“शास्त्रीय संगीत पाया, तर फिल्लम संगीत कळस काय रे?”
सदर - चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
केशव परांजपे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 29 July 2017
  • शास्त्रीय संगीत Classical music राग Raag केशव परांजपे Keshav Paranjpe किशोरी आमोणकर Kishori Amonkar शास्त्रीय संगीत Classical music सुगम संगीत Sugam Sangeet

मराठी शाळेत महिन्याला शेवटच्या शनिवारी वादसभेचा कार्यक्रम असायचा. ‘तलवार श्रेष्ठ की लेखणी श्रेष्ठ?’ असे विषय असायचे. आणि समारोप करताना अध्यक्ष नेहमीच सामोपचारानं म्हणायचे, ‘दोन्ही आपापल्या परीनं श्रेष्ठ आहेत.’ तशी वादसभा ‘शास्त्रीय संगीत की सुगम संगीत?’ असा विषय घेऊन करू या का?

वर्तमानपत्रातल्या एका बातमीवरच्या किशोरी आमोणकरांच्या प्रतिक्रियेचा किस्सा मी अनेक ठिकाणी, अनेक वेळा सांगितला आहे. इथंही कदाचित याआधी सांगून झाला असेल. एका विख्यात पार्श्वगायिकेनं एका कार्यक्रमात केलेल्या भाषणाचा वृतान्त होता तो. त्यात त्या म्हणाल्या होत्या- “पार्श्वसंगीतात कारकीर्द करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या तरुणांनी शास्त्रीय संगीत शिकलंच पाहिजे. शास्त्रीय संगीत शिकलेल्या कलाकाराला काहीही गाता येतं… शास्त्रीय संगीत हा पाया आहे…” किशोरीताईंनी उद्विग्नपणे, तुच्छतेनं, वैतागून मला विचारलं, “काय वाचलास का हा सदुपदेश?” मी वाचलाच होता, पण त्यात खटकण्यासारखं, उद्विग्न होण्यासारखं काय असावं असं मोठ्ठं प्रश्नचिन्ह माझ्या चेहऱ्यावर उमटलं. त्यावर ताई उदगारल्या, “शास्त्रीय संगीत पाया, तर फिल्लम संगीत कळस काय रे?” ओ हो!, माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला!

शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या संगीतकलेच्या दोन (स्वतंत्र) शाखा मानायच्या की एकाच संगीतकलेतील वर-खालच्या श्रेणी? दोन्ही मतांसाठी बरेच सबळ पुरावे देता येतील. दोन शाखा मानल्या तर शास्त्रीय आणि सुगम यात श्रेष्ठ कोण याचा निवडा देता येणार नाही. व्यक्तिपरत्वे हे उत्तर बदलेल. शास्त्रीय संगीताची अभिरूची ही उच्च अभिरूची आणि सुगम संगीताची अभिरूची ही हीन जरी नाही, तरी जरा खालच्या दर्जाची, असा जो सार्वत्रिक समज आहे, तो सोडून द्यावा लागेल. (माझ्याही स्वत:च्या मनात असा समज आहे!) संगीत ही स्वायत्त कला आहे. आणि तिची स्वायत्तता शास्त्रीय संगीतात अबाधित आहे. सुगम संगीत हे उपयोजित संगीत आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आणि त्या अर्थानं शास्त्रीय संगीताचा अवकाश अधिक व्यापक आहे, हे मान्य करावं लागतं.

किशोरीताईंचं म्हणणं असं होतं की, ताला-सुराची उपजत समज असणारी, गोड गळा लाभलेली मुलं जे ऐकतील ते सहज गुणगणुतात. ते सुगम संगीत. त्यांच्या सांगीतिक प्रवासाची सुरुवात जसजशा त्यांचा सुरांचा सहवास वाढत जातो, तसतशी ती मुलं संगीतसागरात अवगाहन करायला प्रवृत्त होता. त्यांना सुरांची भाषा अवगत व्हावी, रागांचा भावानुभव यावा, त्यांचे वैयक्तिक भावानुभव, त्यांची वैयक्तिक गुणवत्ता यांचा विनियोग व्यापक अशा रागाच्या भावाला प्रतिममान करण्याकडे व्हावा, अशा तऱ्हेनं संगीताच्या स्वर्गात पोचलेला कलाकार पुन्हा पृथ्वीवर, मर्त्य लोकांत- जिथं बाह्य ताल आणि शब्द यांनी स्वराला कुंठित केलं आहे अशा गानप्रकारात - कशाला येईल?

ताई हे असं ज्या उत्कटपणे बोलत, ते ऐकताना उन्मन अवस्थेचा अनुभव येई. पण ही एक अत्यंत आदर्श स्वप्नासारखी प्रक्रिया आहे. प्रत्यक्षात काय घडतं, कसं आणि का घडतं? वास्तव लक्षात घ्यायलाच हवं. ताई सहज गुणगुणणं, स्वर-तालांची माहिती, रागांचा परिचय, रागांचा अनुभव आणि पुढे साक्षात्कार ही अशी एकानंतर एक अशा पायऱ्यांची मांडणी (सोपान), असं या प्रवासाकडे पाहतात. प्रत्यक्षात या मार्गाला अनेक फाटे फुटलेले आहेत.

आज सुगम संगीत या गानप्रकारानं बरीच मजल मारली आहे. इतकी की सुगम संगीत ही गानसोपानाची सुरुवातीच्या भागातली एक पायरी न राहता, ती एक वैशिष्ट्यपूर्ण कलाशाखा म्हणून सुस्थापित झाली आहे. ‘सर्व सुगम संगीत हे तर रागदारीवरच आधारित असंत’ असा समज बाळबोधपणाचा ठरेल. रागसंगीत हा सुगम संगीताच्या समृद्धीचा एक स्रोत आहे. असे आणखी अनेक स्रोत सुगम संगीतात एकजीव झाले आहेत. सुगम संगीतातल्या स्वररचना गाण्यासाठी मुळीच ‘सुगम’ राहिलेल्या नाहीत. शास्त्रीय गायन शिक्षणात आणि रियाजात अनेक वर्षं व्यतीत केलेल्यांनासुद्धा सलगपणे म्हणायला अवघड वाटतात अशा चाली आज (गेली निदान २५-५० वर्षं तरी) बांधल्या जातात. श्रीनिवास खळ्यांसारख्या संगीतकाराच्या चालींतला ‘ऑफ बीट’ शास्त्रीय गायकांना सहज साधला असं झालेलं नाही.

दर्जेदार सुगम संगीत गाण्यासाठी गळा फारच तयार हवा, कारण सुगम संगीतात गानक्रिया महत्त्वाची भूमिका बजावत असतात. (गानक्रिया – ‘गळा’ चालवणे. कण, खटका, मुटकी, मींड,घसीट, कंप इ.) शिवाय गळा हुकमी हवा. वक्तृत्व कठीण असतं, पण लेखकानं लिहिलेले संवाद अभिनित करणंही कठीणच असतं. तसंच दुसऱ्या कुणी बांधलेली चाल आपली करून गाणं आव्हानात्मक असतं. सुगम संगीतातली सांगीतिक सामग्री – चाल, गायन, वाद्यमेळ – ही एकाच कलाकाराची क्वचितच असते. ती विविध कलाकारांची असते. सुगम संगीत ही सामूहिक निर्मिती आणि प्रस्तुती असते. म्हणून सुगम संगीताचा विचार करताना कलाकार म्हणून त्या त्या टीमचा, संघाचा विचार केला पाहिजे.

चांगलं जमलेलं भावगीत किंवा चित्रपटगीत आपल्या मर्यादित अवकाशात एक वातावरण उभं करतं. एक जिवंत अनुभव देतं आणि अनुभव सहज मोठा असतो का? शब्द आणि स्वरतालांच्या मिलाफातून एक विविक्षित भावछटा सुगम गीत छेडून जातं. आणि हा भावानुभव कविता वाचनाच्या अनुभवापेक्षा वेगळा असतो.

सुगम संगीत गायक सुरात गातात, अतिशय सुरात गातात. मी स्वत: आजकाल जे तरुण शास्त्रीय गायक-गायिका ऐकतो आणि जे तरुण सुगम गायक-गायिका ऐकतो, त्यात सुरेलपणाचं प्रमाण दोन्ही ठिकाणी सारखंच आहे. सुगम गायकांमध्ये सुरेलपणा कमी आहे असं तरी नक्कीच म्हणता येणार नाही. शास्त्रीय गायकांमध्ये सुरांचं, आवाजांच्या सौंदर्याचं अवधान अनेकदा पुरेपूर टिकलेलं दिसत नाही. सुगमवाले ‘बसलेलं’ गातात, शास्त्रीय गायक ‘पाठ’ करून गात नाहीत? पाठांतर शक्तीच्या मर्यादांमुळे न पाठ केलेलं गाणं म्हणजे उत्स्फूर्त गाणं नव्हे. सुगम लोकरंजनासाठी आणि शास्त्रीय आत्मरंजनासाठी गायलं जातं असं खरंच म्हणता येईल का? दोन्ही क्षेत्रांत गांभीर्यानं प्रामाणिक काम करणारे आहेत, तसे सवंगतेकडे झुकलेलेही आहेत. सुगमच गाणाऱ्यांना अर्धा-पाऊण तास विलंबित ख्याल गाता येईल का? त्यांना तो गायचाच नसतो. ख्याल गाणारा एखादं सुमग गीत अपेक्षित अचूकतेनं परिणामकारक गाईल याची हमी कोणाला देता येईल का? ताला-सुरात बहुदा (!) बिनचूक म्हणून शकेल एवढंच. सुगम संगीत हा गानप्रकार जसजसा प्रगल्भ होत गेला आहे, तसतसे त्या गानप्रकाराचे निकष रूढ होत गेले आहेत. आणि केवळ शास्त्रीय गायनाचं शिक्षण घेतलं म्हणून त्या निकषांची परिपूर्ती कोणी करू शकेल असं नाही.

पुन्हा एकदा ‘पाया आणि कळस’ किंवा ‘कच्चा माल आणि तयार माल’ या विषयावर येतो. अर्थशास्त्रीय सिद्धान्त काय सांगतो? सुगम संगीताला बाजारात मोठी मागणी आहे. म्हणून सुगम संगीतात प्रस्थापित कलाकाराला पैसा अधिक मिळतो. परिणामी ज्याला गाता येतं तो प्रत्येक जण सुगम संगीतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून या क्षेत्रात कमालीची चुरस, स्पर्धा असेल आणि म्हणून सर्वोत्तम गुणवत्तेचे गायक या क्षेत्रात येतील, राहतील. या क्षेत्रातल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शास्त्रीय संगीतशिक्षणाची बैठक उपयोगाची असेल तर प्रत्येक महत्त्वाकांक्षी स्पर्धक हे शिक्षण घेईल. हा अर्थशास्त्रीय सिद्धान्त १०० टक्के लागू होत नसला तरी त्यात तथ्य नक्कीच आहे. शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत यांतील नात्यावर या सिद्धान्ताचा प्रभाव नक्कीच राहील.

या सिद्धान्ताला जणू छेद देत आज कितीतरी गुणी तरुण शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेत आहेत, एवढंच नव्हे तर शास्त्रीय संगीतात कारकीर्द करण्याचं ध्येय बाळगून आहेत. अर्थशास्त्रात गृहीत धरलेल्या तर्कसंगत वागण्यापलीकडे पाहायला लावण्याची क्षमता रागदारीत आहे, असाच याचा अर्थ होतो ना? जे सुगम संगीतात प्रवेश मिळवू शकत नाहीत, ते शास्त्रीय संगीतात उरतात, असं काही होत नाहीये. म्हणूनच अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांनी शास्त्रीय संगीत कंठाशी धरलं आहे त्यांच्या पाठीशी उभं राहू या.

लेखक अभिनव पदवी महाविद्यालयाचे (भाईंदर, मुंबई) प्राचार्य आहेत.

kdparanjape@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......