नूरजहान - किस तरहा भूलेगा दिल...
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
जयंत राळेरासकर
  • ‘मल्लिका-ए-तरन्नुम’चं मुखपृष्ठ आणि नूरजहान
  • Fri , 04 August 2017
  • ग्रंथनामा Granthnama वाचणारा लिहितो मल्लिका-ए-तरन्नुम एजाज गुल नूरजहान

नूरजहान म्हटलं की, ‘मल्लिका-ए-तरन्नुम’ म्हणावंच लागतं. भारतात नूरजहानची कारकीर्द तशी फार मोठी नाही. सात-आठ चित्रपटांची लोकप्रियता फक्त असूनदेखील ती आज एक दंतकथा बनली आहे. मुळात गंमत अशी आहे की, अभिनेत्री म्हणून नूरजहान कशी होती, हे फारसं कुणी विचारात घेत नाही, मात्र गायिका म्हणून ती ‘सम्राज्ञी’ होती. माझ्या पिढीनं नूरजहानचे चित्रपट बघितले नाहीत. जे बघितले ते गाण्यातूनच किंवा क्वचित दूरदर्शनवर. पाकिस्तानात ती गेली ती १९४७ च्या सप्टेंबर महिन्यात. त्यानंतर नूरजहानबद्दल फक्त बातम्या येत राहिल्या... आणि पुढे पुढे तर त्यांचा ओघदेखील कमी होत गेला.

नूरजहान गेली त्याच सुमारास लता मंगेशकर नावाचा करिष्मा अवतरला. नंतर आम्हाला नूरजहानबद्दल बोलायला फुरसतदेखील मिळाली नाही. ‘नो मॅन्स लँड’वर झालेली दोघींची भेट आपण साजरी केली. त्या मंतरलेल्या क्षणात काय झालं असेल याचा अंदाज करत आम्ही त्याचा उत्सव केला. अर्थात ते सगळं एका भाबड्या प्रेमाखातर. एकदा नूरजहान भारत-भेटी साठीआली आणि मुंबईनं जल्लोष केला. दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत तिचा गौरव केला... आठवणी जागवल्या! वृत्तपत्रांनीदेखील रकाने भरवले... ती स्वत: गायलीदेखील. आलम मुंबईकर रसिक भरून पावले. ते साल होतं १९८२.

नूरजहान एक गायिका म्हणून किती लोकप्रिय होती, हे त्या घटनेतून कळलं. नूरजहानच्या गाण्याबद्दल, तिच्या आवाजाबद्दल कुणाला कसली शंका नव्हती. पण ती पाकिस्तानात गेल्यामुळे एक दडपण मात्र नक्की होतं. कदाचित त्यामुळेच असेल, तिच्याबद्दल इतर काही विचार करायला फारसा अवधी नव्हता आणि फारसं हातातदेखील लागत नव्हतं.

नूरजहान भारतात असती तर काही वेगळं झालं असतं का, याला आज काही अर्थ नाही, पण तिच्या महत्त्वाकांक्षी, बेदरकार आयुष्याच्या पार्श्वभूमीवर गायिका-अभिनेत्री  म्हणून तिचं अस्तित्व तपासून पाहताना आपण दिग्मूढ होऊन जातो हे मात्र खरं. अगदी नेमकंपणानं विचार केला तर नूरजहानबद्दल फारसं प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण पुस्तकही आलं नाही. त्याला एकमेव अपवाद म्हणजे एजाज गुल लिखित ‘मालिका-ए-तरन्नुम – नूरजहान’. सविता दामले यांनी त्याचा मराठी अनुवाद (मैत्रेय प्रकाशन, मुंबई) केला आहे. कदाचित काही लेख आलेही असतील, पण एरवी नूरजहान हे एक गूढच राहिलं अगदी अखेरपर्यंत.

आवाजाची देणगी आपल्याजवळ आहे हे नूरजहानने खूप लहानपणी ओळखलं होतं. नूर हे आई-वडिलांचं बारावं अपत्य. ‘अल्लावसाय’ असं तिचं नाव होतं आणि जन्म होता २१ सप्टेंबर १९२६ चा... मुक्काम पोस्ट मुराद्खन, इलाका – कसूर. फातेहबी आणि मददआली यांचं कुटुंब हे कंजर समाजाचं. गाणी, बजावणी, मेळ्यातून नाचणं हा त्यांचा व्यवसाय होता. जमीनदार मंडळी त्यांच्या घरातील बारशी, लग्न किंवा तत्सम प्रसंगी बोलावत आणि ही मंडळी जात असत. शिवाय गावातील जत्रा आणि प्रत्यक्ष थिएटरमध्ये देखील कार्यक्रम ठरवले जात. या सगळ्यातून कशी-बशी गुजराण होत असे. मुलीला गाणं येणं-न येणं हा विचारदेखील नव्हता, तिला गावंच लागे. पर्यायदेखील नव्हता, कारण खाणारी तोंडं खूप होती. अल्लावसाय पुढेदेखील दुसरा मार्ग नव्हता. संगीत शिक्षण व्हावं या हेतूनं शिक्षक नेमले गेले आणि तिनं गाणं सुरू केलं!

याच काळात सिनेमाचा व्यवसाय नव्याने आलेला होता. कसूर सोडून हे कुटुंब लाहोरला आलं, ते कदाचित याच आशेनं. केवळ चल-चित्रं दाखवणाऱ्या सिनेमात नूरजहानने वयाच्या पाचव्या वर्षी उमेदवारी केली. नूरजहानचा पहिला गाजलेला चित्रपट १९३६ साली आला. नाव होतं- ‘मिसर का सितारा’. अर्थात बाल-कलाकार म्हणून उमेदवारी करताना आता तिला मार्ग नक्कीच सापडला होता. ‘गुलेबकावली’ (१९३९), ‘यमला जट’ (१९४०) आणि ‘खानदान’ (१९४१) या चित्रपटांतून नूरजहान या गायिका-अभिनेत्रीचा उदय झाला. वास्तविक आता तशी ती किशोर वयाच्या जरा बाहेरच होती. काहीही असलं तरी एक नक्की की, इथून पुढे नूरजहानने आपल्या कारकीर्दीचा गंभीर विचार केला. तिच्या महत्त्वाकांक्षी स्वभावाची बीजंदेखील याच काळात रोवली गेली. ‘खानदान’मध्ये तिचा नायक होता प्राण. पण हिंदी फिल्मवाल्यांच्या भाषेत तिचा खरा ‘हिट’ अजून यायचा होता. १९४२मध्ये तो आला. आणि एका वादळी आयुष्याची नांदी सुरू झाली!

शौकत हुसेन रिझवी ‘खानदान’पासून तिच्याकडे आकर्षित झालेला होता. ‘खजांची’च्या निमित्तानं ते पुन्हा एकत्र आले. शौकत स्वत: ‘खजांची’चा संकलक होता, निर्माता होता आणि साहजिक त्यानं क्रेडिट घेतलं. पण दिग्दर्शक दलसुख पांचोली हे शिस्तीचे तर होतेच, शिवाय व्यावसायिक निष्ठा असणारे होते. त्यांचं नूरजहानकडे बारीक लक्ष होतं. ही मुलगी शौकतकडे आकर्षित होते आहे आणि शौकतदेखील तिच्यावर फिदा आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. पुढे चित्रपटाच्या दृष्टीनं हे धोकादायक ठरू शकेल असं त्यांना वाटत होतं. पांचोली यांची करडी नजर आणि शौकत- नूर यांचं वय यांचं गणित काही जमेना. तशी नूरजहानने परिस्थिती चलाखीने हाताळली, पण पांचोली यांनी तिला घराचा रस्ता दाखवला! शौकत मुंबईला गेला आणि पायाला भिंगरी असणारी नूरजहान पुन्हा नाच-गाण्यात स्टेजवर गेली... ही अनिश्चितता नूरजहानने कायम अनुभवली.

नूरजहानचं हे आणखी एक स्थलांतर होतं. आणि यावेळेस त्याचं कारण होतं दिग्दर्शक बी.एम.व्यास आणि मिर्झा अश्रफ नावाचा एक नट. पैशाची जबरदस्त निकड होती आणि त्यामुळे नूरजहानने व्यास यांच्या  ‘दुहाई’मधील भूमिका स्वीकारली. पण गंमत अशी होती की, ही भूमिका अश्रफ सोबत असणारी एक दुय्यम भूमिका होती. नूरजहानचा प्रवेश हा काही हेतूनं होता का हे समजायला काही मार्ग नाही. पण योग असा होता की, बी.एम.व्यास यांच्या पुढच्या चित्रपटात नूरजहानची भूमिका होती आणि त्याचं दिग्दर्शन केलं, शौकत रिझवी यांनी! आता ही सरळ-सरळ एक संधी होती आणि ती अर्थातच नूरजहानने घेतली!  नूर तेवढी चलाख नक्कीच होती!

शौकत हुसेन नूरजहानकडे आकृष्ट झाला होता यात प्रश्नच नाही. परंतु हे करताना शौकतला नूरजहानच्या स्वभावाची आणि मनोव्यापाराची पूर्ण जाणीव होती. पुरुषांना आकर्षित करून घेणारा मंत्र तिच्याकडे आहे असं शौकत म्हणायाचा. पण शौकत आता ‘नूरजहान’ला सोडायला तयार नव्हता. त्याने सरळ-सरळ नूरजहानचा ताबा घेतला. शौकतचा मित्र-परिवार मोठा होता, त्यात सआदत हसन मंटोदेखील होता. मंटो, शौकत, नूरजहान आणि नूरजहानचा एक भाऊ असे सगळे त्यावेळी जद्दनबाईच्या आलिशान बंगल्यात जमत असत. गप्पा, गाणी, आणि खाणं-पिणं असा सगळा फक्त ऐय्याशीचा मामला होता. नूरजहानला तर ही एक नवी वाट सापडली होती. कुणाचीही पर्वा न करता तिनं अखेर शौकत हुसेनशी निकाह केला. ते साल होतं १९४२.

आत्तापर्यंत आलेले चित्रपट साधारण होते आणि तिला गाणीही फारशी मिळाली नव्हती. मात्र एक नक्की की, चित्रपटातला तिचा प्रवेश मात्र नक्की झाला होता. १९४२ च्या ‘खानदान’मध्ये गुलाम हैदर यांनी नूरजहानला आठ गाणी दिली. ‘तू कौनसी बदलीमे मेरे चांद है आजा’ हे सुरुवातीच्या काळातील लोकप्रिय गाणं आजदेखील आठवलं जातं.

१९४३ साली ‘नादान’ हा जिया सरहदी यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट. त्याची गाणी होती संगीतकार के.दत्ता यांची. मात्र ‘नादान’ आणि ‘नौकर’ची गाणी मिळत नाहीत. १९४४ साली संगीतकार सज्जाद हुसेन यांचा ‘दोस्त’ आला. दिग्दर्शक होता शौकत हुसेन आणि त्याचा नायक होता मोतीलाल. ‘बदनाम मुहब्बत कौन करे’ हे गाणं अजूनसुद्धा ऐकलं जातं. ‘बदनाम’ या शब्दावर नूरजहानने घेतलेली हरकत रसिक श्रोते कधीच विसरणार नाहीत. त्यानंतर आलेला ‘लाल हवेली’चा नायक होता गायक अभिनेता सुरेंद्र. पण तसं पाहिलं तर १९४४ साल होतं नौशाद यांच्या ‘रतन’चं.  त्याच्या गाण्यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला होता आणि आमीरबाई-जोहराबाई यांच्या आवाजानं हिंदुस्तानचा अवकाश भरून गेला होता! या सगळ्या धीम्या प्रवासात १९४५ साली नूरजहानचा ‘बडी मा’ प्रदर्शित झाला. ‘आ इंतजार है तेरा’, ‘दिया जलाकर आप बुझाया’, ‘तुम हमको भुला बैठे’, ‘किसी तरह मुहब्बतमे चैन पा न सके’ ही त्यातील गाणी गाजली. खऱ्या अर्थानं ती नूरजहानची गाणी होती! मास्टर विनायक यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात लता मंगेशकर यांचीही भूमिका होती आणि त्यांना दोन गाणीही होती! लताजी त्यावेळी बाल-कलाकारच होत्या!  श्यामसुंदर यांचे संगीत असलेला ‘गांव की गोरी’ हा नूरजहानचा आवाज असलेला दुसरा चित्रपट. ‘किस तऱह भूलेगा ये दिल’ आणि ‘बैठी हुँ तेरी याद का लेकर जो सहारा’ ही त्यातील गाणी गाजली.

नूरजहानच्या गाजलेल्या गाण्यांची संख्या कमी असली तरी ही गाणी आजदेखील विस्मृतीत गेलेली नाहीत. नूरजहानच्या आवाजातील खनक, उच्चारातील लडिवाळ भाव किंवा कैफ बेजोड असा आहे. खरं तर होता असं म्हणायला हवं, कारण एवढंच करून ती १९४७ सालानंतर झालेल्या उलाथापालथीत पाकिस्तानात गेली... ती परत न येण्यासाठीच!

ज्याला अविस्मरणीय म्हणता येईल असे नूरजहानचे चित्रपट १९४५ नंतरचे- ‘अनमोल घडी’ आणि ‘जुगनू’. ते अनुक्रमे १९४६ आणि १९४७ मध्ये प्रदर्शित झाले. ‘अनमोल घडी’ मध्ये चार सोलो गाणी आणि एक युगलगीत होतं. नूरजहानचा नायक सुरेंद्र हाही गायक नटच होता. ‘आ जा मेरी बरबाद मुहब्बत के सहारे’, ‘मेरे बचपन के साथी मुझे भूल ना जाना’, ‘जवां है मुहब्बत हंसी है जमाना’, आणि ‘क्या मिल गया भगवान’ नूरजहानची ही सर्व सोलो गाणी गाजली. आणि यात काही कमी पडतं म्हणून की काय ‘आवाज दे कहां है, दुनिया मेरी जवां है’ हे युगलगीत. अर्थातच सुरेंद्रबरोबरचं. ‘अनमोल घडी’चं संगीत होतं नौशाद यांचं. ही सर्व गाणी आजदेखील सदाबहार आहेत.

आणखी एक विशेष म्हणजे ‘अनमोल घडी’मध्ये नूरजहान बरोबर सुर्रेयाही होती, मात्र बाजी मारली होती नूरजहानने. यानंतर तिचे ‘दिल’ (संगीत- जाफर कुरेशी ) आणि ‘हमजोली’ (संगीत-हाफीजखान) हे दोन चित्रपट आले, पण त्यांचा काही प्रभाव पडला नाही. मात्र नूरजहानच्या संदर्भात या चित्रपटांचा उल्लेखही अगदी अपवादात्मक होतो.

अखेर आला ‘जुगनू’. याचं संगीत होतं फिरोज निजामीचं. साल १९४७! देशात सर्वत्र स्वातंत्र्याचं वारं वाहत होतं. हिंदुस्तान-पाकिस्तान दोन देश होणार हे स्पष्ट दिसत होतं. सगळीकडे एक अस्थिरता निर्माण झाली होती. नूरजहान म्हणायची की, ‘मी जिथं जन्मले तिथं जाणार’. अर्थात तसं अनेकांना वाटत होतं आणि नूर त्याला अपवाद नव्हती. ‘जुगनू’मध्ये तिचा नायक होता दिलीपकुमार. त्याची अवस्था काही वेगळी नव्हती, मात्र तो पाकिस्तानात गेला नाही. नूरजहानला अनेकानी पाकिस्तानात न जाण्याचा सल्ला दिला, पण तिनं तो मानला नाही. ते काही असो या सगळ्या अस्थिरतेमुळे ‘जुगनू’चं स्वागत कसं झालं याची कल्पनाच केलेली बरी.

एजाज गुल यांच्या ‘मलिका-ए-तरन्नुम - नूरजहान’च्या मलपृष्ठावरील मान्यवरांचे काही अभिप्राय

नूरजहान गेली पण ‘उमंगे दिल की मचली’, ‘हमे तो शाम-ए-गममें काटनी है जिंदगी अपनी’ आणि महम्मद रफी सोबतचं ‘यहां बदला वफा का बेवफाई के सिवा क्या है’ ही गाणी भारतीय रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. ‘जुगनू’चा दिग्दर्शक शौकत हुसेनच होता. तो तर तिच्या आधी पाकिस्तानात गेला होता. तिथल्या स्वातंत्र्यदिनाचं त्याला चित्रण करायचं होतं. शौकत १ ऑगस्टला गेला आणि नूरजहान सप्टेंबरला.

‘जुगनू’ नूरजहानचा गाजलेला चित्रपट असला तरी त्याच वर्षी (१९४७) प्रदर्शित झालेला ‘मिर्झा सहबान’ हा तिचा अखेरचा चित्रपट. यातील ‘हाथ सिने पे जो रख दे तो करार आ जाये...’ हे जी.एम.दुर्रानी सोबतचं युगलगीत आणि ‘आजा तुझे अफसाना जुदाई का सुनाये’ हे नूरजहानचं सोलो गाजलं. याच चित्रपटासोबत नूरजहानचा भारतातील बसेरा संपला. देशभर अस्थिरता होती, अशा परिस्थितीत नूरजहाननं पाकिस्तानात जायचा निर्णय घेतला होता. तशी १९३५-३६ पासून ती पडद्यावर दिसत असली तरी तिची खरी कारकीर्द होती ती १९४२ ते १९४७. आणि याच गाण्यांसाठी आजही तिला ‘मल्लिका-ए-तरन्नुम’ म्हटलं जातं.

१९५२ साली नूरजहान पाकिस्तानात स्थिरावल्यानंतर सआदत हसन मंटोनं नूरजहानवर एक प्रदीर्घ लेख लिहिला होता- ‘नूरजहान- सरूर-ए-जहान’  मंटो एक प्रच्छन्न स्वभावाचा बिनधास्त पत्रकार आणि मनस्वी लेखक होता. त्याच्या म्हणण्यानुसार नूरजहान अभिनेत्री असण्यापेक्षा गायिका जास्त होती. नूरजहान भडक डोक्याची आणि स्वत:च्या रूपाचा गर्व असणारी होती, असं वर्णन मंटोनं केलं आहे. ही त्यानं नूरजहानला दिलेली अखेरची भेट असावी...मंटो होताच तसा!

लाहोरला गेल्यानंतर नूरजहानची मनोअवस्था कशी होती याबद्दल आपण काही बोलू शकणार नाही, पण पाकिस्तानातील चित्रपट उद्योगाची स्थिती काही चांगली नव्हती. एक तर फाळणीच्या गोंधळात अनेक स्टुडियो जमीनदोस्त झाले होते आणि नव्याने सगळे उभे करणं फारसं सोपं नव्हतं. शौकत हुसेनने काही प्रयत्न केले. शोरीचा स्टुडियो विकत घेऊन काही व्यवस्था लावली होती. मुख्य म्हणजे त्यानं एचएमव्हीशी करार केला. पाच वर्षे उलटून गेली होती. चित्रपट निर्मितीची थंड प्रक्रिया, उमेद हरवलेले कलाकार, यांसारख्या अनेक गोष्टींमुळे सगळंच ठप्प झालं होतं. शौकतच्या सगळ्याच प्रयत्नांना यश येत नव्हते. आता त्याचे आणि नूरजहानचे खटके उडू लागले. मुळातल्या ऐय्याश वृत्तीच्या नूरजहानला नवी वाट शोधणं भाग होतं. अनेकांनी तिला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला, पण तिनं तो मानला नाही. क्षुल्लक वाद वाढत राहिले आणि त्याची अखेर झाली ती घटस्फोटात. नूरजहानने एजाज दुर्रानीशी दुसरं लग्न केलं, पण तेही टिकलं नाही. या दोन विवाहातून नूरजहानला सहा मुलं झाली.

या दुसऱ्या विवाहानंतर शौकत हुसेनने खूप विस्तारानं नूरजहान आणि तिचा स्वभाव याबद्दल लिहिलं आहे. एका श्रेष्ठ कलाकाराला त्याचा स्वभाव हा कसा मारक ठरतो आणि उलटं पडत गेलेलं दान त्याला कुठं पोहचवतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे नूरजहान असं काहीसं त्यानं लिहिलं. अर्थात हे सगळे नंतरचं शहाणपण. मोठ्या राजकीय नेत्यांशी संधान बांधून आपली पोळी कशी भाजून घेता येईल, यातच तिला आता रस अधिक होता. पण हे सगळं नंतरचं. त्या आधी पाकिस्तानमध्ये चित्रपट आणि संगीत क्षेत्रात ती कशी होती हे बघणंही भाग आहे.

पाकिस्तानात नूरजहानचा चित्रपट अभिनेत्री म्हणून काळ साधारणपणे १३-१४ वर्षाचा होता. खुर्शीद अन्वर, रशीद अत्रे, चिश्ती यासारखे काही दिग्गज तिच्या मागे असूनही तिच्या चित्रपट गीतांनी फारशी उंची गाठलेली दिसत नाही. याचमुळे तिनं अभिनय सोडला आणि गाण्यांवर लक्ष केंद्रित केलं. पाकिस्तान टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपण कौटुंबिक समस्यांमुळे तो निर्णय घेतला असं म्हटलं आहे. एजाज या तिच्या दुसऱ्या पतीच्या विनंतीवरून आपण हा निर्णय घेतल्याचं नूरजहानने सांगितलं.

मात्र हे इतकंच पुरे असं म्हणेल ती नूरजहान कसली! केवळ पार्श्वगायन करून किंवा स्टेज-शो करून हवं ते ग्लॅमर आणि लोकप्रियता तिला मिळेना. तिच्या आवाजाला योग्य नायिका मिळेनात. नूरजहान त्यामुळे नाराज होत गेली. नकळत ती राजकारण करू लागली. प्रसिद्धीसाठी काहीही करण्याच्या तिच्या स्वभावानं उचल खाल्ली. नवोदित कलाकारांची कोंडी करण्याचे तिचे मनसुबे आकार घेऊ लागले. रुना लैलासारखी गायिका त्याचं एक ठळक उदाहरण. पण नूरजहानला कुठेच फारसं यश आलं नाही. तिचे दिवस संपले होते हेच खरं. (रुना लैला पाकिस्तान सोडून बांगलादेशात गेली.) नूरजहानला पुरून उरली ती मलिका पुखराज ही गायिका. मल्लिका पुखराजने नूरजहानला तिची जागा दाखवून दिली होती. काळासोबत दोन हात करणं नूरजहानला जड गेलं.

१९६६ साली ‘प्राईड ऑफ परफॉर्मन्स’ हा किताब तिला मिळाला. झिया मुनाहेर यांनी २००४ मध्ये पाकिस्तानातील ‘डॉन’ या वृत्तपत्रात नूरजहानविषयी लिहिलं आहे – ‘अध्यक्ष, पंतप्रधान, लष्कर-प्रमुख आणि राजकारणी अनेक आले... अनेक संसदा आणि राजवटी आल्या आणि गेल्या... पण नूरजहान मात्र इथंच राहण्यासाठी परिस्थितीशी कायम झगडली... त्यांच्या नुसत्या भुवया जरी उंचावल्या तरी विरोधक गारद व्हायचे.... मंत्रमुग्ध करणारी गाणी त्या म्हणताच राहिल्या...पेस-मेकर बसवल्यानंतरही...”

मलिका-ए-तरन्नुम नूरजहान - एजाज गुल, अनुवाद -सविता दामले

मैत्रेय प्रकाशन, मुंबई, पाने – १५२, मूल्य – १७५ रुपये

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3931

.............................................................................................................................................

नूरजहान भारतातच राहिली असती तर?

अखेरची तीन वर्षं ती अंधारात फेकली गेली होती. पेसमेकरमुळे मर्यादा आल्या होत्या. आयुष्य सगळं स्पर्धेत आणि अहंगंड जोपासण्यात गेलं आणि तरीही एक सल मनात होताच. के.दत्ता, सज्जाद, गुलाम हैदर यांच्या आठवणी तिला येत असतील का? लता मंगेशकर आणि नूरजहान वाघा बोर्डरवर ‘नो मॅन्स लँड’वर भेटल्या, त्यावेळी दोघी गुलाम हैदरबद्दल बोलल्या असं म्हणतात. पंचवीस माणसांना पुरेल इतकी बिर्याणी नूरजहानने आणली होती. आशा भोसलेही त्यावेळी होत्या. दिलीपकुमार, ए.आर. कारदार, मेहबूबखान यांचं न ऐकता आपण इथं आलो... हे सगळं त्या अखेरच्या दिवसांत तिच्या मनात आलं असेल का..? नूरजहानच्या या सगळ्या दुर्विलासाची बातमी कळल्यावर शौकत हुसेन रिझवी म्हणाला होता- ‘आपल्या दुर्गुणांची आणि पापाची सजा ती भोगते आहे...” पण काहीही असलं तरी आम्ही नूरजहानच्या त्या पाच वर्षांतील गाण्यावर फिदा होतो आणि आहोत.

कसूर गावातील घाणेरड्या वस्तीपासून सुरू झालेला हा प्रवास अखेर कराची जवळील गिझरी स्मशानातील कबरीत विसावला आहे. नीरव शांतता हेच फक्त आज तेथील गाणं आहे!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......