अजूनकाही
१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्याचा निर्धार केला असतानाच भाजपशासित उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना म्हणजेच आमदार आणि खासदारांसाठी टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या थोर व्यक्ती वाहतूककोंडीत अडकू नयेत, यासाठी ही सुविधा दिली जात आहे. सरकार राज्यात व्हीआयपी संस्कृती संपुष्टात आणण्यासाठी एकीकडे वाहनांवरील अंबर दिवे हटवण्याचे आदेश देते आणि दुसरीकडे व्हीआयपी संस्कृतीला प्रोत्साहन देत आहे.
या व्हीआयपी मंडळींना किती महत्त्वाची कामं असतात! त्यांची सामान्यजनांशी तुलना तरी होऊ शकते का? शिवाय त्यांचा श्वासोच्छवासही जनतेच्या हितासाठीच होत असतो, सगळं आयुष्य जनसेवेला समर्पित असतं. त्यामुळे त्यांचा प्रवास सुकर होणं, ते वेळच्या वेळी हवं तिथं पोहोचणं यातून अंतिमत: जनतेचंच भलं होत असतं... उगाच दर टोलनाक्यावर दोनपाच कर्मचाऱ्यांना थोबाडण्यात त्यांचा वेळ आणि शक्ती वाया घालवण्यात काय हशील?
.............................................................................................................................................
२. दीनानाथ बात्रा यांच्या अध्यक्षतेखालील ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’ या संस्थेनं ‘एनसीईआरटी’ पाठ्यपुस्तकांबाबत अजब शिफारसी केल्या आहेत. अभ्यासक्रमातील इंग्रजी, उर्दू, अरबी शब्द काढून टाका, मिर्झा गालिबच्या रचना वगळा, रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारावंर फुली मारा, भारतीय जनता पक्ष हा हिंदू पक्ष असा उल्लेख वजा करा, अशा त्यांच्या शिफारसी आहेत.
बात्रांच्या शिफारसी खतराच आहेत! पण, मुळात हे गृहस्थ अजून खासगी न्यासातच कसे? आतापर्यंत ते एनसीईआरटीच्या किंवा जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या किंवा एखाद्या आयआयटीच्या प्रमुखपदावर असले पाहिजे होते. आपल्या लोकोत्तर प्रतिभेनं त्यांनी त्या पदाची ‘शोभा’ आणखी वाढवली असती, अगदी उजळून टाकली असती. भारतातल्या शिक्षणाला त्यांनी वेदकालीन गुंफांच्या योग्य पथावर आणून ठेवलं असतं. बात्रांच्या पात्रतेला न्याय द्या.
.............................................................................................................................................
३. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सीमेवर लष्कराच्या जवानांनी दिलेल्या बलिदानाची आठवण राहावी, यासाठी तिथं रणगाडा आणून ठेवण्याची मागणी साक्षात या विद्यापीठाच्या कुलगुरूंनीच केली आहे. त्याचबरोबर सीमेवर भारतीय जवान शहीद होतात, तेव्हा जेएनयूमधील काही लोक आनंद साजरा करतात, असं वक्तव्य भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे.
या दोन्ही संभावित ‘पात्रां’च्या वक्तव्यांची गांभीर्यानं दखल घेऊन निव्वळ रणगाडे आणण्यावर थांबू नये. अधूनमधून लढाऊ विमानंही या विद्यापीठावरून फिरवावीत आणि थोडे थोडे बॉम्ब टाकावेत. शक्य झाल्यास रणगाडे पूर्वसूचना न देता विद्यापीठ परिसरातून चालवायलाही हरकत नाही. शिवाय, राष्ट्रवादी विद्यार्थ्यांच्या हातात लष्कराची शस्त्रं द्यावीत आणि ते सीमेवरील जवान शत्रूच्या सैनिकांना कसे टिपतात, याची प्रॅक्टिस म्हणून त्यांना जे देशद्रोही वाटतील, त्या विद्यार्थ्यांना टिपून काढायलाही शिकवावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विद्यापीठात गोमूत्र शिंपडून त्याचं नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठ करून टाकावं, म्हणजे ते कायमस्वरूपी शुद्ध होऊन जाईल.
.............................................................................................................................................
४. उत्तर प्रदेशात दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष १० लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आहे. २६ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विषयीचे प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलचे प्रश्न विचारले जाणार आहेत. परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना एक पुस्तिका देण्यात येईल. या पुस्तिकेत दीनदयाळ उपाध्याय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारांची माहिती असणार आहे.
अरे देवा, अजून पुस्तिका वाटावीच लागते का? मुखोद्गत नाही झाली संघविचारांची माहिती? या दळभद्री शाळा करतायत तरी काय? उपाध्याय यांना राष्ट्रपिता घोषित करून राज्य सरकारमार्फतच ही परीक्षा घ्यायला काय हरकत आहे? सगळ्याच राज्यांमध्ये घेता येईल. खोटा काँग्रेसी, कम्युनिस्ट इतिहास लवकरात लवकर पुसून काढल्याशिवाय देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीचा प्रसार होणार नाही.
.............................................................................................................................................
५. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीदरम्यान क्रांतिकारकांनी जन्माला घातलेल्या अनेक घोषणा आणि देशभक्तीपर गीतं आजही लोकप्रिय आहेत. आम आदमी पक्षाचे (आप) नेते प्रशांत भूषण यांनी ट्विटर अकाऊंटवरून स्वातंत्र्यलढ्यात लोकप्रिय ठरलेल्या काही घोषणांची आणि देशभक्तीपर गीतांची यादी प्रसिद्ध केली आहे. यापैकी अनेक घोषणा आणि देशभक्तीपर गीतांचे निर्माते मुस्लिम आहेत. सध्या तावातावानं बोलणाऱ्या हिंदुत्ववादी संघटना स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी जन्मालाही आल्या नव्हत्या, अशी टीका प्रशांत भूषण यांनी केली आहे.
या घोषणा आणि गाणी पुढीलप्रमाणे...
* “मादरे वतन भारत की जय” ही घोषणा अजीमुल्ला खाँ यांनी दिली होती.
* ‘जय हिंद’ ही घोषणा आबिद हसन सफरानी यांनी दिली होती.
* ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही घोषणा प्रसिद्ध उर्दू कवी हसरत मोहानी यांनी दिली होती.
* ‘भारत छोडो’ हे घोषवाक्य युसूफ मेहर अली यांची निर्मिती होय.
* युसूफ मेहर अली यांनीच ‘सायमन गो बॅक’ ही घोषणा दिली होती.
* ‘सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है’ हे देशभक्तीपर गीत बिस्मिल अज़ीमाबादी यांनी लिहले आहे.
* ‘तराना-ए-हिन्दी’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा’ ही गीते ख्यातनाम कवी अलमा इकबाल यांनी लिहली आहेत.
* भारताचा राष्ट्रध्वज असलेल्या तिरंग्याच्या निर्मितीत सुरय्या तय्यबजी यांचे मोठे योगदान आहे.
प्रशांत भूषण यांची ही सगळी सेक्युलर बडबड एका चुकीच्या गृहितकावर आधारित आहे. भारत हा देश १९४७ साली स्वतंत्र झाला, हीच मुळात काँग्रेसनं पसरवलेली अफवा आहे. हा देश गोऱ्या साहेबांकडून काँग्रेसकडे हस्तांतरित झाला आणि पुढे साठ वर्षं तो काँग्रेसच्या गुलामगिरीत पिचला. आत्ता कुठे २०१४ला तो स्वतंत्र झाला आहे. त्या बोगस स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांच्या घोषणा आणि गाण्यांना राष्ट्रीय गाणी आणि घोषणा म्हणून मान्यता देणं हा काँग्रेसने कसं अल्पसंख्याकांचं लांगूलचालन केलं होतं, याचाच ढळढळीत पुरावा आहे.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment