अजूनकाही
‘कुट् गेल्तो? लई दिसापास्नं दिसंना झाल्तो?’ अशा प्रश्नाला ‘आईय, कुटंबी नाई. तशीच आत्ता दिसलाव’, असे उत्तर ऐकून आले की समजावे ही प्रश्नोत्तरे उदगीरच्या माणसांमध्ये चालू आहेत. ‘उग्गी चिडवू लालाय व्हो तुम्हाला ह्यानं... ह्येनंच कुट गायप झाल्ता की......’ अशी थट्टा तिसरे वाक्य घेऊन आले की तुम्ही या संभाषणात निमंत्रण नसताना उडी ठोकणारच. कारण उदगीरचे कोणी कित्येक दिवसांनी भेटलेले असते अन् तुमची जीभ पाणीपुरीला जशी चटावलेली तशी या भाषेसाठी आसुसल्याचे तुम्हाला जाणवले असते. कर्ता-कर्म-क्रियापद-काळ-लिंग या चाकोरीत अन् शिस्ती रूळलेली तुमची जीभ मग अशी सैराट सुटते की विचारू नका. जिव्हाळा, ओढ, मोह अशा अनेक भावना चक्क अनोळखी माणसांशी उत्पन्न करणारी ही भाषा केवळ एकमात्र, एकुलती एक आहे. कारण आमचे उदगीर कर्नाटकाच्या हद्दीवचर वसले आहे. कन्नड भाषा उदगीरच्या मराठीची मावशीच. ७० कि.मी.वरील बीदर ओलांडले की तेलंगणा-आंध्र प्रदेशाची सुरुवात. त्यामुळे तेलुगूचाही तेलंगी मामा उदगीरच्या मराठीला लाभलेला. मग, व्याकरण, लय, उच्चार आणि हेल यांचा एक खास उदगिरी प्रकार जिभेवर अन् कानावर कायम तरळत राहतो. उर्वरित महाराष्ट्रातील लोक कधी हसतात. कधी बुचकळ्यात पडतात तर कधी नक्कल करायला जाऊन फसतात. त्यामुळे आम्ही उदगिरी लोक आमची भाषा शुद्ध बोलणार्यांनाच मानतो. उदगीरजवळील कुमठा गावचे प्रसाद कुमठेकर असेच शुद्ध उदगीर भाषक असून ‘बगळा’ ही कादंबरी त्याच भाषेत लिहून काढून ‘लई बंबाट काम केलाय बगा त्यानं.’
अत्यंत चौकस व बोलका चिंत्या पाचवीला. त्याच्यासोबत त्याचा एक खास मित्रगट. सगळे सारखेच उदगिरी. क्रिकेट खेळतांना चेंडू हरवला जातो आणि सुरू होते. एक मोहीम पैसे जमवून चेंडूची परतफेड करण्याची. अचानक तळ्यात बगळे पकडून नेणारे दिसतात अन् चिंत्याला वाटते की आपणही बगळा पकडून विकावा. म्हणजे मार खाण्यापासून वाचू तरी. हे सारे डोक्यात घोळवत हुशार चिंत्या दुपारनंतर शाळा बुडवू लागतो. इकडे निम्न मध्यमवर्गीय घरातील सारे त्या काळचे प्रश्न घर अस्वस्थ करत असतात. बेकारी, चणचण, अपेक्षाभंग, स्वप्नभंग आणि परंपराचा जाच त्या ब्राह्मण कुटुंबास आणखीनच केविलवाणे करत असतो. पण लेखक त्यातच गुंतत नाही. त्याने अनेक पात्रांच्या मुखातून कथानक मांडत मांडत कादंबरीतील औत्सुक्य ताणले आहे. भाषा मात्र खास उदगीरची. फक्त एक वर्गमित्र बोबडा असतो. ते बोबडेपणही अगदी नेमके नोंदवलेले.
या कादंबरीत एक शाळा, त्यातील शिक्षक आणि कथानायकाला समजावून घेणारा मुख्य शिक्षक यांचीही मोठी रंजक रचना आहे. आम्हा मराठवाड्यातल्या लोकांना कायम पाठ्यपुस्तके अन् नाटके-कथा-कादंबर्या यातून कोकणी नाहीतर पुणेरी वा मुंबईच्या शाळांची वर्णने वाचावी लागावी. कैक वर्षांनी कुमठेकरांचे उदगीरच्या शाळेचे पात्र तसे वठले की रूखरूखच लागावी. मराठवाड्यातील शिक्षक तसे त्याच भाषेत बोलणारे. त्याच परिसरात जन्मून वाढलेले. त्यामुळे सर्वांच्या समस्या ओळखून त्याप्रमाणे वागणारे. चिंत्याची बरीच मोठी घडण ही शाळा करते याचे कारण तो ज्या परिस्थितीत अन् वातावरणात जगतो, तिथे शिक्षणाशिवाय दुसरा मार्गच नाही सुखी होण्याचा. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जोडीलज्ञ उदगीरने आर्य समाज, स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसजन, संघ परिवार अशांच्याही शाळा चालवल्या. एकंदर ध्येयवादी अन् प्रेरक वातावरण. गावही चळवळ्या लोकांचे, त्यामुळे शिक्षण व त्यामधील संस्था-व्यक्ती मराठवाड्यातल्या लेखकांच्या लक्षात कायम राहतात.
या कादंबरीत एक करुण असे मात्र आहे. गोविंदकाकाचे. आमच्या लहानपणी कित्येक घरात एकाकी माणसं असायची. दात पुढे आल्याने लग्न थांबलेल्या मुली, पांढरे केस अकालीच उगवल्याने सतत चिंताक्रांत झालेली मुले; देवीचे वण, आवाळू, कोड, अपंगत्व म्हणजे लकवा, कुरूपता यांनी छळलेले तरुण-तरुणी फार दिसायचे. गोविंदकाकाला कुबड आहे. तोही हुशार असून कुबडा असल्याने अडकून पडलेला आहे. त्याचा उद्वेग अन् त्याचा नोकरीचा शोध चिंत्याच्या बगळ्यांच्या शोधाला समांतर आहे. या कुबड्या काकाच्या पाठीची शस्त्रक्रिया करण्यासाठी चिंत्या पैसे जमवण्याचा इरादा बाळगून आहे. त्यासाठीही तो बगळे पकडायच्या नादाला लागलेला आहे.
चिंत्याचे मित्र विविध जातींचे आहेत. सार्यांना चिंत्याच्या ब्राह्मणी वर्तनाचे अप्रूप. त्याचे बोलणे, सभ्यतेचे जगणे, रात्री एकत्र जेवणे, वेळेवर अभ्यास करणे, ज्ञानासाठी धडपडणे अशी ग्रामीण भागातील अनेक बालसुलभ आकर्षणे व त्याची आपल्या घरच्यांशी तुलना करणे या कादंबरीत व्यवस्थित आले आहे. ११ रुपयांचा क्रिकेटचा सवंगड्याचा चेंडू चिंत्याकडून हरवतो हे त्याच्या मनाला इतके लागते की, तो अपमान, नुकसान आणि भरपाई यांनी झपाटला जातो आणि त्या भरात शाळेच्या बाहेरचे जग जवळ करतो. ही अपराधी भावना दहा वर्षांच्या मुलात कशी येते? तिचा शोध म्हणजे ‘बगळा’ आहे का? लिंगायत, कोमटी, न्हावी, मराठा, मुसलमान अशा मित्रांच्या संगतीत एक सात्त्विक, पापभीरू अन् भित्रे पोर कसे खुलत जाते याची कहाणी म्हणजे ही ‘बगळा’ आहे का? तसे पाहिले तर बगळा हे प्रतीक धूर्तपणाचे, संधीसाधूपणाचे आणि चिकाटीचेही. बकध्यान ही लबाडीने वा चातुर्याने स्वार्थ साधणार्याला चपखल बसणारी उपमा. तसा कथानायक अजिबात नाही. तो आतून बाहेरून पांढरा आहे. त्याच्या आयुष्यात ना काही अकस्मात, ना काही अचानक सरळ रेषेत जगणे, पण एकाएकी चेंडू भरून देण्याची मिळालेली धमकी अन् त्यासाठी केलेली तगमग म्हणजे प्रत्यक्षाप्रत्यक्ष झालेल्या चुकीची भरपाई करण्याचा प्रामाणिकपणा हा ‘बगळा’ दाखवतो. त्यामध्ये निरागसता आहे, तसा एक आत्मच्छल आहे अन् दोषमुक्त होण्याची धडपडही. परंतु हे सारे झाले अत्यंत मजेदार, अस्सल उदगिरी भाषेत. मराठी साहित्यात जमा झालेली एक वेगळी अभिव्यक्तीच ही!
बगळा - प्रसाद कुमठेकर
पार पब्लिकेशन्स, मुंबई
पाने - २८०, मूल्य - ३००रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3745
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment