डॉ. हेमू अधिकारी हे रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या क्षेत्रांतील एक लक्षणीय नाव. व्यवसायाने शास्त्रज्ञ असलेले, लोकविज्ञान चळवळीत, अण्वस्र विरोधी शांतता चळवळीत काम करणारे अधिकारी त्यांच्या रंगकर्मी-सिनेअभिनेते या ओळखीबरोबरच आपल्या विवेकशील वैज्ञानिक दृष्टिकोनासाठीही ओळखले जातात. ४५ नाटकं, १६ मराठी व हिंदी चित्रपट आणि ७ मालिकांमध्ये काम केलेल्या अधिकारी यांचे ‘नाट्य विज्ञान समाजेन’ हे पुस्तक नुकतेच सृजन प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. ‘आत्मचरित्र लिहिण्याएवढा मी मोठा नाही’ या विनम्र भावनेने त्यांनी आपल्या आयुष्यातील काही मोजक्या आठवणी या पुस्तकात सांगितल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या काही लेखांचाही समावेश या पुस्तकात केला आहे. या पुस्तकाला नाट्यसमीक्षक, कथाकार, कवी राजीव नाईक यांनी प्रस्तावना लिहिली आहे. तर नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी यांनी ‘पुस्ती’ या नावाने पुस्तकाच्या शेवटी ‘जे न लिही हेमू’ असा दीर्घ लेख लिहिला आहे. त्या लेखाचा हा संपादित अंश...
.............................................................................................................................................
‘जुलूस’च्या सुमारे सव्वाशे प्रयोगानंतर १९७८च्या दरम्यान एक दोन नाटकानंतर ‘बहुरूपी’ बंद न करता बंद झाली. मिटिंग वगैरे घेऊन, ठराव वगैरे पास करून, नाटकाच्या कॉलमात बातमी वगैरे देऊन, दरवाजावर ‘क्लोज्ड’ असा फलक लावून संस्था बंद झाली नाही. कारण असल्या कागदी सवयी आम्हाला नव्हत्या. विजय कुळकर्णी सभावृत्त वगैरे काही लिहायचा. ती त्याच्या व्यवस्थितपणाची आणि व्यवस्थापनाची सवय होती. बंद न करता ‘बहुरूपी’ विराम पावली. एक एक मोतीबिती वेगवेगळ्या दिशांना घरंगळले.
सुभाष राणे आमच्यातला सर्वांत तरुण आणि नावीन्याची तीव्र ओढ असलेला, पाश्चात्य नाट्यवाङ्मयाचा अभ्यास असलेला उत्साही रंगकर्मी. दोन नाटकानंतर त्यालाच अमेरिकेत स्थायिक व्हावे लागले. विद्याधर सहस्त्रबुद्धे, आमच्या बिनपैशाचा अर्थमंत्री. अमेरिकेत नोकरदार झालेला आणि घरदार घेतलेला. शिरीष कर्णिक, शरद कानडे न परतीच्या वाटेनं निघून गेलेले! उरलेले ‘तुम्ही व्हा पुढे, आम्ही आहोतच मागे’ या कुळीतले. मदतनीस. श्रमिक रंगकर्मी. राहता राहिलो आम्ही दोघे. मी आणि हेमू. पैकी मी बारा पिंपळावरचा मुंजा, एकटा हेमू काय करणार? नाटकं होती, पण मनुष्यबळ नव्हतं. आपोआपच ‘बहुरूपी’ थांबली आणि तरीही ती राहिलीच. हे म्हणजे ‘रंगायन’ संपली तरी ती ठिकठिकाणी ‘उरली आणि मुरली’ या प्रकारे ‘बहुरूपी’ राहिली नाही. ते द्रष्टेपण आमच्याकडे नव्हतं. ‘बहुरूपी’ राहिली म्हणजे माणसं राहिली. फुग्यातली हवा जावी आणि फुगा रहावा तशी. सुंभाचा पीळ तसाच राहिला.
असे सगळेच विखुरलेले असले तरी कुठच्या ना कुठच्या बंधनाने ‘बहुरूपी’ला जोडले गेलेले होते.
हेमू त्या सगळ्यांशीच संपर्क ठेवून होता. शिरीष कर्णिक अकस्मात तरुणपणी न परतीच्या वाटेने निघून गेला. त्याची बायको आता सासूबाई झाली आहे. पण ती नेहमी ‘बहुरूपी’च्या कार्यक्रमांना आवर्जून येते. थांबली ती नाटकं, राहिली ती माणसं. आणि ती ‘बहुरूपी’ची म्हणूनच राहिली. या सर्वांना घट्ट बांधणारा किमयागार होता हेमू आणि एकमेव हेमू. “बहुरूपीनं तुम्हाला काय दिलं?’’ या प्रश्नाचं उत्तर, “घट्ट राहणं दिलं’’ हे आहे. आणि हे बंध घट्ट ठेवले गेले, राहिले ते केवळ हेमूमुळेच. हेमूला सतत प्रत्येक ‘बहुरूपी’वाल्यांची काळजी, कुणाचं काही दुखलं, खुपलं, आनंदात, संकटात पहिली धाव असायची हेमूचीच. ‘बहुरूपी’ हे कुटुंब झालं, राहिलं त्याचं कारण हेमू. प्रत्येकाच्या कुटुंबातच आणि कुटुंबाचाच तो आहे. कुणाच्या घरात जरा काही खुट्ट घडलं की हेमूला फोन. “हेमू घरात मस्त रंग काढलाय, तू ये, पार्टीचं ठरवूया.’’ हेमू प्रत्येकाला चालना द्यायचा. जो तो एकत्र जमायला, पार्टी करायला निमित्त शोधायचा. मग नातवाचं बारसं देखील ‘बहुरूपी’ला बोलावायला पुरेसं असायचं. दरवर्षीच्या ३१ डिसेंबरला तर ‘बहुरूपी’ची कुठेतरी सहल ठरलेलीच.
आणि हेमूने एक नियमचं करून टाकलेला. अगदी नाटकं करत असल्यापासूनचा. एकट्यादुकट्याला मज्जाव. पत्नीसह सामील व्हायचं. या सगळ्यांच्या बायकांना एवढी चटक लागली की, मग त्या पतींशिवायच एकत्र भेटायच्या. आपोआप ‘बहुरूपी’ची एक महिला शाखाच निर्माण झाली. पुरुषपात्र विरहित नाटक करायची टूम असती, तर बायकांचं नाटकही त्यांनी केलं असतं. नाटक करत होतो तेव्हा याच बायकांपैकी कुणीतरी प्रयोगानंतरची पुरीभाजी करून आणीत असे आळीपाळीने. संगतीचा परिणाम म्हणून त्यांनाही नाटकाची चव कळायला लागली होती. प्रयोगानंतरच्या मसालेदार फ्लॉवरच्या रस्साभाजीला मुकावं लागेल, या भयाने कुणी आपल्या पत्नीला नाटकात घेण्याचा आठाह मात्र केला नाही. त्यामुळे सगळ्यांच्या बायका नवऱ्याच्या नाटकाच्या समीक्षका झाल्या. त्या मग आपणच जमत आणि कुठच्या कुठच्या नाटकाला जात. नाटक संपल्यावर आपसात त्या प्रयोगावर चर्चाही करीत. मग हे नाटक ‘बहुरूपी’ने केलं असतं तर कुणी कुठली भूमिका करायची हेही त्या ठरवत. नाटक संपल्यावर रवींद्र नाट्य मंदिराच्या बाहेर पडताना एक दुसरीला म्हणे, “तिकडच्या ग्रीन रूममध्ये पोळीभाजी देत असू ना; आणि इकडच्या पायरीवर बसून चर्चा, या समोरच्या हिरवळीवर बसून गप्पा. आता रवींद्रला ती ग्रीन रूम नाही, त्या पायऱ्या नाहीत, ती हिरवळ नाही आणि ‘बहुरूपी’ची ती नाटकंही नाहीत. सर्वांची एकच इच्छा, आपल्या मुलाबाळांनी तरी आता ‘बहुरूपी’ची बालनाट्य शाखा काढायला हवी. नाटक म्हटलं की पहिलं स्मरण ‘बहुरूपी’चं आणि ‘बहुरूपी’चंच आणि हे सगळं घडण्यामागचा सूत्रधार हेमू.
हेमू जेवढा माझ्या कुटुंबातला होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मी त्याच्या कुटुंबातला होतो. माझ्या लेखन हौसेबद्दल माझ्या मातापित्याकडून क्वचितच कौतुक झालं असेल, पण हेमूची आई मात्र नेहमी शाबासकी देत राहायची. गिरगावच्या कमळाबाई हायस्कूलमध्ये त्या अध्यापिका होत्या. भूगोल आणि नागरिकशास्त्र शिकवायच्या. त्यांच्या शाळेच्या गॅदरिंगला माझ्याकडून त्यांनी खास नृत्य-नाट्यच लिहून घेतलं होतं. आता फक्त त्या नृत्य-नाट्याचं शीर्षक तेवढं आठवतं. ते होतं ‘पाण्याला लागली तहान’. पाण्यावरचे धरण-बंधारे असा काही भौगोलिक विषय. माहिती आईनीच पुरवली होती. केवळ शाब्दिक कौतुकापर्यंत न थांबता आईनी प्रत्यक्ष कृतीतून मला उत्तेजन दिलं होतं. हेमूच्या घरी बेसन लाडवांचा खमंग वास पसरला की कमीत कमी दोन नगावर तरी माझं नाव लिहिलं जायचं. मग माझी फेरी कितीही दिवसांनी झाली तरी डब्याच्या तळाशी शिल्लक राहिलेले ते दोन लाडवाचे नग माझ्यासारख्या नगाच्या हातातोंडाची वाट बघत असायचे. त्यानंतर डबा खराखुरा रिकामा व्हायचा. खरं तर लाडवांच्या डब्याची ही पॉपर्टी बाळ कोल्हटकरांच्या नाटकांतली. पण त्या दिवसात (१९७० दरम्यान) ती प्रॉपर्टी बहुधा प्रत्येक पांढरपेशा मध्यमवर्गीयाच्या घरातल्या फळीवर असायची. बाळ कोल्हटकरांची नाटकं लोकप्रिय होण्याचं हेही एक कारण असावं!
एका बाजूला हेमू ‘बहुरूपी’च्या पालकत्वाची जबाबदारी सांभाळत होता, तर दुसऱ्या बाजूला त्याला स्वत:च्या नाट्यविषयक जाणिवाही समृद्ध करायच्या होत्या. आविष्काराच्या नवनव्या आव्हानांना सामोरं जायचं होतं. व्यावसायिक नाटकात त्याचा जीव रमणं शक्यच नव्हतं. ती मंडळी अधिकाधिक नाटकीपणाकडे झुकलेली, तर हेमूचा पूर्णपणे वास्तवाभिमुख दृष्टिकोन. स्वाभाविकतेकडे कल. काही वेगळे सुचवले तरी बाजारू वृत्ती ते स्वीकारत नाही. परिणामी व्यावसायिक नाटकात ‘अळीमिळी गुपचिळी’ हेच धोरण त्याला अवलंबावे लागले. त्या घुस्मटीत तो फार काळ राहिला नाही. तुलनेनं दिलीप प्रभावळकरांच्या हलक्याफुलक्या वास्तव कॉमेडीजमध्ये तो रंगून गेला. ‘हसवा फसवी’ आणि ‘चूकभूल द्यावी घ्यावी’चे तुफानी हास्य निर्माण करण्यात दिलीप बरोबर त्याचाही महत्त्वाचा सहभाग होता.
प्रायोगिक समांतर नाटकांतून त्याच्या अभिनयाने चांगलीच बाजी मारली. राजीव नाईक यांच्या ‘जुलूस’मधला मुन्नाला घेऊन वाटा धुंडाळणारा बाप उत्तम होता! ‘अखेरचे पर्व’मधील इतिहासकाराची भूमिका मला खूप आवडली होती. ‘पगला घोडा’मधली त्याची व्यक्तिरेखा कायम लक्षात राहण्याजोगी. ‘मॅकबेथ’मधली त्याची चेटकीण विलक्षण वेगळी होती. मनवा नाईक हिच्या तृतीयपंथीयांच्या वेदनेवरील ‘दोपहरी’ चित्रपटात हेमूने भेदकतेचा वेगळाच प्रत्यय दिला.
‘जुलूस’ नाटकात मला गुरुदेवच्या भूमिकेत, कंबरेत वाकून गोलाकार उभ्या राहिलेल्या पात्रांच्या पाठीवरून उड्या मारतच वावरायला लावले होते. आपल्या भूमिकेवरून उड्या मारणारा उडाणटप्पू गुरुदेव या देहबोलीवरून समजत असे. पण तोपर्यंत मला प्रेक्षकांतच एक प्रेक्षक बनूनच बसावं लागत असे. मी हेमूचा ‘बाप’ बघत राहण्यात मशगुल होत असे. प्रत्येक वेळी तो मला नवनवीन भासत असे.
चळवळीचा आणि नेतृत्वाचा गुण हा त्याचा वारसाच होता. छबिलदास शाळेच्या संचालक मंडळात तो होता. अंधश्रद्धा निर्मूलन सस्थेचे काम तो करत असे. शास्त्रीय दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी जणू त्याने स्वत:ला वाहूनच घेतलं होतं. ‘आंतरनाट्य’च्या ‘सांधा’ नाटकाच्या २५ व्या प्रयोगाचे निमित्त साधून समांतर नाटकवाल्यांची एक फेडरेशन निर्माण झाली होती. ‘समांतर नाट्यमंच’ दामू केंकरे व हेमू अधिकारी त्यात अग्रणी होते. हेमूने काही दिवस अथक परिश्रम घेऊन या संघटनेसाठी एक घटनाही तयार केली होती. महत्त्वाचे म्हणजे या घटनेत ‘समांतर नाटक म्हणजे नक्की काय?’ याची चर्चा करून ‘समांतर रंगभूमी’ची व्याख्याही केली होती.
तो रक्ताचा वैज्ञानिक आहे. म्हणजे त्याच्या रक्तात एक पेशी वैज्ञानिक ज्ञानाचीच आहे. त्याला अभिनयाव्यतिरिक्त दिग्दर्शनाचीही आसक्ती होती. ‘बहुरूपी’ची सगळी नाटकं (‘अपत्य’ व ‘हे समय उत्ताल समय’ वगळता) त्यानेच दिग्दर्शित केली होती. त्याला ‘केस ऑफ ओपनहायमर’ आणि ‘हिरोशिमा’ ही अणुबॉम्ब दुर्घटनेवर आधारित, विज्ञान प्रश्नावर आधारित नाटकं दिग्दर्शित करायची होती. आर्किमिडीजवरचं नाटकही त्याला करायचं होतं. विज्ञान आणि नाटक असा एक सांधा जुळवण्याचा तो प्रयत्न करत होता. पण त्या वेळी नाटकवाली ‘बहुरूपी’ नव्हती. यामुळे ते सारं राहून गेलं.
हेमू नास्तिक आहे. देवधर्म तो मानत नाही. पूजा-अर्चांचा त्याला तिटकारा आहे. त्याचे आजोबा होते तेव्हा घरात देव होते. आजोबांनंतर हेमूच्या आईने त्या देवांना घरी पाठवले, म्हणजे कुणाकुणाला देऊन टाकले. देणारा तो देव म्हणतात. आईने देवांनाच देऊन टाकलं. आता काय म्हणावं? बायकोनं आईच्या नंतर देव मागच्या दारानं घरात आणले. आता ते देव्हाऱ्यात गुण्यागोविंदाने कर्मकांडाशिवाय नांदत आहेत. हेमूने विरोध केला नाही. ती प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे अशी त्याची धारणा आहे. तो स्वत: मात्र देवांच्या भानगडीत नाही. आम्ही सहलीला जायचो. तिकडच्या देवळात सगळी ‘बहुरूपी’ची जोडपी देवदर्शनाला जायची. पण हेमूने कधी कुणाला अडवलं नाही.
समातंर प्रायोगिक नाटकं करणाऱ्यांनी प्रयोगापूर्वी नारळ फोडण्याच्या, रंगमंचाची पूजा करण्याच्या, पडद्याला हार वगैरे घालणाच्या कृतीचा त्याला राग यायचा. अजूनही येतो. पण तो त्याने स्वत:कडेच ठेवला. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार त्याने केला, पण नास्तिकतेचा प्रचार त्याने केला नाही. गणपतीला पहाटेपासून रांगा लावणार्या, संबंध दिवस फुकट घालवणाऱ्या बी.ए.आर.सी.च्या शास्त्रज्ञांबद्दल मात्र त्याला तीव्र संताप येतो. कॉम्प्युटर हाताळणाऱ्याने त्या यंत्राची गंध, फुलं, अक्षता वाहून पूजा करण्यातला प्रचंड विरोधाभास त्याला असह्य होतो.
‘बहुरूपी’चे आम्ही लोक जमायचो. धुंवांधार चर्चा करायचो. एखाद्या विषयावर टोकाची मतं जोरजोरात मांडली जायची. मूर्ख, बेअक्कल, अडाणी, अशा शिव्या नसलेल्या शिव्यांपासून अस्सल शिवराळपणापर्यंत मजल जायची. आणि बऱ्याच वेळाने आगपाखड थंड व्हायची. जणू पूर्वी काही घडलंच नाही आणि मग शांतता आणि खेळीमेळी. एकदा तर आमच्यातल्या भांडणाला ऊत आला. अगदी कडेलोट झाला. विद्याधर रागारागाने तरतरा निघून गेला. कुठल्यातरी कारणामुळे हेमू भयंकर संतापला होता. लता (हेमूची बायको) हेमूला म्हणाली, “आता काही विद्याधर आपल्या घरी येणार नाही. तुमच्याशी बोलणार नाही.’’ योगायोग असा की तिचं हे वाक्य संपतं न संपतं तोच विद्याधरचीच घराखालून हाक आली ‘हेमूऽऽ’!
संस्थेची गरज म्हणून मी नाटकांचा अनुवादक झालो. हेमूने मलाच हाताशी धरला. मला लेखनाचा छंद होताच. हेमू माझी काही वाक्यं कापणार, हे गृहीत धरून मी जरा जास्तच संवाद लिहायचो. कापून कापून किती कापणार? एक दोन वाक्यं ठेवावीच लागत. तेवढ्याने माझी हौस भागत असे! त्यामुळे हेमूच्या काटछाटीला मी कधीच नाखुषी दर्शवली नाही. पण हेमूमुळे नाटकाच्या बेतशीरपणा मला कळला; ज्याच्या भावी काळात माझ्या नाट्यसमीक्षेला उपयोग झाला. राजकीय नाटकाच्या समीक्षेसाठी मला हेमूची खूप मदत झाली.
‘बहुरूपी’मधल्या हेमूबद्दल सांगताना ‘बहुरूपी’च्या बाहेरच्या हेमूबद्दल काही शब्द उमटवणे गरजेचंच आहे. कारण ती स्वत:हून बोलणार नाही. मुळात आत्मवृत्तालाच त्याची पसंती नव्हती, पण आमच्यासारख्या अनेक मित्रांचा आग्रह त्याला मोडता येणं अशक्य झालं म्हणून तो प्रस्तुत लेखनाला तयार झाला.
कितीतरी नावारूपाच्या नाट्यस्पर्धांना तो परीक्षक म्हणून दक्षतापूर्वक काम करायचा. तो परीक्षक असला की गुणी स्पर्धक चिंतामुक्त असत. एखाद्या नाटकाबद्दलचं त्याचं मत नाट्यक्षेत्रात महत्त्वाचं मानलं जातं. रंगकर्मी आपल्या नाट्यप्रयोगांबद्दल त्याला विचारतात आणि तो त्याच्या पद्धतीने विश्लेषण करतो. राजकीय नाटकांबद्दल तर तो फारच तीव्रतेने बोलतो. एक प्रकारे त्याची ही न छापलेली नाट्यसमीक्षा होती. ‘बहुरूपी’ नंतर तर तो ‘आंतरनाट्य’ या प्रायोगिक नाट्यसंस्थांच्या नाटकात रमला. ‘आंतरनाट्य’ने आमचा हेमू हायजॅक केला असं मी म्हणणार नाही - तिथं तो ‘बहुरूपी’चा एक प्रतिनिधीच होता.
‘राजसंन्यास’मधल्या हिरोजीसाबाजीच्या मैत्रीचा वारसा सांगणारी हेमूची आणि माझीही मैत्री एवढी टिकली कशी, याचं कित्येकांना आश्चर्य वाटतं. आम्हा दोघांचे स्वभाव एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न. तो एका विशिष्ट राजकीय विचारधारेशी बांधलेला. मी कुठच्याच पक्षाचा नाही. बिलकुलच उजवा नाही आणि टोकाचा डावाही नाही. हेमू तसा पूर्वाश्रमीचा शीघ्रकोपी. बराचसा गंभीर. मी नाटक सोडून सगळ्याच गोष्टी चेष्टेवारी नेणारा. मला ललित साहित्याची आवड. लिहिण्याची खुमखुमी. हेमूला वैचारिक आणि राजकीय लेखन अधिक पसंतीचे. मला अलंकारिक भाषेचा हव्यास, तर त्याचा निखळतेचा अट्टाहास. त्याला पारंपरिकता त्याज्य, मी त्या पारंपरिकतेत आधुनिकता शोधण्याच्या प्रयत्नात (उदा. माझं ‘नाटक ठेवणीतली’ हे पुस्तक). त्याचा सामाजिक व राजकीय भान जेवढं तीव्र, तेवढं माझं अजिबात नाही. अशी अनेक स्तरांवरची प्रकृतीभिन्नता असूनही आमची मैत्री अतूट राहिली. कारण आमच्या दोघांचा जिव्हाळ्याचा विषय नाटक. नाटक आमच्यापेक्षा मोठं आहे, तेच ‘लार्जर दॅन लाईफ’ आहे, अशी आमची दोघांची पक्की खात्री. आम्ही दोघं आपापल्या मग दुराप्रमाणे ती उंचावण्याच्या प्रयत्नात. नाटकातील वेगळपणाचा शोध हेच आमच्या दोघांच्या अभेद्य मैत्रीचं सिमेंट. हिरोजीसाबाजी यांच्या पुढे शिवाजी महाराज हे दैवत होतं तसं आमच्यासमोर मात्र कुठलंच दैवत नव्हतं; नाटक हाच एक मैत्रीचा जुळणारा धागा असावा.
आता एकेकाळचे कार्यप्रवण आम्ही ‘बहुरूपी’वाले सगळेच बोनस वर्षांमध्ये गेलो आहेत. ज्येष्ठ नागरिकत्व भूषवत आहेत. (सौ. रश्मी वैद्य व प्रभाकर चिंचोळकर अलीकडेच निवर्तले.) एकमेकांकडे येण्याजाण्याऐवजी स्वत:च्याच प्रकृतीची आंदोलने मोजत आहोत. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीगाठी नाहीत. एकत्र जमणं, गप्पा मारणं मंदावलं आहे. मात्र मोबाईल, व्हॉट्सअप, व्हिडिओ कॉल यांच्यामुळे आता ‘बहुरूपी’ इलेक्ट्रॉनिक झाली आहे. काही काळानंतर वेगळ्या जगात आम्ही एकत्र असू आणि तिकडेही नव्याने ‘बहुरूपी’ची स्थापना करू - नक्कीच. (ही उपमाही हेमूला पटणार नाही म्हणा.
.............................................................................................................................................
नाट्य विज्ञान समाजेन : वृत्त आणि विचार – डॉ. हेमू अधिकारी
सृजन प्रकाशन, नवी मुंबई
पाने - २६४, मूल्य – ३०० रुपये.
.............................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3747
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment