अजूनकाही
आताच्या काळात, राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी पक्षानं चांगलं काम करण्याबरोबरच चांगलं मार्केटिंगही करणं गरजेचं असतं. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपनं नेमकं तेच केलं. आता इथं चांगल्या कामाबद्दल नाही, चांगल्या मार्केटिंगबद्दलचा मुद्दा आहे. 'अब की बार मोदी सरकार' अशी दमदार टॅगलाईन घेऊन भाजपनं नरेंद्र मोदी यांना समोर ठेवत निवडणूक लढवली. या टॅगलाईननं अशी काही किमया केली की, भाजपला अभूतपूर्व यश मिळालं. (त्यात काँग्रेसच्या १० वर्षांतील नाकर्तेपणाचाहा वाटा मोठा होता!) भाजपच्या यशाची चर्चा आत्ता करण्याचं कारण म्हणजे मराठीत अनुवाद झालेलं 'पांडेपुराण' हे पुस्तक. पीयुष पांडे 'अब की बार मोदी सरकार' या टॅगलाईनचे जनक. त्यांचं 'पांडेमोनियम' हे पुस्तक या नावानं आधी इंग्रजीत प्रकाशित झालं. भारतीय जाहिरातविश्वाचा अनभिषिक्त सम्राट असं बिरूद मिळालेल्या पीयुष पांडे यांचं काहीसं आत्मचरित्रासारखं किंवा जाहिरातींच्या निर्मिती प्रक्रियेचा वेध घेत आजवरचा प्रवास उलगडणारं असं हे पुस्तक आहे. प्रसाद नामजोशी यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे आणि मनोविकास प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
राजस्थानमध्ये वाढलेल्या पीयुष पांडे यांचा जाहिरात क्षेत्रातला प्रवास अचंबित करणारा आहे. जाहिरातीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना हा माणूस आज 'ऑगिल्व्ही अँड मेदर' या विश्वविख्यात अॅड एजन्सीच्या साऊथ एशिया विभागाचा क्रिएटिव्ह हेड आहे. पीयुष पांडे यांना क्रिकेटची प्रचंड आवड. इतकी की, त्यांनी राजस्थानकडून रणजी सामनेही खेळले होते. भारतीय संघात खेळलेले अरुण लाल त्यावेळी त्यांचे सहकारी होते. जाहिरात क्षेत्रात येण्यापूर्वी पीयुष पांडे यांनी टी टेस्टर म्हणूनही काम केलं होतं. मात्र, कायमच क्रिएटिव्ह विचार करणारा हा माणूस अपघातानं जाहिरात क्षेत्रात आला आणि त्यानं नंतर इतिहास घडवला!
'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणं २१व्या शतकात जन्माला आलेली पिढी सोडून आधीच्या जवळपास प्रत्येकाला माहीत आहे. दूरदर्शनचा तो काळ होता... किंवा 'पूरब से सूर्य उगा' हे सर्वशिक्षा अभियानाचं गीतही मनाच्या कप्प्यात नक्कीच घर करून असेल. या दोन्ही गाण्यांचे गीतकार पीयुष पांडे आहेत... या अफाट लोकप्रिय गाण्यांची रंजक जन्मकथा वाचायची असेल, तर 'पांडेपुराण' वाचायलाच हवं!
पीयुष पांडे यांनी भारतीय जाहिरात क्षेत्रात काय नाही केलं! उत्पादनाला ग्राहकांपर्यंत पोहोचवणं हे जाहिरातीचं मुख्य काम. मात्र, पीयुष पांडे यांनी जाहिरातीतून ग्राहकांना भावनिक साद घातली, जाहिरातींमध्ये हलकाफुलका विनोद आणला. रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी वेचून त्याला उत्पादनाशी जोडलं आणि त्याचा प्रभाव पाडला. जाहिरातीला स्टोरीटेलिंगचं एक महत्त्वाचं माध्यम केलं. उदाहरणार्थ, कॅटबरीच्या जाहिराती… ‘कुछ मीठा हो जाए!’ कॅटबरी या चॉकलेटनं आज भारतीय संस्कृतीत मिठाईची जागा मिळवली ती याच भावनिक जाहिरातींच्या जोरावर. भावा-बहिणीचं, आई-मुलाचं, नवरा-बायकोचं, प्रियकर प्रेयसीचं नातं घेऊन केलेल्या कॅटबरीच्या अनेक जाहिराती आयकॉनिक म्हणाव्या अशाच आहेत. जाहिरांतींमध्ये क्रिकेट आणण्याचं श्रेयही त्यांचंच... किंवा फेव्हिकॉलचं न फुटणारं अंडं, फेव्हिक्विक लावल्यानं काठीला मासे चिकटणं, एमसील न लावल्याने मृत्युपत्रावर पाण्याचा ठिपका पडून एक अंक पुसला जाणं... अशा कित्येक आयकॉनिक जाहिराती!
पीयूष पांडे लिखित ‘पांडेपुराण’च्या मलपृष्ठावरील मान्यवरांचे काही अभिप्राय
प्रेक्षक म्हणून आपल्याला जाहिरातींच्या मागे काय घडतं याची कल्पनाच नसते. एक चमकदार कल्पना सुचण्यासाठी काय काय करावं लागतं किंवा आपल्या रोजच्या जगण्यातही किती चमकदार कल्पना असू शकतात याचा वस्तुपाठ म्हणजे 'पांडेमोनियम' आहे. पीयुष पांडे यांनी जाहिरातींमध्ये भारतीय संस्कृतीला इतकं बेमालूमपणे मिसळलं की, परदेशी उत्पादनंही भारतीय होऊन गेली. महत्त्वाचं म्हणजे, कुठलीही जाहिरात सर्वसामान्य प्रेक्षकालाही कळेल इतकी थेट आणि मार्मिक. जाहिरात जाहिरात वाटणार नाही इतकं साधीसोपी कॉपीरायटिंग. बरं, ते करतानाही कुठलाही अभिनिवेष नाही.
'अब की बार मोदी सरकार' या जाहिरातीनं काय कल्लोळ केला हे आपण सर्व जाणतोच. मात्र या जाहिराती कशा घडल्या, त्या मागे काय विचार होता हे सर्व तपशीलवार या पुस्तकात वाचायला मिळतं. आज आयपीएल हा क्रिकेटमधला ब्रँड आहे. मात्र, आयपीएल सुरू होण्यापूर्वी काही वर्षं आधीच अशा प्रकारच्या क्रिकेट स्पर्धेची कल्पना सुचवली होती. काही वर्षांनी ही कल्पना प्रत्यक्षातही आली. त्याच्या निर्मिती प्रक्रियेत पीयुष पांडे यांचाही सहभाग होता हे विशेष.
अजून एक वेगळा मुद्दा म्हणजे, पांडे यांनी जाहिरातीच्या ग्लॅमरस व्यवसायात असूनही त्यांनी सामाजिक भान जपलं. त्यांच्या पल्स पोलिओ, भारतीय पोस्टाच्या जाहिराती महत्त्वाच्या आहेत. अशा जाहिरातील करताना बजेटचा विचार न करता समाजासाठी चांगला विचार त्यांनी जाहिरातींतून दिला. त्यामुळे व्यवसायाच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार त्यांच्या कामातून दिसतो. अजून एक म्हणजे, एवढी वर्षं व्यवसायात असूनही त्यांचा दृष्टीकोन 'सिनिकल' झाल्याचं दिसत नाही, तत्त्वज्ञानाचे डोस नाहीत, किंवा आता बघा मी तुम्हाला काय सांगतोय ते… असाही आविर्भाव नाही. आहे ते फक्त एखादी गोष्ट सांगितल्यासारखं साधेपणानं केलेलं अनुभवाचं शेअरिंग...
आता थोडं पुस्तकाच्या अनुवादाविषयी... पुस्तकाचा अनुवाद प्रसाद नामजोशी यांनी चांगलाच केला आहे. मात्र, जाहिरात या शब्दाव्यतिरिक्त अॅड एजन्सी, ब्रँड अॅम्बेसिडर अशा रूढ इंग्रजी शब्दांचा मनोविकास प्रकाशननं पुस्तकाचा दर्जाही चांगला राखला आहे.
पांडेपुराण - पीयूष पांडे, अनुवाद - प्रसाद नामजोशी
मनोविकास प्रकाशन, पुणे, पाने – २५४, मूल्य – ३२० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3933
.............................................................................................................................................
भारतीय जाहिरात क्षेत्राशी संबंधित फारच थोडी पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. अॅलेक पदमसी यांचं ‘डबल लाईफ’ हे त्यापैकी एक. ‘पांडेमोनियम’ हे पुस्तक जाहिरातींच्या निर्मितींची कथा सांगतानाच आपल्याला जागतिकीकरणानंतर बदललेली बाजारपेठ, ग्राहकांची आवडनिवड याविषयीही एक दृष्टी देतं. 'पांडेमोनियम' म्हणजे गोंधळ किंवा केयॉस असा एक अर्थ आहे. मात्र, जाहिरातींच्या गोंधळात पीयुष पांडेच्या जाहिराती अस्सल आहेत. जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी 'पांडेपुराण' म्हणजे 'गुरुचरित्र' आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार आहे. विशेषत: लेखकांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक असं हे पुस्तक आहे. बाकी वाचकांसाठी दोनच शब्दांत सांगायचं, तर 'मस्ट रिड'!
लेखक मुक्त पत्रकार आहेत.
chinmay.reporter@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment