योगी आदित्यनाथ आणि साबण : ‘फेस’ टू ‘फेस’!
सदर - ‘कळ’फलक
संजय पवार
  • योगी आदित्यनाथ आणि कुशीनगरमधील दलित
  • Thu , 20 July 2017
  • ‘कळ’फलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar योगी आदित्यनाथ Yogi Adityanath दलित Dalit भाजप BJP

लवकरच देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपतीपदी राम कोविंद हे विराजमान होतील. ते आपल्या दलित प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांचा ठरलेला पराभव करतील. तो किती मतांच्या फरकानं करतील, त्यावर कदाचित उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आकडेही बदलतील. गोपाळकृष्ण गांधीही मीराकुमार यांच्याप्रमाणेच हरणारी निवडणूक लढताहेत.

या दोन निवडणुकांच्या निमित्तानं पुन्हा एकदा समाजातील राजकीय पक्ष व माध्यमातील जातवास्तव समोर आलं. ‘कुठे आहे जात किंवा जातीव्यवस्था?’ म्हणत सातत्यानं जात, जातिभिमान, जातिअंत, जातव्यवस्था, जातपंचायत, ज्ञातीमंडळे, संमेलनं, मेळावे चालूच असतात. जात आपल्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की, ‘तिथे पाहिजे जातीचे’ किंवा ‘जातिवंत’ (कलाकार\खेळाडू\राजकारणी इ.इ.) ही संबोधनं, वाक्प्रचार, म्हणीही जातवार अस्तित्वात आहेत. त्या आपण सर्रास संभाषणापासून साहित्यापर्यंत ते इतरत्र सहज वापरत होतो\असतो. मधल्या काळात विविध जातसमूहांच्या अस्मिता जागृत झाल्यानं ‘रिकामा न्हावी, भिंतीला तुंबड्या लावी’, ‘चांभार चौकशा’, ‘काय तमाशा लावलाय?... हजाम आहेस का?’, ‘महारासारखा ढोल बडवतो’ वगैरे उल्लेख वापर वगळावे लागले. काहींना हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच वाटला आणि हे जातीवरून संबोधन नाही तर त्या व्यवसाय, कृतीवरून आलेलं संबोधन आहे, अशी सारवासारवही झाली. पण ‘काय हजाम आहेस काय?’ या वाक्यातली अकुशलता खऱ्या कुशल व जातीनं न्हावी असणाऱ्या माणसास किती अप्रस्तुत व अवमानकारक वाटते, याचं खूप खेळकर वर्णन राम नगरकरांच्या ‘रामनगरी’ या पुस्तकात आहे. ते इच्छुकांना जरूर वाचावं.

आज जात आणि दलित या विषयावर पुन्हा लिहिण्याची वेळ आलीय ती दोन-तीन कारणांनी. त्यातलं एक महत्त्वाचं आहे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संबंधात. ते पुढे विस्तारानं येईलच. त्या आधीच्या दोन नोंदी तशा महत्त्वाच्याच, पण योगींच्या मानानं दुय्यमच.

मायावतींनी राज्यसभेत सहारनपूरवर बोलू न दिल्यानं रागावून सदस्यपदाचा राजीनामा देणं ही अन्य दोन घटनांतील एक घटना. सहारनपूर हा संवेदनशील विषय आहे. त्यावर राज्यसभेच्या चौकटीअंतर्गत चर्चा करण्याचे नियम, पोटनियम बहेनजींना चांगलेच ठाऊक असणार. पण घटता जनाधार आणि भीम आर्मीचं वाढतं आव्हान, भाजप खेळत असलेलं दलित कार्ड आणि पुढच्या वर्षी मुदत संपत असलेलं राज्यसभा सदस्यत्व असे अनेक पैलू या राजीनाम्यामागे आहेत. त्यांचा संताप ठरवून केलेला नसेलही. अनेकदा सभागृहाचे नियम-उपनियम उत्स्फूर्त, तीव्र संताप, भावना व्यक्त करतानाच अचानक जो ब्रेक लावतात, त्यामुळे अनेक सदस्यांचा तोल जातो. भावनावेग वाढतो, हताशा येते. मायावतींचंही असंच झालं असावं, पण सहारनपूर आधीही देशात अनेक घटना घडल्या, पण मायावती इतक्या उद्विग्न, क्रुद्ध झाल्या नव्हत्या. त्यात त्यांना उत्तर प्रदेशनं गेली दोन दशकं उत्तमोत्तम संधी दिल्या. त्या उत्तम प्रशासक म्हणूनही गणल्या जातात, पण तरीही त्यांना लोकसभा ते विधानसभा पराभवाला सामोरं जावं लागलं. बसपाचा ढासळता पाया, पक्षाला लागलेली गळती व स्वत:च्या संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन यामुळे त्यांच्या ‘प्रामाणिक’पणावरच प्रश्न उभं राहिलंय. राष्ट्रीय राजकारणातील बावन पत्त्यांत आपण हुकमाचा एक्का की जोकर राहतो, याची चाचपणी या राजीनाम्यात असावी.

दुसरा मुद्दा आहे तो राष्ट्रपतीपदाच्या वेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनीही जे ‘दलितत्वा’चे पाळणे गायले आणि ‘आता राष्ट्रपती हवा तर तो दलितच’ म्हणून जी अहमहमिका लागली होती, डाव-प्रतिजाव खेळले गेले, माध्यमांनीही दलित चर्चा फिरती ठेवली आणि आता गंमत बघा काल\परवा उपराष्ट्रपतीपदासाठी सत्ताधारी व विरोधकांनी उमेदवाऱ्या जाहीर केल्या, नामांकन अर्ज भरले. माध्यमांनीही मथळे दिले…

पण आम्हाला अजूनही व्यंकय्या नायडू व गोपाळकृष्ण गांधी यांची जात कोणती हे कळलेलं नाही. ते दलित, ओबीसी, भटके, आदिवासी की उच्चवर्णीय याची कुठेही चर्चा सोडा पण उल्लेखही नाही. मग भाजपसह सर्व राजकीय पक्ष व माध्यमं यांना कुणाच्या दलित असण्यात का एवढा रस असतो? का दलित उच्चस्थानावर बसला की आम्हाला अधोरेखित करायचं असतं – “बघा हं, आता दलितांना पण देतोय बरं का उच्चासन!” साधारण याच प्रकारचा पण उलटा बाण शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनाही सोडण्याचा मोह आवरत नाही. मग ते ‘पूर्वी महाराज पेशवे निवडत, आता पेशवे महाराज निवडतात’ किंवा ‘छत्रपती गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते’ किंवा ‘ब्राह्मण मुख्यमंत्री ही सर्वपक्षीय पोटदुखी’... हे सर्व वाचलं, पाहिलं, ऐकलं की आमची मनोवृत्ती आजही ‘सडकी’च आहे, याचे पुरावेच मिळतात.

अशाच पण याहून अधिक सडक्या मनोवृत्तीचं प्रदर्शन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या प्रशासनानं केलं. सहारनपूरच्या आक्रोशात ही वृत्ती लपून राहिली.

आपल्याकडे सध्या कुठली बातमी, कुठं कशी पोहचवावी किंवा पोहचवू नये याची निलाजरी दरपत्रकं आणि खुशमस्करी लाळघोटेपणा वाढल्यामुळे अनेक महत्त्वाच्या घटनांची बातमी परस्पर विल्हेवाट लावून काही घडलंच नाही असं दाखवण्यात माध्यमं तरबेज झालीत. त्यामुळे मग पर्यटन स्थळी अतिउत्साहात तरुणाचा बुडून मृत्यू किंवा सलमानचा सिनेमा पडला या व अशा बातम्यांचं मूल्य वाढतं. असो.

तर बातमी योगी आदित्यनाथ व त्यांच्या प्रशासनाची. योगी आदित्यनाथ राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कुशीनगरलाही भेट दिली. सध्याच्या भाजपच्या दलितप्रेमाचा एक अध्याय कुशीनगरातही घडवावा असं योगीजींच्या मनात आलं. त्याप्रमाणे काही दलितांची व योगीजींची भेट घडवण्याचा घाट घालण्यात आला. इथपर्यंत सर्व राजकीय संकेतांना धरून होतं. पण योगीजी नुस्तेच मुख्यमंत्री नाहीत. ते तर सनातन धर्माचे कडवे समर्थक आणि प्रचारक. संविधानिक शपथ अंतरात्म्याला वेसण नाही घालू शकत. त्यामुळे योगीजींच्या प्रतिमेला व प्रतिभेला शोभेलसा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला. अर्थात तो मुख्यमंत्री सचिवालयातूनच निर्देशित झाला असणार. निर्णय असा होती की, भेटीला येणाऱ्या दलितांना एक साबण व टॉवेल आधीच पाठवून, त्यांना येताना आंघोळ करून, स्वच्छ अंग पुसून यायला सांगा! दलित हे अस्वच्छ असतात, ते आंघोळसुद्धा करत नाहीत आणि योगींची सोवळी तर प्रखर असणार. मग सरकारी खर्चानं दलितांचं आरोग्यदायी शुद्धीकरण करण्याची योजना भेटीपूर्वी करण्यात आली.

ही घटना समजताच गुजरातमधील दलितांनी याचा निषेध करायचं ठरवलं, तेही लखनौत थेट योगीजींच्या निवास अथवा कार्यालयात. आता दलित निषेध करणार म्हणजे अत्यंत आक्रस्ताळी, शिवराळ भाषा, हिंस्र आंदोलन अशा ठराविक साच्याच्या प्रतिमा सगळ्यांच्याच डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण गुजरातचे दलित भलतेच संयमित (!) व कल्पक निघाले!!

त्यांनी निषेध म्हणून एक साबणच बनवला आणि गुजरातहून तो लखनौला योगीजींना भेट म्हणून पाठवायची त्यांची योजना होती. इथवर साबणाला साबणानं उत्तर असं दिसतं. पण कल्पकता व संयम पुढे आहे. हा साबण त्यांनी १२५ किलो वजनाचा बनवला. त्यावर एका बाजूला गौतम बुद्ध व दुसऱ्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा एम्बॉस केल्या आणि या साबणाचं नाव ठेवलं, ‘तथागत’! योगीजींनी तो वापरून ‘नाही निर्मल मन, काय करील साबण’ हे वचन काही क्षण बाजूला ठेवून त्यांच्या साबणनीतीला धरून हा साबण वापरून संविधानिक शुर्चिभूतता अंगिकारावी व सनातन मळ काढून टाकावा, असं माफक पण क्रियाशील उद्दिष्ट ठेवलेलं.

त्यासाठी या दलितांनी लखनौमधल्या ऑल इंडिया पीपुल्स फ्रंटच्या लोकांशी संपर्क साधला. आपली योजना सांगितली. फ्रंटने यावर विचार करण्यासाठी व हा साबण मुख्यमंत्र्यांकडे पोचवण्यासाठी गुजराती बांधवांना कशी मदत करावी यासाठी एक मिटिंग ठेवली.

या फ्रंटमध्ये समाजातील विविध लोक, निवृत्त सरकारी अधिकारी वगैरे आहेत. एस. आर. दारापुरी हे त्यातलेच एक निवृत्त पोलिस अधिकारी. त्यांनी या संदर्भात जो वृतान्त कथन केला तो पुढीलप्रमाणे –

ऑल इंडिया पीपुल्स फ्रंटने या मिटिंगसाठी लखनौच्या प्रेस क्लबचा हॉल बुक केला. रितसर भाडं वगैरे भरून. मात्र ज्या दिवशी मिटिंग होती, तेव्हा आठ-दहा जण मजले, बाकी येत होते, पण त्या आधीच पोलिस आले आणि म्हणाले, ‘तुम्हाला इथं कार्यक्रम घेता येणार नाही.’ वास्तविक जागा प्रेस क्लबची. परवानगी देण्या-नाकारण्याचा हक्क प्रेस क्लबचा. पण इथं पोलिस प्रेस क्लबची परवानगी न घेता (कायद्यानुसार ती त्यांनी घेणं आवश्यक होती) थेट घुसले. प्रकरण व्यवस्थापकाकडे गेलं. तोवर त्यांच्यावर योग्य तो दबाव आणून बुकिंग रद्द करवलं गेलं होतं. निवृत्त पोलिस अधिकारी दारापुरी याबाबत पोलिसांसी बोलत असतानाच पोलिसांनी तुम्हा सर्वांना कलम १४४अंतर्गत अटक करतोय असं सांगितलं. यावर दारापुरींनी कलम १४४ हे रस्त्यावर लावायचं कलम आहे असं निवृत्त पोलिस अधिकारी म्हणून वर्तमान पोलिस अधिकाऱ्यांना सांगितलं. पण तोवर पोलिसांनी त्यांना अटक करून रस्त्यावर आणलं होतं. फोटो काढण्यात आले व बातमी देण्यात आली – ‘मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हल्ला करण्याची योजना पोलिसांना हाणून पाडली!!!’

दरम्यान गुजरातहून निघालेला साबण झाँशी स्थानकातच कार्यकर्त्यांसह ताब्यात घेण्यात आला. ही अटक होईपर्यंत लखनौत पीपुल्स फ्रंटच्या लोकांना अटकेत ठेवून, मग मॅजिस्ट्रेट समोर उभं करून प्रत्येकी २० हजाराच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली.

तथागत साबणाची निर्मिती करणाऱ्या गुजराती दलित बांधवांचं म्हणणं होतं, कुशीनगर हे तथागताचं निर्माण स्थान, तिथल्या दलितांवर, त्याच भूमीत साबण प्रयोग करणाऱ्यांना आणखी मोठ्या साबणाशिवाय दुसरी चांगली भेट निषेध म्हणून काय असू शकते? तो १२५ किलोग्रॅम केला, कारण बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वी जयंती केंद्र सरकार धुमधडाक्यात साजरी करतंय. दोन- अडीच हजार वर्षं जुन्या जातिव्यवस्थेचा, मनूवादाचा मळ काढायला १२५ किलो लागणारच ना! यात औचित्य आणि उपयोग दोन्ही साधेल!

आता आमचं मा. नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप, संघ यांना एकच सांगणं आहे, तुमच्या योगींना ‘फेस’ आणणारा व ज्या साबणाला ते ‘फेस’ करू शकले नाहीत, तो ‘तथागत’ साबण नव्या राष्ट्रपतींना भवनात शिरताच पहिल्या आंघोळीसाठी द्यावा. म्हणजे भवनाचं पावित्र्य टिकेल! त्यासाठी झाँशीहून तो तुमच्या पद्धतीनं यात्रा काढून आणल्यास उत्तम! आणि ‘नाही निर्मळ मन, काय करील साबण’ हे वचन अभ्यासक्रमातून, साहित्यातून हद्दपार करावं.

.............................................................................................................................................

लेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.

writingwala@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......