अजूनकाही
बरीच वाट पाहिल्यानंतर अखेर मागच्या शुक्रवारी ‘जग्गा जासूस’ रिलीज झाला. माझ्या माहितीत ‘थोडासा रुमानी हो जाये’नंतर २७ वर्षांनी पहिल्यांदाच आपल्याला पूर्ण संवाद पद्यामध्ये असणारा सिनेमा पाहायला मिळाला. हा प्रयोग आपल्यासाठी इतका नवीन आहे की, समीक्षक, प्रेक्षक दोघांनाही बुचकळ्यात टाकत अगदी टोकाच्या मतांचा तो धनी ठरलाय. कारण सिनेमातल्या नाच- गाण्यांशी असला तरी संपूर्ण म्युझिकल सिनेमाशी भारतीय प्रेक्षक फारसा परिचित नाहीये. त्यामुळे समोर घडणाऱ्या म्युझिकल प्रसंगाला कशी प्रतिक्रिया द्यायची, हेच बऱ्याच जणांना समजेनासं होतं.
याचा अर्थ सिनेमा फारच ग्रेट आहे आणि आपण त्या लायक नाही आहोत असं म्हणणं नाहीये. सिनेमात तांत्रिकदृष्ट्या चुका झाल्या आहेत. संगीत आणि बोल यांच्या पातळीतला ताळमेळ चुकणं, अभिनेते कुशल गायक-नट नसणं, कथेचे तुकडे पडत जाऊन ती लांबत जाणं इ. पण तांत्रिकता बाजूला ठेवल्यास हा एक उत्तम सिनेमा वाटतो. रहस्यकथा, अॅडव्हेंचर आणि म्युझिकल्स या जॉन्रंना एकत्र करण्याचं काम दिग्दर्शक अनुराग बासूने उत्तम केलंय. (लहान मुलांसाठी असं काही करणं बंगाली मनुष्यच करू जाणो! कारण बालसाहित्याची इतकी समृद्ध साहित्यपरंपरा केवळ त्यांनाच लाभली आहे.)
अगदी छोट्या छोट्या प्रसंगातही इथे दृश्यात्मकतेचा वापर आहे. (दृश्यं बदलण्याच्या पद्धती पाहा, एकही शब्द न वापरता टेबलवरती ठेवलेल्या ५ टेलिफोन्समधून विनोदनिर्मिती करणं इ.) ‘बर्फी’मधल्या झिलमीलला जशी प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची स्वतःची एक दृष्टी आहे, तशीच अनुराग बासूलाही आहे असं वाटतं. (दोन खुन्यांच्या फोटोसमोर बोट धरून एक-एक डोळा बंद करत नक्की खुनी कोण हा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचवला जातो!) टूटी फुटी जसा जग्गाला कॉर्नफ्लेक्स उलटे खोलायला सांगतो, तसा उलटा विचार करत तो प्रसंग रचत जातो. (मिस मालाची आत्महत्या आणि मर्डर ऑन द जायंट व्हील या दोन्ही गोष्टींचा विचार उलटा केलेला आहे!) सिनेमातल्या वेडेपणाला, योगायोगांना किंवा दुर्दैवांनाही त्याने मांडणीचा एक भाग म्हणून सादर केलंय. इतका वेडेपणा असलेला मनुष्यच ‘सब खाना खाके दारू पीके चले गये’ यासारख्या शब्दांवर गाणं होऊ शकतं हा विचार करू शकतो. आणि इतका वेडेपणा त्याच्यामध्ये आहे म्हणूनच तो अशा कथेला म्युझिकलचं अंग देण्याचा विचार करू शकतो.
या सिनेमाची विस्तृत समीक्षा वेगवेगळ्या समीक्षकांनी वेगवेगळ्या अंगांनी केलेली आहेच. ती करणं हा या लेखाचा उद्देश नव्हे. आपण मुळात या जॉन्रशी, या सिनेप्रकाराशी इतके अनभिज्ञ कसे राहिलो याचा विचार करूया.
आपल्याकडे म्युझिकल्स का घडले नाहीत?
आधी पाहूया हे म्युझिकल (संगीतक/संगीतिका) नक्की प्रकरण काय आहे? म्युझिकल्समध्ये संगीत किंवा गाण्यांचा वापर हा केवळ पार्श्वभूमीला न ठेवता त्यांना पुढे आणलं जातं. कथा पुढे नेण्यासाठी संगीताचा, गाण्याच्या बोलांचा किंवा पद्यात बोलल्या जाणाऱ्या संवादांचा वापर केला जातो. (स्वीनी टॉड, ले मिझराब्ल) संगीत आणि पद्य हे कथेचे अविभाज्य घटक होऊन जातात. तर कधी कधी सगळे संवाद पद्यात नसतात, पण काही गद्य, काही पद्य संवाद, काही गाणी (साउंड ऑफ म्युझिक, माय फेअर लेडी) असा त्याचा प्रवास होतो. मग पुढे जाऊन त्यात डान्सिकल (वेस्ट साईड स्टोरी, शिकागो, स्पॅनिश डान्सीकल्स) हाही एक प्रकार आहे. म्युझिकल अॅनिमेशन्स (मेरी पॉपीन्स, लायन किंग, फ्रोझन) हाही खूप वर्षं प्रसिद्ध असणारा प्रकार आहे.
आजच्या काळात ही परिमाणं बदलत जॉन कार्नीचे संगीताबद्दलचे सिनेमे, एडगर राईटच्या सिनेमातलं संगीतासोबत अॅक्शन हाताळणं. असेही नवनवीन प्रयोग सिनेमातल्या संगीताच्या वापरासोबत होत आहेत.
पण हे सर्व झालं हॉलीवुडच्या म्युझिकल्सबद्दल. आपल्याकडे याचं स्वरूप काय आहे? हिंदी किंवा जवळपास सबंध भारतातले प्रादेशिक सिनेमेही पहिले तर आपण सिनेमात गाणं आणि नाचणं याच्याशी अजिबात अनभिज्ञ नाही आहोत. पण संपूर्ण सिनेमाच असा गाण्यात असण्याचा आपला अनुभव हा अगदीच थोडका आहे. माझ्या माहितीत तर ‘हिर-रांझा’ आणि ‘थोडासा रुमानी’च्या पलीकडे ही यादी गेलेली नाही. अर्थात परिभाषा थोडी सैल केली तर बरेच सिनेमे यात येऊही शकतील. उदा. ताल, रॉकस्टार, देवदास, जानेमन इ.
“आमच्याकडे प्रत्येक फेस्टिव्हलला गाणी असतात, आम्ही म्युझिकल माणसं आहोत” अशा शब्दांत भारतीय स्टार्स बॉलीवुडच्या नाच-गाण्याचं समर्थन भारताबाहेर करताना दिसतात. आपण सर्वच याचा अभिमान बाळगतो. तो बाळगायला हरकतही नाही, कारण त्यात तितके प्रयोग करत आपण तो विकसित केला आहे. तरीपण मनात शंका येते की, संपूर्ण म्युझिकलचं आपल्याला इतकं वावडं का? याचं एक उत्तर असं की, सर्वांसाठी सिनेमे बनवण्याच्या प्रयत्नात जॉन्र स्पेसिफिक प्रयोगांना भारतात कायम डावललं गेलंय. अॅक्शन, थ्रीलर, रोमँटिक, कॉमेडी हे सर्व एकाच सिनेमात द्यायचा आपला प्रयत्न असतो/असायचा. त्यामुळे भारतात पूर्ण संगीतिका बनणं शक्य झालं नाही. आता ते बनण्याची थोडी जागा तयार होते आहे. अर्थात तशी मागणी अजिबात नाहीये.
यात प्रश्न असा पडतो की, लाखभर रचना असणारं महाभारत आपल्याकडे संपूर्ण पद्यात लिहिलं जातं. शिक्षणाची मौखिक परंपराही एक ताल किंवा लय पकडून त्यावर मंत्र, जप, काव्य, ऋचा शिकण्याला महत्त्व देते. मग हे सिनेमात का नाही उतरलं? बरं अगदी जुनं सोडलं तरी एकोणिसाव्या शतकातली देवकीनंदन खत्रींच्या ‘चंद्रकांता’सारखं साहित्य पडद्यावर येताना आपण पूर्ण गद्यात बनवलं. कार्नाडांच्या ‘उत्सव’सारखे प्रयोग एखाद दुसरेच झाले. मराठीतही ‘घाशीराम कोतवाल’पासून ‘तीन पैशांचा तमाशा’पर्यंत बरीच संगीतकं येऊन गेली. पण ‘जैत रे जैत’सारखा सिनेमात घडणारा प्रयोग विरळाच.
आपल्या म्युझिकल्सचा विचार कसा केला जावा?
पण पाश्चात्य व्याख्येप्रमाणे संपूर्ण म्युझिकल सिनेमा आपल्याकडे बनला नाही ही नाण्याची एक बाजू झाली. भारतीयांनी पारशी नाटकापासून प्रेरणा घेत, सिनेमात अभिव्यक्ती म्हणून संगीत, गाणी अगदी प्रामुख्याने वापरली आहेत. फक्त ती वापरण्याची आपली पद्धत वेगळी आहे. जसं की पाश्चात्य म्युझिकल्स हे बोलण्यातून गाण्यात गेले तरी स्थळ आणि काळाची बंधने तोडताना दिसत नाहीत. पण आपल्याकडे मात्र प्रपोज झाल्या झाल्या लगेच कुठल्या तरी ‘ला ला लँड’वर जाऊन ‘नैनो में सपना’ सुरू व्हायला अजिबात वेळ लागत नाही. (त्यांच्याकडे मात्र प्रत्यक्ष ‘ला ला लँड’ नावाच्या सिनेमातही पात्रं आधी त्या जागेवर जातात आणि मग तिथं ते गाणं घडतं) आपल्या नाटकांमध्ये जसं एक चक्कर मारली की, स्थळ बदलतं तसाच स्थळ-काळ अगदी खुलेपणाने वापरण्याचा हा प्रकार. अशा प्रकारे आपली गाणी वापरण्याची पद्धतच वेगळी आहे. अर्थात आता हळूहळू ती कमी होत चाललीय, कारण राजकुमार हिरानीसारखे काही अपवाद वगळता विश्वासार्ह वाटेल अशा पद्धतीने त्याचं दिग्दर्शन होताना दिसत नाही. हीच मेख आहे की आपण गाणी दिग्दर्शित करण्याचं एक तंत्र विकसित केलंय आणि आज ते विसरत चाललो आहोत.
एकंदर भारतीय सिनेमात गाणी वापरणं हे पहिल्या बोलपटापासून (‘आलम आरा’) सुरू झालं. पण गाण्यालाही स्वतःचं एक व्याकरण असतं, त्याची त्याची एक पूर्ण कथा असते, भावनांचा प्रवास असतो आणि आणि संगीतासोबत त्यालाही क्रिसेन्डो असतो हे सर्व प्रेक्षकांच्या समोर आणलं ते व्ही. शांताराम यांनी. त्यांचे ‘जल बीन मछली नृत्य बीन बिजली’, ‘नवरंग’ हे कमालीचे डान्सिकल्स आहेत. शिवाय ‘गीत गाया पत्थरोने’, ‘पिंजरा’ यातलंही गाण्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ‘नवरंग’मधली नृत्यं आपल्यासमोर कथा उभी करतात. मग ती नाग-मोराची कथा सांगणारं गाणं असो की, ‘आधा है चंद्रमा’ असो. ‘नृत्य बीन बिजली’ या गाण्याच्या सुरुवातीलाही संध्या एक मासोळी पाण्यातून बाहेर काढते, स्वतः नाचते. दोघींचा रंग सारखा आहे आणि तडफडही. आणि शेवटाला मासोळी परत पाण्यात सोडली जाते. अशा प्रकारे कथा नसलेल्या ठिकाणीही त्याला एक हुक ठेवण्याची शांतारामांची ही हातोटी कमाल आहे.
अर्थात गाणी वापरण्याचं हे प्रत्येक दिग्दर्शकाचं तंत्र स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. चेतन आनंदची त्यातली शैली वेगळी. शक्ती सामंतांची वेगळी. गुरु दत्तच्या ‘प्यासा’मधलं ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो’ हे गाणं अत्यंत शांतपणे सुरू होतं आणि एका सीनची गरज पूर्ण बाजूला सारत सिनेमाला थाटात एका महान शोकांतिकेच्या जागी नेऊन कसं बसवतं हे पाहण्याजोगं आहे. हे गाणं काढलं तर सिनेमा पूर्ण होणारच नाही. आजच्या सिनेमात अशी किती गाणी असतात. (इम्तियाजची टाईम ट्रॅव्हल गाणी सोडल्यास.)
‘साहीब, बिवी और गुलाम’मधल्या ‘पिया ऐसो जिया से’ या गाण्यात मीना कुमारी गाण्याच्या ठेक्यांवर तयार होत जाते. म्हणजे साडीच्या निऱ्या काढताना त्यावरही हलके बिट्स दिले जातात. हा गाणं दिग्दर्शित करण्याचा नाजूकपणा आपल्या दिग्दर्शकांनी विकसित केला आहे. म्हणून म्हटलं की, आपल्या म्युझिकल्सचा अभ्यास हा फार वेगळ्या प्रकारे करावा लागेल.
गाण्यांचा असाच वेगळा विचार करणारे राज कपूर, विजय आनंद हे दिग्दर्शक आपल्याकडे होऊन गेलेत. गाण्यात प्रचंड भव्यता आणण्याचं काम मनमोहन देसाईंनी केलं. त्यांची अंड्यात बसलेल्या अँथनी गोनसाल्वेसची प्रतिमा आपल्या कायमची लक्षात राहिली आहे. ‘सुहाग’, ‘रोटी’ या सिनेमातलीही त्यांची गाणी नक्की पाहावीत अशी आहेत.
शक्ती सामंतांनी अभिनेता आणि अभिनेत्रींना थोडंसं दूर ठेऊन गाणं करण्यात जी मजा आणलीय त्याची उदाहरणं बघा. ‘मेरे सपनों की रानी’ यात एकजण ट्रेन दुसरा कारमध्ये आहे आणि हे एकत्र शूट करण्याची जी कमाल त्यांनी ६० दशकात करून दाखवलीय, त्याला तोड नाही. अभिनेता आणि अभिनेत्रींना परत एकदा असंच दोन शिकाऱ्यांवर दूर ठेवून मग ते ‘तारीफ करू क्या उसकी’ शूट करतात. ही गाणी आयकॉनिक ठरली ती केवळ चांगल्या संगीतामुळेच नव्हे तर त्याच्या दृश्यांचा असा विचार केल्यामुळे. लक्षात घ्या शेवटची घेतलेली दोन्ही नावं ही अत्यंत व्यावसायिक दिग्दर्शकांची होती. पण आजच्या हिंदी आयटमसॉंग सारखं त्यांनी लावा गॅरेजचा सेट, उडवा वेल्डिंगच्या ठिणग्या असं करून सगळीच सारखी दिसणारी गाणी दिग्दर्शित केली नाहीत. तर त्यात त्या संगीताचा, शब्दांचा विचार आहे. म्हणून तर ‘चिंगारी कोई भडके’च्या तालावर वल्हवली जाणारी होडी आजही लक्षात राहते.
हीच धुरा पुढे चालून सुभाष घईनी चालवली. ‘जरा तसबीर से तू’ असो किंवा ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यांत चेहरा समोर येणं हा एक हूक आहे. संगीताची एक धून कथेपासून गाण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला चालना देत राहील असा विचार ‘हिरो’सारख्या सिनेमात आहे. पुढे पुढे त्यांच्या गाण्यांत एक भव्यता येत गेली. एक्स्ट्रा वापरण्याचं विशेष स्कील असणारा शैमक दावरला त्यांनी सोबतीला घेतलं. (जो आज २-३ वर्षात एखादी फिल्म करतो, त्याचा फिल्ममध्ये कोरिओग्राफी करण्याचा रस आता निघून गेलाय हे त्याचं म्हणणं का असेल याचाही विचार केला जावा!)
त्यानंतरच्या पिढीतलं विशेष नाव घ्यावं ते मणीरत्नमचं. ‘दिल से’ या गाण्यातला वेडेपणा, ‘रुक्मिणी’, ‘हमा’ गाण्यांतली मस्ती हे त्या काळाच्या मानानं खूप लिबरेटिंग होतं. आणि त्याचा गाण्याच्या दिग्दर्शनाचा परमोच्च बिंदू म्हणजे अर्थातच ‘छय्या छय्या’.
लगोर खेळण्यापासून ते पाणी भरायला गेल्यावर मोडलेल्या काट्यापर्यंत कुठल्याही प्रसंगावर गाणं दिग्दर्शित करणारा भन्साळी म्हणजे तर आजचा हिंदी सिनेमातला म्युझिकल दिग्दर्शित करू शकण्याची संपूर्ण क्षमता असणारा दिग्दर्शक म्हणावा लागेल.
अशा अजून बऱ्याच दिग्दर्शकांबद्दल चर्चा करता येईल, पण या लेखाचा उद्देश हा त्या दृष्टीने विचार करायला सुरुवात करायला लावणं इतकाच होता. आपल्या दिग्दर्शकांनी हे जे काही तंत्र विकसित करून ठेवलंय. त्याचा वापर आज अत्यंत कमी होताना दिसतो. आपण भारतीय दृश्य माध्यमाच्या बाबतीत अंधळे होत चाललोय की, काय असा प्रश्न पडावा इतकी बिकट परिस्थिती आज आहे. या परिस्थितीत ‘जग्गा जासूस’ करण्याचा विचार करणंही क्रांतिकारी ठरतं. आज तो विचार अनुराग बासूने केला त्यामुळे त्याचं कौतुक नक्कीच आहे. हा चित्रपट भले क्रांतिकारी नसला तरी त्यामुळे या दृष्टीने पुढे काही प्रयत्न होतील अशी आशा करायला हरकत नाही. कारण या प्रयत्नातच आपण भारतीयांनी तयार केलेली ही कला टिकून राहणार आहे.
लेखक पुण्याच्या सिने क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
chavan.sudarshan@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment