ट्युशन्स - एक स्वानुभव!
पडघम - कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
प्रवीण बर्दापूरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 22 July 2017
  • पडघम कोमविप ट्यूशन्स Coaching Classes एबीए MBA आर्टस Arts बी.कॉम B.Com

दहावीचा निकाल लागला, लेकीला ७९ टक्के मार्क्स मिळाले. सगळ्याच विषयात विशेष प्राविण्य मिळालं. बापाचं ५५ टक्क्यांचं, तर लेकीची आई नेहमीच फर्स्टक्लास करिअर असलेली. पण आजवर एकूणच या खानदानात कुणी एवढे मार्क्स मिळवलेले नव्हते. म्हणून लेकीच्या या यशानं बाप जाम खुश झाला. स्वत:च्या आणि लेकीच्याही मित्र-मैत्रिणींना त्यानं दणदणीत पार्टी दिली. पार्टीची पेंग उतरलेली नसतानाच दुसऱ्या दिवशी सकाळी लेकीनं सांगितलं, ‘आता ट्यूशन लावायला हवी.’

‘का’, बापानं विचारलं.

‘कारण मिळाले त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळायला हवेत. शिवाय अकाऊंटस, बुक किपिंग, इकॉनॉमिक्स वगैरे विषयांसाठी ट्युशन्स आवश्यकच आहेच’, लेक उत्तरली.

‘म्हणजे तू आर्टस नाही घेणार?’ आश्चर्यचकित होऊन बापानं लेकीला विचारलं.

‘Not at all’, पटकन प्रतिसाद देत लेक म्हणाली, ‘बी.कॉम. होणार. नंतर एम.बीए. करणार आणि मॅनेजमेंटमध्ये करियर करणार’, लेक ठाम स्वरात म्हणाली.

एवढुशी लेक आता मोठी होऊन इतक्या ठामपणे बोलताना बघून बापाला एकीकडे बरं, तर दुसरीकडे तिनं आर्टस्‌ न घेण्याबद्दल वाईट, असं संमिश्र दाटून आलं. लेकीनं इंग्रजीसह अर्थशास्त्र, राज्यशास्त्र वगैरे विषय घेऊन बी.ए./एम.ए. करावं, असं बापाचं स्वप्न होतं. मग त्यावर वाद झाला. लेक मागे हटणार नाही हे स्पष्टच होतं. ठरवल्याप्रमाणे लेकीनं कॉमर्सला प्रवेश घेतला आणि तिचं अकरावी-बारावीचं रुटीन सुरू झालं.

पुढची दोन वर्षं भुर्रकन उडणार हे स्पष्ट झालं. सकाळी सहाला उठणं आणि ट्युशन्सला पळणं, मग अकरा ते दोन कॉलेज. घरी आल्यावर सकाळच्या ट्युशन्सचा अभ्यास, की लगेच पुन्हा ट्युशन आणि रात्री उशिरापर्यंत पुन्हा कॉलेज आणि संध्याकाळच्या ट्युशनचा अभ्यास. अभ्यासाला दिवसाचे २४ तास कमी पडायला लागले. स्वाभाविकच तिची हेळसांड होऊ लागली. लेकीच्या खाण्या-पिण्यातल्या हेळसांडीनं चिंतित झालेल्या आईनं अभ्यास करता-करताच लेकीला खाणं भरवण्याचा उद्योग सुरू केला. दिवसातल्या तासांची संख्या वाढवायला हवी, अशी तक्रार लेक करू लागली. पण ते काही बापाच्या हातात नव्हतं! अकरावीच्या वर्षभर हे असंच सुरू राहिलं.

अकरावीच्या परीक्षेनंतर तर हे शेड्यूल आणखी बिझी झालं. उन्हाळ्याच्या सुटीतही ट्युशन्स क्लासेस सुरूच राहिले. त्यामुळे बाहेर कुठे भटकंती झाली नाही. कुणाकडे पार्टीला जाणं नाही, शांतपणे बसून एखादा सिनेमा पाहणं नाही. क्रिकेट खूप आवडत असूनही क्रिकेटच्या वर्ल्ड कपच्या काळातही लेक अभ्यास एके अभ्यास करत राहिली. या काळात तिचा अविर्भाव असा की, जणू तिला क्रिकेट काही कळतच नाही! एरवी ढणाढणा वाजणाऱ्या म्युझिक सिस्टिमवर धुळीचे थर चढले, पण त्याकडे लेकीचं लक्ष नव्हतं!

बारावीचा निकाल लागला. तसा नेहमीप्रमाणे बापाला बोर्डातून निकाल तीन-चार दिवस आधीच कळला होता. लेकीला ८१ टक्के मार्क्स मिळाले. कॉमर्समध्ये ८१ टक्के म्हणजे चांगलेच मार्क्स होते. निकाल अधिकृतपणे कळल्यावर बहुदा लेकीला गिल्टी वाटू लागलं. निकालानंतर सेलिब्रेशनचा विषयसुद्धा घरात निघाला नाही. बापानं दोन-तीनदा सुचवलं, पण लेकीनं तो विषय उडवून लावला. घरात जणू काही एक घुसमट मुक्कामाला आलेली होती. या घुसमटीत आणखी पाच-सहा दिवस गेले आणि लेकीनं बापासमोर कन्फेशन दिलं, ‘ट्युशन्स लावून खूप मोठा उपयोग झालेला नाही. इतका वेळ आणि पैसा खर्च करून दोन-अडीच टक्के मार्क्स वाढण्यात काही दम नाही!’

ट्युशन्सनं फार काही फरक पडणार नाही, हे मला माहीत होतं’ बाप फिस्करला.

‘तुला अनेक गोष्टी आधीच माहीत असतात, पण त्याचा मला काहीच उपयोग नसतो’, लेकीनं बापाला फटकारलं. पण त्या फटकारण्यात फार काही दम नव्हता हे लगेच सिद्ध झालं. तिच्या डोळ्यात ढग दाटून आले... ते केव्हाही कोसळतील अशी चिन्हं दिसू लागली. मग बापानं लेकीला कवेत घेतलं. लेकीनं अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कन्फेशनचा पुरता निचरा झाल्यावर बाप म्हणाला, ‘दिवसाचे सतरा-अठरा तास तू अभ्यासात घालवले. ट्युशन्सच्या प्रत्येक विषयाला प्रत्येक वर्षाला बारा हजार रुपये खर्च केले. म्हणजे एका अर्थानं मार्क्स विकतच घेतले की! या पैशात आणखी लाखभर रुपयांची भर टाकून सरळ मार्क्सच विकत घेतले असते, तर आठ-दहा टक्के तरी आणखी आले असते!’

‘असं मॅनेज करायचं असतं तर अभ्यास कशाला केला असता? सगळ्यांनी ट्युशन्स लावली म्हणून मलाही वाटत होतं की, आपणही जावं. शिवाय पैसे हा काही प्रॉब्लेम तर नव्हता ना आपल्या घरात?’, लेकीनं बाजू मांडली.

‘प्रश्न पैशांचा नाहीच. मित्र-मैत्रिणी काय करतात यापेक्षा आपल्यात काय आहे, किती आहे आणि शिकतानाही आनंद मिळू शकतो का हे जास्त महत्त्वाचं. आनंद न देणाऱ्या आणि ज्ञानाची व्याप्ती न वाढवणाऱ्या शिक्षणाचा उपयोग तर काय?’ बाप म्हणाला.

‘म्हणजे काय?’, लेकीनं विचारलं.

‘इट्स व्हेरी सिम्पल’, बाप सांगू लागला, ‘गेली दोन वर्षं तू खाण्या-पिण्याची हेळसांड केली. कोणत्याही पार्टीला आली नाहीस. दर रविवारी दुपारी बाहेर जेवायला जाण्याचा आपला रिवाज गेल्या दोन वर्षांत आपण पाळलेला नाही. गेल्या दोन वर्षांत तू आठ-साडेआठपर्यंत अंथरुणात लोळत पडलेली नाहीस. कोणत्याही कार्यक्रमाला आली नाहीस. आवडती गाणी ऐकली नाहीस, एकही सिनेमा पाहिला नाहीस, क्रिकेटचा सामना बघितला नाही, घरात आरडाओरडा केला नाहीस, हट्ट करून शॉपिंग केलं नाहीस, नवे कपडे घालून मिरवली नाहीस... एक ना अनेक... आणि इतकं सगळं मिस करून कमावलं काय तर अडीच टक्के मार्क्स... असा हा हिशेब आहे. अकाउंट जुळतं का कुठे? ट्युशन्स लावून दहा-पंधरा टक्के मार्क्स कधीच वाढत नसतात. तू स्वत:च्या बुद्धिमत्तेवर ७९ टक्के मार्क्स मिळवले होते. इतका सारा खटाटोप न करताही थोडा अभ्यास जास्त केला असतास तरी ही वाढ तू मिळवली असतीस. तसं न करता तू तुझ्या आयुष्यातली दोन वर्षं निरस केलीस, नापास केलीस!’

‘हे झालं तर खरं, पण आता बोलून काही उपयोग आहे का त्याचा? आणि वारंवार ते बोलून तू मला वीट आणणार, चिडवत राहणार आहेस का? एक ठरलं आता, एखाद्या विषयात नापास व्हायची भीती असेल तरी मी ट्यूशन लावणार नाही यापुढे’, लेकीनं जाहीर करून टाकलं.

‘चिडवणार तर आहेच नक्की, कारण पैसे माझ्या खिशातून गेलेले आहेत’, बापानं जाहीर करून टाकलं.

‘धिस इज नो जस्टीस. बापानं बापासारखं राहावं’, लेकीनं ठणकावलं. ‘नो वे, तुझं हे असं वागणं सहन केलं जाणार नाहीच’, असं म्हणत लेकीनं बापाच्या गळ्यात हात घातला आणि म्हणाली, ‘आय लव्ह यू बाबा...’ बापाचा सगळा विरोध साहजिकच मावळला. त्यानं लेकीला लगेच प्रतिसाद दिला. मग लेक बारावी झाल्याची पार्टी देण्याच्या बेतात दोघे बुडून गेले. लेकीच्या चेहर्‍यावर हसू आणि अंगात उत्साह संचारला. त्या घरात पुन्हा चैतन्य पसरलं.

तीन-चार दिवसांनी सगळ्याच स्थानिक वृत्तपत्रात लेकीनं लावलेल्या ट्युशन्स क्लासेसची जाहिरात होती. बारावीच्या परीक्षेत त्या क्लासेसचे जे विद्यार्थी गुणवंत ठरले त्यांची छायाचित्रं त्या जाहिरातीत होती. लेकीचा फोटो त्यात अर्थातच अग्रस्थानी होता. तो फोटो बघून बापाला साहजिक आनंद झाला. सकाळचे नऊ वाजले तरी लोळत पडलेल्या लेकीला गदागदा हलवत त्यानं उठवलं आणि तो फोटो दाखवला. तो बघितला न बघितला करत अंक बापाकडे फेकत ‘असा फोटो पेपरमध्ये येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीपेक्षा सकाळी नऊपर्यंत लोळणं जास्त आनंदाचं आहे. तू जा आता. मला झोपू दे’, असं म्हणत लेकीनं पांघरून ओढलं. वृत्तपत्र उचलून बाप लेकीच्या खोलीबाहेर पडला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठं समाधान पसरलेलं होतं.

पुढे यथावकाश लेक कोणतीही ट्युशन किंवा क्लास न लावता रितसर एमबीए झाली. ते करत करताना लेकीनं सिनेमे पाहणं, क्रिकेट सामने टीव्हीवर आणि मैदानावर जाऊन पाहणं, पार्ट्यांना जाणं कायम ठेवलं, तरी तिला ८० टक्के मार्क्स मिळालेच. कॅम्पसमध्ये झालेल्या मुलाखतीत तिची निवड टाटात झाली. 

लेक आता एका बहुराष्ट्रीय कंपनीत बड्या हुद्द्यावर आहे. ‘एन्जॉय करा, ट्युशन नका लावू’चा धोशा सर्वांच्या मागे आता ती लावत असते!

लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......