अजूनकाही
२००५ नंतर तब्बल १२ वर्षांनी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी भारतीय महिला संघानं स्वकर्तृत्वानं मिळवली होती. पण दुर्दैवानं, १९८३ सालच्या कपिल देवच्या संघाप्रमाणे मिताली राजच्या संघाला विश्वचषक जिंकण्याची कमाल साधता आली नाही. अवघ्या नऊ धावांनी भारतीय महिलांना इंग्लंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. मैदानावर पराभव झाला असला, तरी या महिला संघानं तमाम भारतीय चाहत्यांची मनं मात्र जिंकून घेतली. विश्वचषक जिंकण्याच्या अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षा पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेटला मिळालेल्या प्रेमाचा आणि प्रतिसादाचा आनंद अधिक आहे.
क्रिकेट या खेळाची ओळख खरं तर इंग्लंडनेच जगाला आणि भारताला करून दिली, आज हा खेळ भारतीयांच्या नसानसांत भिनला आहे. जणू भारताचा धर्मच बनला आहे. प्रत्यक्ष इंग्लंडमध्येही क्रिकेटचं इतकं वेड पाहायला मिळत नसेल जितकं भारतात पाहायला मिळतं. जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारताचंच आहे. पण भारतात क्रिकेटला मिळणारं हे प्रेम फक्त पुरुष संघाच्याच वाट्याला येतं. बाकी महिला संघाच्या वाट्याला आतापर्यंत उपेक्षाच अधिक आली. आज मात्र हे चित्र बऱ्याच अंशी बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचं कारण ठरलं, ते आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीतील भारतीय पुरुष संघाचा मानहानीकारक पराभव. हो, पुरुष संघाचा पराभव हेच महिलांच्या क्रिकेटची नोंद घेण्यास खऱ्या अर्थानं कारणीभूत ठरलं!
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाची गाठ पडली, ती कट्टर वैरी असणाऱ्या पाकिस्तानबरोबर. याच स्पर्धेच्या साखळी सामन्यात आणि त्याआधीही अनेकदा भारतानं पाकचा धुव्वा उडवला असल्या कारणानं हा अंतिम सामना आपण आरामात जिंकणार याच तोऱ्यात भारतीय चाहते वावरत होते. पण झालं भलतंच. पाकनं भारताचा मानहानीकारक पराभव केला आणि भारताच्या विजयाचं स्वप्न पाहणाऱ्या, पाकला चारी मुंड्या चित करू पाहणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या अपेक्षांना सुरूंग लागला. त्याच वेळी महिला विश्वकप स्पर्धेतील साखळी सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानच्या महिला संघाला पाणी पाजलं. १७० धावांचं माफक आव्हान पाक खेळाडूंना दिलेलं असतानाही भारतीय गोलंदाजांनी कमाल केली आणि ७५ धावांमध्ये पाक खेळाडूंचा खुर्दा केला.
भारतीय पुरुष संघाचा पराभव चांगलाच जिव्हारी लागलेल्या तमाम भारतीयांनी मग भारतीय महिलांनी पाकला लोळवल्याचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षात, प्रसारमाध्यमांमध्ये आणि अगदी सोशल मीडियावरूनही भारतीय महिला खेळाडूंचं गुणगान सुरू झालं. दुधाची तहान ताकावर भागवण्यातला हा प्रकार असला, तरी एका अर्थानं महिला क्रिकेटचं किमान कौतुक करणं सुरू झालं होतं.
पाकला लोळवताना भारतीय महिला संघातील गोलंदाज एकता बिश्तने १८ धावांच्या मोबदल्यात पाच बळी टिपले, तर याच विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय कर्णधार मिताली राजनं सहा हजार धावांचा पल्ला पार केला. असा विक्रम करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटपटू. भारताच्या इतर खेळाडूंनीही या स्पर्धेत दखल घेण्याजोगी कामगिरी केली. वेळोवेळी संघाच्या मदतीला धावून येणारी अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी, तरुण हरमनप्रीत कौर, राजश्री गायकवाड, शिखा पांडे, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आदी जवळपास सगळ्याच खेळाडूंनी ‘इम्प्रेसिव्ह’ कामगिरी करून दाखवत सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.
विश्वचषक स्पर्धेत धडाक्यानं सुरुवात करणाऱ्या भारतीय महिला संघानं चार विजय साजरे केले खरे, पण ऑस्ट्रेलिया व द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारताचं आव्हान संपुष्टात येणार असं वाटत असतानाच मितालीनं कर्णधार पदाला साजेशी शतकी खेळी साकारली आणि त्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंड संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारतीय महिलांचा सामना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाशी पडणार होता. साखळी स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं भारताला पराभूत केलेलं असलं, तरी जबरदस्त आत्मविश्वास आणि जिंकण्याच्या ईर्ष्येनंच मैदानावर उतरलेल्या भारतीय रणरागिणींनी ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याचा चमत्कार घडवून आणला. बारीक चणीच्या पण मनगटात प्रचंड ताकद असणाऱ्या तरुण हरमनप्रीत कौरनं लगावलेल्या धडाकेबाज नाबाद १७१ धावांच्या (११५ चेंडूंमध्ये) जोरावर भारतानं हा चमत्कार घडवून आणला आणि अंतिम फेरीत शानदाररीत्या प्रवेश केला. अंतिम फेरीत इंग्लंडशी गाठ पडलेल्या भारतीय संघाला विजयाचा हा ‘टेम्पो मेन्टेन’ करता आला नाही. खरं तर साखळी स्पर्धेत भारतीय महिलांनी इंग्लिश खेळाडूंना पराभूत केलं होतं. कदाचित अंतिम सामन्याच्या दबावामुळे किंवा फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला अवघ्या नऊ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. पण पराभव पदरी पडूनही भारतीय चाहत्यांनी या भारतीय महिला खेळाडूंना शिव्या न घालता (जे एरव्ही पुरुषांच्या सामन्यात पराभव झाल्यास घडते) त्यांचं कौतुकच केलं.
भारतीय चाहत्यांनी आणि अनेक मान्यवरांनी, खेळाडूंनी सामन्यापूर्वी भारतीय संघाला भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या. वृत्तवाहिन्यांवर, वर्तमानपत्रांत भारतीय संघाच्या कामगिरीच्या मोठमोठाल्या बातम्या छापून येत होत्या. क्रीडा वाहिन्यांवरून भारतीय महिलांच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण होत होतं. पुन्हा पुन्हा हायलाइट्स दाखवले जात होते. सोशल मीडियावरून भारतीय खेळाडूंची ओळख आणि कामगिरी शेअर होत होती. तोपर्यंत ‘जीके’ (जनरल नॉलेजमध्ये विचारला जाणारा प्रश्न) म्हणून भारतीय महिला संघाची कर्णधार या नात्यानं फक्त आणि फक्त मिताली राजला ओळखणारे भारतीय आज संघातील इतर खेळाडूंना नाव आणि त्यांच्या कामगिरीनुसार ओळखू लागले. एवढंच काय, तर हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर खचाखच गर्दी झालेली पाहायला मिळाली. या प्रेक्षकांमध्ये इंग्लिश लोक जेवढ्या संख्येनं हजर होते, तेवढ्याच संख्येनं भारतीय प्रेक्षकही होते. काही भारतीय सेलिब्रेटी मंडळी तर महिला संघाला प्रोत्साहन देण्यासाठी थेट लॉर्ड्सवर पोहोचली होती.
रविवारी एकत्र जमलेल्या अनेकांनी गटारी पार्टीबरोबरच महिला क्रिकेटचा आनंद लुटला. फारशी कधीही पाहिली न जाणारी महिला क्रिकेट मॅचची फायनल अनेकांनी टीव्हीसमोरून न हलता पाहिली, एन्जॉय केली. भारतीय संघाच्या पराभवानं या चाहत्यांना रुखरुख लागून राहिली, पण तरी कुणीही या खेळाडूंविषयी अपशब्द वापरले नाहीत. उलटपक्षी त्यांचं कौतुकच केलं. ‘वेल प्लेड इंडिया’, ‘ब्राव्हो’, ‘बेटर लक नेक्स्ट टाइम’, ‘हरलात तरी मनं जिंकलात’ अशा शब्दांत क्रिकेट चाहत्यांनी या संघाचं कौतुक केलं. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरूख खान, अनुष्का शर्मा यासारख्या कलाकारांनी या खेळाडूंचं ट्विटरवरून कौतुक केलं. पहिल्यांदाच एवढा पाठिंबा आणि प्रेम देणाऱ्या चाहत्यांचे, पाठिराख्यांचे आभार मानायला भारताची कर्णधार मिताली राज विसरली नाही.
२००६ साली बीसीसीआयने महिला संघाचा कारभार आपल्या हाती घेतल्यापासून महिला संघाला मिळणाऱ्या सोयीसुविधांचा दर्जा तर सुधारलाच, शिवाय संघाच्या कामगिरीतही फरक पडलेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मुख्य म्हणजे महिला खेळाडूंच्या दृष्टिकोनातही प्रचंड फरक पडलेला जाणवत आहे. स्वत:ला सिद्ध करतानाच व्यावसायिक स्तरावर खेळाचे प्रदर्शन करण्याचं धोरण या खेळाडूंनी स्वीकारलेलं दिसतं. संघभावना वाढीस लागली असून त्याचा परिणाम एकंदर क्रिकेटवर झाला आहे.
आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय संघ ५९ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताची कर्णधार मिताली राज दुसऱ्या स्थानावर आहे, तर गोलंदाजांच्या यादीत झूलन गोस्वामी आणि एकता बिश्त अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानावर आहेत. याचबरोबर आयसीसीच्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी मिताली राज हिची निवड करण्यात आली आहे. विश्वचषक स्पर्धेदरम्यानचं तिचं नेतृत्वगुण पाहून आयसीसीनं हा बहुमान तिला दिला. याच संघात हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनाही स्थान मिळालं आहे.
‘पुरुष संघाचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि महिलांचं क्रिकेट म्हणजे लिंबू टिंबू,’ हा भारतीय क्रिकेट चाहत्यांचा दृष्टिकोन आता बदलत आहे. भारतीय चाहत्यांच्या मानसिकतेत झालेला हा सकारात्मक बदल महिला क्रिकेटच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल, यात वाद नाही. सर्वच स्तरांतून होऊ लागलेल्या कौतुकामुळे भारतीय संघाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. बीसीसीआयनं या खेळाडूंना घसघशीत बक्षीस देणार असल्याचे जाहीर केलं आहे. महिला खेळाडूंनाही बक्षीस म्हणून चांगली रक्कम आणि नोकरीच्या संधी मिळणार असतील, तर अधिकाधिक व्यावसायिक खेळाडू निर्माण होण्यास वाव मिळेल.
.............................................................................................................................................
- मिताली राजच्या नेतृत्वाखाली २००५ मध्ये भारतीय संघाने विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.
- झूलन गोस्वामी आणि मिताली राज या संघातील ज्येष्ठ खेळाडू आहेत. त्यांचा हा शेवटचा वर्ल्ड कप होता.
- एक दिवसीय क्रिकेटमध्ये सगळ्यात अधिक बळी झूलन गोस्वामीच्या नावे आहेत.
- डायना एडलजी यांनी सचिन तेंडुलकरकडे हरमनप्रीतच्या नोकरीचा विषय ठेवला आणि सचिनने केलेल्या शिफारशीमुळे हरमनप्रीतला प. रेल्वेमध्ये नोकरी मिळाली.
- टीव्हीवर सचिनला खेळताना पाहून पूनम राऊतने फलंदाजीचे धडे गिरवले आहेत.
- १९ वर्षांखालील संघातून खेळताना स्मृती मंधानाने वेस्ट इंडीज संघाविरुद्ध १५० चेंडूंमध्ये २२४ धावा केल्या होत्या.
.............................................................................................................................................
लेखिका मुक्त पत्रकार आहेत.
mitalit@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
sayalee paranjape
Tue , 25 July 2017
चांगला लेख आहे.. महिला क्रिकेट लोक बघताहेत हे खूपच चांगलं आहे. मात्र, भारतात महिला क्रिकेट नावाचं काहीतरी गेल्या दोन महिन्यांतच उदयाला आलंय की काय अशी शंका सोशल मीडियावरच्या पोस्ट्स वाचून येत होती. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर प्रकाश टाकायला हवाच होता. फक्त एक- डायना एडलजीऐवजी डायना एडल असं झालंय लेखात. वाचकांना त्यामुळे उगाचच ते डायना हेडन वाटण्याची शक्यता आहे.