टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • आचार्य बालकृष्ण, शिक्षक पात्रता परीक्षा, धनंजय मुंढे, गिरीश बापट आणि राहुल गांधी
  • Thu , 03 August 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या आचार्य बालकृष्ण Acharya Balkrishna शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET Exam धनंजय मुंढे Dhananjay Munde गिरीश बापट Girish Bapat राहुल गांधी Rahul Gandhi हिंडोली Hindoli

१. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) मराठीच्या प्रश्नपत्रिकेत शुद्धलेखनाच्या विक्रमी २३० चुका झाल्याचं विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही, आता परीक्षा झालेली आहे, आम्ही काहीच करू शकत नाही, असे बेजबाबदार उत्तर हेल्पलाईनकडून मिळाले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे राज्यातील १ हजार ३६२ केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या ‘टीईटी’च्या मराठीच्या १५० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत शुध्दलेखनाच्या २३० चुका आढळल्या. यामध्ये बालकवींचे नाव त्र्यंबक बापूजी ठोबरे असे छापले आहे. ‘जेव्हा मी जात चोरली’ या कथासंग्रहाचे नाव ‘जेव्हा मी जात चोरली होती’, असे छापले आहे, ‘कैऱ्या’ ऐवजी ‘कैन्या’, ‘त्याला’ ऐवजी ‘ल्याला’, ‘पुढील’ ऐवजी ‘पुदील’, ‘उताऱ्या’ ऐवजी ‘उताण्या’, ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ यांचे नाव ‘तखर्डकर’ असे छापले आहे. प्रश्नपत्रिका दोनमध्येही चुका आहेत.

पात्र शिक्षक बनायला आलेल्या विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतल्या चुकांचा इतका बाऊ कशाला करायला हवा? अशी प्रश्नपत्रिका काढून परिषदेने त्यांच्या व्याकरणज्ञानाची ‘परीक्षा’च घेतलेली नाही का? उलट परीक्षेची ही झटपट पद्धत क्रांतिकारक आहे. प्रश्नपत्रिकाच चुकीची काढायची. जो जेवढ्या चुका काढेल तेवढे मार्क. परीक्षेची वेळ संपायच्या आधीच निकाल जाहीर करता येईल. ऑनलाइन-ऑफलाइनची झंझटही वाचेल. शिवाय परीक्षा केंद्रावर घातलेल्या गोंधळाच्या प्रमाणात काही वाढीव गुण देता येतील.

.............................................................................................................................................

२. हजारो परदेशी कंपन्या भारतावर आक्रमण करून आपल्याला गुलाम बनवत आहेत. महिलांना साबण विकायला लावून आपली परंपरा, संस्कृती, मूल्य उद्ध्वस्त करत आहे. पूर्वी एकच ईस्ट इंडिया कंपनी होती. आता हजारो कंपन्या लुबाडत असून हे थांबवण्याची वेळ आली आहे. स्वदेशी हाच राष्ट्रवाद आहे,' अशा शब्दांत स्वदेशीचा नारा देताना पतंजलीचे प्रमुख आचार्य बालकृष्ण यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात आपल्या कंपनीचे 'ब्रँडिंग' केले.

कुठे लोकमान्यांचा स्वदेशीचा नारा आणि कुठे बाळकृष्णाचा धंदेवाईक पुकारा! हे बाळकृष्ण आणि बाबा रामदेव यांच्या स्वदेशीचं स्तोम याच भावनिक मार्केटबाजीमुळे आता घराघरात पोहोचलेलं आहे. बाजारात ग्राहकाला लुबाडणारा मल्टिनॅशनल नको, स्वदेशी हवा, एवढाच काय तो यांच्या स्वदेशीचा अर्थ. आजच्या युगात असले चोचले सगळ्या देशांनी करायचे ठरवले, तर भारताची निर्यात बंद होईल, त्याचं काय? बाळकृष्ण अँड कंपनीने देशातल्या गोरगरिबांना आपल्या कंपनीचे समभाग दर्शनी मूल्याला वाटून टाकले आणि त्यांना आपल्या उत्कर्षात सहभागी करून घेतलं, तर त्यांच्या उद्योगामध्ये देशहित वगैरे शोधण्यात काही अर्थ. अन्यथा ते एक धंद्याचं टेक्निक आहे बस्स.

.............................................................................................................................................

३. विधान परिषदेतील बहुमताच्या जोरावर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदारांना बोलू देत नाही, असा आरोप करत बुधवारी भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधान परिषदेतून सभात्याग केला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर उत्तर देता येत नसल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना विधान परिषदेतून पळ काढावा लागला अशी बोचरी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. प्रकाश मेहता, राधेश्याम मोपलवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी धारेवर धरल्याने सरकारची कोंडी झाली. शेवटी दुपारनंतर सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेतून सभात्याग केला. ‘मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांना बोलू द्यायचे नाही असा लोकशाहीविरोधी पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. सभापती आणि उपसभापतींनीही यावर विचार करण्याची गरज आहे. पाशवी बहुमताच्या जोरावरील दादागिरी सहन करणार नाही’ अशा शब्दात गिरीश बापट यांनी विरोधकांना सुनावले. सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेतून सभात्याग करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गिरीश बापटांना ‘पाशवी बहुमता’ची उचकी लागलेली पाहून राज्यात अनेकांना हसण्याची उबळ आवरली नसेल. विरोधी पक्षात असताना राज्यसभेत आणि लोकसभेत आपल्या पक्षाची ज्येष्ठ मंडळी काय करत होती, याचा त्यांनी थोडा अभ्यास केला असता, तर असलं विधान त्यांच्या तोंडी आलं नसतं. त्यांच्या पक्षाने संसदेचं कामकाज बंद पाडण्याचा विक्रम केला होता. ही त्याची परतफेड समजा. पेराल, तेच उगवतं. तेव्हाचे मुंडेसाहेब मुलुखमैदान तोफ होते, आताचे धाकले मुंडे लोकशाहीचे मारेकरी ठरतायत, हा काळाचा केवढा उफराटा महिमा.

.............................................................................................................................................

४. राजस्थानच्या बुंदी तालुक्यातील हिंडोली या छोट्या शहरात ४० पक्की घरे आणि ३० चारचाकी वाहने आहेत. मात्र समृद्धी नांदत असलेल्या या गावातील लोकांना स्वच्छता आणि आरोग्याची काडीचीही चिंता नाही. त्यामुळेच गावात सगळ्या सोयीसुविधा असूनही शौचालये नाहीत. या गावातील एका घरापुढे तर १५ गाड्या उभ्या राहतात. मात्र या घरातील सर्व मंडळींना शौचासाठी बाहेरच जावे लागते. एका शौचालयाच्या उभारणासाठी २५ ते ३० हजारांचा खर्च येतो. सरकारकडून केवळ १५ हजारांचा मदत दिली जाते. त्यात हे अनुदान मिळायला प्रचंड उशीर होतो,’ अशी तक्रार धन्नानाथ योगी यांनी केली. या गावातील बाबुल योगी यांनी त्यांच्या कुटुंबासाठी नुकतीच एक एसयूव्ही गाडी खरेदी केली आहे. त्यांच्याकडे आधीच सहा गाड्या आहेत. मात्र अद्याप या घरात एकही शौचालय नाही. या कुटुंबात १० सदस्य असून हे सर्वजण उघड्यावर शौचास जातात.

‘टॉयलेट : एक शेमकथा’च आहे ही. भिकारडेपणा हा आर्थिक परिस्थितीवर अवलंबून नसतो, तर तो रक्तात असतो, हेच या लाजिरवाण्या बातमीतून सिद्ध होतं. १० गाड्या घेण्याची ऐपत असणाऱ्यांना शौचालय बांधण्यासाठी सरकारच्या अनुदानाची गरज भासते, कारण, ते बांधून आपण सरकारवरच उपकार करतोय, अशी त्यांची भावना असते. कुटुंबातल्या १० सदस्यांपैकी कोणालाही परसाकडे जायचं असेल, तर त्या सोयीसाठी १५ गाड्या ठेवाव्या लागत असतील बिचाऱ्यांना. आपला देश महान आहे, तो उगाच नव्हे.

.............................................................................................................................................

५. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेची ‘मन की बात’ न ऐकता स्वत:ची ‘मन की बात’ देशावर लादतात, अशा शब्दांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका केली. ‘मोदींना देशातील जनतेच्या ‘मन की बात’ ऐकायची नाही. मोदी केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चर्चा करून देश चालवत आहेत,’ असे ते म्हणाले.

आपल्या पक्षाच्या पंतप्रधानांच्या आदेशाच्या जाहीरपणे चिंध्या करणाऱ्या राहुल यांना मुळात पंतप्रधानपदावरच्या व्यक्तीला स्वत:च्या ‘मन की बात’ असू शकते, हे माहिती असण्याची शक्यता कमी आहे. मोदी हे अमित शाह सोडल्यास अन्य कुणाशीही चर्चा-सल्लामसलत करतात, हा तर शुद्ध खोडसाळ आरोपच झाला. ते संघपरिवाराशी चर्चा करत असले, तर त्यात गैर काय? डॉ. मनमोहन सिंहांना आज चहा प्यायचा की कॉफी, हे तरी ठरवता आलं असेल का गांधी-परिवाराशी चर्चा केल्याविना?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......