अजूनकाही
चीनच्या पोलादी भिंतीला लोकशाहीच्या मागणीसाठी, लोकशाहीच्याच मार्गानं अखंड धडका मारणारा आणि आणि तिआनमेन चौकात थेट माओच्या रणगाड्यांना भिडणारा लू श्याबाओ अखेर वयाच्या ६१ व्या वर्षी विकोपाला गेलेल्या कॅन्सरनं तुरुंगाच्या गजाआडच १३ जुलै रोजी मरण पावला.
२०१० सालातील शांततेचं नोबेल प्राईझ मिळवणारा हा चीनमधील लोकशाहीवादी नेता आयुष्याची १६ वर्षं तुरुंगातच होता. त्याला, त्याच्या पत्नीला वा कोणाही चिनी नागरिकाला त्याच्या वतीनं हा नोबेल पुरस्कार कम्युनिस्ट सरकारनं स्वीकारू दिला नाही.
वयाच्या २२ व्या वर्षी चिनी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठात दाखल झालेल्या या तरुणानं 'Innocent Heart' हा कविताप्रेमींचा गट नावारूपाला आणला. 'कन्फ्यूशिअस' या चीनच्या परंपरागत तत्त्वज्ञानालाही तो आव्हान देऊ लागला. खुलेआम विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मागू लागला. लिखाणाच्या शैलीनं आणि ओजस्वी वक्तृत्वानं देश-विदेश गाजवू लागला. वयाच्या पंचविशीतच तो कोलंबिया, हवाई यांसारख्या युरोप, अमेरिकेतील नामवंत विद्यापीठांत व्याख्यानं देण्यासाठी जाऊ लागला. सरकारच्या निर्बंधांमुळे विदेशातच राहून तो चीनमधील विद्यार्थ्यांना व तरुणांना जागं करू लागला.
तरुण आणि तडफदार विचारांच्या लू ची प्रतिभा चीनच्या पोलादी वातावरणात एकदमच लक्ष वेधून घेणारी होती. सरकार सांगेल तोच इतिहास, तेच तत्त्वज्ञान आणि तोच एकमेव प्रगतीचा मार्ग मानणाऱ्या या झापडबंद बौद्धिक वर्तुळात लू 'डार्क हॉर्स' या टोपण नावानं ओळखला जाऊ लागला. परंपरागत विचारांना नाकारताना त्यानं दाखवलेल्या मनस्वी निर्धाराचं 'लू शॉक्स' म्हणून वर्णन केलं जाऊ लागलं! लि-जेहोउ हा ८० च्या दशकात चीनच्या तत्त्वज्ञान क्षेत्रातील चमकत तारा होता. मार्क्स आणि कांटचे माणूस, समाज आणि देश या बद्दलचे विचार तो चिनी पार्श्वभूमीवर नव्यानं मांडत होता. लू श्याबाओनं लि-जेहोउच्या मांडणीला आक्षेप घेत संपूर्ण व सर्वंकष मानवी स्वातंत्र्याचं तत्त्वज्ञान मांडायला सुरुवात केली. ‘पर्यायांची चिकित्सा व लि-जेहोउशी संवाद’ हे त्याचं पुस्तक चीनमध्ये विक्रीचा उच्चांक मोडू लागलं. अर्थात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला ना प्रोफेसर लि-जेहोउ आवडले, ना हा तरुण अभ्यासक लू श्याबाओ रुचला. दोघांनाही विजनवासात जावं लागलं. ली परदेशात आश्रय घेऊन स्थायिक झाले, तर लू कारावासात मरण पावला.
२७ एप्रिल, १९८९. चीनमधील हजारो तरुण लोकशाहीच्या मागणीसाठी तिआनमेन चौकात एकत्र जमले आणि या लढ्यासाठी लू जीवावर उदार होऊन चीनमध्ये परत आला. सरकारनं या विद्यार्थ्यांवर शस्त्र चालवू नये म्हणून तो त्याच्या तीन साथीदारांना घेऊन थेट रणगाड्यांच्या पुढेच तीन दिवस उपोषण करत बसून राहिला. आणि मग बघता बघता या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा 'हिरो' बनला. समाजाच्या एका वर्गाला कायमच शत्रू म्हणून बघण्याचं मार्क्स, लेनिन आणि माओचं तत्त्वज्ञान चिनी सरकारनं कायमचं फेकून द्यावं आणि संवाद, सामोपचार, सहभागाचं धोरण स्वीकारावं असे जीव तोडून त्या रणगाड्यांच्या पुढे उभा राहून तो सांगू लागला. सरकारचा एकूण नूर पाहून त्यानं अखेरीस त्या हजारो विद्यार्थ्यांना चौक सोडायला राजी केलं आणि बराच मोठा रक्तपात टाळला. 'चार सभ्य माणसं' या पदवीने त्याला व त्याच्या साथीदारांना विद्यार्थ्यांनी गौरवलं तर 'पिसाळलेला कुत्रा' ही पदवी त्याला सरकारी वर्तमानपत्रांनी दिली.
लोकशाहीच्या मागणीसाठी झालेलं हे मोठं, पण अयशस्वी आंदोलन हा लूच्या जीवनाला कलाटणी देणारा टप्पा ठरला. तो कम्युनिस्ट सरकारचा शत्रू ठरला आणि तिथंच सुरू झाली ती एक प्रचंड ताकदवान सरकार आणि तेव्हढ्याच मानसिक ताकदीच्या प्रतिभावान व्यक्तीची लढाई. घरावर पहारे, स्थानबद्धता, नातेवाईकांचा छळ, वाचन वा लिखाणावर बंदी, देशद्रोहाची आरोपपत्रं, न्यायालयात बचावाचं निवेदन करण्यासही बंदी असा हा जीवघेणा संघर्ष सतत २७ वर्षं चालू राहिला आणि अखेरीस संपला तो त्याच्या तुरुंगातील मृत्यूनेच!
तुरुंगात असताना, २००० साली लिओ यु या आपल्या एका मित्राला लू ने अतिशय मार्मिक पत्रं लिहिलं. ज्यात तो म्हणतो, “आपल्या राष्ट्राचा हरवलेला आत्मा आपल्याला शोधायचा असेल आणि चीनच्या नागरिकांना त्यांचा आदर्श आध्यात्मिक आवाज बुलंद करायचा असेल तर देशासाठी, लोकांसाठी सर्वस्वाचा होम करणारा तत्त्ववेत्ता जन्माला आला पाहिजे. गांधी नावाचा महापुरुष भारतात उदयाला आला आणि त्यानं देशालाच एक आवाज आणि आत्मा मिळवून दिला. कोणत्याही देशात खरं स्वातंत्र्य निर्माण होतं ते हुकूमशाही विचारांना सक्रिय विरोध करण्याचं बळ कुणीतरी दाखवलं तरच!”
२००८ साली त्यानं चीनच्या लोकशाहीचा आठ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून मोठी खळबळ उडवली. व्यक्तिस्वातंत्र्य, अनेक पक्षीय लोकशाही, कम्युनिस्ट विचारप्रणालीचा विरोध या साठी त्यानं शेकडो कविता, लेख आणि पत्रं तैवान, हाँगकाँग येथून प्रकाशित केली. ते जगभर पोहचलं. त्याला तुरुंगातून सोडावं म्हणून सलमान रश्दींसारख्या जगातील अनेक नामवंतांनी कायम प्रयत्न केले.
'I have no enemies, no hatred' हे त्याचं पत्र हा निर्भय मनाचा, लोकशाही प्रेमाचा आणि उदार अंतःकरणाचा पुरावा आहे. नोबेल पारितोषिक वितरणाच्या समारंभात या पत्राचं जाहीर वाचन करून लूच्या सन्मानार्थ व्यासपीठावर मांडलेल्या एका रिकाम्या खुर्चीवर त्याचं पारितोषिक ठेवलं गेलं.
“कम्युनिस्टांच्या विळख्यात सापडलेल्या या देशावर पश्चिमेतल्या एखाद्या देशानं किमान ३०० वर्षं राज्य केलं, तरच तिथं लोकशाही आणि समतेचं युग येईल” असं तो उपहासाने म्हणत असे.
“चीनमध्ये मानवी मूलभूत अधिकारांची जी राजरोस पायमल्ली होत आहे, त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी मला पाश्चिमात्य सभ्यतेचा आणि संस्कृतीचा हत्यार म्हणून उपयोग करणं भाग आहे. अर्थात पश्चिमेकडेही सर्व काही आलबेल आहे असं नाही. पश्चिमेकडील जी मूल्यं मला अयोग्य वाटतात, त्यांच्याशी मी माझी स्वतःची सृजनता (Creativity) वापरून सामना करेन. परिस्थितीनं मला अशा विचित्र पेचात पकडलं आहे!” अशी प्रांजळ कबुली त्यानं एका लेखात दिली आहे.
राजरोस हिंसा करणाऱ्या काश्मीर वा अन्य भागातील अतिरेक्यांचा कैवार घेऊन रोज निदर्शनं करणाऱ्या भारतातील लालभाईंना आणि त्यांच्या साथीदारांना लू चे नाव ओठावर आणणंदेखील गुन्हा वाटतो. त्याची पाठराखण तर सोडाच, पण त्याच्याविषयी मौन बाळगण्यातच भारतातल्या मानवाधिकाऱ्यांनी धन्यता मानली.
नक्षलवाद्यांना उघड उघड समर्थन देत त्यांच्या सशस्त्र लढ्याला सहानुभूती दाखवणारे, त्यांच्याशी गुप्त पत्रव्यवहार केल्याचा आरोप असणारे प्रा.साईबाबा, विनायक सेन हे आमच्या साम्यवाद्यांचे आणि समाजवाद्यांचे 'हिरो', तर चीनमध्ये अहिंसक मार्गानं लोकशाहीसाठी, व्यक्तीच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी मरेपर्यंत आवाज उठवणारा लू श्याबाओ मात्र त्यांचा कट्टर शत्रू!
त्याच्या ढासळत्या प्रकृतीच्या बातम्या कम्युनिस्टांनी दडपल्याच आणि चायना मेडिकल हॉस्पिटलला त्याला उपचारांसाठी दाखल केलं, तो आता नक्की मरणार याची खात्री झाल्यावरच. जेव्हा त्याची स्थिती अत्यंत खालावली तेव्हा, म्हणजे मृत्यूच्या केवळ २० दिवस आधी त्याला मेडिकल पॅरोल देऊन तुरुंगातून मुक्त करण्यात आलं. जगातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी लू वर उपचार करण्याची, त्यासाठी चीनला येण्याची तयारी दाखवली होती, पण सरकारनं त्याच्या प्रकृतीविषयी बातम्या द्यायलाही हॉस्पिटलला बंदी केली होती.
लू श्य्यीया या आपल्या प्रिय पत्नीला लू आपल्या सामर्थ्याचा सर्वोच्च स्रोत मानायचा. तीच त्याची एकमेव प्रेरणास्थान होती. सरकारचा प्रचंड छळ सोशत ही कवयित्री कायम लू च्या सोबत राहिली. त्याला तुरुंगाबाहेरील जगाशी जोडणारी एकमेव दूत बनली. तिच्याविषयी लू आपल्या एका कवितेत लिहितो,
The glitter of the outside world
scares me
exhausts me
I focus on
your darkness –
simple and impenetrable...
चीनमध्ये कधी लोकशाही अवतरलीच तर त्या प्रसिद्ध तिआनमेन चौकात पिढ्यापिढ्यांना प्रेरणा देणारा ज्याचा पुतळा उभा राहील, असा हा आपला शेजारी लू श्याबाओ आणि असा हा त्याचा संघर्ष!
“एखादा गांधी आमच्या चीनमध्येही जन्माला यावा...” असं म्हणणाऱ्या या निर्भय वीराला श्रद्धांजली!
लेखक हैदराबाद येथील Vignana Bharathi Institute of Technologyमध्ये प्राध्यापक व उप-प्राचार्य आहेत.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment