अजूनकाही
माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं त्यांच्या जन्मगावी रामेश्वरम (तमिळनाडू) इथं स्मारक उभारण्यात आलं. कालच्या २७ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उदघाटन केलं. जवळपास १५ कोटी रुपये खर्चून हे स्मारक साकारण्यात आलं. हे स्मारक भव्य करण्याचा प्रयत्न तर झालाच पण दिव्य व्हावं यासाठीही डोकंही लावण्यात आलं. स्मारकाचं उदघाटन झाल्यानंतर वीणाधारी कलाम, त्यांच्या पुढं ‘भगवतगीता’ असं चित्र दिसलं. फक्त ‘गीता’ का? ‘कुराण’ आणि ‘बायबल’ही ठेवा, अशी मागणी पुढे आली. मग ‘कुराण’, ‘बायबल’ ठेवलं गेलं. फक्त ‘गीता’ ठेवण्याच्या प्रकरणावर खुद्द कलामांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली होती. तमिळनाडूतील संघ परिवाराच्या संस्थांनी ‘‘कुराण’, ‘बायबल’ नको, फक्त ‘गीता’च ठेवा’ यासाठी आग्रह धरला होता. द्रविडी विचाराच्या संघटना मात्र वेगळाच आग्रह धरून या स्मारकावर नाराजी व्यक्त करत आहेत. यात द्रविड मुनेत्र कळघम या पक्षाच्या विविध गटांचा समावेश आहे. या गटात वाइको या तमिळ नेत्याचे अनुयायी आहेत.
या द्रविडी विचाराच्या गटाचं म्हणणं असं की, कलाम हे गीतेऐवजी प्रसिद्ध तमिळ लेखक तिरुवल्लुवर यांच्या वचनांना (कवितांना) महत्त्व देत. या कवितांना ‘तिरुवल्ली’ म्हणतात. मराठीत साने गुरुजी यांनी या वचनांचा अनुवाद ‘कुरल’ या नावानं केला आहे. साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात असताना डिसेंबर १९३० या दरम्यान हा अनुवाद केलाय. तिरुवल्लुवर यांच्या काव्यग्रंथाला तामिळी वेद असं संबोधलं जातं. इतकं तमिळ माणसांच्या जीवनशैलीत या ग्रंथाचं महत्त्व आहे. हा काव्यग्रंथ कलामांच्या जवळ गीतेऐवजी जास्त शोभला असता. ते औचित्याला धरून झालं असतं. तमिळी संस्कृतीचा तो ठेवा आहे, असं द्रविड संघटना म्हणत आहेत.
यामुळे थोर तमिळी पुरुष कलाम यांच्या हातात तिरुवल्लुवर यांचा ग्रंथ वीणेऐवजी द्यावा अशी मागणी द्रविडी संघटनांनी लावून धरलीय. ‘तिरुवल्लुवर’ यातील तिरु म्हणजे पूज्य आणि वल्लुर म्हणजे जातीने अस्पृश्य. वल्लूर ही एक अस्पृश्य जातही आहे. तिरुवल्लुर हे जातीने अस्पृश्य, धंद्याने कोष्टी होते. पण विचाराने थोर होते. ‘कुरल’मध्ये १३३० दुपायी वृत्ताले श्लोक किंवा काव्यपंक्ती आहेत. तिरुवल्लुवरांचा काळ इसवी सनाच्या पहिल्या शतकातला मानला जातो.
तिरुवल्लुवरांचा काव्यग्रंथ कलामांजवळ नाही आणि ‘गीता’, ‘कुराण’, ‘बायबल’ ठेवलंय. हातात वीणा दिलीय, यावर आक्षेप घेत द्रविडी संघटनांनी हे कलामांचं वैदिकीकरण करण्याचा डाव असल्याचं म्हटलंय. द्रविडी लोक, तमिळी लोक हे सांस्कृतिक आक्रमण खपवून घेणार नाहीत. आमचा विरोध जारी ठेवणार, अशी या संघटनांची भूमिका आहे.
द्रविड विरुद्ध वैदिकी असा वाद तमिळनाडूला नवा नाही. पेरियार रामास्वामी नायकर यांनी द्रविडी आंदोलन सुरू केलं, तेव्हापासून हा वाद अधूनमधून पेट घेत आला आहे. मात्र त्याची मुळं खूप जुनी आहेत. या वादाला वांशिक, भाषिक मुळं आहेत. तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडचा आणि कावेरी नदीच्या आसमंताचा भूप्रदेश म्हणजे तमिळनाडू. इथं मूळ द्राविडी संस्कृती होती. ती फार प्राचीन आहे. किती प्राचीन त्याविषयी फक्त अंदाज बांधले जातात. द्रविड लोक लष्करी पेशाचे. लढाईत त्यांना मजा वाटे. तमिळ भाषा संस्कृतपेक्षा प्राचीन आहे, असा द्रविडींचा दावा आहे. तमिळचा संस्कृतशी काहीही संबंध नाही. संस्कृतचा गंधही नसलेली भारतातील ती एकमेव भाषा मानली जाते. तमिळ भाषेचा शब्दसंग्रह स्वतंत्र व विपुल आहे. स्वतंत्र भाषा, स्वतंत्र शब्दकोश, स्वतंत्र वाक्यरचना, तिचा सारा संसार स्वयंभू आहे. संस्कृतपेक्षा जुना आहे. तमिळनाडमधला ‘नाड’ हा शब्द ‘देश’ या अर्थानं वापरला जातो. ‘देश’ या संस्कृत शब्दाचा तो पर्यायी शब्द. म्हणजे तमिळनाड या शब्दातच स्वतंत्र देश असा भावार्थ आहे. तमिळ भाषेत पाच महाकाव्ये आहेत. त्यांचं सार ‘कुरल’मध्ये येतं. हा नीतीशास्त्रावरचा ग्रंथ आहे. तमिळींची अस्मिता असलेला हा ग्रंथ कलामांच्या प्रतिकृतीजवळ नाही याचा निषेध द्रविडींनी केला आहे. हे जाणूनबुजून करण्यात आलंय असा त्यांचा आरोप आहे. तमिळी भाषेला डावलण्याचा हा कावा असल्याचं द्रविडींना वाटतं.
आधीच द्रविडींचा संस्कृत, हिंदी या भाषांना असलेला विरोध जगजाहीर आहे. या भाषा हातात घेऊन उत्तरेचे राजकारणी तमिळी संस्कृतीवर आक्रमण करतात, असा आरोप करत पेरियार यांनी एकेकाळी स्वतंत्र तमिळ देशाची मागणीही केली होती. त्या आंदोलनात मोठा हिंसाचारही झाला होता.
आता या वादात तमिळ दलित संघटनांनीही उडी घेतली. त्यांनी मागणी केलीय की, अब्दुल कलाम हे थोर शास्त्रज्ञ होते. राष्ट्रपती होते. कोळी या मागास जातीतून ते पुढे आले. देशाचे महान पुरुष ठरले. भारताच्या संविधानाचा हा मोठा विजय आहे. कलामांचे जीवन म्हणजे संविधानाची फलश्रुती मानता येईल. म्हणून कलामांच्या हातात वीणेऐवजी संविधान जास्त शोभले असते. वीणेऐवजी कलामांच्या हातात संविधान द्यावे, या मागणीवर दलित संघटना ठाम आहेत.
कलाम हे देशाचे महापुरुष आहेत यावर सर्वांचं एक मत, त्यांना प्रतिमेच्या पुढे कोणते धर्मग्रंथ ठेवावेत, हातात वीणा असावी की ‘कुरुल’ की संविधान यावरून सुरू झालेले वाद पुढे काय वळण घेतात हे बघावं लागेल.
देशात सध्या संघपरिवार ऐतिहासिक उंचीवर पोचला आहे. देशभर त्याची ताकद वाढतेय. संघाची राजकीय आघाडी असलेला भाजप सत्तेत आहे. पाठ्यपुस्तकं बदलली जाताहेत. म. गांधी आणि दीनदयाळ उपाध्याय यांना एकाच मापानं मोजलं जातंय. उद्या दीनदयाळ हे महात्मा ठरले तर कुणी आश्चर्य वाटून घ्यायला नको. अकबर-राणा प्रताप यांचा इतिहास सोयीनं लिहिला जातोय. रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे घडतंय यामागे एक प्रभावी सूत्रबद्ध विचारसरणी आखणी करताना दिसते आणि त्या विचारसरणीची सत्ता त्या आखणीप्रमाणे अमलबजावणी करताना दिसतेय.
संघपरिवाराचा हा सांस्कृतिक अजेंडा आहे. हा देश त्या विचारानुसार संघाला घडवायचाय. त्याचा भाग म्हणून कलामांचं स्मारक विशिष्ट पद्धतीनं संघानं साकारलं. देशात खरा मुसलमान कसा असावा तर तो कलामांसारखा असा संदेश देण्याची एकही संधी संघानं सोडली नाही ती म्हणूनच. ही संघाची खासीयत आहे. संघ कलामांच्या प्रतीकातून देशातल्या मुस्लिमांना सांगू पाहत आहे की, तुम्ही कलामांसारखे मुस्लिम असाल तर आम्ही तुमचा द्वेष नाही करणार. उलट ममतेनं जवळ घेऊ. त्यासाठी ‘गीता’ तुम्हाला प्रिय मात्र हवी. हातात वीणा घ्यायची तयारी ठेवा. तुम्ही ब्रह्मचारी राहाल तर उत्तम. तुम्ही शाकाहारी असाल तर काय मज्जाच मज्जा!
प्रतीकांची पळवापळवी, विकृतीकरण, हवं तसं सादरीकरण हा फार मोठ्या सांस्कृतिक राजकारणाचा भाग असतो. आपल्याला जो विचार सांगायचाय, समाजात रुजवायचाय तो प्रतीकांच्या माध्यमातून नेणं, रुजवणं हे एक प्रभावी राजकारण असतं. संघ परिवार या राजकारणात सतत अग्रेसर असतो. त्या राजकारणाचा भाग म्हणूनच म. गांधी, पं. नेहरू यांचं विकृतीकरण होत जातं. अकबर हरला, राणा प्रताप जिंकला हे त्यातूनच बिंबवण्यात येतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची तोडमोड त्यातूनच होत राहते. दीनदयाळ उपाध्याय म्हणूनच पुढे येत आहेत.
पण प्रतीकांच्या विकृतीकरणाचा खेळ खपवून घेतला जाईलच असं नव्हे. प्रतीकं, भाषा, वंश, जात, वर्ण, धर्म, प्रांत भेदामुळे आपल्या देशात खूप खदखद आहे. काश्मीर खदखदतोय. तमिळनाडूसह दक्षिण भारतात हिंदी भाषा विरोध वाढतोय. टागोरांच्या प्रतीकाशी खेळाल तर बंगाली खवळतील. हा देश एका सांस्कृतिक सूत्रात कधीच बसवता येणार नाही. त्या सूत्राचा अतिरेक झाला तर कलह वाढतील. फुटीची झाडं वाढतील आणि त्यांना विषारी फळं लागतील, हे सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी समजून घेतलं नाही तर अनर्थ ओढवेल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment