टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अरविंद पानगढिया, शरद यादव, सुषमा स्वराज आणि कन्हैय्याकुमार
  • Fri , 04 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अरविंद पानगढिया Arvind Panagariya शरद यादव Sharad Yadav सुषमा स्वराज Sushma Swaraj कन्हैय्याकुमार Kanhaiya Kumar

१. चीनची भारतात १६० दशलक्ष डॉलर गुंतवणूक आहे आणि भारतही चीनशी व्यापार संबंध वृद्धिंगत करू इच्छित आहे, अशा शब्दात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. युद्ध हा कोणत्याही समस्येवरील उपाय असू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. सुषमा स्वराज यांनी डोकलाम वादाच्या पार्श्वभूमीवर, बदलत्या परिस्थितीत चीनशी संबंधांबाबत संसदेत प्रथमच केंद्राची भूमिका स्पष्ट केली. चीनशी मैत्री आणि चर्चेचा पर्याय जाहीर करताना पाकिस्तानशी मात्र चर्चा नाहीच, हेही त्यांनी सांगितले. आम्हाला मैत्री हवी आहे, मात्र हा विचार एकतर्फी असून चालत नाही. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाहीत, अशा शब्दात स्वराज यांनी काश्मीरबाबत सध्याचेच धोरण पुढे सुरू ठेवण्याचा इरादा जाहीर केला.

अरे देवा, हिंदी-चिनी भाई भाई म्हणून दगाबाज चीनवर विश्वास ठेवणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या धोरणांवर प्रखर टीका करून त्यांनी कसा भारताचा सत्यानाश केला, याचा आम्ही इकडे प्रचार करत असताना आमच्या सरकारनं आमच्याशीच दगाबाजी करावी? आम्ही रक्ताचं पाणी करून लोकांना चिनी माल घेण्यापासून परावृत्त करतोय आणि तुम्ही तिकडे चीनशी व्यापार वाढवण्याचा विचार सांगणार. सीमेवर जवान लढत असताना रस्त्यांची कंत्राटं देणार, कारखाने काढणार त्या लबाड चिन्यांबरोबर. अर्थात, चर्चेऐवजी युद्ध करायला चिनी भाई हे काही विदेशी काश्मिरी नाहीत?

.............................................................................................................................................

२. शालेय विद्यार्थ्यांना पॉर्न बघण्यापासून रोखण्यासाठी शाळेच्या आवारात जॅमर लावण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं दिलं आहे. शाळेच्या आवारात जॅमर लावणं व्यवहार्य ठरणार नाही असंही सरकारनं स्पष्ट केलं. शाळेच्या आवारात जॅमर लावल्यास शाळेतील इंटरनेटही बंद पडेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. स्कूल बसचा चालक आणि मदतनीसाच्या मोबाईलवर पॉर्नबंदीसाठी बसमध्ये जॅमर बसवता येतील असं त्यांनी स्पष्ट केलं.

एक बरा निर्णय घेतला की, त्याबरोबर दोन वेडगळ गोष्टी करायच्या, असा नियम आहे की काय? शाळेतलं इंटरनेट बंद झाल्यानं शिक्षकांचीही ‘गैरसोय’ होईल, हे लक्षात घेणाऱ्या सरकारला बसमध्ये जॅमर लावणं व्यवहार्य वाटतं? अशाने हळूहळू बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे एकेक बाऊन्सर आणि त्या बाऊन्सरनेच अत्याचार करू नये, म्हणून त्याच्याबरोबर दुसरा बाउन्सर ठेवायची वेळ येईल. मुलांनी पॉर्न पाहण्यावर नियंत्रण आणणं कठीण आहे. त्यांना व्यवस्थित लैंगिक शिक्षण देणं, हाच एकमेव मार्ग आहे.

.............................................................................................................................................

३. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर अरविंद पानगढिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. पानगढिया यांनी राजीनामापत्रात मोदींची तोंडभरून स्तुती केली आहे. याआधी बाहेरच्या व्यक्तीला या पदावर नियुक्त करण्याचं धाडस कोणत्याही पंतप्रधानानं दाखवलेलं नव्हतं, असं पानगढिया यांनी पत्रात म्हटलं आहे. पानगढिया यांनी मंगळवारी नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

पानगढिया हे सुसभ्य समाजाचे प्रतिनिधी आहेत. तिथं बॉसच्या छळाला कंटाळून राजीनामा देणारा माणूसही ‘या कार्यालयात मी जे सुखद दिवस व्यतीत केलं आणि वरिष्ठांनी जे प्रेमपूर्वक मार्गदर्शन केलं, तो माझा आयुष्यभराचा ठेवा आहे,’ असं राजीनाम्याच्या पत्रात तीन प्रतींत लिहितो. भावनेच्या भरात पानगढिया रघुराम राजन यांची अशीच बाहेरून झालेली नियुक्ती विसरलेले दिसतायत. राजकीय व्यवस्थेच्या बाहेरून आलेला एक कर्तबगार अधिकारी देशाचा पंतप्रधानही होता १० वर्षं. मोदी यांचा स्वभाव आणखी किती धाडसी आहे, हे लक्षात आल्यावर आणि ती धाडसं आपल्याला झेपणार नाहीत, हे समजल्यावर आपण बाहेर पडलो, असं त्यांनी लिहिलेलं नसलं तरी वाचू शकणाऱ्याला वाचता येतंच की!

.............................................................................................................................................

४. संयुक्त जनता दलातील नाराज नेते शरद यादव यांनी नवीन पक्षाच्या स्थापनेच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. नवीन पक्षस्थापनेचा विचार नाही असं यादव यांनी म्हटलं आहे. पण हा दावा करतानाच शरद यादव यांची राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्यानं भेट घेतल्यानं तर्कवितर्क लढवलं जात आहे. महाआघाडीला धोबीपछाड देऊन भाजपबरोबर एका रात्रीत हातमिळवणी करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या निर्णयावर त्यांच्याच पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार शरद यादव नाराज आहेत. पक्षाचे अकरा यादव व सात मुस्लिम आमदारांमधूनही विरोधाचे सूर बाहेर पडत असल्याची चर्चा होती. बिहारमध्ये घडलेला प्रकार हा दुर्दैवी असून त्यामुळे जनमताचा अनादर झाला. नितीशकुमार यांनी जो निर्णय घेतला त्याच्याशी मी सहमत नाही. हे खूपच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शरद यादव यांनी दिली होती.

शरद यादव यांचे लाख लाख आभार. त्यांनी आणखी एक पक्ष स्थापन केला असता तर त्याचं नावही कसला ना कसला जनता दल, असंच असलं असतं. जनता दल रियुनायटेड, जनता दल उरवळ, गल्ली जनता दल, जनता दल शरद (नको नको, वेगळाच समज व्हायचा), जनता दल यादव (अर्र, हेही तेवढंच गैरसमजकारक) किंवा जनता दल चिंधी क्र. ११७ वगैरे... इतकी जनता दलं लोकांच्या लक्षात कधी राहणार आणि लोक तुम्हाला मतं कशी देणार?

.............................................................................................................................................

५. संविधान बचाव युवा परिषदेच्या वतीनं सात ऑगस्ट रोजी विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याचं भाषण आयोजित करण्यासाठी औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहात कार्यक्रम करायला दिलेली परवानगी महापालिकेनं अचानक रद्द केली. नाट्यगृह दुरुस्तीचं कारण त्यासाठी पुढे करण्यात आलं आहे. या कृतीच्या विरोधात गुरुवारी डाव्या संघटनांनी उपोषण करून निषेध नोंदवला. ‘वरून आदेश होते’ म्हणून परवानगी रद्द करण्यात आल्याचं महापालिका मालमत्ता विभागाच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांना सांगितल्यानं ते संतापले. या कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करून ५४ हजार २४० रुपयांचं भाडे शुल्क महापालिकेमध्ये जमा केलं होतं.

‘राजा भिकारी, माझी परवानगी मागे घेतली, ढुम ढुम ढुमाक्’ आणि ‘सोनू, तुझा स्वत:वर भरौसा नाय काय?’ अशी गाणी रचून सादर करायला हरकत नाही. ही मंडळी कोण कन्हैय्या, कसला कन्हैय्या, तो किती फुटकळ वगैरे बोलतात आणि त्याच्या बोलण्याला इतकी घाबरतात. स्पॉटनानाचा सत्कार आयोजित करा... एका क्षणात सगळ्या मराठवाड्यातली सगळी सभागृहं दुरुस्त आणि चकाचक होऊन जातील. शिवाय ही मंडळी शिळोप्याच्या गप्पांमध्ये आणीबाणीच्या दमनशाहीच्या गप्पाही मारतात.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......