अजूनकाही
ढिनचॅक पुजा नावाच्या स्वतःला गायिका म्हणवून घेणाऱ्या मुलीचं 'सेल्फी मैने ले ली' नावाचं गाणं समाजमाध्यमांचा माध्यमातून तुफान गाजलं. त्या गाण्याच्या युट्युब व्हिडिओला लाखो हिट्स मिळाल्या. ट्विटरवर हे गाणं असंख्य वेळा रिट्विट झालं. ढिनचॅक पुजा नाव घराघरात पोहोचलं. एखाद्या समाजमाध्यमावर नसलेल्या आणि त्यामुळे जगापासून तुटलेल्या माणसाला हे ऐकल्यावर असं वाटू शकत की, ही ढिनचॅक पुजा खूप गुणवत्ता अंगी असलेली गायिका असेल. त्यामुळेच लोक तिची गाणी इतकी बघत आहेत. पण ज्यांनी ज्यांनी ढिनचॅक पुजाची गाणी ऐकली आहेत, त्यांना माहीत आहे की, हे किती सुमार प्रकरण आहे. तिच्या गाण्याचा व्हिडीओ जितका वाईट आहे, त्याच्यापेक्षा वाईट पूजाचा आवाज आहे. एकूणच संगीत दिग्दर्शन, संगीत संयोजन, निर्मिती मूल्य या आघाड्यांवर या ढिनचॅक पूजाने सुमारतेचे नवीन मापदंड निर्माण केले आहेत.
दिग्दर्शक कांती शाहचा ‘गुंडा’ ज्याला माहीत नाही, असा चित्रपट रसिक विरळाच. ‘गुंडा’हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुमारतेचा पडद्यावरचा उत्सव आहे. ‘Its so bad that it’s good’ या सिंड्रोममुळे या चित्रपटाला ‘कल्ट क्लासिक’चा दर्जा मिळाला आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, तिला विनोदाची झालर येते म्हणतात. अतिशय वाईट संवाद, भडक अभिनय, विनोदी रेप सीन्स आणि अतिशय वाईट तांत्रिक बाजू असते, तेव्हा ‘गुंडा’सारखा चित्रपट तयार होतो. आज IMBDसारख्या वेबसाइटवर ‘गुंडा’चं मानांकन रणबीरच्या ‘रॉकस्टार’, विद्या बालनच्या ‘द डर्टी पिक्चर’ आणि चक्क ‘शोले’पेक्षा पण जास्त आहे.
खरं तर ‘गुंडा’चा दिग्दर्शक हीच कांती शाहची ओळख करून देणं म्हणजे त्याच्यावर अन्याय होईल. ‘डाकू मुन्नीबाई’, ‘गरम’, ‘कांती शाह के अंगुर’, ‘लोहा’, ‘शीला की जवानी’ या सेमी-पोर्न चित्रपटांचा लेखक-दिग्दर्शक म्हणून तो सिंगल-स्क्रीन चित्रपटाच्या बाजारात प्रसिद्ध आहे. विक्रमादित्य मोटवानेच्या गाजलेल्या ‘उडान’ या चित्रपटात ‘कांती शाह के अंगुर’ या चित्रपटाचा वारंवार उल्लेख होतो. ‘उडान’मधला टीनएजर नायक आणि त्याचे मित्र यांच्या लैंगिक जाणिवांचा तो चित्रपट एक अविभाज्य हिस्सा असतो.
कांती शाह आणि ढिनचॅक पुजा यांना जोडणारा एक समान दुवा आहे. दोघांनाही सुमार असूनहीण भरपूर लोकाश्रय मिळाला आहे. अनेक प्रतिभावंत कलावंत या लोकाश्रयासाठी आयुष्याच्या शेवटपर्यंत टाचा घासतात, तरी त्यांना हवीहवीशी जनमान्यता मिळत नाही. तीच लोकप्रियता ढिनचॅक पुजा आणि कांती शाहसारख्या सुमार लोकांच्या मागे गोंडा घोळवत फिरते, याचा अन्वयार्थ काय लावायचा? लोकांना-प्रेक्षकांना-श्रोत्यांना काय आवडेल याचा नक्की असा फॉर्म्युला अजून तरी तयार झालेला नाहीये.
मागे एका निर्मात्याने असं विधान केलं होत की, “एखाद्याला हिट फिल्म बनवण्याचा फॉर्म्युला मिळाला तर ही इंडस्ट्री त्याला करोडो रुपयांची नौकरी देऊन कामावर ठेवेल.” पण ढिनचॅक पुजा, कांती शाह, पाकिस्तानी गायक ताहेर शाह आणि अशा कित्येक सुमारांना मिळालेल्या लोकप्रियतेचं कारण मायबाप जनतेच्या मानसिक विश्लेषणात दडलेलं आहे.
फेसबुकवर 'आय लव्ह ट्रॅशी हिंदी मुव्हीज' नावाचा प्रचंड लोकप्रिय ग्रुप आहे. त्यावर 'ट्रॅशी' फिल्म प्रचंड आवडणारं पब्लिक आहे. सामान्यतः त्या ग्रुपवर जितेंद्रचे साऊथ इंडियन रिमेक्स, मिथुन चक्रवर्ती (ज्याचा उल्लेख तिथं सगळे भक्तिभावाने प्रभुजी असा करतात!) आणि त्याचे उटीमध्ये चित्रित झालेले चित्रपट, धर्मेंद्रचे देमार पट, रामसे बंधूचे भयपट आणि तत्सम चित्रपटांवर लांबलचक चर्चा होतात. अनेक वेळा या चर्चा विनोदी असतात, तर काही वेळा गंभीर. या ग्रुपमध्ये दहा हजारावर सदस्य आहेत आणि ही संख्या रोज वाढतंच आहे. म्हणजे 'ट्रॅशी' सिनेमा आवडणारं पब्लिक आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आहे.
'ट्रॅशी' सिनेमे आवडणे ही काही फक्त भारतीय प्रेक्षकांची मक्तेदारी नाही. हॉलिवुडमध्येही अनेक 'ट्रॅशी' सिनेमे बनले आहेत. 'एड' वुड ज्युनियर हा हॉलीवुडमधला निर्माता आणि दिग्दर्शक. साठ आणि सत्तरच्या दशकात याने परग्रहवासीयांची आक्रमण, भूत-प्रेत आणि इतर तत्सम विषयांवर चित्रपट काढले. पण याची खरी ओळख ही नाही. त्याच्या ‘प्लॅन नाईन फ्रॉम आऊटर स्पेस’ या चित्रपटाला जगात बनलेल्या सगळ्यात वाईट चित्रपटाचा मान मिळाला आहे.
हॉलिवुडमध्ये गोल्डन टर्की अवॉर्ड्स नावाचा भन्नाट प्रकार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा गौरव करतात, त्याप्रमाणे गोल्डन टर्की अवॉर्ड्स सर्वांत वाईट चित्रपटांना पुरस्कार देतात. त्यांच्या मते वाईट चित्रपट बनवणे हीसुद्धा एक कला आहे. तर या गोल्डन टर्की अवॉर्डने एड वुडला 'सार्वकालीन वाईट दिग्दर्शक' या पुरस्काराने सन्मानित केले आहे. हा पुरस्कार घ्यायला एड वुड मात्र हजर राहू नाही शकला. कारण काही वर्षांपूर्वीच अती मद्यपानाने तो मरण पावला होता.
टीम बर्टनने जॉनी डेपला घेऊन 'एड' वुड ज्युनियरवर एक भन्नाट चित्रपट काढला आहे. तर या एड वूडचे चित्रपटांच्या स्पेशल स्क्रीनिंग होतात. लोक तिकीटखिडकीवर तिकीट मिळवण्यासाठी झुंबड उडवतात. त्याच्या चित्रपटांचे फॅन क्लब आहेत (जसे आपल्याकडे 'गुंडा' फॅन क्लब आहेत तसे). लेखक-निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता टॉमी विसाउ याचा 'द रूम' हा चित्रपटही असाच प्रेक्षक लोकप्रियतेमुळे सुमार असूनही कल्ट बनला आहे. म्हणजे 'ट्रॅशी' सिनेमे आवडणं हा युनिव्हर्सल फेनॉमिनन आहे.
'ट्रॅशी' सिनेमे किंवा कलाकृती प्रेक्षकांना का आवडतात याची अनेक कारणं आहेत. एकतर ताणतणावांनी भरलेल्या आयुष्यात या कलाकृती विनोदाची सुखद झुळूक आणतात. भले बहुतेक सुमार कलाकृतींचा उद्देश हा विनोदनिर्मिती नसला तरी त्यातून अजाणतेपणी जी विनोद निर्मिती होते, त्यामुळे प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होतं. 'ट्रॅशी' कलाकृतीची स्वतःची काही वैशिष्ट्यं आहेत. त्या लो बजेट असतात. दुसरं म्हणजे त्यांची निर्मिती मूल्यं हिणकस असतात. या चित्रपटांची पटकथा वाईट असते. संवाद विनोदी असतात. अभिनय आक्रस्ताळा असतो. या हिणकस निर्मितीमूल्यांमुळे अजाणता विनोदनिर्मिती होते, ती जगभरातल्या प्रेक्षकांना अपील होते असं निरीक्षण आहे. एकाच वर्तुळात फिरणारे मेनस्ट्रीम सिनेमे बघून बघून काही प्रेक्षकांना कंटाळा आलेला असतो. त्यांना 'ट्रॅशी' सिनेमे एक हटके अनुभव देतात. त्यामुळे 'ट्रॅशी' सिनेमा किंवा कलाकृतींचा स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग आहे.
आपल्याकडच्या रामसे बंधूंच्या भयपटांचं उदाहरण रोचक आहे. रामसे बंधूंचे चित्रपट काही लोकांना हास्यास्पद वाटतात, तर काही लोकांना भयानक. पण रामसे बंधूंचे चित्रपट त्याच्यातल्या हॉट सीन्समुळे जास्त गाजले. त्यांच्या चित्रपटांच्या निर्मितीमूल्यांची यथेच्छ थट्टा झाली. त्यांच्या चित्रपटात खरे स्टार्स भुताचा रोल बजावणारे नट होते. एका चित्रपटात भूत आदिदासचे बूट घालून येतो. या प्रकाराला लोक कितीही हसत असले तरी आपल्यापैकी बहुतेकांना, रामसे बंधूंच्या चित्रपटांनी आयुष्याच्या एका टप्प्यावर नक्की घाबरवलंय हे कबूल करायला हवं.
टीव्हीवर ‘झी हॉरर शो’ नवीन सुरू झाला, असताना डोक्यावरून पांघरूण घेऊन एका फटीतून तो शो बघण्याचं थ्रील अनेकांनी लहानपणी अनुभवलं असेल. ‘झी हॉरर शो’च्या निमित्ताने रामसे बंधूंनी फक्त चित्रपटगृहात अनुभवायला मिळणारी भीती, लोकांच्या बेडरूममध्ये पोहोचवली. त्या अर्थाने, सध्या विशीत आणि तिशीत असणाऱ्या पिढीच्या अनेक लोकांच्या नॉस्टाल्जियाचा ते भाग आहेत. दिग्दर्शक श्याम रामसे एका मुलाखतीत म्हणाला होता, “देशाच्या ज्या भागात रेल्वे थांबत नाही, त्या भागात आम्ही सिनेमा आणि टीव्हीच्या माध्यमातून पोहोचलो आहोत.’’ एकदम मार्मिक विधान आहे, ना? जिथं भले भले राजकारणी आणि सेलिब्रिटी पोहोचू शकत नाहीत, तिथं रामसे हा ब्रँड पोहोचला आहे.
'ट्रॅशी' कलाकृती आवडणाऱ्या लोकांकडे त्यांच्या आजूबाजूचे लोक विचित्र नजरेने बघतात. त्यांना स्वतःलाही आपली आवड इतकी विचित्र आणि इतरांपेक्षा वेगळी कशी असा प्रश्न पडतो,.पण त्यांनी स्वतःला आपल्या जगावेगळ्या आवडीनिवडीमुळे कमी लेखण्याची गरज नाही. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यानुसार ज्या लोकांना 'ट्रॅशी' सिनेमे मनापासून आवडतात, त्यांचा बुद्ध्यांक इतर लोकांपेक्षा जास्त असण्याची शक्यता असते. जर्मनीमध्ये हे संशोधन पहिल्यांदा प्रसिद्ध झालं. अनेक लोकांकडून प्रश्नावली भरून घेऊन मिळालेल्या उत्तरांच विश्लेषण केलं असता काही धक्कादायक निष्कर्ष समोर आले. या अभ्यासात असं आढळलं की, 'ट्रॅशी' सिनेमे आवडणारे बहुतेक लोक उच्चशिक्षित होते. याशिवाय 'ट्रॅशी' सिनेमे आवडणाऱ्या लोकांची अभिरुचीही चांगली असते.
त्यामुळे तुम्हाला 'गुंडा' आवडत असेल किंवा रामसे बंधूंचे हॉररपट आवडत असतील आणि त्यामुळे तुम्हाला किंवा तुमच्या अभिरुचीमुळे तुम्हाला तुच्छ लेखत असतील तर तुम्ही त्यांच्या तोंडावर या अभ्यासाचे निष्कर्ष फेकून मारू शकता. 'ट्रॅशी' कलाकृती आवडणाऱ्या लोकांसाठी 'कॅम्प' अशी शब्दरचना वापरली जाते. सुझान सोनतेग नावाच्या अभ्यासिकेने ही टर्मिनॉलॉजी वापरली आहे. तिच्याच शब्दांत सांगायचं तर, "Camp asserts that good taste is not simply good taste ; that there exists, indeed, a good taste of bad taste." या वाक्यातले शेवटचे पाच शब्द सगळ्यात जास्त महत्त्वाचे.
ही झाली 'ट्रॅशी' कलाकृती बघणाऱ्या प्रेक्षकांची बाजू. मला वाटतं अशी कलाकृती निर्माण करणाऱ्या कलाकारांचीही एक बाजू आहे. ढिनचॅक पुजा, कांती शाह, साजिद खान, एड वूड, ताहीर खान या सगळ्या बिनीच्या खेळाडूंची बाजू. आपण लोक आपण त्यांना कितीही हसत असलो आणि त्यांची खिल्ली उडवत असलो तरी या लोकांचं त्यांच्या कलेवर असणार प्रेम आपण नाकारू शकत नाही. लोकापवादाची फिकीर न करता हे लोक त्यांच्या मर्यादित वकुबानुसार कलाकृती बनवत राहतात. कारण ते त्याशिवाय दुसर काही करूच शकत नाहीत. जेव्हा जेव्हा कलानिर्मितीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तेव्हा पहिल्या मानाच्या प्रभावळीत या लोकांना जागा नसेल, पण सर्वांत शेवटच्या रांगेत तरी हजारी मनसबदार म्हणून एक मानाचं पान त्यांच्यासाठी नक्कीच राखून ठेवलेलं असेल…
.............................................................................................................................................
लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.
amoludgirkar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment