अजूनकाही
‘इथून छान अँगल मिळतोय…’ इमारतीच्या गच्चीवर चढलेला तो यु-टीव्हीचा कॅमेरामन म्हणतोय.
खाली इमारतीच्या पायथ्याशी कोसळलेल्या इमारतीच्या ढीग, त्या खाली अनेकांचे चेपलेले संसार, आडवे तिडवे खांब, त्याखाली निर्जिव मानवी देह, काही जखमी बायका-पोरं. वातावरणात सगळीकडे धुरळा, उदध्वस्तपण आणि हल्लकल्लोळ.
मातीच्या ढिगाऱ्यावर इथं-तिथं हिंडताहेत हेल्मेट घातलेले मंत्री, आमदार, खासदार, महापौर आणि नगरसेवक, शासकीय अधिकारी. एखादा टुरिस्ट स्पॉट पाहावा तसं चाललंय त्यांचं. इमारत कोसळल्यावर तो अवघा परिसर खरोखरच टुरिस्ट स्पॉटच झालाय. लांबून लांबून नेतेमंडळी, पक्षश्रेष्ठी येत आहेत घटनास्थळाला भेट द्यायला. कोसळलेल्या जागी मृतांचे नातेवाईक गोळा झालेत. त्यांचं सांत्वन करायचं काम वॉर फुटिंगवर चालू आहे. इमारत कोसळल्यावर सगळ्या नेते मंडळींना मोठा गहिवर आलाय प्रेमाचा. गिधाडं उतरावीत तशी चॅनलवाल्याची पथकं दुर्घटनास्थळी उतरली आहेत. काहींचा हा पहिला अनुभव असल्यानं त्यांना ही घटना भलतीच थ्रीलिंग वाटते आहे. त्यांच्या करिअरमधला हा अनफर्गेटेबल इव्हेन्ट आहे. कॅमेरामनची दाटी झालीय. शुटिंगमध्ये त्या क्रिएटीव्ह मंडळींच्या कामात बघ्यांचे, पोलिसांचे, मदतकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अडथळे येताहेत. कोसळलेल्या भिंतीचे तुकडे, खांब आडवे येताहेत. त्यांची चरफड होतेय.
शुटिंगमध्ये आपली पण इनव्हॉल्व्हमेंट असावी म्हणून वाहिन्यांचे वार्ताहर इथं-तिथं खोट्या लगबगीनं फिरताहेत. कॅमेरामनला सूचना देताहेत- ‘तिकडे नको, त्या बोट तुटलेल्या हातावरनं पॅन कर. त्या चेपलेल्या टाकीवर ये, नंतर त्या स्ट्रेचरवरल्या मुलीच्या क्लोज-अप वर जा. जाताना सगळ्या लोकेशनचा टॉप अँगल शॉट घ्यायला विसरू नकोस. जवळच्या बिल्डिंगध्ये शिरून टेरेसवरनं तो घेऊ. मी तोवर बिल्डिंगवाल्यांची परमिशन घेऊन ठेवतो…’ एकूण बहरलीत पत्रकार मंडळी!
दुससऱ्या दिवशी त्यांच्या वर्तमानपत्राची पानं ओसंडून वाहणार आहेत यात शंका नाही. दुर्घटना स्थळाची करुण द्दश्यं. सोबत ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज असतील... तिथल्या कुटुंबावर झालेल्या आघाताच्या वैयक्तिक कहाण्या.
आता तरी शासन जागं होणार काय? या सारख्या खणखणीत मथळ्यांनी पानं भरतील हस्तीदंती मनोऱ्यातील संपादकांचे मर्मभेदक अग्रलेख. त्यातून इशारा दिलेला असेल- ‘इमारतीच्या बिल्डरवर कारवाई करा, स्थानिक नगरसेवकाला धरा, जाब विचारा; नाहीतर लोक रस्त्यावर येतील. कायदा हातात घेऊन त्या नराधमांना धडा शिकवतील.’ अग्रलेखात राज्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना असतील- ‘सरकारनं शहरातल्या मोडकळीस आलेल्या घरांची कसून तपासणी केली नाही, तर इमारत दुर्घटनेचं हे सत्र या शहरात चालूच राहील...’
दुर्घटनास्थळी आता एकच धावपळ उडालीय. प्रत्यक्ष गृहमंत्री आलेत अपघाताची पाहणी करायला. गृहमंत्र्यांना चॅनलवाल्यांनी गराडा घातलाय. प्रत्येकांनी त्यांच्या छातीवर बंदुकीसारखे माईक रोखलेत. चेहरा शक्य तितका गंभीर करून गृहमंत्री बोलताहेत धीम्या आवाजात- ‘या प्रकरणाची चौकशी करून त्याला जबाबदार असलेल्या दोषी व्यक्तींना कडक शासन करण्यात येईल; कोणाचीही गय केली जाणार नाही.’ गृहमंत्र्यांची ही विधानं त्यांना स्वत:ला तोंडपाठ आहेतच, पण टीव्हीवाल्यांनाही ती आता पाठ झाली आहेत अणि टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही.
साप्ताहिकांची पथकं आता दुर्घटनाभूमीवर उतरलीत. रंगीत गुळगुळीत कव्हर्सची साप्ताहिकं. डिजिटल कॅमेरे नाचवत पोनीटेल हेअरस्टाईलमधले त्यांचे फोटोग्राफर मातीच्या ढिगाऱ्यावरून खाली-वर करताहेत. त्यांच्यापैकी एकाला मध्येच कुठेतरी तुटलेला मानवी हात दिसतो, ओह्, शीट म्हणून तो दचकून मागे होतो. सगळे वार्ताहर कॅमेरे घेऊन तिथं धावतात. हे असं एक्स्ल्युजिव्ह काहीतरी सापडलं म्हणून समाधानाची रेषा उमटली त्याच्या चेहऱ्यावर.
प्रत्यक्ष घटनास्थळावरली अशी युनिक हृदयद्रावक छायाचित्रं, योगायोगानं जीव वाचलेल्या रहिवाशांच्या कहाण्या, जखमींच्या मुलाखती, सरकारी निवेदनं, संतप्त लोकांच्या जळजळीत प्रतिक्रिया सगळं या मंडळींना प्रॉपर पर्सपेक्टिव्हमधनं पेश करायचं आहे आता या पत्रकार लोकांना. इतरांपेक्षा आपला अँगल वेगळा असला पाहिजे म्हणून संपादक साहेब मोबाईलवरनं तंबी देताहेत. इमारत कोसळताना कोणीतरी म्हणे मोबाइलवर शुटिंग केलं होतं, त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झालेत. पोलीस त्याचा मोबाईल जप्त करण्याआधी आपल्याला ते कव्हरेज मिळावं यासाठी साऱ्यांचा आटापिटा चालू आहे. सीसी कॅमेऱ्यावर फक्त लोकांची पळापळ चित्रित झाली आहे. पण त्यांच्या लेन्स आधीच खराब, त्यात धूळीच्या लोटामुळं आणखी धूसर बनून गेलेल्या. लोकेशनवरला लाईट फेड होत चाललाय भराभर. शुटिंग आवरतं घ्यावं लागणार. पीस टु कॅमेरा देऊन माईकवाले म्हणाताहेत, ‘चलो, पॅक-अप.’ गृहमंत्री तर केव्हाच परतलेत. त्यांना इथून पुस्तक प्रकाशन समारंभाला आणि नंतर एका चॅरिटी संस्थेनं आयोजलेल्या फॅशन-शोला जायचंय.
दुर्घटना स्थळावर आता दगडविटांच्या ढिगाऱ्यापेक्षा, मंत्र्यांनी, महापौरांनी दिलेल्या आश्वासनांचा ढिगाराच जास्त झालाय.
तसं नवीन काही नव्हतं कशातच. कोसळलेली इमारत आणि तिचा अनधिकृतपणा देखील नवा नव्हता. तिचं कोसळणंही नवीन नव्हतं. नवे होते मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले जीव. बाकी गोंधळ जुनाच होता!
मातीच्या ढिगाऱ्यावर कपाळाला हात लावून बसलेल्या स्त्री-पुरुष रहिवाशांशी समाज कार्यकर्ते एवढं काय बोलत होते कोण जाणे. थोड्या वेळानं तेही पांगले. इमारतीचे अवशेष हळूहळू काळोखात नाहीसे झाले. आता ते दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात प्रकाशझोतात येतील. विधानसभेत विरोधी पक्ष शहरातल्या मोडकळीस आलेल्या इमारतीवरून सरकारला धारेवर धरतील. त्या पलीकडे ते करणार तरी काय? त्यांच्या कर्मकांडाचा तो भाग बनून गेला आहे.चौकशी समिती स्थापन होईल. तिचा अहवाल जाहीर होईपर्यंत कोसळलेल्या इमारतीच्या जागी वीस मजली टॉवर उभा राहिलेला असेल. त्या टॉवरमध्ये सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधी पक्षातल्या नेत्यांचे नातेवाईक, प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलं आणि सुना राहायला येतील. त्यांच्यापैकी कुणाचा तरी नातू १०व्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या गॅलरीत त्याला बर्थ-डेला गिफ्ट मिळालेला डिजिटल कॅमेरा घेऊन उभा राहील. आणि…
वडिलांना हाक मारून सांगेल, पपा, पपा, लवकर या. इथून काय छान अँगल मिळतोय!
हे दृश्य, हा घटनाक्रम तास नेहमीचाच. शहरातली घरं साधारणत: पावसाळ्यात कोसळतात. महिनाभर त्यावरल्या चर्चा लेख, दोषारोप चालू राहतात. पाऊस आपल्याबरोबर इमारतींची पडझड, रस्त्यातले खड्डे या सारख्या समस्या घेऊन येतो, आणि आपल्या बरोबर घेऊन जातो.
अलिकडे दुर्घटना पावसाची वाट पाहात नाहीत. शहरातल्या कितीतरी अनधिकृत इमारती कोसळण्याच्या बेतात आहेत; मीडियावाल्यांची नजर आपल्याकडे कधी वळते याची वाट पाहताहेत…
लेखक कथाकार, पत्रकार आहेत.
awdhooot@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment