अजूनकाही
गेली पाच सहा वर्षं अर्णब गोस्वामीने इंग्रजी वृत्तवाहिन्यांच्या जगावर आपलं अधिराज्य गाजवलं होतं. ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीवर ‘द न्यूज अवर’ या कार्यक्रमातून आपल्या 'नेशन वाँटस टू नो' सारख्या कॅचफ्रेझेसनी जणू तो संपूर्ण देशाशी थेट संवाद साधत असतो! पत्रकारितेचे सर्व मापदंड, मर्यादा ओलांडून ‘प्राईम टाईम न्यूज प्रोग्राम’चं रूपांतर त्याने वाद-विवादाच्या आखाड्यात केलं होतं. त्यात कुठल्याही विषयावर सम्यक, सकस चर्चा न होता निव्वळ आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडवल्या जात. एका झटक्यात लोकांना भ्रष्ट, देशद्रोही, ठरवलं जाई. लोकांच्या भावनांना थेट हात घालता येईल, अशी प्रत्येक विषयाची मांडणी करणं, टोकाच्या भूमिका घेणाऱ्या लोकांना सहभागी करून घेणं, आवेशपूर्ण शीर्षकांचा सतत पडद्यावर मारा करणं, अशी एकूण या कार्यक्रमाची धाटणी असे. जाणीपूर्वक वातावरण तापवलं जाई. अगदी पडद्यावरही आगीच्या ज्वाळा दाखवून वातावरण निर्मिती केली जात असे.
माध्यमातल्या जाणकारांचं म्हणणं आहे की, २००८ च्या महामंदीनंतर माध्यमांच्या कार्यशैलीत खूप फरक झाला आहे. गुंतागुंतीच्या बातम्या मिळवण्यासाठी, त्यासाठी संशोधन करण्यासाठी लागणारा पैसा आणि वेळ खर्च करायला माध्यमांचे मालक-व्यवस्थापक तयार नाहीत. देशभर पत्रकार पाठवण्याचा खर्च त्यांना करायचा नाही. याउलट चर्चांचे कार्यक्रम घेणं त्यामानाने कमी खर्चिक आहे. याचा परिणाम असा झालाय की, अशा कार्यक्रमांचं सगळीकडे पेव फुटलंय आणि वार्ताहरांचं महत्त्व कमी झालंय. पूर्वी रात्रीच्या ९च्या बातम्या पहिल्या की, देशात काय चाललंय याची प्रेक्षकांना कल्पना यायची. आता मात्र अशा माहितीसाठी पेपर वाचावा लागतो किंवा दूरदर्शन पाहावं लागतं. इतर वृत्तवाहिन्यांवर ९ वाजता केवळ वेगवेगळे शो किंवा सामूहिक चर्चांचे कार्यक्रम असतात.
‘न्यूज अवर’मध्ये सहभागी झालेले सहभागी पाहुणे सांगतात की, आपल्याला चर्चेत सहभागी होता येईल म्हणून ते आमंत्रण स्वीकारतात, पण कार्यक्रमात मात्र त्यांना कोंडीत पकडलं जातं. ढोबळ भूमिका घायला भाग पाडलं जातं. आणि ते जास्त तपशिलात चर्चा करू लागले तर त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष केलं जातं. मधु किश्वर या अभ्यासक या कार्यक्रमात अनेकदा सहभागी झाल्या आहेत. त्या सांगतात की, पॅनेलमधल्या लोकांकडून एवढीच अपेक्षा असते की, त्यांनी कार्यक्रमात यावं आणि या एक तासाच्या कार्यक्रमामुळे देशापुढचे सगळे प्रश्न सुटतील, या अर्णबच्या भ्रामक कल्पनेला बळकटी द्यावी.
एक वरिष्ठ व्यवस्थापक सांगतात, “टीव्ही म्हणजे नाट्यमयता आणि या नाट्यमयतेत भर घालणं हे आपलं काम असं अर्णब मानतो. नाहीतर प्रेक्षक तुमच्याकडे येणार नाहीत.” अर्णबचा एक भूतपूर्व सहयोगी सांगतो, “तो एक बुद्धिमान पत्रकार होता. पण आता तो जणू एक विनोदवीर झालाय. ९ वाजता ‘टाइम्स नाऊ वर जे लागतं, त्याला तुम्ही निश्चितच बातमी म्हणू शकत नाही. त्याने बातमीला एक प्रकारचा फार्स बनवून टाकलंय. आमच्यासाठी न्यूज हा एक गंभीर व्यवसाय आहे. एखादा अँकरला स्वतःचं मत असू शकतं, पण हे जर तुम्ही अति ताणलं तर ते खूप आक्रमक आणि दडपण आणणार ठरतं. हे कधी कधी इतकं हास्यास्पद होतं की, त्यामुळे प्रत्यक्ष बातमीपासून पूर्ण दुर्लक्ष होतं.”
टाइम्स ग्लोबल ब्रॉडकास्टिंगचे माजी सीइओ चिंतामणी राव मात्र अर्णबचं समर्थन करतात. त्यांचं म्हणणं आहे की, ‘काळाप्रमाणे बातम्यांच्या सादरीकरणाची पद्धत बदलणं साहजिक आहे. १८४० सालची बातमी सांगण्याची पद्धत, १९६० सालची पद्धत आणि आताची पद्धत यात फरक हा असणारच.’
एक मात्र खरं आहे अर्णबची शैली कितीही विवादास्पद असली तरीही तो विलक्षण लोकप्रिय होता. इतका की, इतर वाहिन्यांनी त्याची नक्कल करायला सुरुवात केली. त्याच्यासारखीच आक्रमक शैली वापरण्यासाठी आपल्यावर दबाव असल्याची कबुली अनेक पत्रकार देतात. आजमितीला वृत्तवाहिन्यांमधला सर्वांत लोकप्रिय आणि प्रभावशाली पत्रकार म्हणून अर्णबचं यश निर्विवाद आहे.
१९७३ साली अर्णब गोस्वामीचा जन्म एका आसामी कुटुंबात झाला. त्याचे वडील सैन्यात असल्यामुळे त्याचं बालपण वेगवेगळ्या ठिकाणी गेलं. शालेय शिक्षणानंतर दिल्ली विद्यापीठातून त्यांनी समाजशास्त्राची पदवी मिळवली आणि त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून सामाजिक मानववंशशास्त्रातील मास्टर्स पदवी मिळवली. त्याचं ऑक्सफर्डमधील कुलगुरू सुरंजन दास सांगतात की, अर्णब चौकस बुद्धीचा तरुण होता आणि त्याच्या वाद-विवाद कौशल्याने ते प्रभावित झाले होते.
भारतात परतल्यानंतर अर्णबने कलकत्त्याला रुद्रांग्षु मुखर्जी यांच्या हाताखाली ‘द टेलिग्राफ’ या वर्तमानपत्रात नोकरी धरली. मुखर्जी सांगतात की, तो उत्साहाने भरलेला होता. त्याचबरोबर अत्यंत विनम्र आणि कामसू तरुण होता.
वर्षभरातच अर्णब ही नोकरी सोडून प्रणोय रॉय यांच्या एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीमध्ये रुजू झाला. तिथं राजदीप सरदेसाईचं वर्चस्व होतं. एनडीटीव्ही या दोघांमध्ये निरंतर स्पर्धा चालू होती. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नसत. एखाद्या राजकीय बातमीवर राजदीप रिपोर्टिंग करू लागला की, अर्णब लगेच त्यातल्या प्रमुख व्यक्तींना हेरून बातमी तयार करत असे, जेणेकरून त्याच्याकडेही लोकांचं लक्ष वेधलं जाईल.
त्यांच्यातलं हे वितुष्ट अर्णबने एनडीटीव्ही सोडल्यानंतरही कायम राहिलं. एनडीटीव्हीमध्ये आपल्याला डावलण्यात आलं असं त्याचं म्हणणं आहे. अजूनही तो बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, प्रणोय रॉय सारख्यांना माध्यमविश्वातील प्रस्थापित आणि स्वतःला त्यांना आव्हान देणारी व्यक्ती असं सादर करायचा प्रयत्न करे. जेव्हा राजीव प्रताप रुडी या भाजपच्या प्रवक्त्याने त्याला चुकून ‘राजदीप’ म्हणून संबोधलं, तेव्हा त्यांना थांबवत अर्णब म्हणाला, “मी अर्णब आहे, राजीव, अर्णब. आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की, आमच्यामध्ये काही एक साम्य नाही.”
जानेवारी २००५ मध्ये ‘टाइम्स नाऊ’ची सुरुवात झाली. त्या वेळी या वाहिनीचा मुख्य संपादक असलेला अर्णब केवळ ३३ वर्षांचा होता. त्यावेळी अर्णब गोस्वामीपेक्षा टाइम्स ग्रुप स्वतः वृत्तवाहिनी काढतोय याचीच जास्त चर्चा होती. सुरुवातीला तो बिझनेस न्यूज चॅनल असावा आणि त्याने सीएनबीसीसारख्या वाहिन्यांशी स्पर्धा करावी असा मानस होता. परंतु लवकरच अर्णबने त्याच्या संपादकीय टीमला सांगितलं की, त्यांची स्पर्धा एनडीटीव्ही आणि सीएनएन-आयबीएन या वृत्तवाहिन्याशी आहे. सुरुवातीला रॉएटर्स ही नावाजलेली आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था भागीदार होती. त्यांच्या आग्रहाखातर ‘टाइम्स नाऊ’च्या नियमावलीत ‘आम्ही अचूकतेला परमोच्च महत्त्व देऊ. तसंच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्न व विवादांमध्ये आम्ही नेहमी तटस्थ राहू,’ याचा उल्लेख करण्यात आला होता. पण रॉएटर्सने ‘टाइम्स नाऊ’मधली आपली भागीदारी संपुष्टात आणल्यावर ही सगळी नियमावलीच काढून टाकण्यात आली.
‘टाइम्स नाऊ’ सुरू करण्यासाठी अर्णब आणि त्याच्या टीमने अतोनात मेहनत घेतली. परंतु वृत्तवाहिनी प्रसारित होऊ लागल्यावर त्यांना अपेक्षेप्रमाणे प्रेक्षक मिळत नव्हते. अर्णबवर त्याचा दबाव वाढू लागला आणि त्याची हकालपट्टी होणार अशी सर्वत्र चर्चा होऊ लागली. दबावाखाली अर्णबने आपल्या संपादकीय भूमिकेचा फेरविचार केला आणि व्यवस्थापकांना पटवून देऊन उद्योग-व्यापाराशी संबधित बातम्या-कार्यक्रमांना कात्री लावली. हळूहळू सर्व संपादकीय सूत्रं त्याने स्वत:च्या हातात घेऊन संपादकीय भूमिकेवरील चर्चाही संपुष्टात आणली.
त्यानंतर ‘टाइम्स नाऊ’ची अवस्था अर्णब सांगेल त्याप्रमाणे हलू लागली. इतर सर्वांपेक्षा अर्णब जास्त वेळ ऑन स्क्रीन राहू लागला. प्रत्येक बातमी वा विषयांवर तो त्याची आक्रमक मतं मांडू लागला. ‘टाइम्स नाऊ’ ही खरीखुरी वृत्तवाहिनी नसून ती फक्त अर्णबचं मुखपत्र आहे की काय, अशा पद्धतीनं या वृत्तवाहिनीवरील बातम्या-कार्यक्रमांचं सादरीकरण होऊ लागलं. या चढेल आक्रमकतेचा ‘टाइम्स नाऊ’ला अंतिमत: फायदा होऊन त्यांचा टीआरपी झपाट्यानं वाढला. देशातील सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून अर्णबच्या रात्रीच्या कार्यक्रमाची जाहिरात केली जाऊ लागली. एकवेळ आक्रमक पत्रकारिता परवडली, पण पक्षपाती, पूर्वग्रहदूषित आणि राष्ट्रवादी पत्रकारिता ही देशातील सौहार्द धोक्यात आणत असते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी पत्रकारिता ही उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या हिताची होते. अर्णबला देशातील भाजप-संघासारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्ष-संघटनांची पसंती मिळू लागली ती त्यामुळेच. अर्णब त्यांच्या गळ्यातील ताईत झाला खरा, पण त्याने वृत्तवाहिनीवरील बातम्यांना, कार्यक्रमांना स्वत:च्या अजेंडा राबवण्याचं हत्यार बनवून टाकलं होतं.
थोडक्यात, अर्णब गोस्वामीची टीव्ही पत्रकारिता हे भारतीय पत्रकारितेच्या इतिहासातलं एक दु:स्वप्न होतं.
..................................................................................................................................................................
(‘फास्ट अँड फ्युरीअस – द टर्ब्युलंट रेग्न ऑफ अर्णब गोस्वामी’ या राहुल भाटिया यांनी २०१२मध्ये ‘कॅरेव्हॅन’ या मासिकात लिहिलेल्या लेखावर आधारित.)
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment