गोपाळकृष्ण गांधींवरील हल्ले येत्या काही आठवड्यांत अधिकाधिक वाढणार...
पडघम - देशकारण
आशुतोष
  • गोपाळकृष्ण गांधी
  • Mon , 31 July 2017
  • पडघम देशकारण गोपाळकृष्ण गांधी Gopalkrishna Gandhi

मराठी अनुवाद - सविता दामले

मी गोपाळकृष्ण गांधी यांना आत्तापर्यंत भेटलेलो नाही. त्यांच्याबद्दल वाचलेलं आहे आणि वृत्तपत्रांतील सदरातून व्यक्त झालेली त्यांची मतं वाचली आहेत. त्यांचे बंधू राजमोहन गांधी यांना मी ओळखतो. ते माझ्या पक्षाचे सदस्य आणि पूर्व दिल्ली मतदारसंघातील लोकसभा- उमेदवारही आहेत. त्यांची ओळख असणं हा माझा सन्मानच आहे असं मला वाटतं. त्यांच्याइतक्या सौम्य व्यक्तिमत्त्वाचा दुसरा माणूस माझ्या पाहण्यात नाही. ते उच्चशिक्षित विद्वान आहेत. त्यांनी त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्यावर पुस्तक लिहिलं आहे. ज्या लोकांना महात्मा गांधी, त्यांचं कार्य आणि स्वातंत्र्य चळवळ यांच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यांच्या दृष्टीनं तर हे पुस्तक म्हणजे मोठा खजिनाच आहे.

गोपाळकृष्ण गांधी हेसुद्धा आपल्या बंधूंसारखेच ‘महात्म्या’चे नातू शोभणारे असतील असं मी गृहीत धरतो. त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या आजोबांचं नाव पुढे केलेलं माझ्या ऐकिवात कधीही आलेलं नाही.

आजचं जग विसंवाद, दुःखद धक्के आणि शोकांतिकांनी भरलं आहे. अशा या जगात संयुक्त विरोधी आघाडीतर्फे उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून उभं राहण्यास गोपाळकृष्ण गांधी यांनी संमती दिली आणि तत्क्षणीच ते सैद्धान्तिकदृष्ट्या खुरटलेल्या लोकांच्या उपहासाचे, तिरस्काराचे आणि अपशब्दांचे धनी झाले. मुक्त, लोकशाही समाजाचा पुरस्कर्ता म्हणून असलेली भारताची प्रतिमा ज्या ठराविक वाहिन्यांमुळे डागाळली जाते, त्यांनी लगेच या माणसाच्या देशभक्तीविषयी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. कारण त्यांनी याकुब मेमनच्या दयेच्या अर्जाला पाठिंबा दिला होता. १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असल्याबद्दल याकुब मेमनला अपराधी घोषित करण्यात आलं आणि २०१५ साली फासावर देण्यात आलं. परंतु वास्तव हेच आहे की, नवमाध्यमक्रांतीच्या या कच्च्याबच्च्यांनी गोपाळकृष्ण गांधींवर केलेल्या या हल्ल्यामुळे त्यांचं स्वतःचंच हसं झालं. कारण त्यांचं अज्ञान आणि औद्धत्य उघडं पडलं. ते स्वतः आत्मवंचनेचे बळी आहेत, हेच यातून पुढे आलं.

मला जाणवतंय की, राजकीय विरोधकांवर सर्वसाधारणपणे जेवढी राळ उडवली जाते, त्यापेक्षा गोपाळकृष्ण गांधींवरील हा हल्ला दिवसेंदिवस अधिकच विखारी आणि तीव्र होत जाईल. तो राजकीय कमी आणि सैद्धान्तिक अधिक असेल. समतोल विचारांपेक्षा अपराधीपणाच्या भावनेनं तो भरलेला असेल. त्यांचं तर्कशास्त्र ज्यानं जुमानलं नाही, कुठल्या ना कुठल्या रूपातील द्वेष दडून बसलेली त्यांची विचारसरणी स्वीकारण्यास ज्यानं नकार दिला, अशा मानवाचं अमरत्व पुसून टाकण्याचा तो प्रयत्न असेल.

गोपाळकृष्ण गांधी हे त्यांचं लक्ष्य नाहीयेत तर ते जो वारसा चालवत आहेत, तो वारसा हेच त्यांचं लक्ष्य आहे. स्वातंत्र्य चळवळ नामक जी राजकीय-सांस्कृतिक संरचना निर्माण झाली होती, ती संरचना हेच त्यांचं लक्ष्य आहे. भारतवर्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देशाची महान परंपरा सुसंवाद आणि सर्व धर्मांप्रती आदर यावर विश्वास ठेवते, मुक्तपणाच्या तत्त्वाची तळी उचलते. या महान परंपरेकडून ज्या आधुनिक राष्ट्रीय भूमिकेला पोषण मिळालं आहे, ती भूमिका हेच त्यांचं लक्ष्य आहे. काही लोकांना ही परंपरा अडचण ठरते. श्रेष्ठ वंशाचा तगून राहण्याचा सातत्यानं चालणारा लढा म्हणजेच इतिहास अशा भ्रामक समजुतीचे हे लोक बळी असतात. त्यांना वाटतं की भारत ही आपली राष्ट्रीय ओळख नसून ‘हिंदू’ ही आहे. त्यांना वाटतं की, इस्लाम, ख्रिस्ती असे स्पर्धक धर्म याच आपल्या समस्या आहेत. त्यांना वाटतं की, ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ हे ‘राष्ट्रवादा’पासून दूर नेणारं’ साधन आहे.

होय, मी हिंदुत्वाबद्दल बोलत आहे. सध्या सत्तेवर असलेल्या अभिजनांच्या जीवनधारणेविषयी बोलत आहे.

या लोकांसाठी गोपाळकृष्ण गांधी हे मुख्यत्वेकरून अशा विचारधारेचे प्रतीक आहेत, जी भारताचे ‘हिंदू-पाकिस्तान’ होण्यास विरोध करते. त्यांचा गुन्हा काय तर ते अशा पुरुषाचे नातू आहेत, जो द्वेषाच्या राजकारणाच्या विरुद्ध डोंगरासारखा उभा राहिला, ज्यानं गोळवलकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्ताला पाठिंबा दिला नाही. गोळवलकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय प्रमुख होते, त्यांना लोक प्रेमाने ‘गुरुजी’ असे संबोधतात. त्यांच्यामध्ये आणि गांधीजींमध्ये गंभीर मतभेद होते. मुसलमान आणि दलितांना एकत्र घेऊन चालण्याची गांधीजींची राजकीय रणनीती त्यांना मान्य नव्हती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संबंधित संस्थांची सैद्धान्तिक पायाभरणी गोळवलकरांनी केली. आपली मते ते अगदी निर्भीडपणे व्यक्त करत. खरं सांगायचं तर त्यांनी लिहिलेल्या ‘वुई ऑर अवर नेशनहुड डिफाईन्ड’ या पुस्तकात त्यांनी आपल्या कल्पना एवढ्या मोकळेपणानं आणि परखडपणानं मांडल्या आहेत की, त्यामुळेच कधी कधी संघपरिवाराला ओशाळल्यासारखं होतं.

गोळवलकर लिहितात, “खरं सांगायचं तर हिंदुस्थानात आम्हाला तिहेरी लढाई लढावी लागते आहे. एका हाताला आम्ही हिंदू मुसलमानांशी लढतो आहोत आणि दुसऱ्या हाताला ब्रिटिशांशी लढतो आहोत. मुसलमानांना कुणीही चुकीच्या वाटेकडे वळवलेलं नाही. ते स्वतःला परकीय आक्रमक जेते समजतात आणि सत्ता हाती घ्यायला पुढे येतात.’’ हे पुस्तक १९३९ साली प्रसिद्ध झालं. महमद अली जिना यांच्याप्रमाणे गोळवलकरही म्हणत होते की, हिंदू-मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत. ते कदापि एकत्र राहू शकत नाहीत. जिनांच्या सिद्धान्ताची परिणती देशाच्या फाळणीत आणि पाकिस्तानच्या निर्मितीत झाली. परंतु हिंदुत्ववादी या सगळ्याचं खापर जिनांपेक्षा गांधीजींवर आणि त्यांच्या ‘तुष्टीकरणाच्या’ राजकारणावर फोडतात.

गोळवलकरांच्या नजरेतून पाहिलं तर मुसलमान आणि ख्रिस्ती हे परकीय घटक असून ‘हिंदूराष्ट्रा’त विलीन व्हायला नकार देतात. ते लिहितात की, “या परकीय घटकांसमोर दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे त्यांनी राष्ट्रीय वंशात विलिन व्हायचं, त्यांची संस्कृती स्वीकारायची किंवा मग जोपर्यंत राष्ट्रीय वंश त्यांना वेगळी चूल मांडण्यास अनुमती देतोय, तोवर त्यांच्या दयेवर जगत राहायचं. राष्ट्रीय वंशाच्या मनात आलं तर त्यांना हा देश सोडून जावंच लागेल.’’ या सिद्धान्ताचं हिटलरप्रणीत नाझीपक्षाच्या सिद्धान्ताशी साम्य आहे. हिटलरचा आर्यवंशाच्या शुद्धतेवर विश्वास होता. ज्यूंसारखे अन्य वंश तिथं उपस्थित असल्यामुळे वांशिक भेसळ होत होती. त्यामुळे जर्मन राष्ट्र अशक्त बनत होतं. या विचारसरणीनं भूतकाळात केवढा धुमाकूळ घातला आणि केवळ एका माणसाच्या भ्रामक कल्पनांची केवढी मोठी किंमत मानवतेला मोजावी लागली, हे सांगण्यासाठी इतिहासात घुसण्याची गरज नाही.

याची पुनरावृत्ती घडण्याची आता शक्यता नाही, कारण आता आपण गोळवलकरांपेक्षा अधिक आधुनिक आणि मुक्त वातावरणात राहत आहोत, नाझी इतिहासाचे आपण साक्षीदारही आहोत. समाज आता धडा शिकलेला आहे. परंतु हे आपण विसरता कामा नये की, आता फक्त रूप बदललं आहे, द्वेषाचा मूळ हेतू काही बदललेला नाही.

हिंदुत्ववाद्यांना वाटतं की, गोपाळकृष्ण गांधींसारखे विचारवंत हे घरभेदी आहेत, त्यांच्याशी लढलं पाहिजे, त्यांची प्रतिष्ठा धुळी मिळवली पाहिजे. गोळवलकरांनी लिहिलंय, “हिंदूंचा शिक्षित वर्ग हा खरं तर इंग्रजीचा गुलाम बनला आहे. त्यांनी आपली नाळ तोडून टाकली आहे. राष्ट्राच्या भूतकाळाचा पाया गमावून बसल्यामुळे ते संस्कृतीहीन, राष्ट्रहीन बनले आहेत.’’ ब्रिटिश साम्राज्यानं हेतूपर्वकच हे काम केलं, ‘खऱ्या राष्ट्रवादा’चा निर्धार लेचापेचा करून टाकणं, वेगळ्या राष्ट्रीय वृत्तीनं उसळी घेणं हेच त्यांचं ध्येय होतं, केवळ याच हेतूनं इंग्रजांनी काँग्रेस पक्षाची निर्मिती केली, अशी गोळवलकरांची ठाम धारणा होती.

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या आघाडीचे गोपाळकृष्ण गांधी हे उमेदवार आहेत हा योगायोग नाही. त्यांचं नाव तृणमूल काँग्रेसनं प्रस्तावित केलं असलं तरी त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षानं आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही पाठिंबा दिला आहे. गोळवलकरांच्या दृष्टीनं मुसलमान आणि ख्रिश्चनांप्रमाणेच कम्युनिस्टही हिंदूराष्ट्राचे शत्रूच आहेत. गोपाळकृष्ण गांधींचं नाव नेमकं अशा वेळेस पुढे आलं आहे, जेव्हा डाव्यांचं बौद्धिक वर्चस्व झुगारून देण्यासाठी उजवी विचारसरणी अटीतटीचे प्रयत्न करत आहे आणि जेएनयूसारख्या संस्था या ‘देशद्रोह्यां’चे अड्डे आहेत, असं चित्र रंगवलं जात आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गरळ ओकलं जात आहे, या गोष्टीचं मला आश्चर्य वाटत नाही. या दोन विचारसरणींतील लढा जसजसा तीव्र होत जाईल, तसतशी द्वेषयुक्त चिखलफेक आणखी वाढत जाईल. इतिहासाच्या चक्रालाच या बाबत दोषी धरावं लागेल.

.............................................................................................................................................

माजी पत्रकार-संपादक आणि आपचे सदस्य आशुतोष यांचा हा मूळ इंग्रजी लेख १८ जुलै २०१७ रोजी NDTVच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाला आहे. मूळ लेख पाहण्यासाठी लिंक –

.............................................................................................................................................

लेखिका प्रसिद्ध अनुवादक आहेत.

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Nikhil Unde

Tue , 01 August 2017

लेखकाच्या मांडणीतच केवढी मोठी चूक आहे हे वाचकांच्या लक्षात आलं असेलच. लेखक गोपाळकृष्ण गांधी ह्यांचा संदर्भ फक्त नावासाठी वापरून सत्ताधारी पक्ष कसा कम्युनल आहे हे दाखवण्यासाठी लेख लिहिले ला दिसतो. एक तटस्थ युवा नागरिक म्हणून हा लेख वाचतो म्हणून मी हतबल होऊन ह्या लेखकाच्या दांभिक विचारसारणीवर आपली प्रतीक्रिया द्यावी हीच इच्छा होते. लेखकाला इतिहासात रमण्याची जी आपसूक लालसा निर्माण होते आणि त्यातून तो वर्तमानाची पर्वा न करता जी वैचारीक चीखलफेक करतो ती डाव्या विचारसरणीला शोभेशी आहे , तरी तो आपल्याला आपण संपादक असल्यामुळे मी कसे तटस्थ लिहिलेले आहे हे दाखवण्याचा विनाकारण प्रयत्न करतो आहे असेच वाटते. मी हा लेख पहिला उतारा वाचत असताना फार उत्सुकतेने वाचत होतो की लेखक गांधींच्या नातू बद्दल कर्तबगारी पूरक आणि समर्पक असे चित्र रेखाटेल पण तिथेही निराशाच! एक भारतीय युवक म्हणून ह्या देशाची राजकीय परिस्थिती बघता संपादकांची लेखणी त्यांच्या तटस्थ विचारांची पाईक बनण्यापेक्षा त्यांच्या राजकीय गुलामगिरीची अथवा वशिलेबाज वृत्तीची पाईक जास्त झाल्यासारखे वाटते. हा विचारवंतांचा दांभिकपना की दांभिकांचा विचारवंत होण्याचा प्रयत्न आहे माहीत नाही. आम्हाला ह्या ६० वर्षांपुर्वीच्या इतिहासाचे नकारात्मक दाखले देऊन सकारात्मक वर्तमान घडवण्याचा पोकळ प्रयत्न वाटतो. ह्यांनी सेक्युलर शब्द एवढा कम्युनल केला आहे की तो म्हणलं की आपण आता काँग्रेस समर्थक अथवा डाव्या विचारसरणीचे म्हणूनच ओळखले जातो. हे अथवा ह्या सारखे लेखक ह्यांचा धार्मिक दंभ असाच लेखणीतून 21व्या शतकात पसरवणार असतील तर हा भारताच्या सामाजिक शांततेला धक्का पोहोचवणारे राजकीय षड्यंत्रच म्हणावे लागेल! हे माझ्या सारख्या युवकांना ह्या देशात नको आहे. लेखकाने असा लेख लिहित असतांना कोणत्याही राजकीय विचारशक्तीचे भांडवल न करण्याची तसद्दी घ्यावी हीच एक तळमिळी ची विनंती. सध्या नकारात्मक पत्रकारितेच्या काळामध्ये सकारात्मक लिखानांची गरज फार आहे ह्याची अक्षरनामाने नोंद घ्यावी.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......