बिमलदा-मन्नादा : तीन रंगी इंद्रधनुष्य
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • मन्ना डे आणि बिमल रॉय
  • Sat , 22 July 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi मन्ना डे Manna Dey बिमल रॉय Bimal Roy

१२ जुलै हा बिमल रॉय यांचा जन्मदिन. हे वर्षे त्यांच्या स्मृतीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. (मृत्यू ८ जानेवारी १९६६). बिमल रॉय यांच्या चित्रपटातील सामाजिक आशय जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढाच संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापरही. यात मोठा वाटा अर्थातच सलिल चौधरी (‘दो बिघा जमीन’, ‘नौकरी’, ‘मधुमती’, ‘परख’, ‘प्रेमपत्र’, ‘अपराधी कौन’, ‘परिवार’, ‘उसने कहा था’, ‘काबुलीवाला’) आणि सचिन देव बर्मन (‘देवदास’, ‘सुजाता’, ‘बंदिनी’, ‘बेनझिर’) यांचाच राहिला आहे.

बिमल रॉय यांनी आपल्या चित्रपटांत बंगाली संगीत आणि त्यातही परत विशेषत: बाऊल संगीत, रविंद्र संगीत यांचा वापर मन्ना डेच्या आवाजात करून घेतला. हा वापर त्यांच्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य बनून राहिला आहे. भक्तीरंग-देशप्रेम-लोकसंगीत असे तीन रंग मन्ना डेच्या आवाजात बिमल रॉय यांच्या चित्रपटात दिसतात.  

बिमलदांच्या 'परिणीता'ला (१९५३) अरुण कुमार मुखर्जींचे संगीत आहे. यात एकतारीवर एक साधु गात आहे-

चली राधे रानी अखियों में पानी

अपने मोहन से मुखडा मोड के

छोड के मोहन की मिठी मुरलिया

छोड के गोकुल की ये कुंज गलिया

नैनन का नाता तोड के

भरत व्यास यांच्या शब्दांतच एक संगीत असतं. एकतारीचा आवाज, तबल्याचा साधा ठेका आणि मन्नादाचा घोटीव आवाज इतक्याच सामग्रीनं या गाण्यात पुरेपुर आर्तता भरली गेली आहे. मीनाकुमारी-अशोककुमार यांचा हा चित्रपट. यातच आशाचे लोकसंगीतावरचे लग्नसमारंभाचे गाणे ‘गोरे गोरे हाथों मे मेहंदी लगाके’ फार छान आहे. 

'देवदास' (१९५५) मध्ये सचिनदेव बर्मन यांनी मन्नादा आणि गीताचा आवाज वापरून दोन बहारदार गाणी दिली आहेत. मन्नादासोबत गीताचा जो एक अस्सल बंगाली सूर लागतो तो अफलातूनच. त्या मातीचाच काहीतरी गुण असावा. ही झाक इतरांच्या आवाजात येत नाही. एकतारीसोबत बासरीचा गोड वापर सचिनदांनी केला आहे. 

आन मिलो आन मिलो शाम सावरे

ब्रिज में अकेली राधे खोयी खोयी सी रे

पारो लहानपणी हे गाणं ऐकत आहे असा प्रसंग आहे. आधीच्याही गाण्यात राधा-कृष्णाची ताटातूट आहे. पण आधीच्या गाण्यात मिलनाची शक्यता नाही. पण या गाण्यात मात्र श्याम राधेला परत येऊन भेटेल ही आशा जिवंत आहे. हा बारकावा मन्नादांच्या गीताच्या आवाजातही दिसतो.

याच चित्रपटात अजून एक गाणं, पण अतिशय वेगळ्या भावावस्थेतील मन्नादा-गीताच्या आवाजात आहे. 

साजन की हो गयी गोरी, साजन की हो गयी

अब घर का आंगन विदेस लागे रे

लग्न ठरलेली पारो अंगणात बसली आहे. आणि ती साधु-संन्यासिनीची जोडी रस्त्यावर गाणे म्हणते आहे. अप्रतिम लावण्यवती सुचित्रा सेन हिचा चेहरा मात्र उदास आहे. ही उदासी लग्न होऊन आई-वडिलांचे घर सोडायचे आहे यापेक्षाही देवदासशी लग्न होत नाही यासाठी आहे. गाण्याचा मूड अतिशय आनंदी ठेवत त्या पार्श्वभूमीवर सुचित्रा सेनचा उदास चेहरा, शुन्यातले डोळे अशी एक वेगळी कमाल बिमल रॉय यांनी साधली आहे. गाण्याच्या शेवटी सहन न होऊन पारो (सुचित्रा सेन) पळत माडीवर जाते आणि दार बंद करून आपल्या हुंदक्याला वाट करून देते. या गाण्यात नवऱ्यासाठी ‘साजन’ शब्द वापरून साहिरनं कमाल केली आहे. म्हणजे ‘साजन की हो गयी’ असे गाण्याचे शब्द आहेत आणि प्रत्यक्षात ती साजन म्हणजेच प्रियकरापासून दूर चालली आहे. 

याच पद्धतीचे बंगाली भजन अजून एका चित्रपटात बिमलदांनी मन्नादांच्या आवाजात वापरले आहे. ‘परख’ (१९६०) मध्ये शैलेंद्रच्या शब्दांतील

क्या हवा चली रे, बाबा ऋत बदली

शोर हैं गली गली

सौ सौ चुहे खायके बिल्ली हज को चली

या गाण्याचा उपयोग मात्र कुठले वैयक्तिक दु:ख व्यक्त न करता सामाजिक परिस्थतीवर भाष्य करण्यासाठी करण्यात आला आहे. शैलेंद्रवरची डाव्या विचारांची छाप या गाण्यांत स्पष्ट दिसते. 

पहले लोग मर रहे थे भूक से, अभाव से 

अब ये मर न जाये कहीं अपने खाव खाव से 

मिठी बात कडवी लागे, गालीया भली

क्या हवा चली रे बाबा, ऋत बदली

पहिल्या तिन्ही गाण्यांत खोल कुठेतरी दु:खाची आर्तता दाखवणारा मन्नादांचा आवाज, इथे विनोदाचा सूर लावत खोल सामाजिक विषादाचा रंग आपल्या आवाजात दाखवतो. तीन संगीतकार, तीन गीतकार आणि एकच गायक यांच्याकडून आपल्या हवा तसा बंगाली भक्तिसंगीताचा वापर करून घेणे ही कमाल नक्की बिमल रॉय यांचीच. 

या बंगाली भजनांच्याप्रमाणेच मन्नादाच्या आवाजात देशप्रेमाची गाणी वापरून एक अनोखा रंग बिमलदांनी आपल्या चित्रपटात भरला आहे. पण अर्थात ही गाणी १९६० नंतरची आहेत. 

'काबुलीवाला' (१९६१) मध्ये सलिल चौधरींनी मन्नादांकडून जे गाणं गाऊन घेतलं, त्या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. एरव्ही देशप्रेमाची गाणी स्फूर्ती, जोश निर्माण करणारी, सैनिकांबद्दल आस्था निर्माण करणारी असतात. पण या गाण्यांत ‘सागरा प्राण तळमळला’सारखे एक निराळेच कारुण्य आहे. हे सुंदर गाणे आहे-

ए मेरे प्यारे वतन, ए मेरे बिछडे चमन

तुज पे दिल कुर्बान

देशभक्तीच्या गाण्यांसाठी हातखंडा असलेल्या प्रेम धवन यांचेच हे शब्द आहेत. रबाबसारखे अफगाणी वाद्य वापरून एक विलक्षण परिणाम सलिल चौधरींनी साधला आहे. मन्नादांच्या गळ्यातील फिरत त्या रबाबच्या सुरावटीचा पार्श्वभूमीवर वापर करत जो करुण परिणाम साधते, त्यानं अजूनच काळीज तुटते. सी.रामचंद्र, ओ.पी.नय्यर, वसंत देसाई यांच्या सारख्यांनी ताकदीने देशप्रेमाची गाणी दिली. पण जो रंग सलिल चौधरींनी यात भरला आहे, तो काहीतरी वेगळाच आहे. 

याच वर्षी आलेल्या ‘उसने कहा था’ (१९६१) मध्येही देशप्रेमाचे गाणे सलिल चौधरींनी मन्नादांच्या आवाजात दिले आहे-

जानेवाले सिपाही से पुछो

वो कहा जा रहा है

या गाण्यासाठी ट्रम्पेटचा-कोरसचा वापर करून वेगळा परिणाम साधला आहे. यात समूहमनाचा आविष्कार कसा घडेल याचा विचार केला आहे. ही रचना हैदराबादचे शायर मकदूम मोईनोद्दीन यांची आहे. मकदूम अशा मोजक्या शायरांपैकी आहेत की, त्यांच्या आठवणीत त्यांच्या गावच्या लोकांनी त्यांचे स्मारक उभारले. हैदराबादच्या निजाम सागर तळ्याच्या काठावर मकदूम यांचा देखणा पुतळा तेव्हाच्या चंद्राबाबू नायडू सरकारने उभारला आहे. 

देशप्रेमाचे तिसरे गाणे ‘बंदिनी’ (१९६३) मध्ये सचिन देव बर्मन यांनी दिले आहे. शैलेंद्रची लेखणी फासावर चढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाची भावना व्यक्त करताना लिहिते-

मत रो माता लाल तेरे बहुतेरे 

जनम भूमी के काम आया मैं बडे भाग हैं मेरे 

शैलेंद्रला शब्द अतिशय वश आहेत. फासावर चढणाऱ्या शहिदाच्या तोंडी असे शब्द त्याने दिले आहेत-

फिर जन्मुंगा उस दिन जब आझाद बहेगी गंगा

उन्नत भाल हिमालय पर जब लहरायेगा तिरंगा 

एका साध्या संथ लयीत मन्नादांनी हे गाणे गायले आहे. जसा की गंगेचा प्रवाह. त्याला आपल्या प्रवासाचे प्रयोजन नीट कळलेले आहे. आता त्याला कुठलीही घाई गडबड नाही. आपण निवडलेला मार्ग बदलणार नाही, आपले प्राक्तन हेच राहणार आहे. देशासाठी लढणाऱ्या या सैनिकालाही आपल्या आयुष्याचे प्राक्तन समजले आहे. दोन पावलांवर मृत्यू उभा आहे. सगळी खळबळ संपून गंगेच्या शांत प्रवाहासारखी एक स्थिरता त्याच्या स्वरांत उमटत आहे. ही शांतताच आपल्याला ऐकताना अस्वस्थ करून जाते. जास्त तीव्र स्वरात साधला जाणार नाही असा परिणाम सचिनदेव बर्मन यांनी मन्नादांच्या आवाजात या संथ लयीत साधला आहे. 

बिमल रॉय यांच्या चित्रपटात मन्नादांच्या आवाजाचा अजून एक रंग पण फुललेला आहे. तो म्हणजे लोकसंगीताचा-शास्त्रीय संगीताचा. ‘दो बिघा जमीन’ (१९५३)मधील ‘धरती कहे पुकार के’ आणि ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ ही दोन गाणी, तसेच ‘मधुमती’ (१९५८) मधील ‘चढ गयो पापी बिछुआ’ आणि ‘परिवार’ (१९५६) मधील लतासोबतची मन्नादांची जुगलबंदी ‘जा तोसे नाही बोलत’ खूप सुंदर आहेत. पण यापूर्वीच्या लेखांत त्यांच्यावर लिहिलेले असल्याने इथे परत उल्लेख टाळले आहे.

बिमल रॉय यांना जाऊन ५० वर्षे उलटली. मन्नादांची जन्मशताब्दी पुढच्या वर्षी सुरू होते आहे. बिमल रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त ही एक आठवण! 

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख