टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • राहुल गांधी, अबु आझमी, दिवाकर रावते, नितीश कुमार आणि तेजस एक्सप्रेस
  • Fri , 28 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi अबु आझमी Abu Azmi दिवाकर रावते Diwakar Raote नितीश कुमार तेजस एक्सप्रेस Tejas Express

१. घाटकोपरमध्ये कोसळलेल्या सिद्धीसाई इमारतीतल्या रहिवाशांच्या आरोपांनुसार सोसायटीतील अध्यक्ष, सचिवासह प्रमुख चार पदे आरोपी शितप याच्या कुटुंबाने आपल्याकडे घेतली होती. त्यामुळे त्यांच्या मनमानीला धरबंध उरला नव्हता. शितपने तळमजल्यावरील तीन खोल्या एकत्र करून त्या व्यावसायिक उद्देशाने भाड्याने दिल्या होत्या. शितप या रुग्णालयाचा मालमत्ता कर स्वतंत्रपणे भरत होता. स्वतंत्र जलवाहिनीही जोडून घेतली होती. वर्षभरापूर्वी रहिवासी जागेत रुग्णालय कसे काय सुरू झाले, याबाबतच्या तक्रारी पालिकेला ‘मिळाल्याच’ नाहीत.

केबलच्या धंद्यातून हा शितप मोठा झाला आणि शिवसेनेचा पदाधिकारी बनला. असे शेकडो शितप आपल्या आसपास आहेत. कोणी बुर्जीची गाडी चालवत होता, कोणी रिक्षा, कोणी भुरट्यांची गँग... राजकीय पक्षांच्या आशीर्वादाने ही मंडळी गडगंज होतात, तेव्हा त्यांच्या अवतीभवती गोंडा घोळणाऱ्यांत, साहेब साहेब म्हणून लाळ घोटणाऱ्यांत मध्यमवर्गीयही कमी नसतात. यापुढे असल्या कोणत्याही गल्लीगणंगाला साहेब म्हणताना आपल्या डोक्यावरचं छत आणि पायाखालची जमीन आपण अकलेबरोबरच गहाण टाकली आहे आणि इमारतीखाली चिरडून घेण्याची पात्रता कमावली आहे, याचं भान ठेवायला हवं.

.............................................................................................................................................

२. नितीश कुमार भाजपला जाऊन मिळणार, हे मला तीन-चार महिन्यांपूर्वीच मला माहिती होतं, असा गौप्यस्फोट काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. राहुल म्हणाले, नितीश यांनी बिहारमधील जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. यापूर्वी ते मला भेटले होते, तेव्हा त्यांनी या निर्णयाबद्दल चकार शब्दही काढला नव्हता. तरीही नितीश कुमार असे काहीतरी करणार, याची गेल्या तीन-चार महिन्यांपासून मला कुणकुण होतीच, असे राहुल यांनी सांगितले. बिहारच्या जनतेने जातीयवादी शक्तींविरोधात लढण्यासाठी नितीश कुमार यांना मते दिली होती. मात्र, वैयक्तिक राजकारणासाठी नितीश यांनी त्याच शक्तींशी हातमिळवणी केली आहे.

बरं का राहुलजी, मी किनई लवकरच भाजपबरोबर हातमिळवणी करून तुम्हा सगळ्यांना तोंडघशी पाडणार आहे बरं का, तयार राहा आपल्या फट्फजितीला, असं नितीश यांनी सांगितलं नाही, हे चुकलंच थोडं त्यांचं. ते राहुल यांना शोधायला प्राथमिक शाळेत गेले असणार. त्यांची अजून बालवाडी पूर्ण झालेली नाही, याची त्यांना कल्पना नसणार. आपल्या कल्पनाशून्य नेतृत्वामुळे आपण काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याचं महात्माजींचं स्वप्न पूर्ण करण्याकडे निघालो आहोत, हे राहुल यांना कळणार कधी? विसर्जनानंतर ‘हाता’वर ‘प्रसाद’ मिळेल, तेव्हा?

.............................................................................................................................................

३. मी ‘वंदे मातरम्’चा सन्मान करतो, पण देशातील कोणताही सच्चा मुसलमान कधीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही, मग मला देशातून बाहेर काढलं तरी चालेल, असं वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केलं. अबू आझमींच्या विधानावर शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं असून ‘वंदे मातरम्’ला विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं, असं दिवाकर रावतेंनी म्हटलं आहे. मद्रास हायकोर्टाने दोन दिवसांपूर्वी प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये ‘वंदे मातरम्’ म्हणणं बंधनकारक केलं आहे.

‘मादर-ए-वतन भारत की जय’ ही भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातली घोषणा अजीमुल्ला खान यांनी दिली होती. भारतात मादर-ए-वतन या नावाच्या कितीतरी मुस्लिम संघटनाही आहेत. याची कल्पना अबुनाना आणि रावतेतात्या यांना नसावी. विषय कशाच्याही सक्तीचा आहे आणि ती सक्ती देशावरच्या प्रेमापेक्षा मुस्लिमांत अमुक गोष्ट मानत नाहीत ना, मग तीच करून घ्या, या अधर्मी अट्टहासातून आलेली आहे. या गणंगांना आपल्या परंपरांच्या नावाखाली सुरू असलेल्या धुडगुसांच्या आणि मध्ययुगीनतेचं मात्र प्राणपणाने रक्षण करायचं असतं. तात्या आणि नाना एकमेकांच्या ‘दुकानां’ची काळजी उत्तम प्रकारे घेत आहेत. दुसऱ्याचं टिकलं तर आपलं टिकेल, याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे.

.............................................................................................................................................

४. मुंबई-गोवा अंतर झपाट्यानं पार करणाऱ्या लोकप्रिय तेजस एक्स्प्रेसमध्ये हवाई सुंदरींच्या धर्तीवर प्रवाशांच्या खानपान सेवेसाठी रेल्वे सुंदरींची नेमणूक होणार आहे. मुंबई ते करमाळी मार्गावर चालणाऱ्या तेजस एक्स्प्रेसमध्ये या रेल्वे सुंदरी हिंदी आणि इंग्रजीत प्रवाशांशी संवाद साधू शकतील. कंत्राटी तत्त्वावर या रेल्वे सुंदरींची भरती करण्यात येईल.

तेजस एक्स्प्रेस दरम्यानच्या काळात कशासाठी कुप्रसिद्धी पावली होती, याचा प्रशासनाला विसर पडला की काय? विमानातल्या प्रवाशांना ‘हवेत’ असल्याचा जरा तरी धाक असतो. इथं चेन ओढ आणि पळ अशी सोय आहे. सरकारी संपत्ती ही बापाची संपत्ती आहे, असं मानण्याची सगळ्या सामाजिक स्तरांमध्ये भिनलेली घाणेरडी वृत्ती आहे. तिचं गलिच्छ दर्शन तेजसने प्रथमच प्रवास करणाऱ्यांनी घडवलं होतं. आपले सदाबुभुक्षित लोक हवाई सुंदरींचाही नजरेनं विनयभंग करण्यात पटाईत आहेत. इथं तर रेल्वे आहे. दर रेल सुंदरीमागे रेल्वे सुरक्षा दलाचे दोन दोन हत्यारबंद जवान पुरवणार असाल, तर ठीक... नाहीतर आणखी भयावह बातम्या येतील तेजसमधून.

.............................................................................................................................................

५. गेल्या १५ वर्षांत भारतातल्या पावसाचं प्रमाण वाढत गेल्यामुळे मध्य आणि उत्तर भारतातल्या दुष्काळी परिस्थितीत परिवर्तन झाल्याचं अमेरिकेतल्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ने (एमआयटी) केलेल्या अभ्यासात आढळलं आहे. भारतातील जमीन आणि समुद्रावरील तापमानात अदलाबदल झाल्यामुळे प्रामुख्याने हा बदल झाला आहे. ‘नेचर क्लायमेट चेंज’ या जर्नलमध्ये ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. १९५० ते २००२ या कालावधीत मध्य व उत्तर भारतात पडणाऱ्या पावसाचं प्रमाण दर वर्षी कमीकमी होत गेलं. २००२नंतर मात्र विपरित परिणाम दिसू लागला आणि मध्य व उत्तर भारतातील पावसाचं प्रमाण वाढत गेलं आणि गरजेपेक्षा जास्त पाऊस या भागांमध्ये पडू लागला, असं ‘एमआयटी’चे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ शिएन वांग यांनी नमूद केलं आहे.

आमच्याकडे पाऊस का पडतो, याचा आम्ही अभ्यास करत नसताना अमेरिकेतल्या या शास्त्रज्ञांना या उचापत्या सांगितल्यात कुणी? पर्जन्यदेव वगैरे प्रगत आणि शाश्वत विज्ञानाचं ज्ञान नसल्याचा परिणाम. या वेडपटांना तापमान वगैरेंचा अभ्यास करून कारणं शोधायला लागतात. आमच्याकडे आम्ही गायीच्या तुपात, गायीच्या शेणाच्या गोवऱ्या जाळून होम हवन करतो, त्यातून निर्माण होणारा धूर डासांपासून कॅन्सरच्या विषाणूंपर्यंत (असतात असतात, नंतर तुम्हालाही सापडतील, तेव्हा कळेल) सगळं काही मारत मारत वर पोहोचतो आणि पावसाचे ढग त्या पवित्र धुराचं दर्शन घ्यायला गोळा होतात, तेव्हा पाऊस पडतो. जरा गुजरात-राजस्थानातल्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केलात, तर तुम्हाला आमचं पुरातन आधुनिक ज्ञान कळत जाईल.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......