सिनेमा गांभीर्यानं बघणारा एक मोठा वर्ग अभिनेता म्हणून शाहरुखला सिरियसली घ्यायला तयारच नव्हता. आशुतोषनं शाहरुखला आपल्या चित्रपटात घेऊन मोठी चूक केली आहे असं त्यांचं मत होतं. पण शाहरुख हा काय प्रतीचा अभिनेता आहे हे आशुतोषला माहीत होतं. शाहरुख आणि आशुतोष जुने मित्र. 'कभी हाँ कभी ना'मध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. आशुतोष शाहरुखला 'शाह' असं संबोधायचा. आशुतोष 'शाह'कडे चित्रपटाची संहिता घेऊन गेला. त्यानं होकार द्यायला थोडाही वेळ घेतला नाही. 'लगान'साठी आशुतोषनं शाहरुखलाच अॅप्रोच केलं होतं, पण त्यावेळेस ते जमलं नव्हतं. मोहन भार्गवच्या भूमिकेसाठी आशुतोषच्या डोक्यात माधवनचं नाव होतं. हृतिक रोशनचा पर्यायही होता. पण 'दाने दाने पे लिखा है खानेवाले का नाम' असं म्हणतात, तसं प्रत्येक भूमिकेवर नटाचं नाव असतं. मोहन भार्गवच्या भूमिकेवर शाहरुखचंच नाव होतं. 

आशुतोषला स्टुडिओ किंवा सेटवर शूटिंग करण्यापेक्षा रिअल लोकेशन्सवर शूटिंग करायला आवडतं. 'लगान'चं शूटिंग शेकडो समस्यांना तोंड देत भूजच्या वाळवंटातच त्याने केलं होतं. 'स्वदेस'च्या शुटिंगसाठी त्याने वाईची निवड केली होती. वाईकडे जाणारे रस्ते खड्ड्यांनी भरलेले होते. शाहरुख हा त्यावेळेस प्रचंड पाठदुखीनं त्रस्त होता. त्या खड्ड्यांमधून प्रवास करताना लागणारा प्रत्येक गचका हा त्याला मरणयातना द्यायचा. चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांनी शाहरुखला होणारा हा त्रास बघितला. एकदा सेटवर खुर्च्या टाकून रॉनी, आशुतोष, शाहरुख बसले होते. तेव्हा न राहवून रॉनीनं आशुतोषला इथं अवघड ठिकाणी शूटिंग करण्यापेक्षा मुंबईतच सेट लावून शूटिंग का करत नाहीस असा प्रश्न विचारला. तेव्हा आशुतोषनं रॉनीचं लक्ष तिथून दिसणाऱ्या तीन पर्वतांच्या शिखरांकडे वेधलं. शाहरुख जेव्हा गावात एंट्री करतो, तेव्हा त्या सीनच्या पार्श्वभूमीवर ही शिखरं दिसतात. त्या पावणे तीन सेकंदाच्या सीनसाठी आपलं अख्खं युनिट घेऊन आशुतोष तिथं आला होता. डिटेलिंगमध्ये आशुतोषचा हात कुणीच पकडू शकत नाही, अशी जी ख्याती आहे ती उगीच नाही!

नासामध्ये काम करणारा मोहन भार्गव तसा लौकिकार्थानं यशस्वी आहे. पण त्याच्या मनात अपराध भावनेनं घर केलं आहे. बालपणी आपला सांभाळ करणाऱ्या कावेरी अम्माला आपण वाऱ्यावर सोडून दिलं आहे, ही अपराधभावना त्याला आतून खात आहे. शेवटी कावेरी अम्माला शोधण्यासाठी काही दिवसाची सुट्टी टाकून तो भारतात येतो. तिथं एका वृद्धाश्रमात कावेरी अम्माला तिथून कुणीतरी घेऊन गेलं आहे आणि ती सध्या चरणपूर नावाच्या गावात राहत आहे असं त्याला कळतं. वृद्धाश्रमातल्या एका प्रसंगात आशुतोष वाऱ्यावर सोडून दिलेल्या वृद्धांची कैफियत मांडून जातो. कावेरी अम्मासोबत एका खोलीत राहणारी वृद्ध बाई म्हणते, "कावेरी नशीबवान आहे. तिला घ्यायला दोन दोनदा लोक येऊन गेले. नाहीतर आम्हा म्हाताऱ्यांकडे बघायला वेळ कुणाला असतो." मोहन आपली आलिशान व्हॅन घेऊन चरणपूरला जायला निघतो. रस्त्यात त्याला एक मिश्किल साधू (मकरंद देशपांडे) भेटतो. तो मोहनचा वाटाड्या बनतो. तो मोहनला विचारतो, "तुला नेमकं कुठं जायचं आहे हे तुला तरी माहीत आहे का?" याच प्रश्नाचा ब्रह्मराक्षस मोहनच्या मानगुटीवर येऊन बसणार असतो. ही तर फक्त सुरुवात असते. शेवटी मोहन कावेरी अम्माचं घर शोधून काढतोच. कावेरी अम्माचं हळूच हातानं मागून डोळे झाकून तिला ती झोपवताना गायची ते गाणं ऐकवतो. हाताला हात लावूनच कावेरी अम्माला कळतं की, तिचा मोहन परत आला आहे ते. कावेरी अम्मा मोहनसाठी त्याच्या आवडीचं जेवण बनवते. तिनं दिलेलं पाणी प्यायचं टाळून मोहन खुबीनं ग्लास बाजूला ठेवतो, हे प्रेक्षकांच्या नजरेतून सुटत नाही. त्याला ते पाणी पिण्याची भीती वाटतं असणार. इतक्यात गीता (गायत्री जोशी) , जिने कावेरी अम्मांना घरी आणलं असत ती शाळेतून वापस येते. गीता ही मोहनची बालमैत्रीण असते. सध्या तिने माजी स्वातंत्र्यसैनिक आणि गांधीवादी दादाजी (लेख टंडन) यांच्यासोबत चरणपूरमध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. मोहनविषयी तिच्या मनात अढी आहे. हा कावेरी अम्मांना अमेरिकेला घेऊन जाईल आणि त्यांना घरकामाला जुंपेल अशी भीती तिला वाटत असते. शिवाय तिलाही आधार म्हणून कावेरी अम्माची गरज असतेच. त्यामुळे तिच्यात आणि मोहनमध्ये एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू होतं. खुद्द कावेरी अम्माची अमेरिकेत जाण्याची इच्छा नसते. पण मोहन लांब जावा असं पण तिला वाटत नसतं. तिच्या डोक्यात वेगळीच कल्पना असते. गीताच्या शाळेसमोर काही समस्या आहेत, त्या तू सोडव मग मी तुझ्यासोबत येण्याचा विचार करेल असं कावेरी अम्मा मोहनला सांगते. दरम्यानच्या काळात मोहनला गावात दोन मित्र झालेले असतात. मेलाराम (दया शंकर पांडे) आणि पोस्टमास्तर श्रीवास्तव (राजेश विवेक). मेलारामच्या हाताला चव असते. अमेरिकेत जाऊन स्वतःचं हॉटेल उघडून लाखो लोकांना खाऊ घालण्याची त्याची महत्त्वाकांक्षा असते. मोहन आपली ही आकांक्षा पूर्ण करेल असं त्याला वाटतं असतं. पण विरोधाभास असा की, त्याच्या स्वतःच्या गावात त्याच्या हातचं पाणी कुणी पीत नसतं. कारण मेलाराम हा दलित असतो. मोहन भार्गव चरणपूरमध्ये एंट्री घेतो ना घेतो, तोच त्याला पोस्टमास्तर भेटतो. वयानं मोठा असून आणि दोघांचीही पार्श्वभूमी वेगळी असूनही मोहन भार्गव आणि हा पोस्टमास्तर यांच्यात एक निर्व्याज मैत्र तयार होतं.

शाहरुख पहिल्यांदा जेव्हा त्याच्या गावातल्या पोस्ट कार्यालयात जातो आणि राजेशला ईमेलची माहिती देतो तेव्हा राजेश कबीराचा एक सुंदर दोहा बदलून म्हणतो, "उह माले गुरु ग्यान करावत, और इमेल संसार जनावत'. स्वदेस जितका सुंदर आहे, तितकाच त्याच्यातला राजेशचा पोस्टमास्तर सुंदर आहे. त्या पोस्टमास्तरमध्ये एक निरागस मूल दडलं आहे. तर शाळेसमोरचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या दोन मित्रांना घेऊन गावात फिरायला सुरुवात करतो. त्याला गाव कळायला लागतो. त्याला जसा जसा गाव समजायला लागतो, तसा मोहन अस्वस्थ व्हायला लागतो. दलितांच्या मुलांना वर्गात प्रवेश नसतो, मुलींना शाळेत पाठवायची प्रथा नसते, या गोष्टी बघून हस्तदंती मनोऱ्यात राहणारा मोहन हादरतो. एके रात्री गावात चित्रपटाचा शो असतो. पण दलितांना सगळ्यांसोबत पडद्यासमोर बसण्याची परवानगी  नसते. ते निमूटपणे पडद्याच्या मागे बसून पिक्चर पाहत असतात. शहरात लोकांना एकत्र आणणारा सिनेमाचा पडदा इथं मात्र दलित आणि सवर्णांना विभाजित करतोय. मध्येच लाईट जाते. गावात विजेची मोठी समस्या आहे. लोक विशेषतः लहान मुलं नाराज होतात. मग मोहन सूत्र हातात घेतो. आपल्याकडच्या दुर्बिणीमधून बच्चे कंपनीला तो अंतराळातले तारे दाखवतो. अंतराळातल्या मौजमजा सांगतो. दलितांच्या मुलांनाही सामील करून घेतो. गाता गाता गावातल्या लोकांना विभागणारा पडदा काढून टाकतो. गावातल्या बड्या 'संस्कारी' धेंडांना मोहन जे करतोय ते पसंद नसतं. आपल्या महान संस्कृतीवर हा उपरा माणूस घाला घालतोय अशी त्यांची समजूत असते.

एकदा कावेरी अम्मा मोहनला त्यांच्या एका कुळाकडून कर्जवसुली करायला पाठवते. मुद्दाम. मोहन मेलारामला घेऊन दुसऱ्या गावी त्या गरीब कुळाच्या घरी जातो. तिथलं अठरा विश्व दारिद्र्य बघून मोहन अंतर्बाह्य हादरतो. इतक्या गरिबीमध्येही तो गरीब शेतकरी आपलं आदरातिथ्य करतो आहे, हे बघून मोहन भारावून जातो. कर्जवसुली करायला गेलेला मोहन आपल्याच खिशातले सगळे पैसे काढून त्या शेतकऱ्याला देऊ करतो. तो मानी शेतकरी ते पैसे घ्यायला नकार देतो, तर त्याच्या मुलाच्या हातात देऊन घाईघाईनं निघतो. हे दारिद्र्य अजून सहन करण्याची त्याच्यात शक्ती नसते. पण कुठपर्यंत पळणार? हे दारिद्र्य सर्वव्यापी आहे. प्रत्येक महान चित्रपटात एक डिफाईनिंग मोमेन्ट असते. 'शिंडलर्स लिस्ट'मध्ये शिंडलरला त्या लहान गोंडस मुलीचं प्रेत दिसतं आणि पैसा सर्वस्व मानणारा शिंडलर बदलतो. 'स्वदेस'मध्ये ती मोमेन्ट आहे. त्या गरीब शेतकऱ्याच्या घरून परत जाताना मोहन रेल्वेने परत जात असतो. तो शेतकऱ्याच्या घरी बघितलेल्या भीषण दारिद्र्यानं अगोदरच अस्वस्थ असतो. तितक्यात एका स्टेशनवर मोहनला 'तो' दिसतो. 'पच्चीस पैसे पानी ग्लास' विकणारा तो पोरगा. एक ग्लास विकून पच्चीस पैसे कमावण्याची त्या पोराची धडपड पाहून मोहनचा कसाबसा स्वतःला एकत्र बांधून ठेवण्याचा मुखवटाही गळून पडतो. त्याच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहायला लागतात. त्या पोराला द्यायला पच्चीस पैसेही मोहनच्या खिशात नसतात. खिशातलं होत नव्हतं ते सगळं त्यानं त्या गरीब शेतकऱ्याला दिलेलं असतं.

मेलाराम आपल्या खिशातलं चाराण्याचं नाणं मोहनला देतो. मोहन ते नाणं पोराला देऊन पाण्याचा ग्लास विकत घेतो. एरवी भारतातल्या पाण्याला तोंडही न लावणारा आणि बाटलीबंद पाणी पिणारा मोहन तो पाण्याचा ग्लास तोंडाला लावतो. डोळ्यातून अश्रू वाहतच असतात. मोहनच्या आणि प्रेक्षकांच्याही. हीच 'स्वदेस'ची डिफाईनिंग मोमेन्ट आहे. शाहरुख खान काय ताकदीचा अभिनेता आहे, हे हा प्रसंग पाहून कळतं.  

गावात परत आल्यावर मोहन त्याच्या अनुभवांनी प्रचंड अस्वस्थ असतो. कावेरी अम्माला कळत , आपलं काम झालं. एव्हाना गीता आणि मोहनमध्ये प्रेमाचे नाजूक धागे विणले जायला लागले असतात. मोहनला गावाकडे आपला मुक्काम वाढवण्याची जास्त कारणं असतात, परत जाण्याची कमी. ग्रामपंचायतीत झेंडावंदन असतं. मोहन धोतर कुर्ता घालून तिथं हजर होतो. तिथे गावातले लोक त्याला अमेरिकेबद्दल काहीतरी सांग अशी विनंती करतात. आपला देश -संस्कृती महान आणि अमेरिका हिणकस अशी त्यातल्या काहींची समजूत असते. 'मैं नही मानता की हमारा मुल्क, दुनिया का सबसे महान मुल्क है." अशी सुरुवात करून मोहन त्यांच्या युक्तिवादाच्या चिंधड्या उडवतो. ज्या देशात एका शेतकरी कुटुंबाला आजच्या जेवणाची विवंचना आहे, त्या देशाला मी महान का मानू असा सवालही विचारतो. तो प्रसंग एकूणच संवाद, अभिनय, दिग्दर्शन याबाबतीत एक माईलस्टोन आहे. चरणपूरसाठी काहीतरी करण्याची मोहनची मनीषा असते. तो गाववाल्यांना मदत करण्याची विनंती करतो. तुमची मदत मिळाली तर मी गावात वीज आणून दाखवतो असं आश्वासन देतो. शेवटी अनंत खटपटी करून गावात वीज आणतो. शेवटी मोहनचा अमेरिकेकडे जाण्याचा दिवस येतो. कावेरी अम्मा, गीता, मेलाराम, श्रीवास्तव, ग्रामस्थ यांना सोडून जायचं जीवावर येत असतं. गीता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कर्तव्य मोहनला बोलावत असतं. मोहन अमेरिकेत परत जातो. आपलं काम पूर्ण करतो. पण आपण मागे चरणपुरात काही तरी ठेवून आलो आहोत ही जाणीव टोचणी देत असते. आपण आपल्या गरीब देशबांधवांसाठी काही तरी करायला पाहिजे असंही तीव्रतेनं वाटत असतं. शेवटी जवळच्या मित्रांच्या आग्रहाला मोडून काढत मोहन पुन्हा चरणपूरला येतो. ‘स्वदेस’चा शेवट अतिशय समर्पक आहे. एरवी देशातल्या घाणीला आणि पाण्याला नाकं मुरडणारा मोहन, मातीत स्वतःला बरबटून घेतं मनसोक्त कुस्ती खेळतो. आणि नंतर नदीच्या शांत वाहत्या पाण्यात पाय बुडवून बसतो. मोहन भार्गवची 'घरवापसी' झालेली असते. 

चित्रपटाचा आवाका खूप मोठा होता. अनेक पात्रं होती. त्यामुळे चित्रपटाची लांबी तीन तासाच्या वर गेली. इतका लांब चित्रपट प्रेक्षक कसा बघणार अशी भीती शाहरुखला वाटत होती. शिवाय चित्रपटात प्रेक्षकांना बांधून ठेवणारी 'पारंपरिक मनोरंजन मूल्य' नव्हती. शाहरुखने आशुतोषला चित्रपटाची लांबी कमी कर, अशी विनंती केली. पण आशुतोष आपल्या 'फायनल प्रोडक्ट'वर ठाम होता. त्यानं मृदू पण ठामपणे 'शाह'ची विनंती नाकारली. प्रेक्षकांनी शाहरुखची भीती खरी ठरवली. 'स्वदेस' तिकीटखिडकीवर फारसा चालला नाही. चित्रपटाला फारसे पुरस्कारही मिळाले नाहीत. त्या वर्षीचा अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कारही शाहरुखला न मिळता सैफ अली खानला मिळाला.

'स्वदेस' ही तशी परफेक्ट फिल्म नाहीच. एक-दोन गाण्यांना सहज कात्री लावता आली असती. खूप लोकांना मोहन गावात ज्याप्रकारे वीज आणतो, तेच शक्य वाटलं नव्हतं. शिवाय चित्रपटाच्या कथेला एक भाबडेपणाचं अस्तर आहेच. आदर्शवाद ठीक असला तरी त्याचा कधी कधी ओव्हरडोस झाल्यासारखा वाटतो. पण हे सगळे दोष असले तरी ‘स्वदेस’ हा एक अप्रतिम चित्रपट आहे हे मान्य करावंच लागतं. चित्रपटात विनाकारण गाणी येतात आणि कथानकाचा प्रवाह खंडित करतात असा अनेकांचा आक्षेप आहे. पण माझं व्यक्तिशः असं मत आहे की, हा चित्रपट जितका आशुतोष आणि शाहरुखचा आहे, तितकाच रहमान आणि जावेद अख्तर यांचा पण आहे. 'यु हि चला चल राही ', 'ये तारा वो तारा', 'ये जो देस है तेरा' ही गाणी अप्रतिम आहेत. 'ये तारा' आणि रामलीलेतल्या गाण्यातून आशुतोषनं चित्रपटाचं कथानक खुबीनं पुढं नेलं आहे. चित्रपटात शाहरुखवर चित्रित झालेलं आणि उदित नारायणने गायलेलं 'आहिस्ता आहिस्ता' नावाचं अप्रतिम अंगाई गीत आहे. दुर्दैवानं चित्रपटात ते फायनल कटमध्ये येऊ शकलं नाही. माझं ते गाणं सगळ्यात आवडत आहे. 'ये जो देस है तेरा' या गाण्यात शहनाईचा कातिल वापर केला आहे रेहमाननं. शाहरुखनं आपल्या अभिनयानं या गाण्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

'स्वदेस' हा तसा फिल्ममेकिंगचे अनेक नियम मोडतो. शाहरुखला प्रेमवीर दाखवायचं टाळून तो त्याला एक धीरगंभीर पण खेळकर व्यक्तिमत्त्वात दाखवतो. शाहरुखचा या चित्रपटातला लूक पण एकदम फॉर्मल आहे. कॉटनच्या पँट्स आणि हाफ बाह्यांचे भडक नसणारे शर्ट्स. शाहरुखने हा लुक मस्त कॅरी केला आहे. चित्रपटात कुणीही दुसऱ्यावर साधं बोट पण उगारत नाही, मारामारी वगैरे लांबचीच गोष्ट. चित्रपटात आयटम सॉन्ग नाहीत. अंगप्रदर्शन नाही. ‘स्वदेस’ यामुळेच तिकीट खिडकीवर चालला नाही, अशी एक भीतीदायक शक्यता वाटते. 

सध्याचं युग आक्रमक राष्ट्रवादाचं युग आहे. प्रचंड आक्रमक भाषेत विरोधकांवर, दुसऱ्या धर्माच्या -जातीच्या -देशाच्या लोकांवर आगपाखड करणं म्हणजेच देशभक्ती असं समीकरण रुजू पाहत आहे. अशा या सतत टोकावर राहण्याच्या काळात 'स्वदेस'सारखे चित्रपट येत राहणं आवश्यक आहे. आज हा चित्रपट आला असता तर बऱ्याच लोकांनी कदाचित शाहरुख 'खान' आहे, म्हणून चित्रपटावर बहिष्कार टाकला असता. नायकाच्या तोंडी 'मैं नही मानता की हमारा मुल्क, दुनिया का सबसे महान मुल्क है." हा संवाद आहे हे कळाल्यावर लोकांनी थिएटरमध्ये तोडफोड केली असती. निहलानीसाहेबांची वक्रदृष्टी पडली असती ती वेगळीच.

थोडक्यात देशभक्तीवर अतिशय सुंदर भाष्य करणारा हा चित्रपट सध्याच्या आक्रमक राष्ट्रवादालाच बळी पडला असता. बर झालं ‘स्वदेस’ तेरा वर्षं अगोदरच येऊन गेला ते. पण इंटरनेटच्या युगात 'स्वदेस'चा कल्ट वाढत चालला आहे हीच आनंदाची गोष्ट आहे. काही गोष्टींना त्यांचा ड्यू उशिरा मिळतो. 'स्वदेस'मुळे प्रेरित होऊन निर्माता रॉनी स्क्रूवालाने 'स्वदेस फाउंडेशन'ची स्थापना केली. मोहन भार्गव प्रमाणेच या संस्थेनं अनेक गावात वीज पोहोचवण्याचं काम केलं आहे. चित्रपट खऱ्या जगात बदल घडवतात ते असे.

.............................................................................................................................................

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

shrikant shingate

Sun , 06 August 2017

Very nice article. Swades is my favorite movie than Lagaan. I have watched lagaan making more than movie.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......