लिपस्टिक स्वप्नांचं आणि बुरखा वास्तवाचं प्रतीक, त्याचा धर्माशी संबंध नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अपर्णा पाडगावकर
  • ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’चं एक पोस्टर
  • Wed , 26 July 2017
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा लिपस्टिक अंडर माय बुरखा Lipstick Under My Burkha अलंक्रीता श्रीवास्तव Alankrita Shrivastava प्रकाश झा Prakash Jha

कालच्या एकाच दिवसात तीन गोष्टी घडल्या. 

एका वर्तमानपत्रातलं एक कात्रण सकाळीच कुणीतरी फॉरवर्ड केलं. शिक्षण हे उत्कर्षासाठी आहे, पैसे कमावण्याचं साधन नव्हे केवळ, ही त्याची वनलाईन. वाचायला घेतलं तर त्यात शिकलेल्या बायकांना जरा गाई-म्हशींकडे बघा, बैल कधी वासराचं संगोपन करताना दिसतात का, असा प्रेमाचा प्रश्न विचारला होता... चीड आली, सडसडून उत्तर द्यावंसं वाटलं आणि मग तेवढ्याच वेगात निराशाही दाटून आली. 

मग दुपारी एका फेसबुकवरील मैत्रिणीचा फोन आला. तुझ्या मित्रयादीत एक नाव आहे. त्याने अश्लील फोटो टाकले आहेत, असं कळवलं. ज्या कळकळीनं तिनं कळवलं त्याचं मला खरंच कौतुक वाटलं. ते एका मेल सेक्स वर्करचं प्रोफाईल असावं, फोटो व पोस्टवरून तसं वाटत होतं. अनफ्रेंड केलं. सेक्सचा व्यापार हा किती हाताच्या बोटापर्यंत येऊन ठेपलाय, याची जाणीव होऊन थोडं अस्वस्थही वाटलं. फोटोवरून तो अगदीच निम्न मध्यमवर्गामध्ये ऑपरेट करत असावा, असं वाटलं. या वर्गात लैंगिक कोंडमारा इतक्या मोठ्या प्रमाणात असेल, याचा अंदाज नव्हता असं नव्हे. पण तिथंही लैंगिकतेचा इतका उघड व्यापार होऊ लागल्याचं पाहून नाही म्हटलं तरी थोडा धक्का बसलाच. तोवर मेल सेक्स वर्कर ही अतिउच्चभ्रू वर्तुळातली हलक्या आवाजात चर्चा करण्याची गोष्ट होती. किंवा मी त्याच्या सार्वदूर प्रसाराबद्दल अनभिज्ञ होते म्हणू. तसंही लैंगिक वंचितांच्या बाजूनं कोण आवाज उठवणार? विशेषतः स्त्रियांची लैंगिकता, हा तर विनोदाचाच विषय.

आणि मग रात्री ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ बघितला. 

हा सिनेमा स्त्रियांशी संबंधित लैंगिकतेबद्दलचे वेगवेगळे कोन दाखवतो. आणि त्याच वेळी तो फक्त लैंगिकतेपुरताच मर्यादित राहत नाही. 

भोपाळमधल्या हवाई मंझिल नामक एका पडू घातलेल्या वाडासदृश्य इमारतीमध्ये राहणाऱ्या चार वेगवेगळ्या वयातल्या स्त्रियांची ही गोष्ट. एकशे पंधरा वर्षांची ही इमारत धोकादायक झालीये, म्हणून खाली करा अशी नोटीस घेऊन येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना उषाबुआ सांगते की, तुम्हाला वाटतं तितक्या लवकर ही इमारत पडणार नाहीये, तेव्हा ते आपल्यासाठी असतं. शेकडो वर्षांच्या परंपरा इतक्या सहज नाहीच कोसळणार. त्याखाली उषाबुआंसारख्या कित्येक जणी गाडल्या जातील.

उषाबुआ आज पंचावन्न वर्षांच्या आहेत. त्यांचा नवरा भोपाळ गॅस दुर्घटनेत गेला. म्हणजे वयाच्या तेविसाव्या वर्षापासून उषा एकटीच आहे. तिला बुआ म्हणणाऱ्या, आर्थिकदृष्ट्याही तिच्यावर अवलंबून असलेल्या भाचरांचा संसार तिच्या डोळ्यादेखतच फुलला आहे. त्याच नातवंडांना घेऊन ती एकदा स्वीमिंग पूल वर जाते. नातवाला वाचवायला पाण्यात उडी मारते. तक्रार नोंदवण्यासाठी आलेला कोच तिला नाव विचारतो आणि क्षणभर तिला स्वतःचं नाव आठवत नाही. परंपरांच्या जोखडाखाली, कर्तव्य निभावताना भारतीय महिला स्वतःला किती दुर्लक्षित ठेवतात... स्वतःच्या सगळ्याच भावनांचं विरेचन ‘मिल्स न् बून टाईप्स’ (‘फिफ्टी शेडस् ऑफ ग्रे’मधल्या लैंगिकतेपासून ती फार लांब आहे!) पुस्तकं वाचून करणाऱ्या उषाबुआला त्या क्षणी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते. त्या क्षणापासून बुआचा ‘उषा’ बनण्याचा प्रवास सुरू होतो. 

दुसरीकडे शिरीन आहे, तीन मुलांची आई. तिच्यासाठी लैंगिक व्यवहार हा रोज करण्याची गोष्ट आहे - आनंद म्हणून नव्हे, कर्तव्य म्हणून. त्यात प्रेमालाप नाही. तिनं कौतुकानं केक बनवला आहे. ओव्हन कसा आणला, ते नवऱ्याला सांगण्याची तिने तालीम केलीय. पण तो तिला रिमोट कंट्रोल मागतो. तो केवळ टीव्हीसाठी नाही. तिच्या इच्छा-आकांक्षांचा रिमोट त्याच्या हाती आहे. ती गप्प राहून ते उरकून टाकते. त्याचा संभोग चालू असताना तिच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नाही की, कपड्यावर सुरकुतीही पडत नाही. त्या पूर्ण प्रसंगामध्ये आणि त्यानंतर तोच केक खाताना (ज्याच्या करण्यातला आनंद, त्याची चव साफ निघून गेलं आहे) कोंकणा कोंकणा सेननं जे भाव चेहऱ्यावर दाखवले आहेत, त्याला तोड नाही! निखळ लैंगिकतेपासून सुरुवात करत हा सिनेमा अशा छोट्या, पण प्रत्ययकारी जागा घेत जगण्याच्या असंख्य आकांक्षा फुलताना आणि नंतर त्या पायदळी तुडवल्या जाताना दाखवतो.

मैत्रिणीच्या लग्नात मनसोक्त नाचताना फर्स्ट इअरला शिकणाऱ्या रिहानाला तिची आई संतापानं ओढून घरात घेऊन जाते. बुरखा शिवणाऱ्या – विकणाऱ्या दुकानदाराची ही मुलगी वर्ल्ड म्युझिक ऐकते, गाते, अभ्यासते, नाचते. मुलींच्या जीन्सवर बंदी आणण्याच्या निर्णयाविरुद्ध एका मोर्च्यातही सामील होते. ‘जीन्स का हक, जीने का हक चाहिये’ असं रिहाना म्हणते तेव्हा ते भिडतं, कारण हा हक्क मिळवण्यासाठी तिला रोज झगडावं लागतं आहे. तिचा मार्ग चूक की बरोबर हा नंतरचा प्रश्न.

वडील तिला पोलीस स्टेशनमधून सोडवून आणताना तिने बुरखा घातलेला नाही, जणू आता सगळी अब्रू वाऱ्यावर उधळलीच गेली आहे. आता बुरख्याची काय गरज? वडील तिला विचारतात की काय कमी पडलं आमच्या संस्कारांत? ती गप्प राहते. जे संस्कार मनसोक्त खळखळून हसण्याचं, आपली रोजीरोटी कमावण्याचं, आपले साधे छंद जोपासण्याचं स्वातंत्र्य आणि सामर्थ्य देऊ शकत नाहीत, त्या संस्कारांच्या अजूनही भक्कम असलेल्या तटबंदीचीच ही गोष्ट आहे. वरवर मोडकळीला आल्यासारखी वाटली तरी इमारत आतून मजबूत आहे.

चौथी लीला. हिला सारा भारत बघायचा आहे. त्यासाठी पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी कष्टही करायचे आहेत. प्रियकरासोबत लग्नही करायचं आहे. साऱ्या गोष्टीत पुढाकार तिचाच. तिची लैंगिक इच्छा जबरी म्हणावी अशी. आईनं लग्न ठरवलंय तिचं. तो होणारा नवरा तिला कौतुकानं घर दाखवतो. “बडा टीव्ही ले लेंगे। फिर घरपर बैठकर ही पुरी दुनिया देख लेना। कहीं बाहर जाने की जरूरत नहीं है…।” असं तो तिला सांगतो तेव्हा ती नि:शब्द आहे. त्यापुढे तो जे काही बोलतो – जे त्याचं स्वतःचंच कौतुक आहे - ते तिला ऐकूच येत नाही. बाहेरच्या कोलाहलात त्याचे शब्द विरून जातात. पण तो काहीही म्हणत असला तरी तिला ते जखडूनच ठेवणारं असणार आहे. जग जिंकण्याच्या आकांक्षा उंबरठ्याच्या आत बांधून ठेवणारे हे संस्कार लीलाने का मानावेत? तिच्या बरोबरीनं धावण्याची ताकद तिच्या प्रियकरातही नाही. दरवेळी तीच पुढाकार घेत राहते आणि हरत राहते. लीलाची कामेच्छा जबरदस्त आहे, पण सेक्सही फक्त एक भावना नाही. ते कधी माध्यम बनतं प्रेम व्यक्त करण्याचं, कधी अगतिक साधन बनतं प्रियकराला बांधून ठेवण्यासाठीचं, तर कधी तिची मुस्कटदाबी करण्याचं त्याचं हत्यार...

(गोष्ट या चार जणींची असली तरी लीलाच्या आईचं एक छोटं उपकथानक आहे. ही विधवा बाई रोजीरोटीसाठी न्यूड पेंटिंगसाठी मॉडेल म्हणून काम करते आणि तिला स्वतःचं घर हवं आहे. बस्स, इतकंच!)

आपापल्या वाट्याची स्वप्नं बघणाऱ्या सगळ्या स्त्रियांची ही कथा आहे. उषा जेव्हा स्विमिंग कॉस्च्युम विकत घेऊन पहिल्यांदा निघते, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की, सगळ्यांच्या नजरेपासून तो लपवण्यासाठी तिला स्वतःलाच त्यावर पाय देऊन उभं राहावं लागतं. परिस्थितीच्या रेट्यामुळे कित्येकदा बायकांना स्वतःच आपली स्वप्नं स्वतःच गाडून टाकावी लागतात. आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे प्रयत्नही अधिकार गाजवू पाहणाऱ्या नवऱ्यापासून छपून करावे लागतात. त्याच्या संभोगाची शिक्षा सततच्या गर्भपातानं भोगावी लागते.

या चारही स्त्रिया सोसत राहतात, आपापल्यापरीनं आपापल्यापुरता संघर्षही करतात. ज्यांना साध्या साध्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला नाही, त्यांना तो सपक वाटू शकेल. या चौघी मुखदुर्बळ वाटू शकतील. पण या हरलेल्या नक्कीच नाहीत. उलट उत्तरं देऊन, आततायीपणा करून प्रश्न सुटणार नाही, हे यांना चांगलंच उमगलंय. आत्ताचा क्षण अंतिम नाही, अशी आव्हानं सतत सामोरी येणार आहेत, हे त्यांना माहीत आहे. रिहानाला आई लग्नात नाचताना फरफटत घरात घेऊन येते, त्यानंतरही ती आकांडतांडव करत नाही. आईनं कोंडून ठेवल्यावरही ती स्वतःपुरती पुन्हा नाचू लागते. जे करावंसं वाटतंय, ते स्वतःच्या आनंदासाठी आहे, याची केवढी ठसठशीत जाणीव आहेही! शेवटच्या प्रसंगात फाटलेल्या पुस्तकांचे तुकडे जोडण्याचा एक प्रसंग आहे. विविध गोष्टींची स्वप्नं त्या तुकड्यातून जोडण्याचं जे प्रतीक वापरलं आहे, ते या स्त्रियांच्या विजीगीषेवर प्रकाश टाकतं.

ही स्वप्नं मरणारी नाहीत आणि म्हणून या स्त्रियांचं स्त्रीपणही. लिपस्टिक हे या स्वप्नांचं प्रतीक आणि परंपरेचा बुरखा हे वास्तव. याचा कोणत्याही धर्माशी काही संबंध नाही.

प्रखर वास्तवाचा हा आलेख आपल्याला सुन्न करतो. सिनेमाची हाताळणी काहीशी तटस्थ वाटते. जितक्या निर्विकारपणे शिरीनचा नवरा तिचा उपभोग घेतो, तशाच थर्ड अँगल पर्सपेक्टिव्हने ही कहाणी सांगितली गेली आहे. हा निर्विकारपणा, ही तटस्थता समाज म्हणून प्रेक्षकांच्या, आपल्या मानसिकतेवर प्रकाश टाकते. अशा समस्या जोवर इतरांच्या घरात असतात, तेव्हा आपण  असेच त्रसस्थासारखे वागतो. जेव्हा ते आपल्या आयुष्यात घडतं, तेव्हाच त्याची दाहकता आपल्याला जाणवते. या चौघीजणी म्हटलं तर वेगळ्या, पण त्यांचा आक्रोश एकच आहे. त्यांचं स्त्रीपण समान धाग्यानं बांधलेलं आहे. माणूस म्हणून त्याची बांधीलकी आपल्याला जाणवते का, हे प्रत्येकानं आपलं आपण तपासून बघायला हवं.

आधीच लैंगिकता हा दबक्या आवाजात बोलण्याचा विषय, त्यातही स्त्रियांची लैंगिकता हा ‘बॉय-झोन’ विनोदाचा विषय. त्यामुळे प्रेक्षकांमधून प्रारंभी हसण्याचे आवाज येत राहिले, यात नवल नाही. शेवट झाल्यानंतर काही मोजक्याच, पण दमदार टाळ्या वाजल्या, हा मात्र आशेचा किरण आहे.

aparna@dashamicreations.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......