अजूनकाही
१. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या 'क्रिकेट प्रशासक समिती'चे माजी सदस्य रामचंद्र गुहा पुन्हा एकदा नाराज झाले आहेत. राहुल द्रविड व झहीर खान यांची सल्लागारपदी नियुक्ती रोखण्यात आल्याचं गुहा यांचं म्हणणं आहे. ही नियुक्ती रोखणं म्हणजे राहुल द्रविड व झहीर यांचा एक प्रकारे 'सार्वजनिक अपमान' असल्याचं गुहा यांना वाटतंय. गुहा यांनी एका ट्विटद्वारे आपली ही नाराजी जाहीर केली आहे. यापूर्वी अनिल कुंबळेसोबत असा व्यवहार केला गेला, त्यानंतर आता झहीर खान आणि राहुल द्रविड यांचा अपमान करण्यात आला आला, असं गुहा यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्टपणे म्हटलंय. कुंबळे, द्रविड आणि झहीर हे क्रिकटचे दूत आहेत असंही गुहांनी पुढं म्हटलंय.
आयपीएल सामन्यातल्या फिक्स्ड चेंडूच्या पूर्वनिश्चित परिणामावरही अनभिज्ञपणे टाळ्या पिटणाऱ्या सर्वसामान्य क्रिकेटरसिकांप्रमाणेच गुहा वागतायत, हे मनोज्ञ आहे. ते स्वयंप्रज्ञ इतिहासकार आणि लेखक असले, तरी क्रिकेटच्या बाबतीत खेळाडूंना दैवतं वगैरे मानून विस्फारल्या डोळ्यांनी पाहण्याची त्यांची वृत्ती दिसते. ज्या खेळाडूंच्या अपमानानं गुहा व्यथित झाले आहेत, त्यांच्यातल्या एकानेही त्याबद्दल तोंड उघडलेलं नाही. क्रिकेटचा खेळ फिक्सिंगनं पोखरून काढला, तेव्हा यांची सगळी दैवतं खेळत होती, समालोचन करत होती; त्यांनी चकार शब्द काढला नाही. त्यांना सवय आहे हो असल्या अपमानांची. ते सहन केल्यावर मिळणारे लाभ महत्त्वाचे वाटतात त्यांना. आपल्याला अडचण काय?
.............................................................................................................................................
२. ब्रिटनमध्ये आपलं जंगी स्वागत होईल, अशी हमी जोवर दिली जात नाही तोपर्यंत ब्रिटनचा अधिकृत दौरा करणार नाही, असा अजब निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांना एका प्रकारे जंगी स्वागताचा आदेशच दिला आहे.
तात्या, तुमच्या दौऱ्याच्या वेळी अमेरिकेच्या नागरिकांनी ब्रिटनचा प्रवास करून तिथं तुमच्यावर अंडी आणि टमाटे फेकले नाहीत, तरी तेच पुष्कळ, अशी परिस्थिती आहे. जंगी स्वागताचे आग्रह कसले धरता? तुमच्या दिव्य कारकीर्दीनं ब्रिटिशांचे डोळे दिपले असतील, अशी तुमची समजूत आहे का? तुम्ही आपल्या वेडसर चाळ्यांनी अख्ख्या अमेरिकेचे आणि निम्म्या जगाचे डोळे पांढरे केले आहेत!
.............................................................................................................................................
३. गोव्यात गोमांसाचा तुटवडा निर्माण झाल्यास इतर राज्यातून त्याची आयात करू, असं आश्वासन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलं आहे. ते मंगळवारी गोवा विधानसभेत बोलत होते. गेल्या काही महिन्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये गोहत्याबंदीचा कायदा लागू करण्यात आला होता. केंद्र सरकारसह देशातील सर्वच राज्यांमध्ये भाजपने गोवंश हत्याबंदीचा पुरस्कार केला आहे. मात्र गोवा सरकारने सुरुवातीपासूनच केंद्र सरकार आणि भाजपच्या गोमांसाविषयीच्या भूमिकेच्या अगदी उलट भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोठा वादही निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर यांनी मंगळवारी गोव्यातील नागरिकांना आश्वस्त केलं.
मान्यवर पर्रीकर आता कोणत्या राज्यातून गोमांस आणणार आहेत? त्यांच्याच पक्षानं बहुतेक राज्यांमध्ये गोहत्याबंदी केली आहे. ईशान्य भारत, गोवा आणि केरळ यांच्यात एखादा गोमांस कॉरिडॉर तयार करावा लागेल आणि गोगुंडांपासून या वाहनांना संरक्षण द्यायला लागेल. नितीन गडकरींना सांगितलं तर ते हवेतल्या हवेत चौपदरी गोमांस हायवे उभारूनही देतील. राज्योराज्यीचे गोगुंड आता पर्रीकरांना कधी जाहीर चोप द्यायला जातात, ते पाहायला हवं.
.............................................................................................................................................
४. राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना टोल नाक्यावरच्या रांगेत तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबावं लागलं, तर टोल भरावा लागत नाही, असा सरकारी नियम असल्याचं स्पष्ट झालं आहे. टोलनाक्यांच्या माध्यमातून वाहनमालकांना भरपूर लुटून झाल्यानंतर हा नियम पुढे आला आहे. अॅड. हरिओम जिंदाल यांनी गेल्या वर्षी जुलै २०१६ मध्ये भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला होता. या अर्जाला प्राधिकरणाने २९ ऑगस्ट २०१६ रोजी पाठवलेल्या उत्तरात ही बाब समोर आली आहे.
त्यामुळेच की काय, आता दहिसरच्या टोलनाक्यांच्या मागे काही अंतरापलीकडे वाहतूक काही तास रेंगाळलेली असताना टोलनाक्यांवर मात्र गर्दी नसते. पिवळ्या रेषेपलीकडे वाहनं जाताच कामा नयेत, असं नियमन करून सगळ्यांकडून टोल वसूल केला जातोच. खरं तर अनेक रस्त्यांची अवस्था आणि वाहतूक कोंडी पाहता टोलनाक्यांवर पेट्रोल-डिझेलचे पंप बसवून कोंडीच्या वेळी भरपाई म्हणून काही लिटर इंधन भरून दिलं पाहिजे गाड्यांमध्ये.
.............................................................................................................................................
५. भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर आणि सध्याचा ट्विटर सेलिब्रिटी वीरेंद्र सेहवाग याने महान टेनिसपटू रॉजर फेडरर याला गायीबद्दल कसा जिव्हाळा आहे, याचे फोटो टाकले आहेत. नुकतीच आठव्यांदा विम्बल्डनला गवसणी घालणाऱ्या फेडररचे तीन फोटो सेहवागने ट्विटमध्ये पोस्ट केले आहेत आणि गाय दोहणाऱ्या 'महान रॉजर फेडररचं गोप्रेम पाहून आनंद झाला', असं म्हटलं आहे.
फेडररला गाय पवित्र वाटते, अशी सेहवागने गोड गैरसमजूत करून घेतलेली दिसते. वयाच्या १४व्या वर्षापर्यंत शाकाहारी असलेला फेडरर नंतर मिश्राहारी बनला, हे त्याला माहिती नसणार. त्यामुळे गोमांसाचा समावेश असलेल्या सुप्रसिद्ध स्विस स्टेकबद्दलही त्याला काही कल्पना असायची शक्यता नाही. फेडरर ज्या गायीचं दूध काढतोय, ती देशी गाय नाही, आपल्या गोरक्षकांना जिच्याबद्दल शून्य जिव्हाळा आहे, अशी ती परदेशी गाय आहे. शिवाय, गायीला कापून खाण्याइतकंच तिचं, तिच्या वासरांसाठी असलेलं दूध, वासरांना उपाशी ठेवून चोरणंही हिंस्त्रच आहे, त्याचं काय?
editor@aksharnama.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment