अजूनकाही
१. राज्यातील आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. तशी परिस्थिती आलीच तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी पुढे येतील, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात कोणताही राजकीय भूकंप होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा शिवसेनेला एकप्रकारे ‘अदृश्य’ इशाराच असल्याची चर्चा सुरू झाली आहे. हा अदृश्य हात ‘पंजा’ नाही, अशी कोपरखळीही त्यांनी काँग्रेसला मारली.
अध्यक्षमहोदय, ही तर डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजराची गोष्ट झाली. आपल्याला जे हात अदृश्य वाटतात, ते इतरांना ढळढळीत दिसतायत की हो... हे अदृश्य हात ‘पंजा’ नसले, तरी पंजातूनच ‘फुटणार’ आहेत, याचीही कल्पना अख्ख्या गावाला आहे. बिचारे भुजांत बळ आहे, तोवर अभयदान मागून घ्या, नाहीतर आधार कार्डावरचा पत्ता बदलायचा, म्हणून तुमच्या सदाशुचिर्भूत पक्षाच्या शुचितासंपन्न सरकारमध्ये सामील होतायत.
.............................................................................................................................................
२. जगभरात चालकरहित (ड्रायव्हरलेस) कार धावणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, भारतात ड्रायव्हरलेस कार धावणार नाहीत, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. लाखो चालकांच्या नोकरीची सरकारला चिंता आहे. ड्रायव्हरलेस कार बाजारात आणून लाखो चालकांच्या नोकरीवर गदा आणली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. ट्रक आणि टॅक्सी एग्रीगेटर्सच्या माध्यमातून परिवहन बाजारात हजारो नोकरीच्या संधी उपलब्ध होत असताना ड्रायव्हरलेस कार बाजारात आल्या तर लाखो लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड पडू शकते, असंही त्यांनी सांगितलं.
अजून ड्रायव्हरलेस कार युरोप-अमेरिकेत नीट धावू नाही लागली. तिच्या अनेक चाचण्या होतील. मग ती बाजारात येईल. तिथून कधीतरी भारतात येईल. त्याला अनेक वर्षं लागतील. आता तहहयात आपणच सत्तेत असू, असं गडकरींना वाटतंय बहुतेक. त्यांचं विधान संगणकयुगाच्या विरोधात बैलगाडी मोर्चा काढणाऱ्या भाजपच्या मूळ मानसिकतेला साजेसंच आहे. पण, ड्रायव्हरलेस कार भारतात यायला नकोतच. ड्रायव्हर असलेल्या मोटारींच्या बेबंद वाहतुकीत ड्रायव्हरलेस कार इतरांच्या चुकांमुळे अपघातग्रस्त होतील. शिवाय, इथल्या हवेत त्यांच्यातही बेशिस्त आणि मस्तवाल बेबंदपणाचे विषाणू शिरायला वेळ लागणार नाही.
.............................................................................................................................................
३. गंगा नदी म्हणजे काही टेम्स नदी किंवा राईन नदी नाही जी कायम स्वच्छच राहील. गंगा नदीत रोज २० लाख आणि वर्षाकाठी ६० कोटी लोक डुबकी मारतात, मग ती कायम स्वच्छ कशी राहील? असा प्रश्न केंद्रीय जल संशोधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्री उमा भारती यांनी केला आहे. ‘नमामि गंगे’ या योजनेचे परिणाम २०१८ पासून बघायला मिळतील, असंही उमा भारती यांनी म्हटलं आहे. संसदेत गंगा सुरक्षेचं विधेयक आणण्याआधी मसुद्याची चर्चा राज्यासोबत केली जाईल असंही भारती यांनी म्हटलं आहे.
उमादेवींनी धार्मिक डुबक्या मारणाऱ्या लोकांची ढाल उभी करून पळवाट शोधली आहे. गंगेत ३५हून अधिक शहरांमधलं सांडपाणी सोडलं जातं, ते त्या सोयीस्करपणे विसरल्या. बरं इतका कॉन्फिडन्स आहे गंगा अशुद्धच राहणार याचा, तर ते सगळे आयोग आणि यांच्याकडचं गंगेचं खातं गंगेतच विसर्जित का नाही करत? कोणाचंही सरकार असलं तरी बहुसंख्याकांच्या लांगूलचालनाचा भाग असलेलं गंगास्नान काही थांबणार नाही. अंत्यसंस्कार आणि प्रेतं नदीत भिरकावणंही थांबणार नाही. सांडपाणीही येत राहणार. मग हे खातं फक्त कोट्यवधी रुपयांचा निधी खात राहील, त्याचा उपयोग काय?
.............................................................................................................................................
४. स्मार्टफोन, फिटनेस ट्रॅकर यांसारख्या गॅजेटचे चार्जिंग करण्यासाठी आता विजेची गरज भासणार नाही. केवळ मानवी हालचालींमधून ऊर्जा घेऊन त्याचा पुरवठा इलेक्ट्रॉनिक उपकरणांना करू शकणारा एक ‘डिव्हाइस’ शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. या शास्त्रज्ञांमध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. अतिशय पातळ असलेल्या काळ्या फॉस्फरसपासून हा डिव्हाइस तयार करण्यात आला आहे. हा डिव्हाइस अतिशय हलक्या तीव्रतेने वाकवला अथवा दाबला गेला, तरीही एनर्जी हार्वेस्टिंग सिस्टीमद्वारे ऊर्जा निर्माण करण्यात येते. अशा प्रकारे भविष्यात आपण स्वतःच आपली वैयक्तिक उपकरणे चार्ज करू शकतो, असे अमेरिकेतील वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक कॅरी पिंट यांनी सांगितले.
वा वा, फारच मौलिक संशोधन. अडचण फक्त एकच आहे. स्मार्टफोनने माणसांना जागच्या जागीच थिजवून टाकलं आहे. टीव्हीपासून गेमपर्यंत आणि मित्रपरिवाराबरोबर गप्पागोष्टींपासून प्रियपात्रांबरोबरच्या प्रेमालापापर्यंत सगळं काही स्मार्टफोनमधून व्हायला लागलं आहे. आता तो चार्ज करण्यासाठी हालचाल करायची असेल, तर त्यासाठी माणूस नेमावा लागेल वेगळा... त्याच्या हातातही स्मार्टफोन असला, तर तोही हलेल याची गॅरंटी नाही.
.............................................................................................................................................
५. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर टीका करून हल्ला चढवला आहे. 'द न्यूयॉर्क टाइम्स'च्या एका बातमीमुळे 'आयएस' या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी बगदादी याला मारण्याचा अमेरिकेचा प्रयत्न निष्फळ झाला, असे ट्रम्प यांनी एका ट्विटद्वारे म्हटले आहे. 'राष्ट्रीय सुरक्षेबाबत त्यांचा हा अत्यंत घाणेरडा अजेंडा आहे', असेही त्यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे. वर्तमानपत्राच्या कोणत्या बातमीमुळे बगदादीला पकडण्याची योजना निष्फळ ठरली, याबाबत मात्र ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले नाही.
बिकाऊ मीडियाच्या बातमीमुळे केवढा उत्पात झाला, याचे ढोल पिटायचे आणि बातमी कोणती ते सांगायचंच नाही, या तंत्राने तर कसलाही पुरावा न देता एखाद्याला फासावरही चढवता येईल. परदेशांतून बीटल्सपासून स्टीव्ह जॉब्जपर्यंत अनेकजण कशाकशाच्या शोधात भारतात येऊन गेले होते. ट्रम्पतात्याही गुप्त ट्रेनिंगसाठी येऊन गेले असणार इतक्यातच, असा फुल डौट खायला वाव आहे.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment