अजूनकाही
जाता येता पाच-सहाशे किमीची चाल करून ज्ञानेश्वर-तुकारामांच्या पालख्या दशमीस मुक्कामी विसावल्या असतील.
इतके दिवस वारीबद्दलचे कुतूहल दरवर्षी ठराविक काळात वर्तमानपत्रात रोज ठराविक जागी येणाऱ्या बातम्यांपुरतेच मर्यादित होते. आळंदी-देहूपासून होणाऱ्या प्रस्थानापासून ठिकठिकाणी स्थानिक पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांनी केलेले स्वागत, न चुकता येणारा दिवे घाटातल्या गर्दीचा वरून घेतलेला फोटो, माळशिरसपासून वाखरीपर्यंत ठिकठिकाणी होणारे उभे-आडवे रिंगण सोहळे, त्यातले ते डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन धावणाऱ्या बायकांचे फोटो, पंढरीच्या सीमेवर होणारे संतांच्या भेटीचे सोहळे, एकादशी नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी प्रक्षाळपूजेनंतर 'जातो माघारी पंढरीनाथा' या शीर्षकाने येणारी वारकऱ्यांच्या परतीची बातमी... हे सारे इतक्या सवयीचे झाले होते की, या काळात आपणही वारीतच आहोत असे वाटे.
केव्हातरी दि. बा. मोकाशींचे ‘पालखी' हे पुस्तक वाचनात आले. त्याआधी वारीच्या अनुभवावरची वर्तमानपत्रात या काळात आलेली सदरे, पुस्तके पहिली- वाचली होती. त्यापेक्षा हे काही वेगळेच पुस्तक होते. मुळात मोकाशी वारकरी म्हणून वारीत सहभागी झाले असले तरी वारीच्या पार्श्वभूमीवरील नियोजित कादंबरीसाठी काही अनुभवात्मक पूर्वतयारी करावी, हा लांबलेला हेतू होता. गोखले इन्स्टिट्यूटकडून वारीच्या पाहणीसाठी प्रश्नावलीही करून घेतलेली. त्यामुळे मोकाशी वारीत आहेत आणि नाहीतही. मनात श्रद्धा आहे तसेच प्रश्नही. त्यामुळे त्यांना भेटणारे वारकरी संसारातले ताप, कौटुंबिक भांडणे, आर्थिक त्रस्तता, शेतीतल्या अडचणी याला कंटाळून वारीत सुटका शोधतात (अर्थात सगळेच असे नाहीत, पण हाही हेतू आहे ).
मला कुतूहल होते, गुंतवणूक नव्हती, पुढे माझ्यासाठी वारीतील रोमँटिसिझम संपून गेला... तरी एक उत्सुकता होतीच, एवढे लाखांच्या संख्येने जाताना बरोबर असणारे चैतन्य परत जाताना कुठे जाते? पालख्या परत कशा जातात? लहानपणी गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीतही मोठी मूर्ती कायमसाठी असणारे गणपती रात्री उशीरा परत कसे जात असतील, असे वाटे, तसेच हेही. अशात यावेळी वारी चालू असतानाच 'परतवारी' हे सुधीर महाबळ यांचे पुस्तक वाचनात आले, दोन महिन्यात तीन आवृत्त्या निघालेले. वारीबरोबर केलेला परतीचा प्रवास. जाताना लाखोंच्या बरोबरीने केलेला उत्सुक, अधीर, राजस प्रवास आता जेमतेम काहीशे जणांचा विरक्त, कष्टमय प्रवास आहे. महाबळ त्याला ‘वैराग्यवारी’ म्हणतात.
गेली बारा वर्षे अपवाद वगळता महाबळ नेमाने परतवारी करताहेत, म्हणजे गुरुपौर्णिमेला गाडीने पंढरपूर गाठायचे, तिथून वारीच्या परतीच्या प्रवासात सामील व्हायचे. येताना वीस-एकवीस दिवसात सगळी कोडकौतुके घेत पंढरीत आलेले. परत तेवढेच अंतर दहा दिवसात कापत आषाढ कृ दशमीस आळंदी. रोज सरासरी ३५ किमीची चाल. मांडव परतणीची उदासीही असावी. पालखी संस्थानचे कर्मचारी वगळता कुणाचीही राहण्या-खाण्याची कसलीही सोय नाही. ती मिळेल तिथे, तशी आपली आपण करायची. पालखीची चाल वेगात, त्याबरोबर एखाद किलोमीटर पुढे चालणे होत नाही, मग अपरात्री एक वाजता उठणे, जमेल तसे आवरून दीड वाजता प्रस्थान ठेवणे, फटफटेतो पालखीचा नियोजित विसावा गाठणे, तिथे पालखीची वाट पाहात थोडी विश्रांती, वाटेत नळ असलेले शेतातले घर दिसले की अंघोळ उरकणे. या दरम्यान सृष्टीचे रोजचे नवल नव्याने उलगडताना त्याच्या साक्षीने रोजचे भारावणे अनुभवत होणारा स्वसंवाद, ही खरी मिळकत…
महाबळ इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्समधले इंजिनीयर. काही वर्षे परदेशी वास्तव्य केलेले, विमानतळ दुसरे घरच वाटावे इतका पंचतारांकित विमानप्रवास सवयीचा झालेला. व्यापताप ही तेवढेच. इथे मात्र सगळ्या चिंता, क्लेश यांच्या पार मन श्रांत होत जाण्याचा निरामय अनुभव. एरवी मनाच्या तळाशी गेलेले मूलभूत प्रश्न विराटाच्या साथीने सलगी करतात...काही सापडल्याचा निरागस आनंद होतो. ज्याने त्याने वाचावा स्वतःशीच ताडून पहावा असा हा अनुभव.
एरवी दिवसभर पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद करत, कसल्याच अपेक्षेविना (अगदी दर्शनाचीही) माऊलींसोबत चालण्यामागच्या श्रद्धेचा शोध घेत मुक्काम गाठणे. मोकाशींप्रमाणे महाबळांनाही बेरकी, अगदी वारीतही कटकटी, व्यापतापांची सोबत सुटत नाही असेही वारकरी भेटतात. त्यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे हा या पुस्तकातला हृद्य भाग आहे. 'परमेश्वरानंच दिलेला प्रपंच सोडून कसे आलात?' या प्रश्नावर एकजण उत्तरतो, 'अहो, प्रपंच परमेश्वरानं दिला खरा, पण तो संपला केव्हा हे मीच ठरवणार नं? मुलं-बाळं शिकली-सवरली की मुक्त व्हायचं का त्यांची लग्नं, पुढे नातवंडं त्यांची कार्य होईतो गुंतूनच राहायचं हे मीच ठरवणार नं?' खाड्कन डोळे उघडावेत असा हा संवाद.
कायम पायी वारी करणारेही असतात ही आपल्या कल्पनेपलिकडची गोष्ट. इथे त्यांचीही भेट होते. दोन एकादशांच्या दरम्यान आळंदी-पंढरपूर अशी वर्षभर पायी, प्रपंच परमेश्वरावर सोपवून बहुतांश एकट्याने वारी करणारे बरेच आहेत. त्यांची काही सोय पालखी संस्थान करते. आळंदी संस्थांनाकडे असे दीडशेवर वारकरी नोंदले आहेत, ही सगळीच माहिती नवलाची, कुतूहल जागावणारी आहे.
या पुस्तकात एक खटकणारीही गोष्ट आहे. महाबळ स्वतः रूढार्थाने आस्तिक (कर्मकांड करत नाही या अर्थी) नाही असे आवर्जून म्हणतात. अरुण साधूंनी प्रस्तावनेतही या गोष्टीचा दोन-तीन वेळेस उच्चार केला आहे. (त्यासाठी 'ते विश्वात्मक देव मानतात' अशी मखलाशी त्यांनी केली आहे. ) याची काय गरज, असे पुस्तक वाचल्यावर वाटून गेले. महाबळ वारीची सर्व पथ्ये पाळतात, वारकऱ्यांना आवर्जून ‘माउली’ असेच संबोधतात. त्यांच्या भाबड्या तरी समजूतदार श्रद्धेचा, त्यामागच्या मानसिकतेचा शोध घ्यायचा, ती समजून घ्यायचा प्रयत्न करतात. चुकूनही प्रश्नचिन्ह लावत नाहीत, एकुलत्या लाडक्या मुलीच्या पहिल्या श्राद्धाच्या दिवशी वाटेवर घर असल्याने वारकरी येतात, त्यांच्यासाठी भाकऱ्या थापणाऱ्या, वारकऱ्यांची जेवणाची वेळ महत्त्वाची का श्राद्धाची? असा प्रश्न करणाऱ्या आजींपुढे नतमस्तक होतात. वारीसारख्या ठिकाणी मनाच्या उन्मनी अवस्थेत चमत्कार म्हणावे असे अनुभव येतात. (नर्मदा परिक्रमेत बहुतेकांना अश्वथामा दर्शन देतो, तसे) तेही नोंदवतात. या सगळ्यात गैर काहीच नाही, पण या सगळ्यामागची डोळस तरी भाबडी अस्तिकता नाकारायची कशासाठी, असे वाटून गेले. शिवाय दरवर्षी ठराविक काळात ठराविक मार्गाने चालणे, हेही कालांतराने एकाअर्थी कर्मकांडातच जमा होते की! असो.
या पुस्तकाने एक कुतूहल शमले तरी नव्या कुतूहलाला जन्मही दिला. कधीतरी स्वतःच वारी अनुभवल्याशिवाय ते शमेल असे वाटत नाही, पण त्यासाठी महाबळांच्या ठायी असलेली अपार डोळस श्रद्धा कुठून आणावी?
परतवारी - सुधीर महाबळ
मनोविकास प्रकाशन, पुणे
पाने – १७६, मूल्य – १९९ रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3696
.............................................................................................................................................
लेखक पुस्तकप्रेमी आहेत.
vaidyaneeteen@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Jayant Raleraskar
Fri , 21 July 2017
परतवारी' बद्दलचा लेख छानच आहे. भाबडेपणा आणि अनुषंगिक क्रिया-प्रतिक्रिया यांना स्पष्टिकरण देण्याची घाई करणारे एका निखळ आनंदाला मुकतात हे उघडच आहे.वारीतील अधिक उणे पुस्तकात असेल असे वाटते. उत्सुकता वाटली हे नक्की...