टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • तस्लिमा नसरीन, ए.पी.जे. अब्दुल कलाम, अमित शहा, नीतीशकुमार आणि कर्नाटक मेट्रो
  • Mon , 31 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या तस्लिमा नसरीन Taslima Nasreen ए.पी.जे. अब्दुल कलाम APJ Abdul Kalam अमित शहा Amit Shah नीतीशकुमार Nitish Kumar कर्नाटक मेट्रो Karnataka Metro

१. प्रसिद्ध आणि वादग्रस्त लेखिका तस्लिमा नसरीन अजिंठा वेरूळ या जगप्रसिद्ध लेणी पाहायला आल्या असताना औरंगाबाद विमानतळावर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी ‘गो बॅक तस्लिमा’ अशी जोरदार घोषणाबाजी करून त्यांना बाहेरच पडू दिलं नाही. अखेर औरंगाबादमध्ये सुटी व्यतीत करण्याचा बेत रद्द करून त्यांना विमानतळावरूनच परत जावं लागलं. मुस्लिम धर्मगुरू आणि मुस्लिम समाजाच्या प्रथांविरोधात वादग्रस्त लिखाण करणाऱ्या तस्लिमा यांना या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात जयपूर साहित्य संमेलनातही अशाच विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. तस्लिमा यांच्या लेखांमुळे आणि वादग्रस्त पुस्तकांमुळे जगभरातल्या मुस्लिम बांधवांची मनं दुखावली आहेत, त्याचमुळे औरंगाबादमध्ये त्यांना प्रवेश करू द्यायचा नाही, असा निर्णय आम्ही घेतला होता, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

जलील हे नाव फारच समर्पक आहे. जगभरातल्या मुस्लिम बांधवांनी त्यांच्या कानात येऊन सांगितलं असावं, ही संपर्कयंत्रणाही फारच कौतुकास्पद आहे. आपल्याला न पटणारा विचार कोणी मांडला किंवा टीका केली, तर त्याच्या प्रतिवादाचे सभ्य मार्ग उपलब्ध आहेत. त्यांचा अवलंब करू नका, असं कोणताच धर्म सांगत नाही. तरीही माणसं असभ्य, असंस्कृत हिंस्त्रपणाला धर्माचा आणि संस्कृतीचा आधार सांगतात. आपल्या अशा उपक्रमांनी आपण ‘गोगुंडां’च्या बरोबरीला उतरतो आहोत आणि आपल्या तर्कशास्त्राच्या आधारे वंदेमातरमची सक्तीही योग्य सिद्ध होते, हे यांना कधी कळणार?

.............................................................................................................................................

२. कर्नाटकमध्ये हिंदीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. कर्नाटकमधील मेट्रोच्या फलकांवर हिंदी भाषेचा वापर नको, अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोची मेट्रो रेल लिमिटेडने फलकांवर तीन भाषांचा वापर केला आहे. मल्याळम, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांचा फलकांवर वापर करण्यात आला होता. चेन्नई मेट्रोमध्ये इंग्रजी आणि तामीळ या दोन भाषांचाच वापर करण्यात आला आहे. चेन्नईत हिंदी भाषेचा वापर फक्त आपातकालीन सूचनेच्या फलकांवर करण्यात आला आहे. कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशनने बंगाली आणि इंग्रजी भाषेसोबतच हिंदी भाषेचाही वापर केला आहे. तर मुंबईत हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला आहे.

चला, आता मुंबईतल्या मेट्रोमध्ये मराठी सूचनांसाठी आंदोलन करायचा मार्ग खुला झाला. सिद्धरामय्या आणि कंपनीने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की देशभरात सर्वभाषकांना इंग्रजी अवगत नाही. हिंदी ही भाषा चित्रपटांमुळे सर्वदूर पोहोचली आहे शिवाय ती अनेकांच्या परिचयाच्या देवनागरी लिपीत लिहिली जाते, हेही महत्त्वाचं आहे. आपल्या राज्यात पर्यटकांनी, बाहेरच्या कोणी येऊच नये, असं वाटत असेल, तर मग वेगळं राष्ट्रच करून घेतलेलं बरं. तसं नसेल, तर सर्वांची सोय पाहायला हवी.

.............................................................................................................................................

३. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार असून त्यांच्याकडे संरक्षण खातं सोपवलं जाणार आहे, अशी चर्चा आहे. स्मृती इराणी यांनाही गुजरातमधून राज्यसभेवर निवडलं जाणार आहे. मार्च २०१७ मध्ये मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिल्यापासून संरक्षण मंत्रीपद कोणालाही देण्यात आलेलं नाही.

शाह यांनी त्या पदावर सोडा, राज्यसभेवरसुद्धा येण्याच्या आधीच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना राजीनामा द्यायला लावून जागतिक ‘भ्रष्टाचारविरोधी लढाईत’ सामील करून घेतलं आहे, हा केवढा मोठा मास्टरस्ट्रोक आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षात फूट पाडून शी जिनपिंग यांनाही ते दाती तृण धरून शरण यायला लावतील, यात शंका नाही. भाईगिरीचाच तर विषय आहे ना फक्त!

.............................................................................................................................................

४. धर्मनिरपेक्षता मला शिकवू नका, काही जण धर्मनिरपेक्षतेचा वापर भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासाठी आणि स्वतःचे पाप लपवण्यासाठी करतात, पण आम्ही विचाराने धर्मनिरपेक्षतेचे समर्थक आहोत, अशा शब्दांत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विरोधकांना सुनावले आहे. सत्ता ही कुटुंबाची नव्हे, तर राज्याची सेवा करण्यासाठी असते, असा टोलाही त्यांनी लालूप्रसाद यादवांना लगावला.

नितीशभौ, असं एकतर्फी नाही ठरवता येणार. तुम्हाला कोणी धर्मनिरपेक्षता शिकवायची नसेल, तर तुम्ही भाजपच्या पाठिंब्यावर सरकार चालवताना आपण धर्मनिरपेक्ष आहोत, असा ढोल वाजवून नाही चालणार. तेजस्वी यादवांपेक्षा जास्त कलमांखाली सुशीलकुमार मोदींवर गुन्हे दाखल आहेत. तुमच्यावरही गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल आहे. तेव्हा यापुढे तुम्ही कोणाला नैतिकताही शिकवण्याच्या फंदात पडणार नाही, असं गृहीत धरायचं का? 

.............................................................................................................................................

५. भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रामेश्वरममध्ये उभारलेल्या संग्रहालयातील अब्दुल कलाम यांचं शिल्प वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या शिल्पाजवळ गीतेचा श्लोक ठेवण्यात आला होता. डीएमके आणि इतर राजकीय पक्षांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर तिथे बायबल आणि कुराणही ठेवलं गेलं. तिरूक्करल या महान तामिळ ग्रंथातले श्लोक त्या शिल्पाजवळ का नाहीत, असा सवाल तामिळ अस्मितावाद्यांनी केला होता.

कलाम हे ख्यातनाम वीणावादक होते, अशी यापुढच्या पिढ्यांची समजूत झाल्यास आश्चर्य नाही. या सरकारच्या कारकीर्दीत कुठेही औरंगजेबाचा पुतळा उभारला जाणार नाही, हे एक बरं आहे. नाहीतर त्याचा टोप्या विणण्याचा व्यवसाय होता, अशी समजूत झाली असती लोकांची. कलाम हे भाजपच्या विचारधारेच्या निकषांवरचे खरे, म्हणजे आचाराने जवळपास हिंदूच झालेले, ‘राष्ट्रीय’ मुसलमान होते, हे लोकांच्या मनावर ठसवण्याचा हा प्रयत्न आहे. कलामांच्या बाबतीत वेगळं काही होणं शक्यही नव्हतं.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......