गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हा अभिवादन ग्रंथ डॉ. पी. विठ्ठल व डॉ. नागोराव कुंभार यांच्या संपादनाखाली प्रकाशित केला. डॉ. आंबेडकरांच्या वैचारिक योगदानाची सर्वस्पर्शी चर्चा करणाऱ्या या पुस्तकाची नुकतीच दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. त्यातील एका लेखाचा हा संपादित अंश….
.............................................................................................................................................
बाबासाहेबांनी आपल्या हयातभर कटुता पत्करून अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. या लढ्याने फुलेंप्रणीत जातीलढ्याला गती मिळाली. नवे परिमाण मिळाले.
डॉ. आंबेडकरांच्या जीवित कार्याचा वरवर विचार केला तर असे दिसते, की त्यांनी केवळ अस्पृश्यतेच्या प्रश्नालाच प्राधान्य दिले; पण या प्रश्नावर लढताना त्यांनी न्यायाच्या तत्त्वाचे भान सोडले नव्हते. त्यामुळेच या लढ्यामागची त्यांची वैचारिक भूमिका व्यापक प्रश्नांचे संदर्भ घेऊन येते. त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध आणि अस्पृश्यांचे लढे उभे केले. पण त्या पाठीमागे अस्पृश्यता हा प्रस्थापितांचा सर्वाधिक किडलेला, सर्वाधिक अन्यायपूर्ण घटक आहे, अशी भूमिका दिसते. अस्पृश्यताविरोधी लढ्याची व्याप्ती त्यांनी हिंदू तत्त्वज्ञानांविरुद्धच्या वैचारिक लढाईपर्यंत नेली. हिंदू समाजव्यवस्था, जातीप्रथा आणि तिचे समर्थन करणारी तत्त्वज्ञाने यांचा त्यांनी प्रतिवाद केला. प्रस्थापिताचा सर्वांत अन्यायपूर्ण घटक आणि एकूणच प्रस्थापित विचारव्यूह यांच्या उच्चाटनाची भूमिका बाबासाहेब घेतात. म्हणूनच हिंदू तत्त्वज्ञानाची परखड चिकित्सा त्यांच्या लिखाणात आढळते. प्रस्थापिताचे उच्चाटन करून त्या जागी श्रेयगर्भ समाज-व्यवस्था आणणे, असा बाबासाहेबांच्या जीवितकार्याचा गाभा सांगता येईल. अशी श्रेयगर्भ समाजव्यवस्था आणि तिच्याशी सुसंगत मूल्य व्यवस्था यांचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांच्या लिखाणात, विचारात दिसतो.
उदारमतवाद आणि समाजवाद
उदारमतवादी विचारविश्वाचा बाबासाहेबांवर प्रभाव होता. विशेषत: राजकीय व्यवस्थेसंबंधीच्या त्यांच्या विचारात हा उदारमतवाद डोकावतो; बाबासाहेबांवर उदारमतवादाचा प्रभाव होता हे म्हणणे अनेकांना अयोग्य वाटते. बाबासाहेबांनी नियोजित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार केला होता. मग त्यांची गणना उदारमतवादी म्हणून कशी करायची, असा प्रश्न विचारला जातो.
व्यक्तिवाद आणि समूहकल्याण यांच्यातील तणावांची डॉ. आंबेडकरांना स्पष्ट जाणीव होती. समकालीन समाजवादी विचार आणि चळवळीबद्दल ते जागरूक तर होतेच पण त्या विचारांचा प्रभावही डॉ. आंबेडकरांवर पडला होता. तथापि, उदारमतवाद आणि समाजवाद यांच्यातून एकाचीच निवड करणे त्यांना फारसे पसंत नसावे. त्याऐवजी उदारमतवादी राजकीय प्रेरणा आणि समाजवादाची परिवर्तनाची दृष्टी यांची सांगड घालण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
आपल्या आयुष्याच्या अखेरीस लोकशाही मूल्ये आणि समाजवादी मूल्ये यांचा संयोग त्यांनी बुद्ध धम्माच्या चौकटीत घडवून आणला. मात्र, या सर्व प्रयत्नांमध्ये त्यांनी उदारमतवादी प्रेरणांचा पूर्णपणे त्याग केला असेही दिसत नाही. उदारमतवाद आणि समाजवाद यांच्यातील वैचारिक द्वंद्वाचे प्रतिबिंब त्यांच्या मांडणीत पडल्याचे जाणवत राहते. त्यामुळेच कम्युनिस्टांच्या ‘क्रांतिवादा’ बद्दल ते साशंक होते; (बहिष्कृत भारत, २७ सप्टें १९२९, ‘अभ्यासाची साधने’ खंड २, पृ. ३२४) आणि तरीही ‘कम्युनिस्टांचे ध्येय आत्यंतिक असले तरी ते अयोग्य आहे, असे आम्ही म्हटले नव्हते.’ (ब. भा. १५ नोव्हे. १९२९, उपरोक्त, पृ. ३३७) असाही खुलासा ते करताना दिसतात.
स्वातंत्र्य-समता-बंधुभाव
या वैचारिक द्वंद्वाचा परिपाक म्हणजे डॉ. आंबेडकरांच्या लिखाणात, विचारात उदारमतवादाचा शिक्का बसलेली तत्त्वे येतात; पण त्यांचा पुरस्कार केलेला असतो तो मात्र परिवर्तनवादी संदर्भात. डॉ. आंबेडकरांच्या विचारात सातत्याने ज्यांचा उल्लेख येतो ती तत्त्वे म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव ही तत्त्वे होत. लोकशाही राज्यपद्धती, समाजवाद, राज्यसमाजवाद. हिंदू तत्त्वज्ञानाची चिकित्सा, धम्म या विविध संदर्भातील बाबासाहेबांच्या विचारात एक समान सूत्र दिसते. ते म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वत्रयींचा पाठपुरावा त्यांच्या लेखनात आणि भाषणांतही या तत्त्वांचा पुनःपुन्हा उल्लेख येतो.
महाडच्या परिषदेपुढे केलेल्या भाषणापासून (१९२७) तर ‘बुद्ध अँड हिज् धम्म’ (१९५७) पर्यंतच्या लेखनात; तसंच इतर अप्रकाशित लेखनातही स्वातंत्र्य, समता, बंधुभाव यांचे संदर्भ येतात; त्यांचा पुरस्कार केलेला दिसतो. म्हणजे या तत्त्वांचा पाठपुरावा त्यांनी जीवनाच्या कोणत्या तरी एकाच टप्प्यावर केला असे नाही तर हयातभर केला. तसेच हा पुरस्कार जीवनाच्या एखाद्याच क्षेत्रापुरता नाही. म्हणजे फक्त समाजकारणात ही तत्त्वे आणि आर्थिक किंवा धार्मिक बाबतीत दुसरी असे होत नाही. सामाजिक व्यवहारांच्या सर्व क्षेत्रासाठी या तत्त्वांचा पुरस्कार बाबासाहेब करतात. त्यांच्या दृष्टीने ही तत्त्वे सर्वस्पर्शी आहेत.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे त्यांनी आदर्शच मानले. ‘अॅनायइलेशन ऑफ कास्ट’ मध्ये ते म्हणतात, ‘‘मला विचाराल तर माझा आदर्श समाज म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावावर आधारित समाज असेल.’’ (WS खंड १, पृ. ५७) ऑक्टोबर १९५४मध्ये आकाशवाणीवरून केलेल्या भाषणातही त्यांनी या तत्त्वांचा आपले ‘सामाजिक तत्त्वज्ञान’ म्हणून स्पष्टपणे उल्लेख केला आहे.
या सर्व विवेचनाचा निष्कर्ष असा, की स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वांचा उल्लेख डॉ. आंबेडकरांच्या विचारात अनेक ठिकाणी येतो एवढेच या त्रिसूत्रीचे महत्त्व नाही, तर त्यांच्या सर्व लिखाणातही या तीन तत्त्वांशी सुसंगत अशीच मांडणी आढळते. सर्व मानवी संबंध या तत्त्वांवर आधारित असावेत असा त्यांचा आग्रह होता. उदाहरणार्थ, ‘बहिष्कृत भारत’. डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘समता हे सार्वजनिक नीतीचे एक मुख्य तत्त्व आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक व आर्थिक बाबतीत समतेचे तत्त्व लागू करणे म्हणजे समाजरचना नीतीच्या पायावर करणेच होय; (अभ्यासाची साधने, खंड २, पृ. २९८-९९) म्हणजेच डॉ. आंबेडकरांंचे तत्त्वचिंतन; राजकीय विचार, धर्मचिकित्सा या तिन्हींमध्ये या तत्त्वांचा पाठपुरावा आढळतो; राजकारण, अर्थव्यवहार आणि धर्मकारण यांना या तत्त्वांचाच आधार असावा असा त्यांचा आग्रह होता.
स्वातंत्र्य
स्वातंत्र्य, समता, बंधुभावाचा आपला आग्रह भांडवलशाही विचाराच्या चौकटीतला नाही हे डॉ. आंबेडकरांनी अन्यत्रही स्पष्ट केले आहे. इतकेच काय पण आपला या तंत्रासाठीचा आग्रह म्हणजे श्रमजीवी जनतेचा या तत्त्वांसाठीचा आग्रह आहे असेही ते सुचवतात.
मताधिकार, मूलभूत अधिकार यांचा केवळ घटनेत समावेश करणे पुरेसे नाही, त्या अधिकारांचा उपयोग करण्याची क्षमता आणि मुभा असली पाहिजे यावर बाबासाहेबांचा भर होता. स्वातंत्र्य म्हणजे जीवितवित्ताचे हक्क घटनेत नोंदवणे एवढेच नाही. अगदी व्यक्तीचा विचार केला तरी व्यक्ती विकासाच्या संधी प्रत्यक्ष उपलब्ध असणे म्हणजे स्वातंत्र्य. अशा स्वातंत्र्यात केवळ व्यक्तिवादी हक्कांना फारसे महत्त्व रहात नाही तर समाजातील भिन्न गटांना, विशेषत: शोषित जनसमूहांना स्वातंत्र्यभोगासाठीच सामर्थ्य प्राप्त करून देणे हाच स्वातंत्र्याचा अर्थ ठरतो; बाबासाहेबांना स्वातंत्र्याचा हा भावात्मक अर्थच अभिप्रेत होता.
डॉ. आंबेडकर ‘स्वातंत्र्य’ ही कल्पना प्रस्थापित मर्यादित अर्थानी वापरत नव्हते; सामान्य जनांना स्वातंत्र्य मिळणे म्हणजे दडपण आणि शोषणापासून अभय मिळणे असा अर्थ त्यांना अभिप्रेत होता. या अर्थानी त्यांचा स्वातंत्र्याविषयक विचार हा समताविचाराशी संलग्न असाच आहे. स्वातंत्र्य आणि समता या परस्परविरोधी बाबी न राहता ते परस्परपूरक आणि एकमेकांना आशय आणि अर्थ प्राप्त करून देणारे विचार ठरतात. म्हणूनच स्वातंत्र्याचा अर्थ सांगता सांगता ते संधीच्या समानतेपर्यंत पोचतात आणि ‘एक व्यक्ती एकमत’ या सूत्राऐवजी ‘एक व्यक्ती एक मूल्य’ या सूत्रापर्यंत येतात, अशा प्रकारे स्वातंत्र्य आणि समता यांच्यातले द्वैत संपतं आणि एका तत्त्वाचा पाठपुरावा म्हणजे दुसर्याचाही पाठपुरावा ठरतो.
समता
समतेच्या तत्त्वाचे उल्लेख डॉ. आंबेडकरांच्या विचारात अनेक ठिकाणी येतात; पण समतेची चर्चा त्यांनी फारशा विचाराने केलेली नाही. त्यांचा मुख्य रोख विषमतेविरुद्ध होता. हिंदू समाजातील जातीव्यवस्था हा त्यांना समता आणि स्वातंत्र्य यांच्या प्रस्थापनेतला मुख्य अडथळा वाटत होता. त्यामुळे जातींची निर्मिती कशी झाली, त्यांचे उच्चाटन कसे करता येईल या प्रश्नांची चर्चा त्यांनी सातत्याने केलेली दिसते. जातीव्यवस्थेमुळे हिंदू समाज विस्कळीत झाला आहे आणि जातींच्या श्रेणीबद्ध रचनेमुळे विविध जातींनी एकत्र येऊन या व्यवस्थेचा मुकाबला करण अशक्य आहे, असं ते म्हणतात. प्रामुख्याने हिंदू समाजाचा विषमाधिष्ठित व्यवहार आणि त्याला मान्यता देणारी विषमतामूलक हिंदू तत्त्वज्ञान यांच्यावर प्रकाश टाकणारे लेखन बाबासाहेबांनी केले आहे.
निव्वळ समतेपेक्षा समान दर्जा, समान संधी, न्याय्य वाटप यांचे महत्त्व बाबासाहेबांना जास्त वाटत होते. टोकाचा व्यक्तिवाद जसा ते नाकारतात तसाच समाजातील विविधता भरडून टाकणारा समूहवादही त्यांनी नाकारला. त्यामुळेच केवळ समतेच्या उद्घोषापेक्षा न्याय कल्पना त्यांना महत्त्वाची वाटते. Equality आणि Equity यात फरक करून ते न्यायात्मकतेचा पाठपुरावा करतात.
बंधुभाव
स्वातंत्र्य आणि समता यांच्यापेक्षाही डॉ. आंबेडकरांना बंधुभावाचे तत्त्व जास्त महत्त्वाचे वाटते. स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांवरील हल्ले थोपवण्याचे काम बंधुभावनाच करेल असा त्यांचा विश्वास होता. आपल्या सभोवतालच्या मानवमात्रांबद्दलचे प्रेम हीच स्वातंत्र्य समतेविरुद्धच्या हल्ल्याविरुद्धची खरी हमी आहे; बंधुभावामुळे समाजात संवाद, सहकार्य आणि सहजीवन यांना वाव मिळतो. समाज गतीक्षम बनतो. Social endosomosis हे बंधुभावाचे लक्षण त्यांनी ‘अॅनायइलेशन’मध्ये सांगितले आहे. (WS खंड १, पृ. ५७) समाजातील विविध गटांमध्ये दुरावा असेल तर प्रत्येक गटाची ध्येये, वाटचाल ही वेगवेगळी राहतील पण बंधुभाव असेल, तर त्या समाजाच्या मुळाशी एकच उद्दिष्ट असेल. केवळ आपापल्या गटाभोवतींची कोंडाळी म्हणजे ‘समाज’ नाही. समकेंद्री समाजरचना हे Social endosomosisचे वैशिष्ट्य असते. प्रत्यक्ष दृश्य व्यवहारांमध्ये विविध समाजघटक उत्तरोत्तर अधिकाधिक एकात्म होण्याची प्रक्रिया म्हणजे Social endosomosis. त्या पाठीमागे अर्थातच भावनिक एकात्मता असली पाहिजे. कोणत्या तरी अमूर्त आवाहनातून होणारे ऐक्य किंवा त्या अमूर्तांशी स्वत:ला जोडल्याच्या खोट्या आभासातून होणारा ऐक्यभ्रम हा वायफळ आणि अल्पजीवी असतो. अशी ऐक्यभावना कृत्रिम असते. ती बहुधा दुसर्या कुठल्या तरी उद्दिष्टाने उभारलली गेलेली असते; बंधुभावामुळे सर्वच समाजगट आंतरिक ऊर्मीतून एकत्र ढकलले जातात. ही एकत्र ढकलेली जाण्याची प्रक्रिया endosomosis मध्ये अभिप्रेत आहे. परस्परांबद्दलचा आदर, आपलेपणा आणि प्रेम म्हणजे बंधुभाव या भावना निसर्गत: विकसित व्हायला हव्यात. व्यूहरचना म्हणून design नव्हे, तसेच हे प्रेम कशाकरता? तर सर्व जण हे आपल्यासारखेच मानव आहेत आणि त्यांचे आणि आपले आयुष्य माणूस म्हणून एकमेकांच्या आयुष्याशी जोडलेले आहे म्हणून. थोडक्यात, ही बंधुभावना निर्व्यांज असेल; साधनभूत instrumental नसेल म्हणजे या समाज घटकाकडून काही तरी साधायचेच तर चला आपण त्यांना आपलेसे वाटेल असे वागू. अशा हिशेबातून बंधुभाव येत नाही.
स्वातंत्र्य, समता, बंधुभाव यांच्याविषयीची निव्वळ तत्त्वचर्चा करणे हा काही डॉ. आंबेडकरांचा हेतू नव्हता. भारतीय समाजाची उभारणी या तत्त्वांच्या आधारे करावी असे ते सांगत होते. म्हणजेच त्यांच्या या विचारांना कृतिशीलतेची जोड होती. आपल्या समाजात ही तत्त्वे आणणे जिकिरीचे आहे आणि त्यासाठी क्रांतिकारक व्यवहाराची गरज आहे, असा इशाराही त्यांनी १९२७च्या (डिसेंबर) महाड परिषदेत दिला होता. अस्पृश्यता निवारण किंवा अस्पृश्यांवरील अन्याय दूर करणे या कामाची व्याप्ती काय आहे हे डॉ. आंबेडकरांनी ओळखले होते. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, ‘अस्पृश्यांचे किंवा दलितांचे कैवारी’ हे डॉ. आंबेडकरांचे वर्णन अपुरे का ठरते ते त्यांच्या अस्पृश्यता निवारणाबद्दलच्या विचारांनीच स्पष्ट होते. अस्पृश्यता निवारण्यासाठी जातीव्यवस्था मोडली पाहिजे आणि जातीव्यवस्थेच्या उच्चाटनासाठी चातुर्वर्णाची व्यवस्था नष्ट केली पाहिजे, असे प्रतिपादन ते करतात. ‘कोणाचे मरण कशात आहे हे ओळखूनच त्यावर मारा करावयाचा असतो.’ असे सांगून सामाजिक रोगाचे निदान कशात आहे याची पूर्ण जाणीव न झाल्यामुळे त्याच्या परिहारांचे प्रयत्न निष्फळ ठरतात असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (अभ्यासाची साधने; खंड २, पृ. १८३)
आंबेडकर विचार आणि परिवर्तनावाद्यांपुढील आव्हाने
माझ्या आत्तापर्यंतच्या मांडणीचा सारांश असा सांगता येईल, की बाबासाहेबांच्या लेखन-भाषणामधील तत्कालीन राजकारणाचे आणि वाद-प्रतिवादाचे संदर्भ बाजूला केले तर १) त्यांच्या सर्व चिंतनामध्ये एक सातत्य असल्याचे लक्षात येते. शोषणरहित समाज, सहजीवन कसे निर्माण करता येईल याबद्दलचे हे चिंतन आहे. २) स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही या सहजीवनाची तात्त्विक बैठक असून डॉ. आंबेडकरांनी राजकारण, धर्म, अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रांमध्ये ही तत्त्वे प्रमाण मानून विचार मांडले; स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वांचा स्वीकार करताना डॉ. आंबेडकरांनी त्यांच्यात उदारमतवादापेक्षा अगदी वेगळा आशय समाविष्ट केला. ३) या तत्त्वांच्या आड येणार्या जात आणि वर्ग या घटकांचा संघर्षपूर्ण मार्गांनी मुकाबला करण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या तत्त्वांचा पाठपुरावा करणे याचा अर्थ प्रस्थापित व्यवस्थेच्या परिवर्तनाचा पाठपुरावा करणे असा होतो. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे हे परिवर्तन मूल्य व्यवस्था आणि समाजव्यवस्था दोन्हींमध्ये आहे. ४) ‘ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही’ यांचा मुकाबला करणे याचाच अर्थ जातीविहीन आणि वर्गविहीन समाजासाठी झगडणे. ५) डॉ. आंबेडकरांनी निर्देशित केलेले दोन्ही शत्रू आज सुसंघटित आणि प्रबळ आहेत. इतकेच नाही तर त्यांचे साटेलोटेही आहे. या परस्परसंबंधांमुळे जातीसंस्थेला भौतिक पाठबळ नव्याने प्राप्त होत असलेले दिसते.
सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संपादक – डॉ. पी. विठ्ठल, डॉ. नागोराव कुंभार
डायमंड पब्लिकेशन्स, पुणे, पाने – ३०२, मूल्य – २५० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3743#
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment