रामचंद्र गुहांचा फॉर्म्युला यशस्वी होईल काय?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • रामचंद्र गुहा, नीतिशकुमार आणि राहुल गांधी
  • Wed , 19 July 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar रामचंद्र गुहा Ramchandra Guha नीतिशकुमार Nitish Kumar राहुल गांधी Rahul Gandhi काँग्रेस Congress

रामचंद्र गुहा, अमर्त्य सेन, गोपाळकृष्ण गांधी ही मंडळी केवळ विचारवंत नाहीत, तर भारतातल्या विचारी वर्गाचे प्रतिनिधी मानले जातात. त्यांनी मांडलेल्या कल्पना, विचार आणि फॉर्म्युले यांची नोंद जगभर घेतली जाते. यांपैकी गुहा हे इतिहासकार आहेत. त्यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाला नुकतीच दहा वर्षं झाली. त्यानिमित्ताने या पुस्तकाची दहावी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने त्यांची एका इंग्रजी वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये गुहा यांनी भारतीय राजकारणाचं विविध अंगांनी विश्लेषण केलं.

या विश्लेषणात गुहा यांनी एक फॉर्म्युला मांडला. त्यात त्यांनी म्हटलं की, “काँग्रेस हा नेता नसलेला पक्ष आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय देऊ शकणारा नेता म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार हे योग्य असले तरी ते पक्ष नसलेले नेते आहेत. म्हणून काँग्रेसने नीतिशकुमारांना पक्षाचा अध्यक्ष करावं. राहुल गांधी यांनी राजकारण सोडून इतर काहीही उद्योग करावा. ते त्यांच्या स्वत:च्या, काँग्रेसच्या आणि देशाच्याही हिताचं ठरेल. तरच काँग्रेस वाचेल, अन्यथा मरेल.”

गुहांचा हा फॉर्म्युला म्हणजे एक भन्नाट राजकीय कल्पना आहे. ती आदर्शवादी आहे. हा फॉर्म्युला कितपत यशस्वी होईल, हा जर-तरचा विषय असला तरी या फॉर्म्युल्यातून सध्याच्या भारतीय राजकारणाचा गुंता, कमजोरी, मजबुरी, गरज त्यांनी अधोरेखित केलीय. हा गुंता सोडवण्याची दिशी त्यांनी स्पष्ट केलीय. स्वत: गुहा यांनीच म्हटलंय की, ‘हा विचार, कल्पना लोकांना आदर्शवादी वाटेल, पण खराखुरा लोकशाहीवादी म्हणून मला ती मांडणं भाग आहे. ती काळाची गरज आहे.’

या मुलाखतीत गुहा यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलंय. मोदी हे सध्या देशातले सर्वांत समर्पित राजकीय नेते आहेत. त्यांच्यामध्ये रात्रंदिन काम करण्याची असीम ऊर्जा आहे. राजकारणाशी असलेल्या त्यांच्या बांधीलकीला तोड नाही. ती अतुलनीय म्हणता येईल अशी आहे. या गुणांच्या बळावर त्यांनी भारतीय जनता पक्षात सर्वोच्च स्थान पटकावलं. देशाची सत्ता मिळवली. पक्षात आणि सत्तेत ते वरचढ ठरले.

मात्र मोदींच्या या गुणांना बाधा आणणारे घटकही दाखवायला गुहा विसरले नाहीत. गुहा म्हणतात, एवढे सगळे गुण असलेल्या मोदींनी त्यांना मतं देणाऱ्यांचा भ्रमनिरास केलाय. हा भ्रमनिरास मोदी कट्टर हिंदुत्ववाद्यांपासून दूर राहतील किंवा आर्थिक सुधारणा घडवून आणतील, या विश्वासाला तडा गेल्यानं झाला आहे.

मोदींनी जनतेचा भ्रमनिरास केलाय म्हणून विरोधी पक्षांनी एक व्हावं, मोदींच्या तोडीस तोड नेता असलेल्या नीतिशकुमारांनी विरोधकांचं नेतृत्व करावं, असा या गुहा फॉर्म्युल्याचा सारांश आहे.

नितिशकुमारच का? तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. स्वच्छ, पारदर्शक कारभार करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. घराणेशाहीचा त्यांच्या नेतृत्वाला डाग नाही. गेली दहा वर्षं ते बिहारमध्ये सत्तेवर आहेत. त्यांच्या काळात तिथं एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. बिहारमध्ये महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण आहे. त्यांनी विद्यार्थिनींना सायकली दिल्या. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली. सायकल हे मुलींसाठी मुक्तीचं प्रतीक बनलं. नीतिशकुमारांचा बिहारमधील दारूबंदीचा प्रयोग उल्लेखनीय ठरला. त्यामुळे महिलांमध्ये खुशी आली. घराघरातले तंटे, झगडे कमी झाले. दारूमध्ये पैसे उडवणारा नवरा त्या पैशाची भाजी, दूध घरी घेऊन येतो. त्यातून घरात समाधान, सुख आलं. बिहार प्रगतीच्या दिशेनं झेपावतोय. बिहारींचं इतर राज्यात होणारं स्थलांतर थांबलंय. परिणामी नीतिशकुमारांच्या सुशासनाचे परिणाम दिसू लागले आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे देश नव्या आशेनं पाहू लागलाय. गुहांसारखा विचारवंत त्यामुळे देशाचा भावी पंतप्रधान म्हणून नीतिशकुमारांकडे बोट दाखवू लागला आहे.

मोदींसारखा तगडा नेता, भाजपचं मजबूत पक्षसंघटन आणि देशात मोदींची सत्तेवरची प्रभावी पकड याला तोंड देण्यासाठी तेवढीच तयारी लागेल. मोदींच्या तोडीचा नेता नीतिशकुमारांच्या रूपानं विरोधकांकडे आहे, पण त्या नेत्याचा पक्ष एका राज्यापुरता मर्यादित आहे. म्हणून नेत्यामागे लागणाऱ्या संघटनेची उणीव काँग्रेसनं भरून काढावी. तसाही काँग्रेस पक्ष नेत्याशिवाय आहे. देशाला आपला वाटेल असा नेता आज काँग्रेसकडे नाही. सोनिया गांधी आजारी आहेत. मनमोहनसिंग यांची इनिंग खेळून आऊट झालेल्या खेळाडूसारखी आहे. ते आता काँग्रेसला मार्गदर्शन करण्याशिवाय इतर कुठल्या उपयोगाचे नाहीत. राहुल गांधींमध्ये नेतृत्वाचे गुण नाहीत. लोक त्यांना स्वीकारत नाहीत. प्रियंका गांधी यांना राजकारणात येऊन लोकांचा विश्वास मिळवावा लागेल. तो वेळखाऊ आणि जर-तरचा प्रकार आहे.

राजकारण हे गतिमान असतं. तिथं थांबायला, वाट पाहायला जागा नाही. पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंह या नेत्यांना काँग्रेसमध्येच मान्यता नाही. देशाचे नेतृत्व स्वीकारण्याची गोष्ट खूप दूर. तेव्हा काँग्रेस संघटनेला आता जिंवत राहायला नीतिशकुमारांसारख्या नेत्याची गरज आहे.

काँग्रेसनं गांधी घराण्याच्या प्रेमापोटी इतर बदल स्वीकारले नाहीत. नेतृत्व बदल केला नाही तर काँग्रेसलाच पर्यायी नवा पक्ष उदयाला येईल, असं भाकीतही गुहा यांनी केलं आहे. तशीही काँग्रेसची गरज संपलेली आहे. काँग्रेसचं नेतृ्त्व असंच आळशी, निष्क्रिय आणि चालढकल नेत्यांच्या हातात राहिलं तर लोक नवा पक्ष उदयाला आणतील. इंदिरा गांधी यांच्या एकछत्री बलदंड सत्तेला पर्याय देण्यासाठी आणीबाणीच्या काळात लोकांतून जनता पक्ष उदयाला आला होता. हे उदाहरण पुरेसं बोलकं आहे. इंदिरा विरोधक तेव्हा विखुरलेले होते. पण जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही वाचवण्यासाठी, भ्रष्टाचारविरोधी आंदोलन पाहता पाहता देशव्यापी बनलं. त्या आंदोलनाच्या रेट्यातून बंडखोर काँग्रेसवाले, समाजवादी, जनसंघी अशा परस्पर विरोधी विचारांच्या संघटना जनता पक्षात विलिन झाल्या होत्या.

इंदिरा विरोधाचा अजेंडा असणारे जनतावादी नेते लोकांनी सत्तेवर आणले होते. विरोधी पक्ष एक झाले तर लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवतात. सत्ताबदल होतो. हा विश्वास या सत्तांतरातून आला होता. भारतातल्या लोकशाही व्यवस्थेचं सौंदर्य म्हणून या इतिहासाकडे पाहता येतं.

तो इतिहास समोर आहे म्हणूनच गुहा मोदी विरोधकांच्या ऐक्याची भन्नाट कल्पना मांडताना दिसतात. त्यात नीतिशकुमार यांची जमेची बाजू अशी की, त्यांचा पक्ष बिहारपुरता मर्यादित असला तरी त्यांचा उदय ज्या जनता दल परिवारातून झालाय, त्या परिवाराची एकजुट झाली तर ते शंभर खासदार निवडून आणू शकतात. ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, कर्नाटकचे एच.डी. देवेगौडा, उत्तरप्रदेशातील अखिलेश यादव, अजित सिंग, हरियाणाचे चौटाला बंधू, लालूप्रसाद यादव यांचे पक्ष या जनता परिवाराचेच घटक आहेत. या सर्वांशी नीतिशकुमारांचा संवाद आहे.

गुहा यांनी मांडलेला नीतिशकुमारांच्या नेतृत्वाचा फॉर्म्युला काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांतले घटक किती गांभीर्यानं घेतात, जनता दल परिवार नीतिशकुमारांमागे किती एकजुटीने उभा राहील, मोदींबद्दल लोकांचा भ्रमनिरास कितपत वाढेल, या मुद्द्यांभोवती यापुढे भारताचं राजकारण घोटाळत राहताना आपल्याला दिसेल, एवढं मात्र या निमित्तानं नक्की म्हणता येईल.

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

prashant kuchekar

Thu , 20 July 2017

guhaanchaa formula barobar aahe.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......