अजूनकाही
१. वादग्रस्त बांग्लादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना शनिवारी औरंगाबाद विमानतळावर झालेल्या विरोधामुळे आणि घोषणाबाजीमुळे औरंगाबाद दौरा आणि महाराष्ट्र दौरा रद्द करावा लागला. मात्र हा दौरा संगनमताने जाणीवपूर्वक हाणून पाडला गेला का? असा प्रश्न आता निर्माण होतो आहे. औरंगाबादमध्ये मी येणार आहे, कोणत्या हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहे याची माहिती फक्त पोलिसांनाच होती. असं असूनही मी विमानतळावर पोहचताच तिथं एमआयएमचे कार्यकर्ते कसे काय पोहोचले? असा सवाल तस्लिमा यांनी ट्विटद्वारे केला आहे. हॉटेलमध्ये एका मित्राच्या नावे खोल्या बुक केल्या होत्या. तरीही त्या हॉटेलवर एमआयएम कार्यकर्ते कसे काय आले? असाही प्रश्न त्यांनी ट्विटरवर विचारला आहे.
तस्लिमाताई, राजकीय आश्रय काही चकटफु मिळत नाही... आश्रिताला अधूनमधून आश्रयदात्यांच्या ‘उपयोगी’ पडावं लागतं... कधीकधी त्यांच्या ‘गेम’मध्ये प्यादं बनावं लागतं... असल्या नूरा कुस्त्या इथे रोज घडतात... त्यातून दोन्हीकडचे कळप आपापल्या मेंढपाळाभोवती गोळा होतात... कधी तस्लिमा, कधी वंदे मातरम्...
.............................................................................................................................................
२. देशभरात शेतकऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या आत्महत्या यांच्या पार्श्वभूमीवर खासदारांना स्वतःचं वेतन वाढवून घेण्याचा अधिकार असता कामा नये, अशी मागणी भाजप नेते वरुण गांधी यांनी लोकसभेत केली. यासाठी ब्रिटनच्या संसदेच्या धर्तीवर एखादी बाहेरची यंत्रणा असावी आणि तिच्यात खासदारांचा हस्तक्षेप असता कामा नये, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली. ब्रिटनची संसद एक स्वतंत्र प्राधिकरणच आहे. सदस्य नसलेल्या लोकांची यंत्रणा सरकारला खासदारांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनवाढीसाठी सल्ला देते. संसद सदस्य आणि जनता या दोहोंच्या शिफारसींच्या आधारे खासदारांची पगारवाढ निश्चित होते.
आपल्याकडे खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकाळात अनेक पटींनी वाढलेल्या अधिकृत उत्पन्नाची काहीएक टक्केवारी संसदेला, विधानसभा, विधानपरिषदांना, पालिकांना, पंचायतींना दिली पाहिजे. त्यातून या सगळ्या प्रतिनिधीगृहांचा खर्च निघेल. काही राज्यांमध्ये तर राज्याची, शहरांची महसुली तूट वगैरेही भरून निघेल.
.............................................................................................................................................
३. रेखा आणि सचिन तेंडुलकर यांच्या गैरहजेरीवर राज्यसभेत सपा खासदार नरेश अग्रवाल यांनी प्रचंड आक्षेप घेतला. सचिन तेंडुलकर आणि रेखा यांना राज्यसभेत यायचं नसेल, तर त्यांनी सरळ खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. या दोघांकडे जाहिराती करायला वेळ आहे इतर ठिकाणी जायला वेळ आहे, मग राज्यसभेत यायला वेळ का नाही? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. रेखा आणि सचिन तेंडुलकर यांनी मागील तिन्ही अधिवेशनात हजेरी लावली नाही. राज्यसभेची खासदारकी घ्यायची आणि तिथले नियम पाळायचे नाहीत याला काय अर्थ आहे, असा सवालही अग्रवाल यांनी उपस्थित केला आहे.
अग्रवाल साहेब, सचिनसारख्या भारतरत्नावर तुम्ही असं बोट ठेवणं बरोबर नाही. सचिन आणि रेखा हे खासदार आहेत म्हणून राज्यसभेला ग्लॅमर आहे. संसदेतून देशाचा कारभार हाकला जातो, त्याविषयीची चर्चा होते, त्यात असाही रस कोणाला आहे? सचिनने जाहिरातींचा, बीसीसीआयमध्ये महत्त्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगण्याचा मौलिक वेळ शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे गोष्टींवर वाया घालवावा का? रेखा नजरेसमोरून दूर झाली की, तिचा कुत्रा हलकल्लोळ करतो रडून, त्याला तुम्ही सांभाळाल का?
.............................................................................................................................................
४. ज्या माणसानं स्वत:चं संपूर्ण जीवन शिवआख्यान आणि शिवचरित्र लिहिण्यात घालवलं, त्या बाबासाहेब पुरंदरेंना आज महाराष्ट्रात पोलीस संरक्षण घेऊन फिरावं लागतंय, ही खूप दुर्दैवाची गोष्ट असल्याची खंत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली. मुंबईत बाबासाहेब पुरंदरे यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज म्हणाले की, काहीजणांकडून बाबासाहेबांचा उल्लेख श्रीमंत म्हणून केला जातो. पण राजकारणामध्ये येऊन श्रीमंत झालेल्या व्यक्ती बाबासाहेबांवर बोटं उगारत आहेत. बाबासाहेबांनी मांडलेल्या इतिहासातील आक्षेपांवर चर्चा करायला कुणीही पुढे येत नाही. कारण त्यांना जातीपातीची लेबलं लावून फक्त आरोप करायचे आहेत. मराठ्यांचा इतिहास ब्राह्मणांनी लिहिला किंवा ब्राह्मणांचा इतिहास मराठ्यांनी लिहिला तर तो चुकीचा, असा प्रकार आपल्याकडे घडत आहे, असं राज यांनी म्हटलं.
अशा चुकीच्या अनेक प्रकारांना कारणीभूत असलेल्या संघटनेतच राज यांची घडण झालेली आहे. बाबासाहेब पोलिस बंदोबस्तात का होईना महाराष्ट्रात राहू शकतात. एम. एफ. हुसेनसारख्या पंढरपुराचा वारसा सांगणाऱ्या थोर चित्रकाराला याच वयात देशातून परागंदा व्हावं लागलं होतं. भावना चेतवण्याचं राजकारण हे वणव्यासारखं असतं... पेटवणाऱ्याची वाऱ्यावर हुकुमत नसते, वारा फिरला तर पेटवणाऱ्यालाही घरादारासकट खाक करू शकतो... आधी इतिहास वगैरे विषय ऑप्शनला टाकू आणि ते तज्ज्ञांच्या अखत्यारीत सोपवून भावनांची दुखवादुखवी थांबवली पाहिजे.
.............................................................................................................................................
५. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापेक्षा आपल्याला राजकारणाचा जास्त अनुभव असल्याचं सांगून राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी त्यांची औकात काढली आहे. ‘नितीशकुमार तुमची औकात काय होती, हे विसरलात का,’ असं विचारून लालू यांनी नितीश यांना राजकारणातले पलटूराम म्हटलं आहे. ‘मी नितीशकुमार यांच्या सहकार्यामुळेच विद्यार्थी संघटनेची निवडणूक जिंकलो, असे नितीशकुमार म्हणतात. मात्र त्यावेळी नितीशकुमार इंजिनीयरिंग करत होते की आणखी काही, याबद्दलदेखील मला कल्पना नाही,’ असं त्यांनी सांगितलं. नितीशकुमारांमुळे आपण लोकप्रिय झालो नाही, तर आपल्यामुळेच नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली, असा दावा लालूप्रसाद यांनी केला. ‘दोन-दोन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालात. लोकसभा निवडणुकीतही तुमचा पराभव झाला. तुमची लायकी काय होती, हे विसरलात का?,’ असं लालूप्रसाद म्हणाले.
नितीशकुमार यांची औकात नव्हतीच, तर त्यांच्या उद्धारासाठीच आपला जन्म झाला असल्याच्या थाटात त्यांना पावन करून घ्यायची यदुकुलाला काय गरज होती, असा प्रश्न लालूंना कोणी विचारला का? इतका अपात्र इसम आपण शिरोधार्य करून घेतो, आपलं संख्याबळ जास्त असताना त्याला मुख्यमंत्री बनवतो आणि त्यानं पलटी मारताच त्याच्यावर शिवीगाळ करतो, यातून आपण हास्यास्पद ठरतो, हे मुरब्बी लालूंना कळत नाही का?
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment