अजूनकाही
१. चीनमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना आता नास्तिक व्हावं लागणार आहे. सदस्यांनी धर्म न सोडल्यास त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागेल, असा इशाराच पक्षाकडून देण्यात आला आहे. ‘पक्षाची विचारधारा लक्षात घेता सच्चा मार्क्सवादी होण्यासाठी सदस्यांना नास्तिक व्हावं लागेल,’ असं पक्षानं एका पत्रकात म्हटलं आहे. ‘पक्षाच्या सदस्यानं धार्मिक प्रथा-परंपरांचं पालन सुरू ठेवल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल,’ असं ‘ग्लोबल टाइम्स’ या अधिकृत सरकारी वर्तमानपत्रानं म्हटलं आहे. चीनच्या संविधानानं देशातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य दिलं आहे.
हे उफराटे तालिबानच आहेत. संविधानानं धर्मस्वातंत्र्य दिलेलं असताना ते नाकारण्याचा अधिकार कम्युनिस्ट पक्षानं कुठून मिळवला? धर्मश्रद्धा लादणं, धर्मश्रेष्ठत्व मानणं आणि धार्मिक कर्मकांडांचं सार्वजनिक स्तोम माजवणं जेवढं घातक तेवढंच नास्तिक्य लादणं घातक आहे. अर्थात, ज्या देशात लोकशाहीला, दुमताला, स्वतंत्र विचाराला थारा नाही, तिथं वेगळी अपेक्षा करता येत नाही. ज्या दिवशी चीनमधल्या कम्युनिस्ट राजवटीचा अंत होईल, त्या दिवशी हा देश पराकोटीच्या आणि तेवढ्याच घातक धार्मिकतेकडे वाटचाल करू लागेल.
.............................................................................................................................................
२. बुरखा न घातलेल्या पत्नीचा फोटो फेसबुकवर शेअर केल्याच्या ‘अपराधा’बद्दल इरफान पठाणला फेसबुकवरच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागण्याचा प्रकार ताजा असतानाच भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी यालाही ‘ट्रोल’भैरवांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. शमीनेही आपल्या पत्नीचा हिजाबशिवाय फोटो प्रसृत केला. त्याबद्दल आणि त्याच्या छोट्या मुलीचा वाढदिवस साजरा केल्याबद्दलही त्याच्यावर हिंस्त्र टीका करण्यात आली. इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नाही, असं सांगून हिंदुत्ववाद्यांना खूश करण्यासाठी असले प्रकार करत आहे, अशी टीका कट्टरवादी मुस्लिमांनी केली.
अर्रर्र, ट्रोलिंग एके ट्रोलिंग एवढंच काम करण्याच्या नादात या इस्लामी ट्रोलभैरवांच्या लक्षात आलेलं नाही की, हिंदू ‘संस्कृती’च्या स्वघोषित आणि अल्पमती ठेकेदारांनाही स्त्रीस्वातंत्र्याची थेरं आणि वाढदिवसाचे केक मान्य नाहीत. शमी आणि इरफान हे बहुधा ख्रिस्तीधर्मीयांना खूष करत असावेत. त्यांच्याकडे हे प्रकार चालतात, चालवून घेतले जातात. इरफान आणि शमी हे असल्या दीडदमडीच्या धर्मभास्करांना न जुमानता आपलं आयुष्य आपल्या टर्म्सवर जगताहेत, हे कौतुकास्पद आहे.
.............................................................................................................................................
३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’मुळे ऑल इंडिया रेडिओनं १० कोटींची कमाई केली आहे. ‘मन की बात’च्या माध्यमातून ऑल इंडिया रेडिओने २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५.१९ कोटींची, तर २०१५-१६ मध्ये ४.४८ कोटींची कमाई केली आहे. बुधवारी माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी या संदर्भातील माहिती लोकसभेत दिली. ‘पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत ३३ वेळा ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला आहे. पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम १८ प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येतो. याशिवाय इंग्रजी आणि संस्कृत भाषांमध्येही या कार्यक्रमाचे प्रसारण केलं जातं,’ अशी माहिती राठोड यांनी लोकसभेला दिली.
मोदींची ‘मन की बात’ आकाशवाणीसाठी ‘धन की बात’ ठरली तर. आता आकाशवाणीनं एखाद्या अर्थविषयक कार्यक्रमाला ‘धन की बात’ असं टायटल देऊन पाहावं. तोही कार्यक्रम सुपरहिट ठरेल. अधूनमधून ‘जन की बात’ आणि कधीतरी ‘जनधन की बात’ असेही कार्यक्रम सादर करायला हरकत नाही.
.............................................................................................................................................
४. गोव्यात 'बीफ'चा तुटवडा भासू देणार नाही. कर्नाटक आणि अन्य भागांतून 'बीफ' आयात करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, असं विधान करणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे त्यांच्याच परिवारातल्या विश्व हिंदू परिषदेच्या रडारवर आले आहेत. पर्रिकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आज विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. मनोहर पर्रिकर यांच्या या वादग्रस्त विधानामुळे भाजपची प्रतिमा खराब झाली आहे, असं विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेचे नेते कोणी ‘जैन’ आहेत, हीच मुळी कळीची गंमत आहे. ती समजली की या परिषदेला हिंदू जीवनपद्धतीचं मूलभूत आकलनही का नाही, याचं ज्ञान होऊ शकतं. गोव्यात जनमताचा कौल नाकारून स्थापन केलेलं सरकार चालवण्यासाठी दिल्ली सोडून पर्रीकरांना गल्लीत यावं लागलं. आता ते हटले तर हे बुजगावणं कोलमडून पडायला वेळ लागेल का? आणि मुख्यमंत्रीपदी बसवणार कोणाला? तिथल्या कुप्रसिद्ध आश्रमातल्या एखाद्या रोबोटिक साधकाला?
.............................................................................................................................................
५. राष्ट्रीयीकृत बँकांनी बड्या उद्योगांना (कॉर्पोरेटस) दिलेली कर्जं अनुत्पादक होण्याचं प्रमाण गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास सहापटीनं वाढल्याची माहिती मंगळवारी राज्यसभेत देण्यात आली. २०१२-१३मध्ये ६२,४४९ कोटी रुपये असणारी स्थूल अनुत्पादक (ग्रॉस एनपीए) कर्जांची रक्कम २०१६-१७मध्ये थेट ३ लाख ४४ हजार ३५५ कोटी रुपयांवर पोहोचली. त्यामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक आदी बँकांच्या अनुत्पादक कर्जांची स्थिती चिंताजनक असल्याचं दिसतं.
बघा बघा, वेळीच वेसण न घातल्यामुळे आणि सरसकट कर्जमाफी केली गेल्यामुळे या शेतकऱ्यांनी कुठवर मजल मारली आहे. त्यांनी उद्योगधंदे स्थापन करून हजारो कोटींची कर्जं बुडवली आहेत. काय म्हणता, हे उद्योगधंदे शेतकऱ्यांचे नाहीत? काहीतरीच काय, या देशात बाकी कोणी फुकटे आणि कर्जबुडवे आहेत का? हे शेतकरीच असणार हो... शंभर टक्के.
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment