अजूनकाही
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा अगदी दोन-सव्वादोन तासांचा रनिंग टाइम असला तरीही लहानसा वाटणारा सुंदर सिनेमा आहे. मुळात याची मांडणी अप्रतिम आणि प्रगल्भरीत्या केलेली आहे. बुआजीच्या (रत्ना पाठक-शाह) कथनाने सुरुवात होणारा हा सिनेमा ती कथन करत असलेल्या कहाणीशी आपलं नातं सांगत राहतो. यात पुढे रिहाना (प्लाबिता बोरठाकुर), शिरीन (कोंकणा सेन शर्मा) आणि लीला (आहाना कुमरा) या येतात. अर्थातच यांच्या स्वतःच्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत. उषा ऊर्फ बुआजी ही तिच्या आयुष्याच्या सेकंड इनिंगमध्ये आहे, ती फँटसीमध्ये अडकून पुन्हा तारुण्याचा शोध घेतेय, रिहाना समाजाच्या बंधनातून मुक्त व्हायचा प्रयत्न करतेय, शिरीन तिच्या सेक्स लाइफमध्ये नाखूष आहे, तर तिच्या नवऱ्याला तिच्याबद्दल अजिबात ओढ नाही आणि लीलाचा तिच्या बळजबरीनं होणाऱ्या लग्नाला विरोध आहे.
यात या तिघींच्या लैंगिक भावना त्यांच्या स्वतंत्र गोष्टींसोबतच एकामागोमाग एक समोर येतात. रिहानावरील बंधनं, तिच्या कुटुंबातील बुरखा शिवण्याचा पारंपरिक व्यवसाय आणि तिचे मुक्त विचार, या दोन्ही विरुद्धची मांडणी इथं कहाणी जास्त खुलवत जाते. तर शिरीनच्या पतीची (सुशांत सिंह राजपूत) तिच्यासोबतच्या शारीरिक संबंधांबाबतची दोन दृश्यं तिच्यावरील बंधनं स्पष्ट करायला पुरेशी ठरतात.
याउलट लीला मुक्त विचारांची आहे. अगदी आपल्या साखरपुड्याच्या दिवशी बॉयफ्रेंडशी सेक्स करणारी. तिच्यावरही तिच्या बळबळजबरीनं होणाऱ्या लग्नाच्या नावाचं एक बंधन आहेच. तर इकडे बुआजीचा आणि तिच्या लैंगिक भावनांचा आतल्या आत कोंडमारा होतो. ती त्यातून बाहेर पडू पाहत असताना तिच्याच नैतिकतेचा प्रश्न निर्माण होतो. या सगळ्या घटना एकाच कहाणीचे चार पदर आहेत, जे एकत्र गुंफण्यात आले आहेत. पण त्यातील बंध इतका सुरेख आहे की, आपल्याला ते कुठेच कृत्रिम वाटत नाहीत.
या भावना सार्वत्रिक आहेत का किंवा त्यांना खरंच प्रातिनिधिक मानता येईल का, असे प्रश्न इथं दुय्यम ठरतात. आणि हा सिनेमा इथंच खऱ्या अर्थानं सफल होतो.
इतकंच नव्हे तर ही कहाणी आपण पाहताना आपल्याला काहीतरी चांगलं पाहिल्याचं समाधान मिळतं. तर याउलट थोडासा अतिरेक वाटणाऱ्या शारिरीक संबंधांच्या दृश्यांमध्ये आणि प्रेक्षकांच्या हास्यकल्लोळ आणि कमेंट्समध्ये काही चांगली भावनिक दृश्यं विरून जातात.
पण एकंदर सिनेमा छान आणि हलकीफुलका आहे. अगदी पन्नासेक टक्के स्त्री वर्ग चित्रपटगृहात असून तोदेखील सिनेमा एन्जॉय करत होता, इतकं अप्रतिम आणि तगडं लिखाण आहे. पण मध्यंतर याही चित्रपटात नको तेव्हा येतो.
विशेष उल्लेख करावासा वाटतो तो बॅकग्राऊंड स्कोअर आणि संगीताचा, दोन्ही अप्रतिम झाले आहेत. ड्रम्स आणि बीट्स सुंदर वाटतात. एडिटिंग लाजवाब आहे आणि यामधील कट्समध्ये एक नैसर्गिकपणा जाणवतो. म्हणजे ट्रान्झिशन्स शिलाई मशीनचा आवाज, ट्रेनचा आवाज अशा निरनिराळ्या आवाजांनी कट्स जोडले आहेत. झेब बंगाश ही पाकिस्तानी गायिका आणि मंगेश धाकडे, यांनी खरंच उल्लेखनीय काम केलं आहे. यातील सगळी गाणी खास जमून आली आहेत. खास करून 'बुरखे ने ले ली जान' म्हणजे माशल्लाह. शिवाय ही गाणी कुठेच अडथळा वाटत नाहीत, तर ती कथा पुढे नेण्यात मदत करतात.
इतकं सगळं असून खरं तर आपला प्रेक्षकवर्ग तितका प्रगल्भ आहे का, हा प्रश्न चित्रपट संपल्यावर आणि पाहताना पडत राहतो. म्हणजे भावनिक दृश्यांवर नको त्या कमेंट्स करून त्यांचा प्रभाव कमी करणं, हा प्रकार इथं तरी फार वेळा जाणवतो. शिवाय शेवटचा प्रसंग, जो या चार कथांना गुंफून ठेवण्यामागील उद्देश सफल झाला हे सिद्ध करतो, तो पाहण्यापूर्वीच थिएटरमधून बाहेर पडणं, ही सर्वांत चुकीची गोष्ट म्हणता येईल.
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा सिनेमा सुरुवातीला सेन्सॉरच्या कचाट्यात अडकून पडला होता. पण तो अडकण्याचं कारण मात्र सिनेमा पाहिल्यावर अजिबात पटत नाही. ना यात म्हणाव्या तितक्या शिव्या आहेत, ना नग्नता आहे, ना तितके भडक लैंगिक दृश्यं आहेत. मग हा सिनेमा इतके दिवस का अडकून पडला? सेन्सॉरचा नेमका कशावर आक्षेप होता? सेन्सॉरचा 'त्याच' दृश्यांना आक्षेप होता की, एकाच्या नावाखाली दुसरीच दृश्यं त्यांना नको होती, असे कित्येक प्रश्न सिनेमा पाहिल्यावर पडतात. त्यांची उत्तरं अर्थातच मिळत नाहीत. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड या संस्थेच्या आणि अर्थातच पहलाज निहलानीच्या कार्याकडे आपण पुन्हा एकदा साशंक नजरेनं बघायला लागतो.
लेखक सिनेअभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment