औटघटकेची कवचकुंडले
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • अर्णब गोस्वामी यांची एक भावमुद्रा
  • Thu , 03 November 2016
  • अर्णब गोस्वामी टाइम्स नाऊ Arnab Goswami Times Now

‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी परवा अचानक राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांमध्येच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. इंग्रजीतले लंडनस्थित स्तंभलेखक सलिल त्रिपाठी यांनी ट्विट केलं की, ‘How will we know now what the nation wants to know?’  अर्णबच्या बाजूने आणि विरुद्ध ट्विटसचा धबधबा सुरू झाला. फेसबुकवरही राजीनाम्याची चर्चा रंगायला लागली. अदानी सुरू करत असलेल्या वृत्तवाहिनीमध्ये अर्णब जाणार असल्याच्या बातम्या संध्याकाळपर्यंत येत होत्या. नंतर अशी बातमी आली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स समूहाला फोन करून अर्णबचा राजीनामा स्वीकारू नये असं सांगितलं. अशा वेगवेगळ्या बातम्या इतक्या वेगाने पसरत होत्या की, अर्णबच्या राजीनाम्याची खातरजमा व्हायलाही बराच वेळ लागला. ती नंतर झाली, पण अर्णबने कुठल्याही प्रसारमाध्यमाशी बोलणं कटाक्षानं टाळलं. किंबहुना कुणालाही त्याच्यापर्यंत पोहचण्यात यश आलं नाही. त्यामुळे अर्णबने नेमक्या कुठल्या कारणांमुळे राजीनामा दिला, हे कारण कालपर्यंत तरी गुलदस्त्यातच होतं. अर्णबने आपल्या संपादकीय सहकाऱ्यांशी बोलताना आता स्वतंत्र माध्यमाची गरज निर्माण झाली असल्याचं सांगितलं. त्याचाच हवाला बहुतेक माध्यमांनी दिला.

अर्णबच्या राजीनाम्याची बातमी सोशल मीडिया, ऑनलाईन प्रसारमाध्यमं यांवर कमालीची चर्चेची ठरली. इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रांमध्ये काल त्याच्या बातम्या आतल्या पानांमध्ये छापूनही आल्या. थोडक्यात, वर्तमानपत्रांनी त्याच्या राजीनाम्याची फारशी दखल घेतली नसली, तरी सोशल मीडिया, ऑनलाईन माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर तो चर्चेचा विषय ठरला. अलीकडच्या काळात कुठल्याही संपादकाच्या राजीनाम्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली नाही.

प्रदीर्घ काळ ‘इंडियन एक्सप्रेस’चे मुख्य संपादक असलेल्या शेखर गुप्ता यांनी तीनेक वर्षांपूर्वी स्वतःच्या संपादकपदाचा राजीनामा दिला. शेखर गुप्ता देशातल्या एका आघाडीच्या वर्तमानपत्राचे संपादक होते. हे वर्तमानपत्र निष्पक्ष, तटस्थ आणि समतोल दृष्टिकोनामुळे ओळखलं जातं. गुप्ता यांचा समावेश भारतातल्या टॉप फाइव्ह संपादकांमध्ये केला जात असे. तरीही त्यांच्या राजीनाम्याचीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली नव्हती. त्यानंतर सीएनएन-आयबीएनमधून राजदीप सरदेसाई, सागरिका घोष आणि त्यांचंच भावंड असलेल्या आयबीएन-लोकमतमधून निखिल वागळे बाहेर पडले, तेव्हाही त्याची चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती. या संपादकांचेही सोशल मीडियावर काही हजारांमध्ये चाहते आहेत. त्यांच्या विरोधकांची संख्याही तितकीच मोठी आहे. तरीही त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधल्या लोकांपलीकडे फारशा चर्चिल्या गेल्या नाहीत.

अर्णब गोस्वामी मात्र या सर्वाला सणसणीत अपवाद ठरले. त्याचं कारण आहे, त्यांची आक्रमक, आक्रस्ताळी पत्रकारिता! मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये अर्णबविषयी फारसं कुणी बरं बोलतं नव्हतं, मात्र देशभरात त्याची लोकप्रियता इतर कुठल्याही वृत्तवाहिनीच्या संपादकापेक्षा जास्त होती. त्याच्या आक्रस्ताळ्या स्वभावाला नाकं मुरडणारेही त्याच्या कार्यक्रमात नित्यनेमाने हजेरी लावत असत. कारण अर्णब हा भारतीय मध्यमवर्गाचा ‘डार्लिंग’ झाला होता. त्यामुळे त्याच्या कार्यक्रमात न जाणं हा स्वत:चाच तोटा करून घेण्यासारखं होतं. त्यामुळे ‘कार्यक्रमात जाऊन फारसं काही बोलता आलं नाही तरी चालेल, पण आपण ‘टाइम्स नाऊ’वर दिसलं पाहिजे’, ही अनेकांची मनीषा असायची. अनुपम खेर, रझा मुराद यांसारख्या पक्षपाती लोकांना तर अर्णबचा कार्यक्रम हे आपला अजेंडा राबवण्याचं व्यासपीठ वाटत होतं. कारण अर्णबची भूमिका आणि त्यांची भूमिका यामध्ये फारसा फरक नसायचा.

जुलै महिन्यामध्ये अर्णबने रेड एफएम रेडिओ चॅनेलला मुलाखत दिली होती. त्यात त्याने म्हटलं होतं की, ‘गेल्या सात-आठ वर्षांपासून माझी वादविवादाची आवड माझं करिअर बनलं आहे. मी या सगळ्याचा खूप आनंद घेतो आहे’ असं म्हटलं होतं. या विधानावरून अर्णब पत्रकारितेला वादविवादाचा आखाडा मानतो, हे पुरेसं स्पष्ट होतं. एवढंच नव्हे, तर अर्णबने काही दिवसांपूर्वी ‘एनडीटीव्ही पत्रकार बरखा दत्त यांच्यासारख्यांवर खटले भरले पाहिजेत, त्यांचा आवाज बंद केला पाहिजे. कारण त्यांची पत्रकारिता देशहिताला प्राधान्य देणारी नाही’, अशी शेरेबाजी आपल्या कार्यक्रमात केली होती. त्यावर बरखा दत्त यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून अर्णबला लक्ष्य केलं होतं. ‘आजतक’ या वृत्तवाहिनीनेही अर्णबने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर टीका करणारं ट्विट केलं होतं (ते त्यांनी नंतर दिलगिरी व्यक्त करत मागेही घेतलं) . मीडिया ट्रायल आणि हेट कॅम्पेन चालवल्याबद्दल मुस्लीम कार्यकर्ते डॉ. झाकीर नाईक यांनी अर्णबविरोधात अब्रुनुकसानाची दावा ठोकला होता. त्याआधी महाराष्ट्रातल्या एका माजी न्यायाधीशाने स्वतःचं छायाचित्र चुकीच्या बातमीत दाखवल्याबद्दल ‘टाइम्स नाऊ’वर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या सगळ्या वादविवादांचं कारण होतं, अर्णबची अति आक्रमक राष्ट्रवादी पत्रकारिता! ‘एनडीटीव्ही’चे एक संपादक रवीश कुमारन यांनीही अर्णबला त्याच्या आक्रमक राष्ट्रवादी भूमिकेबद्दल खडसावलं होतं, पण आपल्या विरोधकांची कुठल्याच प्रकारे दखल न घेण्याचं सत्ताधाऱ्यांसारखं धोरण अर्णबनेही राबवलं होतं. एकदा वार करून झाला की, अर्णब पुन्हा त्यावर होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर करत नसे.

गेल्या वर्षी ‘आउटलुक’ या इंग्रजी साप्ताहिकाने ‘द मॅन हू किल्ड टीव्ही न्यूज’ या नावाने कव्हर स्टोरी केली होती. ती अतिशय सार्थ होती. अर्णबने टीव्हीवरच्या बातम्यांना, चर्चेच्या कार्यक्रमांना आखाड्याचं रूप दिलं होतं. त्यात विजयवीराच्या भूमिकेत सतत अर्णबच असे. इतरांनी त्याच्यापुढे बचाव करायचा किंवा त्याच्या ‘हो’ला ‘हो’ करायचं. ज्यांना अर्णबची भूमिका पटत नसे, त्यांना तो फारसं बोलू देत नसे.

निष्पक्षपाती, तटस्थ, समतोल आणि तारतम्याने बोलणारी व्यक्ती ही मुळात टीव्हीवर फारशी लोकप्रिय होऊ शकत नाही. टीव्ही हे माध्यमच मुळात लाउड आहे. ‘तुम्ही शांतपणे बोलत असाल, तर तुमचं कोण कशाला ऐकून घेईल? दर्शकांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल, त्यांच्या हातातल्या रिमोट कंट्रोलचं बटन दाबलं जाऊ द्यायचं नसेल, तर तुम्हाला उच्चरवातच बोलावं लागेल’ असं टीव्ही माध्यमात सरसकट सर्वांना सांगितलं जातं. त्यामुळे फील्डवर असलेले पत्रकारही मोठ्या आवाजात, तावातावाने बोलताना दिसून येतात, पण तेवढ्यावर टीआरपी मिळत नाही, वाहिनी लोकप्रिय होत नाही.  ती व्हायची असेल, तर आक्रमक पत्रकारिता करावीच लागते. त्यासाठी तर टीव्हीवर चर्चांचे कार्यक्रम सुरू झाले. त्यात दोन विरुद्ध पक्षाच्या लोकांना बोलावून त्यांना एकमेकांच्या विरुद्ध भडकावलं जातं किंवा मुद्दाम उचकवलं जातं. अर्णब याच्याही पुढे गेला. त्याने थेट भूमिका घेऊन विरोधकांवर टीका करायला सुरुवात केली. विरोधकांना धारेवर धरायलाही मागेपुढे पाहिलं नाही. त्यामुळेच त्याचे कार्यक्रम आणि तो जनसामान्यांमध्ये लोकप्रिय झाला.

कारण बहुतेकांना स्वत:ची अशी काही मतं नसतात. त्यांची मतं बनवावी लागतात. ती स्वत:ला हवी तशी बनवायची असतील, तर त्यासाठी आक्रमक व्हावं लागतं; कुठल्याही प्रश्नाचा, समस्येचा न्यायनिवाडा करायला लागतो. अर्णबने नेमकं तेच केलं. त्यामुळे तो कुठलीच मतं नसलेल्या आणि फारसा सारासार विचार करू न शकणाऱ्या मध्यमवर्गाचा लाडका झाला!

या गदारोळात पत्रकारितेची नीतीमूल्यं पायदळी तुडवली गेली, पण तशी तर ती (काही मोजके अपवाद वगळता) थोड्याफार फरकाने हल्ली सर्वच प्रसारमाध्यमं तुडवताना दिसतात. यात केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमंच आघाडीवर आहेत, असं नाही. मुद्रित माध्यमांचे संपादकही हाच कित्ता गिरवत आहेत. वर्तमानपत्राचं किंवा वृत्तवाहिनीचं संपादकपद हे औटघटकेच्या कवचकुंडलासारखं असतं. ती अंगावर असतात, तोवर तुम्ही मृत्युंजयी असता. तुम्ही कुणालाही धारेवर धरू शकता, कुणालाही जाब विचारू शकता किंवा कुठल्याही विषयाचा न्यायनिवाडा करू शकता. त्यामुळेच हल्ली सत्ताधारी वर्ग आणि पत्रकारांचा वर्ग यांच्यामध्ये फारसा फरक राहिलेला नाही. ही कवचकुंडलं काही कारणाने उतरवावी लागली की, तुम्ही एकदम सामान्य होऊन जाता. आयाळ नसलेल्या सिंहासारखे. अर्णब गोस्वामी यांच्या राजीनाम्याचं खरं कारण अजून गुलदस्त्यात असलं, तरी त्यांची ‘टाइम्स नाऊ’च्या संपादकपदाची कवचकुंडलं आता उतरली आहेत. कवचकुंडलांचा एक मोठा तोटा असतो. ती एकदा उतरवली की, पुन्हा धारण करता येत नाहीत. अर्णबने आता स्वत:ची वृत्तवाहिनी सुरू केली किंवा अदानींच्या वृत्तवाहिनीत गेला किंवा अगदी भाजपनेही खास त्याच्यासाठी स्वतंत्र वृत्तवाहिनी सुरू केली, तरी ती कवचकुंडलं त्याला पुन्हा लाभण्याची शक्यता कमीच !

editor@aksharnama.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......