अजूनकाही
कलाकारांची एक बिरादरी असते. सर्वसामान्य जनतेमध्ये ते किंवा पडद्यामागे काम करणारे असतील, तर त्यांचं काम तुफान म्हणावं इतकं लोकप्रिय असतं. पैसा आणि प्रसिद्धी पायाशी लोळण घेत असते. पण समाजातला 'उच्चभ्रू ' किंवा आपली अभिरूची हीच सर्वोत्तम आहे, असा गंड बाळगणारा अभिजन वर्ग या कलाकारांचं कुणी नाव घेतलं तरी नाक मुरडतो. समीर अंजान उर्फ शीतला पांडे हा असाच एक पडद्यामागचा कलाकार आहे. गीतकार या जमातीला अगोदरच आपल्याकडे प्रसिद्धी मिळत नाही. त्यातच 'मासेस'साठी काम करणाऱ्या कलाकारांवर तर अनेकदा वेगवेगळे ठप्पे मारून त्यांना अदखलपात्र ठरवण्याचं उद्योग नेहमीच चालू असतात.
मागे एक किस्सा वाचनात आला होता. आशा भोसले टॉप फॉर्ममध्ये होत्या, तेव्हा कुणीतरी महान संगीत दिग्दर्शक नौशाद यांना आशा भोसले यांच्याबद्दल त्यांचं मत काय आहे, असं विचारलं. "उनके आवाज से अभी वो 'बाजारूपन' नहीं गया." अशी प्रतिक्रिया नौशाद यांची होती.
तर या 'बाजारूपन'च्या लेबलपासून आशा भोसले यांच्यासारखी महान गायिका सुटली नाही, तर समीरसारख्या गीतकाराची काय अवस्था असेल? डेव्हिड धवन आणि गोविंदाच्या सिनेमांसाठी गाणी लिहिणारा, मिथुनच्या उटी वास्तव्यात तयार झालेल्या सिनेमांची गाणी लिहिणारा, 'दिल, धडकन, मोहोब्बत' अशा पाच सहा शब्दांमध्येच खेळ करून लिहिणारा गीतकार असे अनेक शिक्के समीरवर मारले गेले. पण समीर शांतपणे काम करत राहिला. तो नव्वदच्या दशकात जितकं काम करत होता, तितकंच काम तो आजच्या एकदम वेगळ्या सांगीतिक युगातही करत आहे. सर्वाधिक गाणी लिहिण्याचा (पाच हजारपेक्षा जास्त ) दुर्मिळ विश्व विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. अर्थातच एवढ्या प्रमाणावर काम केल्यावर दर्जात्मक घसरण होणं अपेक्षित असतंच. समीरच्या कामातही असे पॅचेस दिसतातच. पण त्यामुळे त्याचं बाकीचं कर्तृत्व दुर्लक्षित होऊ नये, असं प्रामाणिकपणे वाटतं.
नव्वदच्या दशकातली ती विशिष्ट शैलीतली गाणी आज पण तुफान लोकप्रिय आहेत. कुमार सानू, उदित नारायण, कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सोनू निगम, नदीम श्रवण, आनंद मिलिंद, जतिन ललित आणि अनु मलिक हे त्या सांगीतिक युगाचे चेहरे. पण या सगळ्या मोठ्या नावांना जोडणारा सामायिक दुवा म्हणजे समीर. या सगळ्यांचं समीरशिवाय पान हलत नव्हतं. पण गायकांभोवती किंवा संगीत दिग्दर्शकांभोवती जे वलय असतं, तसं गीतकारांभोवती फार कमी वेळा असतं. त्या काळातली जी सगळी हिट गाणी आहेत, ती बहुतेक गाणी समीरने लिहिली आहेत.
समीरचा जन्म बनारसचा. प्रचंड श्रीमंत सांस्कृतिक वारसा असणारं बनारस. समीरचे वडील अंजान हे स्वतः एकेकाळचे प्रसिद्ध गीतकार. वडिलांचेच गुण मुलामध्ये उतरले. समीरला लहान वयापासूनच शब्दांशी खेळण्याचा चस्का लागला. समीरची फिल्मी कारकीर्द सुरू झाली ती १९८३ साली 'बेखबर' नावाच्या सिनेमापासून. वडील चित्रपटसृष्टीत असूनही समीरचा संघर्ष व त्यातून येणारी अवहेलना चुकली नाही. अनेक लोकांना संशय होता की, समीर जी गाणी लिहितो ती त्याला त्याचेच वडील लिहून देतात. या संशयातून अनेक दिग्दर्शक-निर्माते त्याला 'ऑन द स्पॉट' गाणे लिहून द्यायला सांगायचे. समीरने हे अपमान मुकाटपणे गिळले.
समीरचा तारा बुलंद होण्यासाठी १९९० साली 'आशिकी' यावा लागला. 'आशिकी’मधली गाणी छप्परफाड हिट झाली. 'नजर के सामने, जिगर के पास', 'दिल का आलम', 'अब तेरे बिन जी लेंगे हम' ही गाणी घराघरात वाजायला लागली. असं म्हणतात की, ‘आशिकी’चा अल्बम रिलीज झाल्यावर पुढच्या दोन दिवसांत समीरने बारा पिक्चर साईन केले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या 'दिल'ची गाणी तुफान गाजली. मग समीरला मागे वळून पाहण्याची गरजच पडली नाही. पस्तीस वर्षांच्या कारकिर्दीत समीरने अपवाद वगळता सिनेजगतामधल्या सगळ्या दिग्गज निर्माता, दिग्दर्शक, नायक-नायिका, संगीत दिग्दर्शक, गायक-गायिकांसोबत काम केलं. कित्येक सुपरहिट चित्रपटांची आणि आपण डेली बेसिसवर गात असलेल्या गाण्यांचे बोल समीरचे आहेत, हे आपल्याला माहीत नसतं.
'दिवाना', 'बेटा', 'दिलवाले', 'राजा हिंदुस्तानी', 'सिर्फ तुम', 'कुछ कुछ होता है', 'धडकन', 'तेरे नाम', 'सावरीया', किती नाव घ्यावीत? या चित्रपटांची खासियत म्हणजे या चित्रपटांमधलं प्रत्येक गाणं हिट होतं. संगीत दिग्दर्शकांच्या तब्बल चार पिढ्यांसोबत समीरने काम केलं आहे. राजेश रोशन आणि लक्ष्मीकांत प्यारेलालसारख्या 'ओल्ड स्कुल' संगीत दिग्दर्शकांसोबत समीरने काम केलं आहे. मग नव्वदीच्या दशकात आनंद मिलिंद, नदीम श्रवण, जतीन ललित आणि अनु मलिक यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आहेत. २००० नंतर उदयाला आलेल्या शंकर-इशान -लॉय ,हिमेश रेशमिया आणि प्रीतमसारख्या लोकांच्या गाण्यांनाही शब्द दिले आहेत. आणि आता अरमान मलिकसारख्या नवीन संगीत दिग्दर्शकासोबत तो काम करत आहे. संगीतकारांच्या या प्रत्येक पिढीची काम करण्याची पद्धत, त्यांची संगीत देण्याची शैली, वाद्य संयोजन यांच्यात प्रचंड फरक आहे. समीरने या सगळ्यांसोबत स्वतःला जुळवून घेतलं. वर उल्लेख केलेले अनेक संगीत दिग्दर्शक आऊटडेटेड झाले, काही होण्याच्या मार्गावर आहेत, पण समीर मात्र अजून टिकून आहे!
त्याचं 'शिकारी' चित्रपटातलं 'बहोत खूबसूरत गजल लिख रहा हू' हे आदेश श्रीवास्तवने संगीतबद्ध केलेलं गाणं माझं सर्वाधिक आवडत गाणं आहे. 'कुछ कुछ होता है'चं टायटल साँग, 'तेरे नाम'मधलं 'तुमसे मिलना बाते करना', 'आशिकी'मधलं 'अब तेरे बिन'ही अजून काही प्रचंड आवडती गाणी. समीरच आगमन होण्यापूर्वी आपल्या गाण्यातल्या हिंदीवर उर्दूचा बराच प्रभाव होता. उर्दू ही एक सुंदर भाषा आहेच यात वाद नाही. पण खूपदा श्रोत्यांना गाण्यांमधल्या शब्दांचा अर्थच लागायचा नाही. समीरच सगळ्यात मोठं यश म्हणजे त्यानं गाणी समजून घेणं माझ्यासारख्या सर्वसामान्य श्रोत्यांसाठी सोपं केलं. साधे, सरळ, आपण रोजच्या बोलचालमध्ये वापरतो, ते शब्द वापरून त्याने गाणी लिहिली. त्यामुळे त्याचा 'मासेस'शी जो कनेक्ट आहे, तो फार कमी गीतकारांचा आहे.
हाच समीर जेव्हा 'मैं तो रस्ते से जा रहा था'सारखं गाणं लिहितो, तेव्हा त्याच्या टीकाकारांच्या भुवया उंचावतात. किंवा 'ओले ओले'सारखं गाणं असेल. समीरच्या वाईट गाण्यांची यादी काढायची तर ती मोठी आहे. पण या सगळ्यात तुम्हाला गीतकाराचीही एक बाजू समजून घ्यावी लागते.
डेव्हिड धवनच्या सिनेमातली गाणी लिहिताना गीतकारानं अप्रतिम हळुवार शब्दातली गाणी लिहिणं अपेक्षित आहे का? पिटातल्या प्रेक्षकाला अपील होणारी, हलकी फुलकी विनोदी सिच्युएशनमधली गाणी बनवण्यात डेव्हिड धवनचा हातखंडा आहे. तिथं अशी हळुवार गाणी लिहून कसं चालेल? शेवटी सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तिथं त्याचाच शब्द चालतो. कुठलाही गीतकार सतत मनाप्रमाणे सुंदर गाणी लिहू शकत नाही. कारकिर्दीचा मोठा भाग मनाविरुद्ध व्यावसायिक तडजोडी करण्यातच जातो. त्यातूनच मजरुह सुलतानपुरीसारख्या प्रतिभावंताला 'सी ए टी कॅट माने बिल्ली'सारखं गाणं लिहावं लागतं आणि राजेंद्र कृष्णनसारख्या गीतकाराला 'ईना मीना डिका'सारखं गाणं करावं लागतं. समीर वर अनेकदा अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या जावेद अख्तर साहेबांनाही हे भोग चुकलेले नाहीत. समीर ज्यांना आपला आदर्श मानतो, त्या आनंद बक्षींनाही अनेकदा तडजोडी कराव्या लागल्याचं. हे अनेक सर्जनशील व्यक्तींचं प्राक्तन आहे. यातून सुटका नाही.
समीरला कधीही जावेद अख्तर, गुलजार, मजरुह सुलतानपुरी, शैलेंद्र यांचा दर्जा मिळाला नाही. उलट 'मासेस'साठी गाणी लिहिणारा आणि मर्यादित कुवत असणारा गीतकार म्हणून हेटाळणीच त्याच्या पदरी आली. हेच प्राक्तन त्याने ज्यांच्या सोबत जास्त काम केलं आहे, अशा डेव्हिड धवन, गोविंदा, आनंद मिलिंद अशा लोकांच्याही नशिबी आलं आहे. त्याची काही कारणं आहेत. आपल्याकडे अजूनही साठीचं दशक, संगीताचा तथाकथित सुवर्णकाळ, राज कपूर-देव आनंद-दिलीपकुमार, अमिताभ बच्चन यांचा हँगओव्हर लोकांच्या आणि विशेषतः माध्यमात लिखाण करणाऱ्या लोकांच्या मनातून उतरलेला नाही.
नव्वदच्या दशकातला सिनेमा आणि संगीत हे काही अपवाद वगळता पिटातल्या आणि श्रमिक वर्गाला समोर ठेवून तयार केला जायचा. सध्याचा जो अभिजन आणि ओपिनियन मेकर म्हणवून घेणारा वर्ग आहे, त्याने याला कायमच नाकं मुरडली. अर्थात आपापली आवडनिवड असते हे मान्य आहेच. पण यांच्या नाक मुरडण्यामुळे त्या काळातला सिनेमा-संगीत जे आजही ग्रामीण भागात आणि छोट्या शहरांमध्ये पाहिलं आणि ऐकलं जातं, त्याची नोंद कधीच माध्यमांमधल्या मुख्य प्रवाहांनी घेतली नाही. समीरसारख्या कलावंताला या अनावस्थेचा फटका बसला. त्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव हे की, जो वर्ग त्याची गाणी ऐकत होता आणि आज ऐकतो त्यालाही ही गाणी समीर नावाच्या गीतकारानं लिहिली आहेत हे माहीत नाही. त्याच्या गाण्यांना एक तर गायकाच्या नावाने (उदाहरणार्थ - कुमार सानूची गाणी) किंवा अभिनेत्याच्या चेहऱ्याने (उदाहरणार्थ - अजय देवगणची गाणी) ओळखलं जातं. कुणीही ‘समीरची गाणी’ असा या गाण्यांचा उल्लेख करत नाही. कुठल्याही कलावंताला याच्यापेक्षा मोठी वेदना असूच शकत नाही. समीरच्या नशिबी हीच वेदना वारंवार आली. आजही छोट्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भारतातल्या काळ्या पिवळ्या, अनधिकृत ट्रॅव्हल्स गाड्या, प्लॅस्टिकच्या खुर्च्या असणाऱ्या आणि चकण्यात फुटाणे कॉम्प्लिमेंटरी देणाऱ्या बारमध्ये समीरची गाणी वाजतात. समीरच्या गाण्यांना कुठल्याही उच्चभ्रू मुशायऱ्यांमध्ये किंवा गजल नाइट्समध्ये स्थान नाही. पण कॉलेज गॅदरिंगमध्ये 'तेरी उम्मीद तेरा इंतजार करते है' किंवा 'तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम'सारखी गाणी पोर वर्षानुवर्षे म्हणत आली आहेत . प्रत्येक शापाला उशाप असतो असं म्हणतात. प्रेक्षक, अभिजन वर्ग यांच्याकडून मिळालेल्या समीरला मिळालेल्या दुर्लक्षाच्या शापावर, सर्वसामान्य लोकांनी त्याच्या गाण्यांवर केलेलं बेहद प्रेम हा उ:शापाचा उतारा असावा.
लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment