टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • नाशिक महानगरपालिका, अरुण जेटली, अनुराधा पौडवाल, रिलायन्स आणि पाकिस्तान-चीनचे ध्वज
  • Sat , 22 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या नाशिक महानगरपालिका Nashik Municipal Corporation अरुण जेटली Arun Jaitley अनुराधा पौडवाल Anuradha Paudwal रिलायन्स जिओ Reliance Jio पाकिस्तान Pakistan चीन China

१. बाकीच्या कोणाला नसले तरी देशात गायींना किती अच्छे दिन आले आहेत, याचं दर्शन नुकतंच नाशिक महानगरपालिकेत पाहायला मिळालं. पालिकेच्या गुरुवारी झालेल्या महासभेत चक्क एका गायीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नाशिकमध्ये १३ जुलै रोजी एका गायीचा विजेचा धक्का लागल्यानंतर खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. या अपघातानंतर वॉर्ड क्रमांक २५ मधील शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी या गायीवर अंत्यसंस्कार केले होते. साबळे यांनी या गायीच्या मृत्यूला नाशिक महानगरपालिकेला जबाबदार ठरवले होते. त्यानंतर गुरुवारी साबळे यांनी सर्वसाधारण सभेत या गायीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. विशेष म्हणजे एरवी विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेल्या भाजपसह अन्य नगरसेवकांनी तो मान्यही केला आणि त्यानंतर पालिका सभागृहात अभूतपूर्व प्रकार पाहायला मिळाला. यानंतर महापौरांनी गायीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले.

ठिकठिकाणी ‘गोपुत्रां’ची संख्या वाढल्यामुळे आता अशा प्रकारांची सवय ठेवावी लागेल. या निलाजऱ्यांना आपल्या कारभारामुळे शहरातल्या सोयीसुविधांचा बोजवारा उडून करदाते नागरिक कशा हालअपेष्टा भोगतात, याचं उत्तरदायित्व घ्यायची गरज भासत नाही. यांच्या कारभारामुळे याच शहरात विजेचा धक्का बसूनच अनेक नागरिक मरण पावले असतील. त्यांना कोणी आदरांजली वाहिली नसेल, महापालिकेला जबाबदारही धरले नसेल. लगेहाथ यांनी आपल्या दिवंगत संवेदनशीलतेला आणि अकलेलाही आदरांजली वाहून घेतली असती तर!

.............................................................................................................................................

२. भारतीय नागरिकांनी विदेशातल्या बँकांमध्ये किती काळा पैसा साठवून ठेवला आहे, याबद्दल सरकारकडे नेमकी आकडेवारी नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. आर्थिक प्रकरणांमध्ये स्थायी समिती अनेक शिफारसींच्या आधारावर देशात आणि देशाबाहेर किती काळा पैसा गुंतवण्यात आला आहे याची माहिती घेणं सुरू आहे. मात्र देशाबाहेर नेमका किती पैसा आहे हे सांगता येणार नाही, असं अरुण जेटली यांनी म्हटलं आहे.

लोकहो, शांत व्हा, शांत व्हा... काळ्या पैशाबद्दल काहीच माहिती नसताना मोठमोठ्या बाता कशाला मारल्यात, नोटबंदीचा ताप कशाला दिलात, परदेशांतला काळा पैसा किती हे सांगूही शकत नसाल (भारतात आणणं तर दूरच) शकत नसाल, तर राजीनामा द्या, वगैरे मागण्या करून संसदेचं कामकाज बंद पाडायला जेटली हे काही काँग्रेसचे अर्थमंत्री आहेत का? जरा सकारात्मक दृष्टीने पाहा. ही काळी संपत्ती जास्तच निघाली, तर २०१९ साली कदाचित आपल्या खात्यात १५च्या जागी ३० लाख रुपये जमा होण्याचं आश्वासन मिळेल... बडा सोचो!

.............................................................................................................................................

३. भारतीय उपखंडात भारताला शह देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या चीनने त्यासाठी पाकिस्तानचा प्याद्यासारखा वापर करण्याची रणनीती आखली असून पाकिस्तानसोबत हातमिळवणीची ब्लू प्रिंट तयार केली आहे. ती मान्य झाल्यास हळूहळू पाकिस्तान चीनचा गुलाम होणार हे उघड आहे. या ब्लू प्रिंटनुसार पाकिस्तानच्या साधनसंपत्तीवर चीनचं नियंत्रण येणार आहे. भारताला अडचणीत आणण्यासाठी आता पाकिस्तान चीनची गुलामीही करायला तयार आहे असं दिसून येतं आहे. चीनने अत्यंत पद्धतशीरपणे पाकिस्तानला अधिपत्याखाली आणण्याची योजना आखली आहे.

भारतद्वेष हाच ज्या देशाचा लष्करी आणि राजकीय पाया आहे, त्या देशाचं आणखी काय होणार? या देशाला अमेरिकेचे तळवे चाटण्याची सवय होतीच, कारण तोच इथल्या राज्यकर्त्यांना आणि लष्करशहांना भरवणारा तळवा होता. आता बदललेल्या समीकरणात अमेरिकेने पाकिस्तानला धुडकावण्याचं सुरू केलं आहे. आता त्याला दुसरा ‘मालक’ शोधावा लागणारच. भारताशी खरीखुरी मैत्री केल्याखेरीज ही गुलामी संपणार नाही, हे या देशातल्या राज्यकर्त्यांना लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असेल.

.............................................................................................................................................

४. रिलायन्स उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या अनेक घोषणांचा फटका दूरसंचार क्षेत्रातील इतर कंपन्यांना बसला आहे. दूरसंचार कंपन्यांच्या निर्देशांकात आज २ टक्क्यांची घसरण झाली. जिओच्या बहुप्रतिक्षित ४जी फिचर फोनची घोषणा अंबानी यांनी करताच त्याचा मोठा फटका एअरटेल आणि आयडिया कंपन्यांना बसला. आयडिया सेल्युलरच्या समभागांच्या मूल्यांमध्ये ६.६४ टक्क्यांनी घसरण झाली. तर रिलायन्स जिओच्या धसक्याने भारती एअरटेलच्या समभागांच्या किमतीत ३.१६ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. रिलायन्स जिओ मोफत ४जी फोनचा गैरवापर टाळण्यासाठी रिलायन्स जिओकडून ग्राहकांकडून दीड हजार रुपये अनामत रक्कम म्हणून घेतले जातील. तीन वर्षानंतर ग्राहक कंपनीला फोन परत करून दीड हजार रुपये परत घेऊ शकतो. या घोषणांमुळे रिलायन्स उद्योगाच्या समभागाचा दर १ हजार ५७७ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

इतक्या सेवासुविधा इतक्या मोठ्या ग्राहकसंख्येला कोणतीही कंपनी इतक्या कमी दरांत कशी देऊ शकते, असा प्रश्न सध्या कुणाला पडणार नाही. फुकट ते पौष्टिक हे आपलं ब्रीदवाक्य आहे. जगात काहीही फुकट नसतं. कोणी ना कोणी (बहुतांश वेळा वेगळ्या खिशामधून आपणच) अशा खैरातींची किंमत मोजत असतो, हे ‘गिऱ्हाईकां’च्या लक्षात येत नाही. ते तात्पुरत्या, झगमगीत, दिखाऊ लाभांनाच ‘अच्छे दिन’ समजत असतात.

.............................................................................................................................................

५. जुन्या गाण्यांचे रिमेक किंवा रिमिक्स करू नयेत. जुन्या गाजलेल्या गाणी रिमेक करणे म्हणजे एखादी सुंदर बनारसी साडी फाडून तिची बिकिनी केल्यासारखे आहे, असे मत प्रख्यात पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी मांडले. त्या म्हणाल्या, गाण्यांचे रिमेक केल्याने त्यांचे मूळ अस्तित्व नष्ट होते. नवीन कलाकार फक्त गाजलेल्या जुन्या गाणी रिमेकसाठी निवडतात आणि नव्या व्हर्जनमध्ये प्रेक्षकांसमोर आणतात. मात्र त्या जुन्या गाण्यांच्या निर्मितीसाठी किती वेळ आणि मेहनत लागली याचा विचार ते करत नाहीत.

अनुराधाताईंनी फार सुंदर शब्दांत रिमिक्सच्या धांदोट्या केल्या. हा साक्षात्कार त्यांना आता व्हावा, यातही काही आश्चर्य नाही. कोणी त्यांना कव्हर व्हर्जनबद्दलचं त्यांचं मत का विचारलं नाही? अनुराधाताईंची सगळी कारकीर्द टी सिरीजने लतादीदींच्या गाण्यांची, अनुराधाताईंनी गायलेली कव्हर व्हर्जन्स बाजारात आणल्यानंतर त्या आधारावर उभी राहिली. त्याही मूळ गाण्यांच्या कर्त्यांच्या मेहनतीचा विचार कव्हर व्हर्जन करताना झाला नव्हता. अनुराधाताईंनी लतादीदींच्या गाण्यांना खूपच न्याय दिला असला, तरी अस्सल ते अस्सलच होतं तेव्हाही.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......