टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • पतंजली, राजीव शुक्ला, अरुण जेटली, रेमंड डेव्हिस आणि ‘द कॉन्ट्रॅक्टर’
  • Fri , 21 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या पतंजली Patanjali राजीव शुक्ला Rajeev Shukla अरुण जेटली Arun Jaitley रेमंड डेव्हिस Raymond Davis द कॉन्ट्रॅक्टर The Contractor

१. रामदेव बाबा यांच्या पतंजलीचा सध्या बाजारपेठेत चांगलाच बोलबाला पाहायला मिळतो आहे. अनेक दिग्गज कंपन्यांना मागे टाकत पतंजलीने अल्पावधीतच बाजारपेठा आणि घराघरांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यामुळेच आता गृहोपयोगी उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर यांच्यासह अनेक दिग्गज कंपन्यांनी पतंजलीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नैसर्गिक उत्पादनांवर भर द्यायचं ठरवलंय. पतंजलीने यंदाच्या आर्थिक वर्षात २१ हजार कोटींची कमाई केली आहे. पतंजलीच्या महसुली उत्पन्नात यंदा दुपटीने वाढ झाली आहे.

संशोधन वगैरे करून नैसर्गिक उत्पादनं बाजारात आणाल, स्वत:च्या पाकिटांमध्ये स्वत:चीच उत्पादनं भरून विकाल, स्पर्धात्मक किमती ठेवून उत्पादनं स्वस्त राखाल; पण, पतंजलीची ‘स्वदेशी देशभक्ती’ कुठून आणाल? शिवाय कपालभाती वगैरे शिकून व्यक्तिगत विद्या असलेल्या योगासनांचं सामुदायिकीकरण करून टाकण्याची कला शिकायला किती जन्म घ्यावे लागतील?

.............................................................................................................................................

२. गोरक्षेच्या नावाखाली गोरक्षकांच्या देशभर सुरू असलेल्या उच्छादाविषयी राज्यसभेत झालेल्या चर्चेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, असे आवाहन विरोधकांना केले. ‘हिंसेमुळे कोणताही प्रश्न सुटत नाही. हिंसा हा कोणत्याही प्रश्नावरील उपाय असू शकत नाही,’ असे जेटली म्हणाले. काँग्रेस गोमांसाच्या मुद्यांचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. गोमांस, गोवंशहत्या यावरून होणारे राजकारण थांबवण्यात यावे, असे जेटली म्हणाले.

उपयुक्त पशूला माता माता करून डोक्यावर घेणार तुम्ही, तिच्याबद्दलच्या मठ्ठ भावनाबाजीला अवगाहन करणार तुम्ही, त्यातून काहीजण चेकाळून नुसत्या संशयावरून माणसं मारतात, तेव्हा गप्प बसणार तुम्ही, गोरक्षकांच्या नंग्या नाचाकडे सुरक्षा यंत्रणांनी डोळेझाक करावी, असं वातावरण बनवणार तुम्ही; कधीतरी सवड मिळाली तर पंतप्रधानांना कठोर कारवाईचे डोस द्यायला सुचणार आणि या प्रश्नाचं राजकारण करतेय काँग्रेस? तेवढं जरी त्या पक्षाला जमलं असतं, तर तुम्हाला दोन्ही बाजूंनी ढोल वाजवावा लागला असता का?

.............................................................................................................................................

३. भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकप स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये दणक्यात प्रवेश केला. देशभरात टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक होत आहे. आयपीएलचे चेअरमन आणि राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. मात्र, भारतीय महिला क्रिकेट संघाने नेमकं कोणत्या स्पर्धेत यश मिळवलंय हेच राजीव शुक्ला विसरले. त्यांनी वर्ल्डकप स्पर्धेऐवजी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केल्याबद्दल टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

यावर त्यांची खिल्ली उडवणाऱ्या कितीजणांना भारतीय महिला क्रिकेट संघातल्या खेळाडूंची नावं माहिती असतील? कितीजण ते सामने पाहत असतील? ट्वीटमधली चूक शब्दाची आहे. क्रिकेटमधल्या भेदभावाची प्रवृत्ती फक्त शुक्लांची नाही; ती तथाकथित क्रिकेटप्रेमींमध्येही आहे. ते महिला क्रिकेटला लुटुपुटूचं क्रिकेट मानतात. राजीव शुक्लाही त्यांचेच प्रतिनिधी आहेत.

.............................................................................................................................................

४. पाकिस्तान अमेरिकेचा वापर एखाद्या पैसे संपणाऱ्या अमर्याद एटीएमप्रमाणे करतो आहे आणि अमेरिकेच्या बहुतांश आर्थिक मदतीचा उपयोग हा पाकिस्तानचं सैन्य पोसण्यासाठी केला जातो, असा धक्कादायक खुलासा रेमंड डेव्हिस या लेखकानं त्याच्या ‘द कॉन्ट्रॅक्टर’ या पुस्तकात केला आहे. रेमंड डेव्हिसला दोन पाकिस्तानी नागरिकांची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. या अटकेमुळे पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला होता. रेमंड डेव्हिसचा खटला पाकिस्तानच्या कोर्टात सुरू होता. मात्र त्याच्यावरचे आरोप सिद्ध होऊ न शकल्यानं त्याला सोडण्यात आलं.

केवढा मोठा गौप्यस्फोट हा रेमंडचा. आजवर कुणाला जणू हे माहितीच नव्हतं. शिवाय आव असा की, अमेरिका पाकिस्तानला फुकटातच पोसते आहे. अमेरिकेची सगळी अर्थव्यवस्था आणि महासत्तेची गुर्मी यांना जगातला असमतोल पोसत असतो. जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ढवळाढवळ करून अमेरिकेला शस्त्रांसाठी गिऱ्हाईकं मिळवायची असतात आणि कोणताही देश आपल्या बरोबरीला येणार नाही, याची काळजी घ्यायची असते. त्यासाठी भारतीय उपखंडात हे भुभू बसवून ठेवलं आहे. त्याला पोसायला नको? त्यात उपकार आहेत काय?

.............................................................................................................................................

५. पाकिस्तानमध्ये हिंदूधर्मीयांच्या सक्तीने सुरू असलेल्या धर्मांतराबद्दल ‘डॉन’ या प्रसिद्ध वृत्तपत्राकडून आवाज उठवण्यात आला आहे. त्यांनी पाकिस्तानी सरकारकडे या हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी केली असून या सगळ्याबद्दलचा सविस्तर अहवाल सरकारपुढे मांडला आहे. पाकिस्तानच्या थार येथील वाळवंटात हिंदू आणि मुस्लिम अशी मिश्र लोकसंख्या आहे. मात्र, या दोन्ही धर्माचे लोक याठिकाणी गुण्यागोविंदाने नांदत आहेत. उर्वरित पाकिस्तानी समाज आणि जगासाठी हा मोठा आदर्श असल्याचे ‘डॉन’ने म्हटले आहे.

पाकिस्तानातलं कोणतंही सरकार असं काही करणार नाही, याची ‘डॉन’ला खात्री असेलच. मिश्रवंशीय लोकसंख्या, दोन धर्मांचे लोक आजच्या पाकिस्तानातल्या अनेक भागांमध्ये १९४७च्या आधीही गुण्यागोविंदानेच राहत होते. तरीही धर्माच्या आधारावर फाळणी करून दोन्हीकडच्या कट्टरवाद्यांनी अनेकांचं ‘वतन’ कायमचं तोडलंच. त्या फाळणीतून जन्माला आलेल्या, एका धर्माचा आधार असलेल्या देशात आता सलोख्याच्या धार्मिक सहजीवनाचे आणि थोर परंपरेचे गोडवे गाण्यात अर्थ काय?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......