जॉनी वॉकरचा चेहरा, रफीचा गळा आणि गुरुदत्तचा मेंदू
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • जॉनी वॉकरच्या विविध भावमुद्रा
  • Sat , 29 July 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi जॉनी वॉकर Johnny Walker गुरुदत्त Guru Dutt मोहम्मद रफी Mohammed Rafi

गुरुदत्तचे सिनेमे ‘बाजी’ (१९५१) पासून हिट व्हायला सुरुवात झाली. ‘जाल’ (१९५२), ‘बाज’ (१९५३) असे सलग तीन वर्षं सिनेमे येत गेले. या सगळ्यात गुरुदत्तला सावलीसारखा सोबत होता, बद्रुद्दीन जमालोद्दीन काजी. पहिल्याच सिनेमात त्याच्या पिदक्कड माणसाच्या अभिनयावरून गुरुदत्तनं त्याला नाव दिलं, जे पुढे अतिशय लोकप्रिय ठरलं. इतकं की त्याचं मूळ नावच विसरलं गेलं. ते नाव होतं- ‘जॉनी वॉकर’. 

जॉनी वॉकर हा गुरुदत्तच्या चित्रपटाचा अभिन्न हिस्सा बनला. पहिले तीन सिनेमे झाल्यावर पुढच्या सिनेमात त्याला गाणं मिळालं. या गाण्याची लोकप्रियता पाहून, पुढे त्याच्यासाठी सिनेमात किमान एक तरी गाणं हवंच अशी रसिकांची प्रेमाची सक्तीच निर्माण झाली. 

जॉनी वॉकरच्या गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे मोहमद रफीचा आवाज. गुरुदत्त-रफी-जॉनी वॉकर हे समीकरण असं काही जूळून आलं की, त्या गाण्यांना एक वेगळंच स्थान प्राप्त झालं. या यशस्वी सूत्रावर पुढे इतरही दिग्दर्शकांनी आपल्या सिनेमांत जॉनी-रफी यांची गाणी वापरली. ती गाजलीही. पण जॉनी-रफी गाण्यांची खरी रंगत आहे, ती गुरुदत्तच्याच सिनेमांत. जॉनी वॉकर-रफी-गुरूदत्त या तिघांच्या बाबतीत जुलै महिना महत्त्वाचा. ९ जुलै हा गुरुदत्तचा जन्मदिवस, २९ जुलै हा जॉनी वॉकरचा आणि ३१ जुलै हा रफीचा स्मृतीदिन. 

या सुरेल प्रवासाची सुरुवात झाली ‘आरपार’ (१९५४) पासून. गुरुदत्तसाठी गाण्याऱ्या रफीनं जॉनी वॉकरसाठी खास वेगळा आवाज लावत गायलेलं गाणं होतं, ‘अरे ना ना ना ना तौबा तौबा’. या गाण्यात रफीला तशीच ठसक्यात साथ दिली होती गीतानं. केवळ विनोदी म्हणून या गाण्यांना दुर्लक्षित करता येऊ नये, इतकी ताकद या गाण्यामध्ये होती. 

या गाण्यानं मजरूह-ओ.पी.नय्यर-रफी यांना जॉनी वॉकरची नाळ नेमकी सापडली. रफीसोबत गीताचा आवाजही चपखल बसतो हेही लक्षात आलं. पुढचाच सिनेमा होता ‘मि.अँड मिसेस. ५५’ (१९५५). या सिनेमात रफीची खरंच कमाल आहे. गुरुदत्तसाठी ‘उधर तुम हसी हो’सारखं ‘बिना का गीतमाला’ हिट गाणं गाताना, शिवाय अजून तीन गाणी विविध रंगाची गाताना परत जॉनी वॉकरसाठी वेगळा आवाज काढला. हे गाणं होतं-

जाने कहा मेरा जिगर गया जी

अभी अभी यहीं था, किधर गया जी

रफी-गीताच्या सदाबहार गाण्यात याचा समावेश नक्कीच करावा लागेल. मजरूहसारख्या गीतकारानं शब्दांचे केलेले खेळ रफी-गीताच्या तोंडी इतके चपखल बसले आहेत की, ते आपणही नकळत गुणगुणायला लागतो. एरवी या शब्दांना गीतात कुणी फारसं स्थान दिलं नसतं. ‘कहीं मारे डर के चुहा तो नहीं हो गया, कोने कोने देखा ना जाने कहाँ खो गया’ या शब्दांना तसा काय अर्थ आहे? किंवा ‘सच्ची सच्ची कह दो दिखाओ नहीं चाल रे, तुने तो नहीं है चुराया मेरा माल रे’. पण हेच शब्द ओ.पी.नय्यरच्या चालीत रफी-गीताच्या आवाजात असे काही बनून समोर येतात की, आपण आपल्याही नकळत ठेका धरतो.

पहिल्या दोन सिनेमांतील अनुभवांवरून असेल किंवा लोकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादावरून असेल, पुढचं गाणं मजरूह-ओ.पी.नय्यर या जोडीनं अप्रतिम असं तयार केलं. जॉनी वॉकरच्या गाण्यातील हे सगळ्यात दर्जेदार गाणं आहे. गुरुदत्तने केवळ विनोद निर्मिती म्हणून नाही तर आपल्या चित्रपटाचा आशय समृद्ध करणारा घटक म्हणून या गाण्याकडे लक्ष वेधलं आहे. 

ए दिल है मुश्किल है जिना यहाँ

जरा हटके, जरा बचके, ये है बॉम्बे मेरी जान

मजरूहसारख्या गीतकाराची कमाल आहे की, अतिशय साध्या वाटणार्‍या शब्दांमध्ये फार मोठा आशय, मुंबईच्या जगण्याचं नेमकेपण यात पकडता आलं आहे. १९५० नंतर भारतभरच्या लेखक, गायक, नट, दिग्दर्शक यांचा ओघ मुंबईकडे मोठ्या प्रमाणात सुरू झाला. या सगळ्यांना मुंबईच्या ‘बॉलिवुड’नं आपलं मानलं. पोटाशी धरलं. मजरूहने मुंबईचं केलेलं बारीक निरीक्षण, गुरुदत्तला झालेलं मुंबईचं आकलन ओ.पी.नय्यरनं अचूक संगीतबद्ध केलं.

कहीं बिल्डिंग, कहीं ट्रामे, कहीं मोटर, कहीं मिल

मिलता है यहाँ सब कुछ, इक मिलता नहीं दिल

इतक्या साध्या शब्दांत गावांकडून आलेल्या स्थलांतरिताची मानसिकता मजरूह शब्दबद्ध करतो. इथलं व्यवसायाचं भ्रष्ट तत्त्वज्ञान सांगायलाही तसेच शब्द वापरले आहेत

बेघर को आवारा कहते हैं हस हस

खुद काटे गले सबके इसे कहते बिझिनेस

रफीची कडवी संपल्यावर त्याला गीताच्या आवाजात उत्तर आहे- ‘जो है करता वो है भरता, है यहाँ का ये चलन’. अतिशय सोपेपणानं ती मुंबईत जगण्याचं सूत्र त्याला समजावून सांगते. आणि ‘ए दिल है आसान जीना यहाँ’ म्हणत जगण्याची दिशा दाखवते. 

इथं हे गाणं केवळ गाणं उरत नाही. मजरूह-गुरुदत्त-रफी-गीता-ओ.पी.नय्यर-जॉनी वॉकर-कुमकुम सगळ्यांच्याच आयुष्याची मुंबई गाठल्यानंतरची कथा होऊन बसते. हे फार मोठं श्रेय या गाण्याला आहे. त्या वर्षी ‘बिना का गीतमाला’तही हे गाणं हिट ठरलं होतं. 

पुढचा सिनेमा होता ‘प्यासा’ (१९५७). यानं आणि यातल्या गाण्यांनी तर इतिहासच घडवला! यातली गाणी विविध कारणांनी गाजली. पण जॉनी वॉकरच्या तोंडचं गाणं गाजलं ते वेगळ्याच कारणांनी. पुढे चालून ही चाल वडिलांच्या नावावर असली तरी ती आपली आहे, असा दावा राहुल देव बर्मन यांनी केला. आणि सचिनदांनी त्यावर चूप राहून एक प्रकारे मान्यताच दिली. जॉनी वॉकरच्या तोंडचं ते गाणं होतं-

सर जो तेरा चकराये, या दिल डुबा जाये

आजा प्यारे पास हमारे, काहे घबराये 

खरं तर विनोदी गाण्यांत फार आशय शोधण्यात अर्थ नसतो. पण साहिरसारख्या प्रतिभावंताच्या हातात जेव्हा अशी गाणी येतात, तेव्हा ते यात आपल्या प्रतिभेची छाप सोडून जातात. तेव्हाचा प्रभावशाली असलेला डावा विचार नकळतपणे या मालिशवाल्याच्या तोंडी त्याच्या व्यवसायाच्या साध्या कृतीतून उमटला आहे. हे सिद्ध करणारी ‘नौकर हो या मालिक, लिडर हो या पब्लिक, अपने आगे सभी झुके है, क्या राजा क्या सैनिक’ ही ओळ या गाण्यात आली आहे. या गाण्यालाही ‘बिना का गीतमाला’ हिट यादीत स्थान मिळालं होतं. (याच वर्षी ‘नया दौर’मधलं जॉनी वॉकरचे ‘मैं बंबई का बाबू नाम मेरा मस्ताना’ हे गाणंही ‘बिना का गीतमाला’त हिट ठरलं होतं.) 

पुढे ‘१२ ओ क्लॉक’ (१९५८)मध्ये ‘देख इधर ओ हसिना’ आणि ‘कागज के फुल’ (१९५९) मध्ये ‘हम तुम जिसे केहते है शादी’ ही दोन गाणी जॉनी वॉकरची आली. पण त्यात काही वेगळेपण नव्हतं. आधीच्याच पठडीतील गाणी होती. सरळच आहे व्यवसायिक गणितं डोक्यात ठेवून ती चित्रपटात आली होती. 

गुरुदत्तच्या ‘चौदहवी का चांद’ (१९६०) ची आजही आठवण निघते, ते ‘चौदहवी का चांद हो’ या रफीच्या गाण्यावरून. पण यासोबतच यातलं रफीचं दुसरं गाणं ‘मिली खांक में मुहोब्बत’ ‘बिना का गीतमाला’त गाजलं होतं. तिसरंही गाणं रफीच्या आवाजात जॉनी वॉकरसाठी होतं. तेही गाजलं. एकाच गायकाची एकाच चित्रपटातील तीन गाणी ‘बिना का गीतमाला’त हिट व्हायचा दुर्मीळ योग या वर्षी आला. जॉनी वॉकरसाठीचं रफीचं गाणं होतं-

मेरा यार बना है दुल्हा और फुल खिले है दिल के

मेरी भी शादी हो जाये दुवा करो सब मिल के

गुरुदत्तच्या गटात न बसणारा संगीतकार रवी व शायर शकिल या दोघांनीही सुंदर गाणी देऊन संधीचं सोनं केलं. गाण्याला रवीनं कव्वालीचा हलकासा रंग चढवला आहे. ‘चौदहवी का चांद हो’ गाणारा रफी इथं कमालीचा वेगळा सूर लावतो. रफीच्या आवाजात एक आश्चर्य आहे. दिलीपकुमार, देव आनंद, शम्मी कपूर, गुरुदत्त आणि जॉनी वॉकर यांच्यासाठी त्याचा आवाज असा काही लागतो की, तो आवाज त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग वाटावा.

पुढे गुरुदत्तचा ‘साहब बिबी और गुलाम’ आला. पण त्यात जॉनी वॉकर नव्हता. गुरुदत्त गेल्यावर त्याचा अर्धवट राहिलेला चित्रपट ‘बहारे फिर भी आयेंगी’ (१९६६) पडद्यावर आला. त्यात मात्र जॉनी वॉकरचं गाणं होतं- ‘सुनो सुनो मिस चॅटर्जी’. गाणं अर्थातच फार विशेष नाही. ओ.पी.नय्यरनं आपल्या आधीच्याच साच्यात गाणं बसवलं आहे. 

जॉनी वॉकरच्या गुरुदत्त व्यतिरिक्त इतरांच्या चित्रपटातही गाणी आहेत. त्यातील काही तर चांगली गाजलेलीही आहेत. (मधुमती – ‘जंगल में मोर नाचा’, चोरी चोरी- ‘ऑल लाईन किलीयर’, दूर की आवाज- ‘हम भी अगर बच्चे होते’,  रेल्वे प्लॅटफॉर्म- ‘देख तेरे भगवान की हालात’, अजी बस शुक्रिया- ‘सच कहता है जॉनी वॉकर’, ‘घर की मुर्गी दाल बराबर’). ओ.पी. नय्यर किंवा सचिन देव बर्मन यांच्या शिवाय इतर संगीतकारांकडचीही यातील गाणी आहेत. पण जॉनी वॉकरच्या गाण्यांना खरा रंग चढला तो गुरुदत्तकडेच. त्यातही परत संगीतकार ओ.पी. असतानाच. 

या महिन्यात जॉनी वॉकर-रफी-गुरूदत्त तिघांच्याही आठवणी निघतात. तिघांच्याही स्मृतीला अभिवादन. 

(या सदरातील हा शेवटचा लेख आहे. आपण रसिकांनी गेली सहा महिने सदराला उत्तम दाद दिली त्याबद्दल धन्यवाद. ज्येष्ठ लेखक हिंदी गाण्यांचे तज्ज्ञ विजय पाडळकर, जुन्या गाण्यांच्या अभ्यासिका नीलांबरी जोशी यांसारख्यांनी आवर्जुन मेल करून कळवलं. त्यांचे आभार. संपादक राम जगताप, मजकुराची आखणी करणारे कलाकार यांचेही आभार. हे सदर माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहे. रसिकांना ब्लॉगला भेट देता येईल. parbhanvi.blogspot.in असंच ब्लॉगचं नाव आहे. – अाफताब परभनवी)  

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

ADITYA KORDE

Sun , 30 July 2017

जाने कहा मेरा जिगर गया जी...’ या गाण्यातली जुली मला फार आवडली होती -(अभिनेत्री -विनिता भट्ट). “बाते है नजर कि नजर से समझाऊन्गि... म्हणताना तिने केलेले दृष्टीविभ्रम केवळ अप्रतिम. या एका गाण्याने ती अजरामर झाली आहे. तिला ह्या एका चित्रपटामुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली पण तिने त्याच चित्रपटाच्या प्रोडक्शन टीम मधल्या जिमी विनिंग नावाच्या पारशी मेकअप आर्तीस्ट बरोबर लग्न केले, (लग्नानंतर चे नाव यास्मिन) तिनेपुढे काम केले नाही किंवा केले असल्यास मला माहित नाही. पूर्वी गाणं सुरु होताना आधी चित्रपटात वातावरण निर्मिती व्हायची, काही विशिष्ट प्रसंग, नायक, नायिकेचे हावभाव, संवाद झडायचे. नंतर सुरावट वाजू लागायची. म्हणजे प्रेक्षकांना कळायचं कि आता ‘गाणं होऊ घातलय.’ आणि ते सावरून बसत किंवा झोपायची तयारी करत. पण ‘दिल पर हुवा ऐसा जादू...’ ने प्रथमच हे संकेत पायदळी तुडवले. काहीही वातावरण निर्मिती न करता धाडकन ‘दिल पर हुवा ऐसा जादू...’असे शब्द आपल्या कानावर येऊन आदळतात.मज्जा येते. ह्या चित्रपटातले प्रसंग हि तसेच खुमासदार होते. ललिता पवार (सीता देवी ) गुरुदत्तने(प्रीतम) काढलेल्या कार्टून मुळे( हे कार्टून प्रत्यक्षात आर के नारायण यांनी काढले होत एव्हढच नाहीतर चित्रपटात कार्टून काढताना दाखवलेला हात त्यांचाच आहे – रोमन ष्टाइल रथात ललिता पवार बसलेली आहे आणि घोड्याच्या जागी गुरुदत्त आणि मधुबाला यांना दावणीला बांधले आहे असे ते कार्टून आहे ) भडकून त्याला जाब विचारायला जाते तेव्हा तिच्या प्रश्नांना तो फक्त ‘जी हां” एवढेच उत्तर देतो. तो एकूण चार वेळा ‘जी हां’ म्हणतो पण प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने म्हणतो. एवढ कमी म्हणून कि काय शेवटी चिडून जेव्हा ललिता पवार वैतागून “तुमसे तो कोईशरीफ इन्सान बात हि नही कर सकता. मेरा वकील हि तुमसे बात करेगा” असे म्हणते तेव्हा गुरुदत्त ‘ क्यु, आपके वकील साहब शरीफ इन्सान नही है क्या?” असे विचारतो तेव्हा ह्या प्रसंगावर कळस चढतो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख